Home Blog Page 1457

 शिंदे गटाला आणखी धक्का,अर्थ खाते अजित पवारांकडे?

जीआर काढला पण अर्थमंत्र्यांचे नावच दिले नाही.. याचा अर्थ हे खाते रिक्त

मुंबई-ज्या अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्री असताना आपल्याला निधी दिला नाही, असा आरोप करत शिंदे गट मविआतून बाहेर पडला, त्याच अजित पवारांकडे आता अर्थखाते जाण्याची शक्यता आहे. सध्या शिंदे सरकारमध्ये अर्थ खात्याचा कारभार देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. मात्र, शासनाच्या एका जीआरमुळे या खात्यात लवकरच बदल होण्याचे संकेत दिले जात असून हे खाते अजितदादांकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्य सरकारने एक जीआर जारी केला आहे. 7 जुलै 2023चा हा जीआर आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. जीआरनुसार एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे. या समितीत सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत, अतुल सावे यांचाही समावेश आहे. या सर्वांच्या नावापुढे ते कोणत्या खात्याचे मंत्री आहेत, हे स्पष्ट सांगण्यात आले आहे. मुनगंटीवार यांच्या नावापुढे कंसात वनमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुडे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही.

विशेष बाब म्हणजे या जीआरमध्ये पाच सदस्यांच्या यादीत फडणवीस यांच्यानंतर एक पद रिक्त ठेवले आहे. त्यात फक्त अर्थमंत्री असा उल्लेख केला आहे. अर्थमंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थखाते फडणवीस यांच्याकडे असतानाही फडणवीस यांचा उल्लेख तिथे करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्रीपद अजित पवार यांनाच दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

अजित पवार महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते. तेव्हा त्यांनी निधी दिला नाही, त्यामुळे मतदारसंघाचा विकास होत नसल्याचं सांगत शिवसेनेच्या नेत्यांनी बंड केले. आता तेच अजित पवार शिंदे सरकारमध्ये आले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाली आहे. त्यातच त्यांना अर्थमंत्रीपद देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदे गटाकडून या निर्णयाला विरोध होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिल्यास आपल्या बंडातील हवाच निघून जाईल, मतदारसंघात आपली नाचक्की होईल, उद्धव ठाकरेंवरील आरोप निखालस खोटे असून आपण 50 खोक्यांसाठीच बंड केल्याचं अधोरेखित होईल, अशी भीतीदेखील शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

पावसाळ्यातील आरोग्यविषयक तयारीचा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून आढावा

पुणे दि. ८: पावसाळ्यात उद्भवणारे आजार व पूर परिस्थितीत तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा पातळी व गाव पातळीपर्यंत केलेल्या आरोग्यसेवा तयारीचा आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आढावा घेतला.

दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले, जोखीमग्रस्त गावे ओळखून तिथे शीघ्र प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे व उद्रेक झाल्यास त्वरित उपाययोजना करण्यात यावी. पूर्वतयारीसाठी जिल्हा स्तरावरील अहवाल रोजच्या रोज तयार करण्यात यावा व त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र तपासून पाहावेत आणि पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही याची खात्री करावी.

जिल्ह्यातील समनव्यक अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करून ती प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अद्ययावत ठेवावी व राज्यस्तरावरही पाठवावी. साथरोग नियंत्रणासाठीच्या किट वाटप करण्यात याव्यात व त्याचा अहवाल तयार ठेवावा. आशाताई व आरोग्य कर्मचारी यांच्या याद्यासुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे ठेवण्यात याव्यात.

डास उत्पत्ती ठिकाणे यावरही लक्ष द्यावे व पाणीसाठे चांगले राहतील यावरही लोकसहभागाद्वारे नियंत्रण ठेवावे. शीघ्रकृती पथकाद्वारे करावयाचे कामे तसेच इतर सूचनांसाठी एक पुस्तिका तयार करण्यात यावी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपंचायत येथे साथ रोगाबाबतची माहिती देण्यासाठी फलक लावण्यात यावेत, अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य सचिव श्री.म्हैसकर यांनी साथ रोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. कठीण परिस्थितीत आरोग्य विभाग चांगली जबाबदारी पार पाडत असून पावसाळ्यातील आरोग्य परिस्थितीही व्यवस्थितपणे हाताळण्यास सर्वांनी सक्रिय रहावे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य विभागातील विभागीय आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्य विभागामार्फत पावसाळ्यातील डेंगू,मलेरिया, जापानी मेंदूजवर, लेप्टोस्पायरोसिस या आजारांना प्रतिबंधासाठी जोखीमग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. गृहभेटी व आरोग्य कर्मचाऱ्या मार्फत सर्वेक्षण व रुग्णशोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. आश्रम शाळा यांना वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या मार्फत नियमित भेटी देण्यात येत आहेत. पाणी गुणवत्ता नियंत्रण ७६ हजार पाणी नमुने तपासण्यात आले आहेत. पाण्याच्या स्रोतांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावांना हिरवे, पिवळे, लाल कार्ड देण्यात आले आहेत.

परिसर स्वच्छता, डासांपासून वैयक्तिक संरक्षणसाठी मच्छरदाणी, डास प्रतिबंधक क्रीम, खिडक्यांना जाळ्या बसविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले आहे. प्रयोगशाळा सिद्धता, पुरेसा औषध साठा,शीघ्र प्रतिसाद पथके यांची स्थापना आणि गाव पातळीवर साथ रोग सर्वेक्षण तसेच अंतर विभागीय समन्वय व आरोग्य शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

शेती समृद्धी; एक रूपयात पीक विमा !

विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यंत असणार आहे, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ पर्यंत साधारण रुपये २२हजार ६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

योजनेतील पिके

भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी(रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस, कांदा.

सहभागी शेतकरी

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे बंधनकारक आहे.

 योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत – ३१ जुलै २०२३

 सर्व पिकांसाठी जोखीमस्तरः ७० टक्के

 विमा हप्ता : सर्व पिकांसाठी प्रती अर्ज फक्त एक रुपया.

उंबरठा उत्पादन :

अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते.

यासाठी मिळेल संरक्षण

 पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.

 पीक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान : यात अपुरा पाऊस, हवामानातील इतर प्रतिकूल घटकांमुळे अधिसूचित मुख्य पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी/लावणी होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.

 हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर,पावसातील खंड,दुष्काळ इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०टक्यांहून अधिक घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.

 काढणी पश्चात चक्रीवादळ,अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास,भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

 युद्ध व युद्धजन्य परिस्थितीमुळे होणाऱ्या व हेतू पुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास विमा संरक्षण मिळत नाही.

ई-पीक पाहणी:

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणीमध्ये करावी. विमा योजनेत विमा घेतलेल्या पिकात आणि ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

या विमा कंपन्या देणार जिल्हानिहाय सेवा

भारतीय कृषी विमा कंपनी (वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, बीड), ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. (नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा), आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(परभणी,वर्धा, नागपूर),युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ( नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग),एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(हिंगोली,अकोला, धुळे,पुणे, उस्मानाबाद), युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(जालना, गोंदिया, कोल्हापूर), चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड),रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(यवतमाळ, अमरावती, गडचिरोली), एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लि.(लातूर),खरीप हंगामातील सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय फरक संभवतो

पीकनिहाय विमा संरक्षणाची रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

भात (₹ ४० हजार ते ५१ हजार ७६०),ज्वारी (₹ २० हजार ते ३२ हजार ५००),बाजरी (₹ १८ हजार ते ३३ हजार ९१३),नाचणी (₹ १३ हजार ७५० ते २० हजार ),मका (₹ ६ हजार ते ३५ हजार ५९८), तूर (₹ २५ हजार ते ३६ हजार ८०२),मूग (₹ २० हजार  ते २५ हजार ८१७),उडीद (₹ २० हजार ते २६ हजार ०२५),भुईमूग (₹ २९ हजार ते ४२ हजार ९७१),सोयाबीन (₹ ३१ हजार २५० ते ५७ हजार २६७),तीळ (₹ २२ हजार ते २५ हजार ),कारळे (₹ १३ हजार ७५०),कापूस (₹ २३ हजार ते ५९ हजार ९८३),कांदा (₹ ४६ हजार  ते ८१ हजार ४२२)

नुकसान भरपाईसाठी

 स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत नुकसानीची सूचना संबंधित शेतकऱ्याने संबंधित विमा कंपनीस कळविणे बंधनकारक. ही सूचना केंद्र शासन पीक विमा ॲप, संबंधित विमा कंपनी टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचे तालुका / जिल्हास्तरीय कार्यालय, संबंधित बँक, कृषी/महसूल विभागाद्वारे देण्यात यावी. यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.

 खरीप २०२३ च्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडल/ तालुक्यात पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम काढली जाते.

 सरासरी उत्पादन काढताना कापूस, सोयाबीन, भात या निवडक पिकाचे बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान द्वारे प्राप्त उत्पादनास ३० टक्के आणि पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास ७० टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. उर्वरित पिकांचे बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन गृहीत धरले जाणार आहे .

नुकसान भरपाई मिळण्यासाठी…

 नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आकस्मात नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत याबाबत केंद्र शासन पीक विमा APP, संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे.यात नुकसान ग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली जाते.

 संपूर्ण हंगामात विविध कारणांमुळे अधिसूचित क्षेत्रातील पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास वरील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते. सदर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याप्रमाणे नुकसान भरपाई त्यांचे बँक खात्यात जमा केली जाते.

 विमा योजनेतंर्गत सर्व प्रकारची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदविण्याची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी.

सहभागी होण्यासाठी…

 अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्या साठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळविणे गरजेचे आहे.

 इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देवून, हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोहोच पावती त्याने जपून ठेवावी.

 कॉमन सर्विस सेंटर आपले सरकार च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in  या पोर्टलचे साहाय्य घेऊ शकता.

महत्त्वाच्या नवीन बाबी

 या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. शेतातील पीक आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास ई पीक पाहणी मधील नोंद अंतिम धरण्यात येईल.म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी.

 या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रिमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ३० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास ७० टक्के भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे .

 भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पीक विमा पोर्टल वर अपलोड करावी लागेल.

 पीक विमा योजनेत सहभागी होण्यापूर्वी मयत असलेल्या शेतकऱ्याच्या नावे अथवा त्याचे नावे असलेल्या जमिनीवर विमा योजनेत भाग घेतल्याचे निदर्शनास असल्यास विमा अर्ज अपात्र होईल .

योजनेच्या अधिक व अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमा कंपनी , स्थानिक कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

नांदेड दि. ८ : नांदेड येथील १८ भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील १ असे १९ भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाड वरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोहोचून पुढे दिनांक ६ जुलै  रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. तथापि, खराब हवामानामुळे ते अमरनाथ गुफेपासून ६ किमी अलीकडील पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्प मध्ये सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यासंदर्भात आढावा घेवून तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे  जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून संबंधितांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

१. अनिल पांपटवार, २. संजय मनाठकर,  ३. राजेंद्र मनाठकर, ४. मंजुषा दमकोंडवार, ५. अरुण दमकोंडवार, ६. प्रवीण सोनवणे, ७. विजया सोनवणे, ८. विजयनाथ तोनशुरे, ९. शिवकांता तोनशुरे, १०. सुरेखा पत्रे, ११. शामल देशमुख, १२. प्रमोद देशपांडे, १३. मंजुषा देशपांडे, १४. मिसेस कडबे, १५. तुकाराम कैळवाड, १६. पंकज शीरभाते, १७. प्रणिता शिरभाते, १८. आकुलवार, १९. निलेश मेहेत्रे अशी आहेत.

अधिक माहितीसाठी नातलगांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांच्याशी +91 94228 75808 या मोबाईल क्रमांकावर साधावा.

शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयूसह पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
गडचिरोली, दि.८: ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे आज जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे, विधानसभा सदस्य देवराव होळी, विधानसभा सदस्य कृष्णा गजबे, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मिणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरु केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे अशी प्रचिती जनतेला येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. लोकहितासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४०० पेक्षा अधिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना निवडायचे उद्दिष्ट होते. मात्र गडचिरोलीने सर्व रेकॉर्ड तोडून जवळपास ७ लाख लोकांना लाभ दिला आहे. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्के लाभार्थी हे अति दुर्गम भागातील आहेत असे सांगून छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.
मी मुख्यमंत्री असताना येथील खनिज प्रकल्पाला चालना दिली. येथेच गुंतवणूक, येथेच रोजगार आणि नफा सुद्धा गडचिरोलीमध्येच हे धोरण अवलंबिले. ३० हजार कोटींची गुंतवणूक गडचिरोलीसाठी मंजूर करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी देण्यात आल्या आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देवून कृषी विद्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे असे ते म्हणाले. तसेच गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे मोठे उद्योगही येथे येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील एकही आदिवासी घरकुलापासून वंचित राहणार नाही, सर्वांना योजनेतून घरकुल उपलब्ध करुन देण्याची ग्वाहीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

प्रस्तावित विमानतळ व समृद्धीमुळे जिल्ह्यात विकासाचा वेग वाढेल- उपमुख्यमंत्री अजित पवार


जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील युवकांना जास्तीत- जास्त रोजगार मिळाल्यास इतर घटकांकडून होणारा त्रास होणार नाही. तसेच लोकांच्या डोक्यातून नक्षलवादही संपेल असेही ते म्हणाले.

मंत्री धर्मराव आत्राम यानीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर स्थानिक युवकांनी रेला हे पारंपारीक नृत्य सादर केले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्री यांनी युवकांबरोबर नृत्यात सहभाग घेतला.

योजनांच्या लाभ वितरणासह विविध मान्यवर, युवकांचा सन्मान


‘शासन आपल्या दारी’ निमित्त आयोजित महाशिबिरादरम्यान मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पद्मश्रीप्राप्त जेष्ट कलाकार परशुराम खुणे यांचा सन्मान करण्यात आला. १० मीटर शुटींगमध्ये राष्ट्रीय विजेता महेश ठवरे, सिकई मार्शल आर्टमधील एंजल देवकुले यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजनांमधील लाभार्थ्यांना वैयक्तिक योजनांचे लाभही प्रातिनिधिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. यात जानु मट्टामी (शबरी आवास), राजेश मडावी (गोडावून अंतर्गत चेक वाटप), नंदा सयाम (मानव विकास-वाहन), तानुबाई गावडे (श्रावणबाळ पेंशन योजना) राधा तुमरेडी (संजय गांधी निराधार) यांना योजनांचा लाभ देण्यात आला. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, सायकल, रिक्षा, घंटागाडी, शेतीपयोगी यंत्रसामुग्री, दिव्यांगांना सायकली आदी साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

निवासी शाळा, वसतीगृह, आयसीयू, पोलीस प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलांची शासकीय निवासी शाळा, गडचिरोली मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह (गुणवंत), गडचिरोली, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, चामोर्शी या दोन वसतीगृह व एक शासकीय निवासी शाळा या इमारतींचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत ४२ खाटांचे पेडियाट्रिक मॉड्युलर आयसीयू, कोविड-१९ कार्यक्रम कृती आराखड्यांतर्गत ५० खाटांचे मॉड्युलर आयसीयूचेही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. पोलीस विभागाच्या मुरूमगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.

०००

पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

दामिनी पथक सक्षम करण्यासाठी सहकार्य करणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि. ८ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, दिलीप मोहिते, उमा खापरे, पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवावी. त्यासाठी वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील दिशा उपक्रमात सहभागी ७ अशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सहभाग वाढवावा. ज्येष्ठ नागरिक कक्षाद्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.

नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयातील बरासचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार असून गस्त घालण्यासाठी वाहनांची मदत होईल. पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माफी मागायला आलोय, भुजबळांबद्दलचा अंदाज चुकला म्हणत शरद पवारांची येवल्यात जोरदार बॅटींग; वयाचा उल्लेख केला, तर महागात पडेल असा इशारा

येवला -अजित पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार यांची शनिवारी नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी अजित पवारांसोबत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर तिखट हल्ला चढवला. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचे मतदारांना आवाहन केले. येवला हा भुजबळांचा विधानसभा मतदार संघ असल्यामुळे पवारांच्या येथील सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 यावेळी शरद पवार म्हणाले, १०-१२ दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला. वेगवेगळे आरोप केले. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. त्यांनी त्यांच्या भाषणात एक-दोन उदाहरणं सांगितली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे काही आरोप केले असतील, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी काही असेल, त्यावर त्यांनी कारवाई करावी.

शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझा छगन भुजबळांविषयची अंदाज चुकला. यासाठी मी तुमची माफी मागण्यास आलोय, असे त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले. तर त्यांनी विविध विषयाला हात लावत जुन्या जाणत्या नेत्यांची आठवण करत नाशिककरांनी मला जोरदार साथ दिली आहे. असे सांगितले. संकटाच्या काळात येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडी काय अजून पाहिलाच नाही?
व्यक्तिगत बोलणे कधीच थांबत नसते. वय झाले ते खरे आहे पण गडी काय आहे अजून पाहिला कुठे, असे सांगत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला. त्यामुळे उगं वयाबियाच्या भानगडीत पडू नका, वय आणि व्यक्तीगत भावना आम्हाला कोणी शिकवू नये. व्यक्तिगत हल्ले कधी अजिबात झालेले नाही. ते त्यांनी करू देखील नाही. या जनतेच्या विश्वासाला ज्या पद्धतीने तडा दिला. ते चुकीचे आहे.

एकीकडे बाप म्हणायचे दुसरीकडे घाव घालायचा- जितेंद्र आव्हाड

14 आमदार नाशिकरांनी दिली आहे. येवल्यांच्या बंधू बघिणींना सांगतो की, गोपिनाथ मुंडें यांचे मोठे भाऊ पंडीतराव मुंडे हे शरद पवार साहेबांकडे तीनदा गेले आहेत. त्यांनी पवार साहेबांना तीनदा विनंती केली आहे. आम्हाला तुमच्याबरोबर यायचे आहे. तेव्हा त्यांनी नकार दिला. आज भुजबळ बोलतात की, गोपिनाथ मुंडे यांचे घर फोडले? या आरोपाला काहीही अर्थ नाही. तेव्हा पवार साहेबांनी गोपिनाथ मुंडे यांना फोन करून सांगितले आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने निघाले आहोत. महाराष्ट्राचे स्वभावामध्ये विठ्ठलावर तलवार चालविणे, एकीकडे बाप म्हणायचे दुसरीकडे घाव घालायचा. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले.

गोदावरी काठचा पवित्र जिल्हा निवडला. तुमचा कांदा, द्राक्षावर संकट आले तेव्हा हा माणूस उभा राहिला. भुजबळ देखील 75 वर्षांचे आहात. वय हे अंक आहे. हे समजून घ्या. त्यांना पंतप्रधान ना, ना राष्ट्रपती व्हायचा आहे. आता त्यांना दलित, शोषित एकच नाव आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे. शरद पवार. आपला बापाला आधार म्हणून उभे राहायचे आहे. त्यांच्या पाठिशी उभे राहायचे आहे, असे आव्हान त्यांनी केले.

निती, अनितीची ही लढाई

अमोल कोल्हे म्हणाले की, कुरूक्षेत्रासारखी परिस्थिती सद्या राज्यात आहे. समोर रक्ताची माणसं आहे. तेव्हा लढाई रक्ताच्या नात्यांशी आहे. पण यात निती, अनितीची ही लढाई आहे. या लढाईत खडा कोणी टाकला तर तो शकुनी मामाने. अन् तो शकुनी मामाचा आकार कमळाच्या फूलासारखे आहे की, टरबूजासारखा. हे जनताच ठरवेल. आणि या शकूनी मामाला दूर करून आपल्याला पक्ष संघटन करत लढाई लढायची आहे.

अच्छे दिन दिसलेच नाही
अमोल कोल्हे यांनी पुढे बोलताना मोदी सरकारवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, आता अच्छे दिन दिसलेच नाही. वारंवार पक्ष फोडले का जाताहेत. महागाई कमी झाली का? नोकरी मिळणार होती त्या मिळाल्या का? आज जेव्हा देशातील परिस्थिती बघा, सगळीकडे भाजपला हद्दपार करायला लोक लागले. तेव्हा अशाप्रकारे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पण मतदारांचा विश्वास उडाला आहे. कारण मतदारांना बोटावरील शाई ही चुना वाटायला लागली आहे.

त्यांना पांडुरंग समजला नाही
काही जण म्हणतात की, पांडुरंगाला बडव्यांनी घेरले. पण त्यांना पांडुरंग समजलाच समजलाच नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप त्यांच्याकडून करून संधीसाधूचा डाव साधला जात आहे. अशा लोकांना येत्या निवडणूकीत नक्कीच जागा दाखवायची आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी केला.

सुळे,कोल्हे, आव्हाड, रोहित पवारांचे शक्तिप्रदर्शन
येवल्यातील सभा संपल्यानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या रॅलीला नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भुजबळांच्या येवल्यात राष्ट्रवादी पवार गटाकडून झालेल्या शक्तीप्रदर्शनाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …

नाशिक : नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लाव अशी प्रार्थना वरुणराजाकडे केल्याचे माध्यमांना सांगितले.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. चीनचे संकट देशावर आल्यानंतर जवाहरलाल नेहरुंनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतले आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी संरक्षण मंत्री म्हणून दिली. चव्हाणसाहेबांचा लोकसभेत प्रवेश हा नाशिकमधून झाला होता. नाशिककरांनी त्यांना अविरत साथ दिली ही पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आपल्या कामाची सुरुवात नाशिकमधून करावी वाटल्याने आज दौऱ्याची सुरुवात केल्याचे शरद पवार पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.छगन भुजबळ यांचा मुंबईत पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभेत आपली आवश्यकता असल्याची इच्छा व्यक्त केली आणि मग नाशिकच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर येवल्यातून निवडणूक लढवावी असे सूचवले. येवला आमच्या विचारांचा तालुका आहे. १९८० साली आम्ही कॉंग्रेसमधून बाहेर पडलो. कॉंग्रेस (एस) पक्ष स्थापन केला. त्यावेळी नाशिककरांनी सर्व जागा आम्हाला निवडून दिल्या. लागोपाठ दोनदा जर्नादन पाटील हे निवडून आले होते. त्यामुळे भुजबळसाहेबांना सेफ जागा द्यायची होती म्हणून त्या मतदारसंघातील लोकांची संमती घेतली व आम्हाला यश आले असेही छगन भुजबळ यांना येवला मतदारसंघ कसा दिला याचा इतिहास शरद पवार यांनी माध्यमांना सांगितला.वयानुसार थांबले पाहिजे या अजितदादा पवार यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील ‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’ …या ओळीची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.आताच्या मंत्रीमंडळात ६० ते ७० वयोगटातील लोक आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक व्यक्ती माझ्या नजरेसमोर होती त्यांचे नाव मोरारजी देसाई होते. ते पंतप्रधान असताना त्यांचे ८४ वय होते. वय असते… नाही असे नाही… पण केवळ वयच नाही तर प्रकृती चांगली ठेवली तर त्या प्रकृतीने चांगली कामे करायला वय कधी अडथळे आणत नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पेट्राेल पंपावर दराेडा टाकण्याचे तयारीत असलेल्या टोळीला पकडले

पुणे-लाेहगाव वाघाेली रस्त्यावरील इंडियन ऑईल पेट्राेल पंपावर दराेडा टाकण्याचे तयारीत असलेल्या एका टाेळीला विमानतळ पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी पाच आराेपींना अटक करण्यात आली असून त्यांचेवर विमानतळ पोलिस ठाण्यात दराेडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ ) उमेश राम गायकवाड वय ३० वर्षे रा.साडेसतरा नळी साई मंदीराजवळ हडपसर पुणे ०२) सुर्यकांत धोंडिबा रासगे वय ४२ वर्षे रा.राजीव गांधीनगर रासगे आळी मुंढवा पुणे ०३) संतोष हरिदास गायकवाड वय ३७ वर्षे रा. रेणुका माता मंदीराजवळ गायरान वस्ती केशवनगर मुंढवा पुणे ०४) नितीन शंकर जाधव वय २९ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा पुणे ०५) शेखर सिताराम गायकवाड वय ५८ वर्षे रा. सर्वोदय कॉलनी मुंढवाअशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपाेनि विजय चंदन, पाेऊनि रविंद्र ढावरे असे पथकासह पोलिस स्टेशनचे हद्दीत गस्त घालत हाेते. त्यावेळी पोलिस नाईक अंकुश जाेगदंडे यांना माहिती मिळाली की, फाॅरेस्ट पार्क मधून लाेहगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे उत्तरेस असणारे भिंतीलगत चार ते पाच व्यक्ती झाडीत बसले असून त्यांचेकडे हत्यारे आहे. त्यांच्यात आपआपसात चर्चा चाललेली असून ते एखादा माेठा गुन्हा करण्याची शक्यता आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पाच आराेपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून कटावणी, स्कू ड्रायव्हर, हेक्साब्लेड , दाेरी, मिरची पुड असे दराेडयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, रंजन कुमार शर्मा पोलीस उप आयुक्त, शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी, सपोनि विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, सचिन कदम, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, नाना कर्चे, गिरीष नाणेकर, योगेश थोपटे, विशाल निलख, दादा बर्डे, ज्ञानेश्वर आवारी यांचे पथकाने केलेली आहे.

 दरोडेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार, एक पोलिस जखमी, 5 जणांना पकडले चौघे पळाले

पुणे-वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय एटीएम लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पकडण्याची कारवाई करताना दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला.या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. या थरारावेळी एका आरोपीने धारदार कोयता पोलिसांवर फेकून मारले. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.पोलीस उप-निरीक्षक नेमणुक गुन्हे शाखा युनिट ३,चे राहुल पवार यांनी यासंदर्भात फिर्याद नोंदविलीआहे.१) अमोल अंकुश लामतुरे वय २७ वर्षे रा. आंनदनगर पोस्ट ऑफिसजवळ, लातुर सध्या रा. पुणे रेल्वे स्टेशन परीसर २) राजु पुनीचंद शिंदे वय ३९ वर्षे रा. पुणे स्टेशन परीसरात ३) सचिन मारूती खैरे वय ३० वर्षे रा. मु. पो. भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे ४) गणेश मारुती खैरे वय ३२ वर्षे रा. स. नं. ३३, सुभाष बराटे चाळ, दत्तनगर, वारजेगाव, पुणे ५) अक्षय उध्दव सोळुंके वय २२ वर्षे रा. स. नं. ३३, सुभाष बराटे चाळ, दत्तनगर, वारजे गाव, पुणे या ५ जणांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांचे ४ साथीदार मात्र यावेळी पळून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,वारजे येथे एटीएम लुटण्याच्या तयारीत एक संशयित दरोडेखोरांची टोळी तयारीत होती. दरम्यान, पुणे पोलिसांतर्फे शोध मोहीम सुरू असतांना त्याना हा प्रकार त्यांना दिसला. संबधित दरोडेखोरांना पोलिस अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील बंदूक पोलिसांवर रोखली. दरम्यान, एका आरोपीने गोळी झाडल्याने तसेच एकाने कोयता फेकून मारल्याने एक पोलिस कर्मचारी दरोडेखोर आणि पोलिस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत जखमी झाला आहे.पोलिसांचे गुन्हे शाखेचे एक पथक हे रात्री एकच्या दरम्यान गस्त घालत होते. यावेळी कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ३ चे अधिकारी व कर्मचारी , एसीपी सुनील तांबे वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा वसाहतीजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएम मशीन जवळ आठ ते दहाजण हे एटीएम लुटण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना दिसले. या दरोडे खोरांना पकडण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, युनिट 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार व युनिट तीनचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलिस पथकाच्या दिशेने पिस्तुल रोखले.

यावेळी आरोपींनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. पोलिस पथकाने आरोपीच्या दिशेने फायरींग केले. यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलिस शिपाई कट्टे यांच्या दिशेन कोयता फेकून मारल्याने ते जखमी झाले. दरम्यान, आरोपी पळून जात असतांना पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर इतर पाच आरोपी हे अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला असून इतर आरोपींचा शोध चालू आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एक गावठी कट्टा , चार राऊंड, दोन लोखंडी कोयते, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर ,हातोडा असा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (मो.नं. ९७०२८५१८६७) यापाराक्र्णी तपास करत आहेत .

शिक्रापूर ते तळेगाव :पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत

तुटलेल्या ४०० केव्ही वीजवाहिनीची दुरुस्ती सुरू

पुणे, दि. ०८ जुलै २०२३: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाबाची एक वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्यामुळे तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीचा भार इतर वीजवाहिन्यांवर देण्यात आला व भारव्यवस्थापनाद्वारे या सर्वच भागात दुपारी १२.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सूरु करण्यात आला आहे.

पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्चदाबाच्या चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी ९.०३ वाजता तुटली. त्यामुळे सुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले होते. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने इतर वीजवाहिन्यांवर हा भार देत भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण व महापारेषणला यश आले. त्यामुळे बाधीत झालेल्या पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ, रांजणगावचा काही भाग आदी परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने दुपारी पाऊण वाजता सुरु करण्यात आला. त्यामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.  

दरम्यान, पॉवर ग्रीडच्या तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. आज सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर इतर वाहिन्यांवर देण्यात आलेला वीजभार या वाहिनीवर पूर्ववत देण्यात येईल.

मी अजितला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपद दिले, तीनदा DCM केले…सुप्रियाला काय दिले? तुम्हीच तुलना करा!

मुंबई तक नामक न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले ….

अजित पवारांना काही कमी केले नाही

सुप्रियाला नव्हे इतरांना संधी दिली.

घराणेशाहीचे आरोप निराधार

मुंबई-अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रे्समध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे विखुरलेला पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरेलत. अजित पवारांनी बंडखोरी करताना पवारांवर सुप्रिया सुळेंमुळे आपल्याला संधी देण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. पवारांनी मुंबई तक नामक न्यूज पोर्टलशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले – मी अजितला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्रीपद दिले. तीन-चारदा उपमुख्यंमत्रीही केले. याऊलट सुप्रियाला काय दिले? तुम्हीच तुलना करा.

अजित पवारांनी बंडखोरी करताना ते तुमचे पुत्र नाहीत म्हणून त्यांना संधी मिळाली नाही, असा आरोप केला. हे सर्वकाही उत्तराधिकारी निवडल्यामुळे घडले का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना केला होता. त्यावर शरद पवार म्हणाले. माझी यावर जास्त बोलण्याची इच्छा नाही. विशेषतः कुटुंबाशी संबंधित मुद्यावर मला फार बोलायाचे नाही. ते मला आवडतही नाही. केवळ एकच गोष्ट मी तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो की, अजित पवार यांना सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री केले. एवढेच नाही तर त्यांना तीन ते चारवेळा उपमुख्यमंत्री म्हणूनही संधी दिली.

शरद पवार पुढे म्हणाले की, आता ते सुप्रियाविषयी बोलत आहेत. तुम्हीच तुलना करा. एकाला तीन-चारवेळा उपमुख्यमंत्री व एकदा मंत्रीपद दिले. आणि दुसऱ्याला एकही असे महत्त्वाचे पद दिले नाही. केंद्रीय पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेत्याला मंत्रीपदाची संधी मिळाली, तेव्हा आम्ही सूर्यकांता पाटील यांना संधी दिली. त्यावेळी सुप्रिया सुद्धा खासदार होती. त्यानंतर पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाली, तेव्हा पी ए संगमा यांच्या मुलीला संधी देण्यात आली. तेव्हाही सुप्रिया संसदेत उपस्थित होत्या. त्यानंतर तिसऱ्या वेळी प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्यात आली. पण मी सुप्रियाला एकदाही मंत्रीपदाची संधी दिली नाही, असे पवार म्हणाले.

प्रफुल्ल पटेलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आल्या असतानाही मी इतर लोकांना संधी दिली, असे शरद पवार आपल्यावर होणारे घराणेशाहीचे आरोप निराधार असल्याचा दावा करत म्हणाले.

पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा गेम प्लॅन भाजपच्या मुख्यालयात तयार झाला आहे. ते जसे सांगत आहेत, तसे आमचे सहकारी करत आहेत. यापेक्षा कोणतीही वेगळी गोष्ट नाही, असेही शरद पवार यावेळी अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधताना म्हणाले.

भुजबळांबद्दल शरद पवार म्हणाले ….यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं

माझा अंदाज योग्य ठरला नाही, हा माझा दोष

नाशिक -राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली.यानंतर शरद पवार हे जोमाने पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. पक्षातील बंडानंतर त्यांची आज पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी शरद पवरांनी नाशिक येथे पत्रकारपरिषद घेतली.अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान दोन वर्ष तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यांच्या वाईट काळात त्यांच्यावर विश्वास दाखवला. ते भुजबळ तुम्हाला सोडून गेले याचं वाईट वाटतं का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.पवार म्हणाले की, यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझ्या स्वतःबद्दल वाटतं इतराबद्दलं नाही, तेही एकाच गोष्टीचं वाटतं की, माझा अंदाज योग्य ठरला नाही, हा माझा दोष आहे मी दुसऱ्याला दोष देणार नाही, असे शरद पवार म्हणाले. २०२४ मध्ये भुजबळांना लोक स्वीकारतील का? असे विचारले असता पवार म्हणाले की, जे आमच्या पासून दूर गेले त्यांच्याबद्दल भाष्यच करायला नको, लोक ठरवतील मी कोण ठरवणार.

४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड; पिंपरी, चिंचवड, उर्से, शिक्रापूर भागात वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. ०८ जुलै २०२३: पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान विजेची मागणी कमी असल्याने भार व्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. तर काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे.

याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी ९.०३ वाजता तुटली. त्यामुळे सुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले. परिणामी पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला.

       पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहे. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

अर्ध्या रात्री शिंदे:फडणवीसांत 2 तास चर्चा…

मुंबई: वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस हे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर रात्री एक वाजून चोवीस मिनीटांनी फडणवीस तेथून बाहेर पडले.राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिल्यामुळं शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. कारण या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळेत अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. त्याच अनुषंगाने रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळं आता पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारत नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या राज्यात सातत्यानं विविध राजकीय घडामोडी घडत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत गुवाहाटी गाठली होती. त्यांनतर त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यांनी देखील काही आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार हे पुन्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले तर अन्य राष्ट्रवादीच्या 8 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.