पुणे- भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे भाजपा वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडरच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यात आला.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, गोपाळ तिवारी, पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष वॉशिंग मशीन ठेवून त्यावर भाजपा वॉशिंग मशीन असे लिहिले होते. तसेच सोबत मोदी वॉशिंग पावडरही ठेवण्यात आली होती.
याप्रसंगी विविध घोषणांचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते – ‘इडी, सीबीआय, इनकम टॅसचे डाग धुवून मिळतील भाजपा वॉशिंग मशीन‘ ‘भारत मे पाप धोने के दो तरीके हैं… १) गंगा में स्नान २) BJP में छलांग…‘ ‘ मोदी वॉशिंग पावडर‘ अशा अनेक अभिनव घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआय आदिंचा वापर करुन भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणार्या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल असे ते म्हणाले.या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, रमेश अय्यर, शाणी नौशाद, रजनी ताई त्रिभुवन, राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, अनिल सोंडकर, नुरुद्दीन सोमजी, मंजूर शेख, प्रशांत सुरसे, भूषण रानबरे, अजय पाटील, चैतन्य पुरंदरे, भरत सुराणा, मारुती माने, प्रवीण करपे, रमेश सकट, शोएब इनामदार, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, अजित जाधव, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, ओंकार मोरे, विशाल मलके, आशिष व्यवहारे, सुरेश कांबळे, गौरव बोराडे, नीलेश बोराटे, शाबीरखान आयुब पठाण, किशोर मारणे, संकेत गलांडे, साजिद शेख, प्रा. वाल्मिकी जगताप, सोमेश्वर बालगुडे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अंजली सोलापुरे, सुविधा त्रिभुवन, डॉ. गिरीजा शिंदे, सोनिया ओव्हाळ, आस्मा शेख, संगीता थोरात, ज्योती परदेशी, रेश्मा शिलेगावकर, कांता डोने, कविता गायकवाड, पपीता सोनवणे, मंदाकिनी नलावडे, शिवाजी सोनार, शिवाजी भोईटे, जीवन चाकणकर, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजू शेख, विजय वारभुवन, ऋषिकेश बालगुडे, राजू नाणेकर, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, जयकुमार ठोंबरे, निलेश मोटा, दीपक ओव्हळ, अॅनड. राजेंद्र काळबेर, फैय्याज शेख, असलम बागवान, नूर शेख, गणेश काकडे, रमेश राऊत, राजेश जाधव, डॉ. साठे, प्रसन्न मोरे, अनुप बेगी, अक्षय सोनवणे, गणेश साळुंखे, राजू देवकर, मंगेश थोरवे, गोरख पळसकर, साहिल राऊत, बंडू शेंडगे, विनायक तामकर, नरेश नलावडे, धनंजय भिलारे, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबासाहेब गुंजाळ, निलेश धुमाळ, उमेश काची, सागर कांबळे, नितीन जैन, रफिक आलमेल, रनजीत गायकवाड, सुरेश नांगरे, सादिक लुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
काँग्रेसचे भाजपाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध तीव्र आंदोलन-
जिल्हा प्रशासनाच्यावतीने महिन्याभरात १ लाख ३४ हजार दाखल्याचे वितरण
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणतेही दाखले अडविले नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण
पुणे, दि. ९: जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे दाखले वितरण करणे रोखले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे. गेल्या सुमारे महिनाभराच्या कालावधीत विविध प्रकारचे सुमारे १ लाख ३४ हजार दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने १ जून ते ९ जुलै २०२३ या कालावधीत शपथपत्रासह नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र नुतनीकरण ३, उत्पन्नाचा दाखला ७७ हजार ८२१, रहिवासी दाखला २ हजार ६७३, वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास दाखला २४ हजार ६३५, पतदारी प्रमाणपत्र २३, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३५५, अल्पभूधारक दाखला ४३४, नॉन क्रिमिलियर नूतनीकरण प्रमाणपत्र १७, जातीचा दाखला ६ हजार ९७५, शपथपत्रासह
जातीचा दाखला ९२१, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ८ हजार १६८, शपथपत्रासह नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र १ हजार ८५, शेतकरी प्रमाणपत्र ५८४, भूमिहीन प्रमाणपत्र ६४, ३३ टक्के महिला आरक्षण प्रमाणपत्र ४३०, आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र ९ हजार २९४, केंद्र सरकारसाठी आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र ५००, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला २६३ असे एकूण १ लाख ३४ हजार २४५ दाखल्याचे नागरीक व विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.
यापूर्वी जिल्ह्यात तालुकास्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करुन नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण आले आहे. दाखले वाटपाची प्रकिया ही निरंतर चालणारी प्रकिया आहे. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी कोणत्याही प्रकारची दाखले अडविले नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आले आहे.
0000
देव, यश्वीने पटकावले विजेतेपदसुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा
पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सब-ज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत पालघरच्या देव रुपारेलिया आणि पुण्याच्या यश्वी पटेल यांनी अनुक्रमे १५ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत पालघरच्या देव रुपारेलियाने पुण्याच्या साचेत त्रिपाठीला २१-८, २१-१३ असे सहज पराभूत केले आणि विजेतेपद पटकावले.
पहिली गेम अगदीच एकतर्फी झाली. देवच्या आक्रमक खेळासमोर साचेत निष्प्रभ ठरला. देवच्या बॉडी स्मॅशेसने साचेतला निरुत्तर केले. देवचे क्रॉस कोर्टचे फटकेही सुरेख होते. नेटजवळ खेळताना त्याने चपळाई दाखवली. दुसऱ्या गेममध्ये साचेतने थोडा फार प्रतिकार केला. मात्र, तो पुरेसा ठरला नाही. देवने त्याला पुनरागमनाची संधी दिली नाही. देवने साचेतवर अवघ्या २५ मिनिटांत मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत देवने नागपूरच्या ऋत्वा साजवानला २१-१९, २१-१४ असा ४३ मिनिटांत पराभूत केले, तर साचेतने ठाण्याच्या यश सिन्हाचे आव्हान १८-२१, २१-८, २१-१५ असे परतवून लावले. ही लढत ४५ मिनिटे रंगली.
या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या शौर्या माधवीवर २१-११, २१-१५ अशी मात करून जेतेपद निश्चित केले. ही लढत ३० मिनिटे चालली. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला थोडी चुरस बघायला मिळाली. मात्र, नंतर यश्वीने शौर्यावर वर्चस्व राखले. तिने बेसलाइनवरून अप्रतिम खेळ केला. तिच्या रिटर्नच्या फटक्यांचे प्रत्युत्तर शौर्याकडे नव्हते. दुसऱ्या गेममध्ये शौर्याने आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तिला यश आले नाही. विश्रांतीनंतर यश्वीने आक्रमक खेळ केला आणि शौर्याला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत शौर्याने कोल्हापूरच्या दक्षायणी पाटीलला २३-२१, २१-१६ असे ३७ मिनिटांत पराभूत केले, तर यश्वी पटेलने गाथा सूर्यवंशीचे आव्हान २१-१७, २१-१५ असे ३८ मिनिटांत परतवून लावले.
हर्षित माहीमकर-केतकी थिटेला जेतेपद
स्पर्धेतील १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीत हर्षित माहीमकर आणि केतकी थिटे जोडीने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत या जोडीने अंतिम फेरीत सार्थक नलावडे आणि ऋतिका कांबळे जोडीला २१-१३, २१-१८ असे पराभूत केले. उपांत्य फेरीत हर्षित-केतकी जोडीने ओम निऱ्हाळे-अनन्या शिंदे जोडीला २१-१०, २१-१४ असे, तर सार्थ-ऋतिका जोडीने ईशान वानखेडे-तन्वी घारपुरे जोडीला २५-२३, २१-१८ असे नमविले. १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत अवधूत कदम (पुणे) आणि ऋत्वा साजवान (नागपूर) जोडीने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत अवधूत – ऋत्वा जोडीने अर्जुन खांडेकर-अर्णव पळशीकर जोडीला २१-१४, २१-१६ असे नमविले. १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत नागपूरच्या रिधीमा सरपटे-शौर्या माधवी जोडीने बाजी मारली. या जोडीने अंतिम फेरीत गाथा सूर्यवंशी-प्रांजल शिंदे जोडीवर ११-२१, २१-१८, २१-१५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून जेतेपद पटकावले.
ताल नृत्य अकॅडमीच्या वतीने अरंगेत्रम संपन्न
पुणे:ताल नृत्य अकॅडमी च्या वतीने नृत्य गुरू सौ प्रेरणा तुळजापूरकर यांच्या शिष्या कु. यइरा पाटील, नेहा बागडे,सायली दरेकर ,अक्षता जोशी यांचे अरंगेत्रम आज पत्रकार भवन येथे संपन्न झाले ह्या चारही विद्यार्थीनी गेल्या ९ वर्षांपासून नृत्यगुरु प्रेरणा तुळजापूरकर यांच्याकडे भरतनाट्यम शिकत आहेत या प्रसंगी प्रमुख म्हणून प्रसिद्ध संगीत संयोजक प्रसाद घोटवडेकर, रुपाली बंगाळे आणि नंदादीप शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती श्यामा मराठे, ह्या उपस्थित होत्या ह्या वेळी भारत नाट्यम च्या विविध छटा ह्या विद्यार्थ्यांनीनी उलगडून दाखवल्या ताल नृत्य अकॅडमी गेल्या १५वर्षांपासून नृत्यसाधनेच्या माध्यमातून नृत्यांगना घडवत आहे संस्थेच्या महाराष्ट्रात तसेच युरोप मध्ये शाखा आहेत अजून लवकरच देशात शाखा चालू करण्याचा मानस प्रेरणा तुळजापूरकर यांनी यावेळी बोलून दाखवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी कदम आणि संजना सुखदरे यांनी केले
टोमॅटो खूपच महाग..म्हणताच विक्र्त्याने ग्राहकाला बडविले…
टोमॅटो महाग पण ना शेतकऱ्याला पैसे मिळतात ,ना किरकोळ विक्रेत्यांना ..ग्राहकांना भुर्दंड मग पैसे खातोय कोण ?
पुणे-राज्यात टोमॅटोचे दराने उच्चांक गाठलेला असताना एका व्यापाराला टोमॅटो २० रुपये पावशेर ..खूपच महाग म्हणल्याने त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट ग्राहकाला शिवीगाळ करत वजन काट्याच्या लोखंडी वजनाने ग्राहकाला मारलं. यात ग्राहक जखमी झाला असून व्यापाऱ्याविरोधात ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील वडगावशेरी भाजी मार्केट पुणे, येथे सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल गायकवाड (रा.वडगावशेरी, पुणे) असे या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२ रा. गलांडेनगर, मदर तेरेसा नगर स्कुलजवळ वडगाव पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
वडगाव शेरी भाजी मार्केट पुणे येथे फिर्यादी भाजी घेण्यासाठी गेले असताना, भाजी विक्रेत्याला टोमॅटोचा भाव विचारला असता त्याने टोमॅटो २० रु पाव असल्याचे सांगितले. तेव्हा फिर्यादी व्यापाराला म्हणाला २० रुपये पावशेर भाव खूप महाग आहे. फिर्यादी असं म्हणताच व्यापाऱ्याचा राग अनावर झाला, त्याने थेट फिर्यादीला शिविगाळ सुरू केली.
शिविगाळ का करतो, याचा जाब विचारला असता आरोपी व्यापाऱ्याने फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने वजन काट्याच्या लोखंडी मापाने फिर्यादीला मारहाण केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे.
एकाच पक्षाचे सरकार अन हुकुमशाही हेच भाजपाचे ध्येय..पृथ्वीराज चव्हाण
सातारा – भाजपला हुकूमशाही प्रस्थापित करायची असल्याचे मी सांगत आलो आहे. अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेसमुक्त भारत म्हणणे म्हणजे त्यांना विरोधी पक्षच नको आहे. छोटे पक्षही नको आहेत. केवळ भाजपचेच सरकार आणि हुकूमशाही हवी आहे. त्यामुळे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने नेले जात आहे. हे होऊन द्यायचे की नाही ते लोकांच्याच हातात आहे.असे सांगत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 45 आमदारांमधील 30 किंवा त्याहून अधिक आमदार फुटून बाहेर पडण्याची सूतराम शक्यता नसल्याचा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेबाबत जे घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडले आहे. त्यात नेते सोडून गेले असले तरी जनता जाणार नाही, याचा प्रत्यय लवकरच येईल. पक्षफुटीचे राजकारण मी अनेकदा पाहिलेले आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात लोक येतात अन् जातातही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये यापूर्वी विविध पक्षांमधून गेलेले लोक म्हणजे लोकाची गर्दी आहे. या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हा प्रश्नच आहे. राज्य सरकारला साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्तीही रखडलेली आहे. हे सारे वाटते तितके सोपे नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आजची राजकीय स्थिती पाहता सर्वसामान्यांचा स्वतःवरच विश्वास राहिला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत केवळ नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांना निवडून कोणी दिले? अमिषांना बळी कोण पडले? हेही पहाणे महत्वाचे असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले.
कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार
कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची नामदार पाटील यांची ग्वाही
पुणे-कोथरुडमधील कर्वे रस्ता येथील व्यापाऱ्यांची पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला; आणि पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल आभार मानले. व्यापाऱ्यांच्या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.
कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी स्थानिक व्यावसायिकांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १९ जून रोजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर आणि व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.
या बैठकीत कर्वे रस्त्यावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश दिले होते.
पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध आहे; अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली. तसेच जिथे वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा दिला होता.पालकमंत्र्यांच्या कार्यतत्परतेप्रती सर्व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, याबद्दल नामदार पाटील यांचा आज सत्कार करुन, आभार मानले. या सत्काराप्रती नामदार पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करुन, कोथरुडमधील प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी दिली.
दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचे बोर्ड लावण्याबाबत अद्याप कार्यवाही झाली नसल्याची बाब व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, याबाबत विचारणा केली. त्यावर दोघांनीही आगामी आठ दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचे बोर्ड लावण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे आश्वास्त केले.
तसेच, भाजपा सरकारने २०१६ मध्ये व्यापारी वर्गाच्या अडचणी लक्षात घेऊन; व्यापारी आस्थापनेच्या नावे दर्शविणारे नामफलक लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, शासनाच्या सदर निर्णयाची पुणे शहरात योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याची बाब व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी नामदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या. तसेच, व्यापाऱ्यांच्या अन्य समस्यांसाठी ही पाठपुरावा करु, असे आश्वास्त केले.
यावेळी कर्वे रस्ता व्यापारी आस्थापनेचे संस्थापक हस्तीमलजी चंगेडिया, उपाध्यक्ष बक्षरसिंग तलवार, अजित सांगळे, सचिव सुमतीलाल लोढा, संजीव गुजर, खजिनदार राजेश मेहता, शैलेश संत, हरिश पटेल, तेजस महाडिक, नंदू भेटवरा, क्षमा वाघ, पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, मनसेचे हेमंत संभूस उपस्थित होते.
आमदार अपात्र प्रकरणी नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय …
मुंबई-विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 15 आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्रता प्रकरणात नोटीसा बजावल्या आहेत. तर सात दिवसात त्यावर मत मांडण्याचे सांगितले आहे. त्यातच आता या कार्यवाहीला गती येवू लागली आहे.आता नार्वेकरांनी दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. जर आमदारांना लेखी उत्तरे देता आले नाही. तर त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडता येणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटासह ठाकरे गटाचे आमदार काय करतात हेच पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.एक वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत 40 आमदारांसह बंड केले होते. त्यानंतर त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती. या घटनेने राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. तर आत्ताही याच प्रकरणी ठाकरे गटाकडून आमदार सुनिल प्रभू यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे. विधिमंडळानं निवडणूक आयोगाकडे तत्कालीन शिवसेनेच्या घटनेची प्रत मागवून घेतली आहे. त्यासाठी औपचारिक पत्रही देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मोठा निर्णय येऊ शकतो, अशी माहिती विधिमंडळातील खात्रीलायक सुत्रांकडून दिली जात आहे. या कार्यवाहीत गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना देखील सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना म्हणणं मांडण्याची संधी दिली शक्यता आहे, तसंच गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलटतपासणीही घेतली जाईल. तसंच दोन्ही गटांना पुरावेही सादर करावे लागणार आहेत. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष आधी निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.काही दिवसांपूर्वी मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलं. निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असं सूचक वक्तव्य नार्वेकरांनी केलं होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाराष्ट्राच्या या केसच्या सुनावणीदरम्यान अध्यक्षांकडे निर्णय देताना कालमर्यादा असावी की नाही यावरही युक्तीवाद झाले होते. म्हणजे शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनीही हवं तर अध्यक्षांना 2-3 महिन्यांत निर्णय घ्यायला सांगा, पण निर्णय तेच घेतील असं म्हटलं होते होते. कोणाचे आमदार पात्र आणि कोणाचे आमदार अपात्र? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्याकडे तर आहेच, मात्र कोणाचा गट हा खरा पक्ष आहे? हे ठरवण्याचे अधिकार देखील नार्वेकरांनाच आहेत. असं राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. अशातच आता राहुल नार्वेकरांनी क्रांतीकारी निर्णयाबाबत केलेल्या सूचक वक्तव्यामुळे आता नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शरद पवारांची साथ का सोडली ? दिलीप वळसे पाटील काय म्हणाले….
पुणे : ज्याचं वय ३७ वर्षे आहे. मला आज राजकारणात येऊन ४० वर्षे झाली आहेत. माझे अनुभव पाहता त्याचं वय कमी आहे. त्यांनी एक पोस्ट टाकली की साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं?

माझी आणि रोहित पवारांची एकदा भेट झाली. तुमच्या मतदारसंघाचा प्रश्न असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि तुम्ही आंबेगाव विधानसभेतून उभे रहा. त्यामुळे या व्यतिरिक्त माझं कोणतेही भांडण नाही. मी साहेबांच्या कुटुंबाविरोधात कधीच जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मंचर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात दरम्यान हे वक्तव्य केले आहे. डिंभे धरणाच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं.ईडीमुळे मी साहेबांची साथ सोडली नाही. मी जाहीर करतो. मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची नोटीस आलेली नाही. कुठलंही वैयक्तिक हित यामागे नाही. एका विद्वानाने सांगितलं की पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून हा निर्णय घेतला. माझा आणि या डेअरीचा काडीचाही संबंध नाही. आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचा या डेअरी सोबत एक रुपयाचाही संबंध नाही. १९८८ मध्ये देवेंद्र शहा यांची आणि माझी ओळख झाली. रामकृष्ण मोरे आले तेव्हा मैत्री झाली. शरद बँकेच्या प्रमोटरमध्ये देवेंद्र शाह यांचे वडील होते, असे वळले पाटील म्हणाले.एकनाथ शिंदे जेव्हा सगळे आमदार घेऊन गेले, तेव्हा दिलीप वळसे यांनी गृहमंत्री म्हणून मदत केली, असा आरोप करण्यात आला. आता साधा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे गेल्यावर माझंही पद जाणार आहे, मी ही सत्तेबाहेर असणार. उलट उद्धव ठाकरेंना सहा महिन्यांपासून आम्ही सांगत होतो, तुमचे आमदार फुटणार आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना कळवलं होतं. मग मी मदत करण्याचा प्रश्न येतो कुठं? असे म्हणत वळसे पाटील यांनी आरोप फेटाळून लावला. शरद पवार यांचे समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा आरोप केला होता.आज आपण वेगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केलेलं आहे. नुकत्याच काही राजकीय घडामोडी घडल्या, त्यामाध्यमातून राज्यात नवीन समीकरण जुळून आलीत. अजितदादांच्या सोबतीने मी ही मंत्रिमंडळमध्ये सहभागी झालो. आपण हा निर्णय घेतला असला तरी आपण कोणी ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. आपली राष्ट्रवादी स्वतंत्र राहणार आहे. त्याद्वारेच आपण आपलं काम करणार आहोत, असं वळसे पाटील यांनी सांगितलं.माझ्यासमोर मोठा पेच होता. मधल्या काळात एक घटना घडली. पाठ बंधारे विभागाकडे एक प्रस्ताव आला. डिंभे धरणाचे पाणी बोगदा करून पलीकडे न्यायचं. पाणी आपली वैयक्तिक मालमत्ता नाही. अहमदनगर जिल्ह्याचा मी पालकमंत्री होतो, तेंव्हा पाण्यावरून वाद होऊ दिला नाही. मग मी पवार साहेबांकडे गेलो, दोन तीन बैठकाही झाल्या. पण ७१२ मीटर बोगद्यावर घ्यायचं ठरलं. मात्र या सरकारने निर्णय घेतला की बोगदा एकदम धरणाच्या तळाला घ्यायचा. देवेंद्र फडणवीस यांनी तसा प्रस्ताव पाठवला ही आहे. डिंभे चा बोगदा जेंव्हा व्हायचा तेंव्हा होईल. आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर तालुक्यात जे ६५ बंधारे बांधले आहेत. हे बंधारे पावसाने भरेल तितकंच पाणी मिळेल, धरणातून पाणी मिळणार नाही, असं सरकार म्हटलं. या परिसरात पाच साखर कारखाने आहेत, मग उसाला पाणी मिळालं नाही आणि ऊस पिकले नाही तर शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिघडून जाईल. म्हणून आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मी काय हयातभर आमदार राहणार नाही. मात्र अशी परिस्थिती झाली तर आपला परिसर दुष्काळ झाल्याशिवाय राहणार नाही. हे मनाला खटकत होतं. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवार साहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. काही लोक म्हणतील की सत्तेच्या बाहेर राहून ही झालं असतं. मात्र अशा कामांना सत्तेत राहणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे,ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे…छगन भुजबळ
मुंबई– शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे. ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे साथीदार का सोडून गेले, याचा विचार शरद पवारांनी करावा.शरद पवारांना माफी मागावी लागेल, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवार आता काय 40-50 मतदारसंघात माफी मागतील काय?शरद पवारांची विकासाबाबत जी भूमिका आहे, त्यानुसारच मी येवल्यात विकासकामे केली आहेत. तरीही माझ्यावर एवढा राग काढण्याचे कारण काय?, असा सवाल कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांना केला आहे.
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी शनिवारपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. पहिलीच सभा त्यांनी बंडखोर छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली. यावेळी राजकारणात माझे अंदाज कधी चुकले नाहीत, पण येवल्यात चुकला. तुम्ही ‘त्यांना’ (भुजबळांना) माझ्यामुळे चारदा निवडून दिले. मी टीका करण्यासाठी आलो नाही तर तुमची माफी मागण्यास आलोय, असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केली होती. याला छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.
छगन भुजबळ म्हणाले, येवलामध्ये मला उमेदवारी दिली म्हणून शरद पवारांनी काल येवलावासियांची माफी मागितली. माफी मागण्याचे कोणतेही कारण नव्हते. शरद पवारांनी माफी मागावी, असे कोणतेही काम मी येवल्यात केलेले नाही. शरद पवारांनी काल येवला येथे माफी मागितली तर यापुढे जिथे जिथे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत गेले त्या सर्व मतदारसंघात ते माफी मागणार आहेत काय? शरद पवार आता काय 40-50 मतदारसंघात माफी मागतील काय?
छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर या निर्णयाविरोधात शरद पवार पहिली सभा दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव या मतदारसंघात घेणार होते. मात्र, त्यांनी ती सभा रद्द केली आणि माझ्या येवला मतदारसंघात सभा घेतली. कदाचित शरद पवारांचे माझ्यावर अधिक प्रेम असावे, म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतली असावी. कदाचित शरद पवार यांना वाटत असेल की, जे काही झाल त्यामागे माझी मोठी भूमिका असेल. मात्र, असा समज करून घेणे चुकीचे आहे. शरद पवारांच्या घरातूनच बंड झाले आहे. ते का झाले? याचे आत्मपरिक्षण शरद पवार यांनी करावे. प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे साथीदार का सोडून गेले, याचा विचार शरद पवारांनी करावा.
छगन भुजबळ म्हणाले, निवडणुकीत मला शरद पवारांनी येवला मतदारसंघ का दिला, याचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. विधानसभेसाठी 2004 मध्ये माझ्यासाठी एरंडाेल, जुन्नर, वैजापूर, येवला हे पर्याय होते. वडिलांचे गाव असल्याने मला जुन्नरमधूनच लढायचे होते. पण कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने मी जुन्नरऐवजी येवल्यात लढलो. येवला हे मागासलेले असल्याने येथे विकासाचे काम करण्याची संधी होती. त्यामुळेच मी येवल्याचा आग्रह धरला होता. आणि येथून आमदार झाल्यावर मी येथे विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
2014 मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, असे शरद पवारांनी भाजपला सांगितले होते. आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यानंतर 2017 व 2019मध्येही शरद पवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपशी चर्चा केली. शरद पवारांनीच शिवसेनेला भाजपपासून दूर केले, असा गौप्यस्फोटही छगन भुजबळ यांनी केला.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत-अपर मुख्य सचिव राजेश कुमार
पुणे दि. ९: राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने संस्था स्वबळावर उभी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन साधने शोधावीत आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सुरू करावेत, असे प्रतिपादन सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.
राजेश कुमार यांनी तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला शनिवारी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, संचालक डॉ. सुभाष घुले, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.
राजेश कुमार म्हणाले, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. दूरच्या प्रशिक्षणार्थीना लाभ मिळण्यासाठी संस्थेने समाज माध्यमाचा वापर वाढवावा. ‘मॅग्नेट’ प्रकल्पातून संस्थेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजासाठी काही घटक घेता येतील का याचाही विचार करावा. राज्यात काही ठिकाणी संस्थेच्या शाखा सुरू करता येतील का याचीही चाचपणी करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
श्री. कोकरे यांनी संस्थेविषयी माहिती दिली. संस्थेत १३ विषयावरील प्रशिक्षण देण्यात येत असून आजपर्यंत संस्थेने ६१ हजार ३०० प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान ही संस्था पणन मंडळाने १९९८ मध्ये स्थापन केली असून बाहेरच्या राज्यातील प्रशिक्षणार्थीही मोठ्या प्रमाणात येथे प्रशिक्षणासाठी येत असतात, अशी माहिती श्री.कदम यांनी दिली.
डॉ. घुले यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी राजेश कुमार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
जेजुरीच्या माजी नगरसेवक महेबुब पानसरे खून प्रकरणी दोघांना अटक
पुणे-जेजुरी येथील माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे, रा. जेजुरी, पुणे यांचा निर्घुन खुन करणा-या मुख्य दोन आरोपीना अटक केल्याची माहिती पुणे पोलिसांनी येथे दिली. १) वनीस प्रल्हाद परदेशी, रा.४०४, गुरुवार पेठ, पुणे मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे २) महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी, वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत .
पोलीस आयुक्त,रितेश कुमार यांनी पुणे व पुणे शहर परिसरातील खुन, जबरी चोरी अशा गंभीर गुन्हयातील वांटेड आरोपींचा शोध घेवुन त्यांना अटक करुन प्रतिबंध कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पुणे शहर परिसरात गुन्हे शाखेतर्फे कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची चेकींग मोहिम कारवाई सुरु करण्यात आली होती.दिनांक ०७/०७/२०२३ रोजी धालेवाडी, जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घुन खुन करण्यात आला होता. त्याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३०१ / २०२३ भादविक ३०२, ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९,३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयांची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्तरितेश कुमार व सह पोलीस आयुक्तसंदिप कर्णिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकरीता पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे सो, गुन्हे पुणे शहर यांना सुचना केल्या होत्या.दिनांक ०८/०७/२०२३ रोजी सहा पोलीस आयुक्त सतिश गोवेकर सो, गुन्हे २, पुणे शहर यांना नमूद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) वनीस प्रल्हाद परदेशी, रा.४०४, गुरुवार पेठ, पुणे मुळगाव रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे २) महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी, वय ६५ वर्षे, रा. ढालेवाडी, बेंद वस्ती, जेजुरी, पुणे, मुळगाव मु. पो. वाजेगाव, ता. फलटण, जि. सातारा ( अटक) हे दोघे जण डेक्कन परिसरात येणार आहे अशी गोपनीय बातमी मिळाली.
त्यानुसार पोलीस उप आयुक्तअमोल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा डेक्कन परिसरातुन शोध घेवुन त्यांना पकडून दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचा प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाले. या आरोपींनी त्यांचे इतर साथीदारासह वरील नमूद गुन्हा केला असल्याचे कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांना पुढील कारवाई कामी जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मा. सह पोलीस आयुक्त मा.अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांनी केली .
कोणत्याही लोकशाहीत खुन्याचे उदात्तीकरण होत नाही, पण, भारतात हे वर्षानुवर्षे चालू आहे….अशोककुमार पांडेय
पुणे :कोणत्याही लोकशाहीत खुन्याचे उदात्तीकरण होत नाही, पण, भारतात हे वर्षानुवर्षे चालू आहे, असे वक्तव्य येथे ज्येष्ठ लेखक अशोककुमार पांडेय यांनी केले आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय ‘ गांधी दर्शन शिबिराला ‘ चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे झाले. ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ मालिकेतील हे चौथे शिबीर होते.या शिबिरात ज्येष्ठ लेखक अशोककुमार पांडेय यांनी ‘राष्ट्रपिता म्हणून गांधीजींचे स्थान’ या विषयावर,प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी ‘गांधी-आंबेडकर आणि देशाचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी ‘सत्याग्रह शास्त्र’ या विषयावर मार्गदर्शन केले.
सचिन पांडुळे यांनी सूत्रसंचालन केले. सुदर्शन चखाले यांनी प्रास्ताविक केले. नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. अॅड. राजेंद्र दुरुगकर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. जांबुवंत मनोहर, संदीप बर्वे, मिलिंद गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अशोककुमार पांडेय म्हणाले, ‘ देश भौगोलिक अस्तित्व नसते, तर वैचारिक रुप ,ओळख असते.गांधी विचारधारा, सशस्त्र क्रांतीची विचारधारा, धर्म वादी विचारधारा स्वातंत्र्यपूर्व काळात उपस्थित होत्या. धर्माधिष्ठीत राष्ट्र हे त्यांचे स्वप्न होते. त्यांनी स्वातंत्र्यलढयात सहभाग घेतला नाही.
संविधान हेच आपल्या भारतीय विचारधारेचे सार आहे. विचारधारात्मक भारताचा जन्म गांधींजींमुळे झाला, ते जैविक पिता नव्हेत , तर वैचारिक जन्मदाते आहेत.सर्वप्रथम १९४२ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला होता. देशाने त्यांना राष्ट्रपिता मानले होते. महात्मा मानले होते.ही उपाधी कोणत्या नियमात , चौकटीत बांधता येत नाही. गांधीजींनी त्यांच्या अलौकिक जगण्यातून हा सन्मान प्राप्त केला होता.लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य गांधीजींच्या विचारधारेने दिल्याने त्यांच्या विरोधात बोलता आले, हे विसरून चालणार नाही. कोणत्याही लोकशाहीत खुन्याचे उदात्तीकरण होत नाही, पण, भारतात हे वर्षानुवर्षे चालू आहे.
पांडेय म्हणाले, ‘ स्वातंत्र्यलढयातील सर्व नेत्यांमध्ये कोणत्या मार्गाने जावे, याबद्दल मतभेद होत पण, त्यांचे ध्येयाबद्दल मतभेद नव्हते. मतभेद हे जिवंत लोकशाहीचे लक्षण होते, हुकूमशाहीत मतभेद होत नाहीत, तर हत्या होतात.’द्वी- राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारे जिना, सावरकर फाळणीला जबाबदार आहेत की हिंदू – मुस्लीम एकतेचा प्रयत्न करणारे गांधी फाळणीला जबाबदार आहेत, याचा विचार करावा ‘, असेही पांडेय म्हणाले.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ अस्पृश्यता निर्मूलनाचे मोठे काम गांधींजींनी केले. ५ हजार मंदिरे खुली झाली, हॉटेले खुली झाली. डॉ.आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात मतभेद होते, पण, आदरभावही होता. सत्याग्रहाला गांधीजींनी वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. हा मार्ग कायम दिशादर्शक राहिल
परराज्यातून येऊन आफिमची विक्री करणाऱ्या तरुणास अटक
पुणे-परराज्यातून येऊन आफिमची विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली. त्याच्याकडून 230 ग्राम आफीम जप्त करण्यात आले आहे. लाडूराम वागाराम बिष्णोई (वय-२०, रा. काकडे वस्ती, कोंढवा. मूळ रा. सरणाऊ, तहसील सांचोर जी. जारोल राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक एकचेपोलिस कर्मचारी विबवेवाडी भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळीपोलिस अंमलदार पाडुरंग पवार आणि सचिन माळवे यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली होती की, सुखसागर नगर येथील सायरा पॅलेस जवळील गल्ली नंबर 7 मध्ये परराज्यातील एक जण आफिम घेऊन येणार आहे. यावेळी एक जण संशयास्पद आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता 230 ग्राम आफिम आढळून आले. बाजारातील त्याची किंमत 4 लाख 60 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही कारवाईपोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपरपोलिस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यकपोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे १ वरिष्ठपोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यकपोलिस निरीक्षक शैलजा जानकर,पोलिस अंमलदार मारुती प्रधान, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदीप शिर्के यांनी केली.
महाविद्यालयाच्या परिसरातील पानपट्टीत गांजा,बंटा विक्री,परप्रांतीय पानपट्टीवाला गजाआड
पुणे : कर्वेनगर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरात पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या पानपट्टीचालकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. रामबाबू देवनारायण महातो (वय ३१, सध्या रा. कॅनोल रस्ता, कर्वेनगर, मूळ रा. रोहुवा, जि. सातावाडी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
महातो याची कर्वेनगरमधील कॅनोल रस्ता परिसरात गल्ली नंबर ८ च्यासमोर ओमसाई पानपट्टी आहे. या भागात महाविद्यालय असून, कॅनोल रस्ता परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी राहायला आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी पांडुरंग पवार, सचिन माळवे गस्त घालत होते. त्या वेळी महातो पानपट्टीत गांजा, तसेच भांगेच्या गोळ्यांची (बंटा) विक्री करत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या पथकाने महातोच्या पानपट्टीवर छापा टाकला. पानपट्टीतून ११० ग्रॅम गांजा, तीन किलो ५१५ ग्रॅम बंटा असा ४७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महातोविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, राहुल जोशी, सुजीत वाडेकर आदींनी ही कारवाई केली.
