Home Blog Page 1458

भात लावणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये पोहोचले राहुल गांधी

दिल्ली-काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी हरियाणाच्या सोनीपतमध्ये शेतकऱ्यांसोबत शेतात भात लावताना दिसले. तसेच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी केली. शेतकरी व मजुरांशी संवाद साधताना शेतीबाबत चर्चा केली.वास्तविक राहुल गांधी दिल्लीहून शिमल्याला जात होते. सकाळी 7 च्या सुमारास वाटेत सोनीपतच्या मदिना गावात शेतकरी शेतात नांगरणी करत असताना त्यांनी त्यांचा ताफा थांबवला. शेतकऱ्यांमध्ये राहुल गांधी पोहोचले.

राहुल गांधींनी ट्रॅक्टर चालवला. शेतात भात लावला. राहुल याआधी दिल्लीतील बाईक मेकॅनिकच्या दुकानातही दिसले होते. ते हरियाणातच ट्रक चालवताना दिसले होते. सध्या ते वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळत आहेत.राहुल गांधी प्रथम सोनीपतहून गोहाना येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. तेथून भेसवण रोडमार्गे मदिना गावातील शेतात गेले.

कुरुलकरने पाकिस्तानी हेर महिलेला दिली ब्रह्मोस, राफेल विमानांची माहिती

पुणे-डीआरडीओ संशोधन आणि विकास विभाग संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर याने डीआरडीआेच्या आर अँड डीमधील विकसित केलेल्या प्रकल्पाबाबतची संवेदनशील माहिती पाकिस्तानी हेर झारादास गुप्ता हिला हस्तांतरित केल्याचे स्पष्ट झाले आहे. कुरुलकर याने झारादास गुप्तासोबत केलेले वेगवेगळे व्हाॅट्सअॅप चॅट तपास यंत्रणेस सापडले असून त्यात कुरुलकर याने ब्रह्मोस मिसाइल, अग्नी-६ मिसाइल, आकाश मिसाइल, अस्त्र क्षेपणास्त्र, ड्रोन प्रोजेक्ट, रुस्तम प्रोजेक्ट, क्वापटर, इंडियन निकुंज, पराशर, यूसीएव्ही, डीआरडीआे ड्यूटी चार्ट, मिसाइल लाँचर, मेटोर मिसात्तर्ल, एमबीडीए, राफेल आदींबाबत चर्चा करून त्यातील काही माहिती पुरवल्याचे दहशतवादविरोधी पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात सांगण्यात आले आहे.

एटीएसतर्फे डाॅ कुरुलकरविरोधात १८३७ पानी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांच्या न्यायालयात तपास अधिकारी सुजाता तानवडे यांनी दाखल केले आहे. शुक्रवारी संबंधित दोषारोपपत्राची प्रत डाॅ.कुरुलकर याच्या व्हिडिआे काॅन्फरन्सिंगमधील न्यायाधीशांसमोरील संमतीने त्याचे वकील ऋषिकेश गानू यांना दिली आहे. कुरुलकरच्या न्यायालयीन कोठडीत २१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कुरुलकर याच्या पाॅलिग्राफ चाचणीसाठी पोलिसांचे लेखी म्हणणे सादर करण्यास न्यायालयाने सांगितलेले आहे.

डॉ. कुरुलकर याच्याविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात एकूण २०३ साक्षीदारांचे जबाब नोंद केल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये डीआरडीओचे पुणे व दिल्ली येथील डीआरडीओ आरअँडडीईमधील स्टाफ व काही अधिकाऱ्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. दोषारोपपत्राबाबत दिल्लीतील गृह मंत्रालयाची मंजुरी, पत्रे, सर्व मूळ पंचनामे, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा पत्रव्यवहार, आरअँडडीईसोबत केलेला पत्रव्यवहार, तपास अधिकारी यांचे १६८ प्रमाणे अहवाल व स्टेशन डायरी, डीआरडीआेकडून प्राप्त झालेला आरोपी कुरुलकर याचा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा अॅनालिसिस रिपोर्ट, आरोपी व वाँटेड आरोपी याच्या मोबाइलचा तांत्रिक विश्लेषण अहवाल तसेच सोशल मीडियाबाबतचा अहवाल सादर केला आहे.

माहितीच्या गैरवापराचा ठपका

डॉ. कुरुलकर डीओरडीओत १० जून २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान संचालक पदावर कार्यरत होता. त्याने विविध गोपनीय माहिती परदेशी हस्तकास पुरवली. संरक्षण खात्याशी संबंधित माहिती तसेच भारताची सार्वभौमता, एकात्मता व परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असूनही तसेच देशाच्या सुरक्षिततेस बाधा येण्याची शक्यता असताना परकीय हस्तकांच्या फायद्यासाठी देशाच्या सुरक्षेस बाधक ठरेल, अशा पद्धतीने पदाचा गैरवापर केल्याचा ठपका कुरुलकरवर ठेवण्यात आला आहे.

हेर म्हणायची “बेब’

पाकिस्तानी हेर झारादास गुप्ता ही कुरुलकर याला ‘बेब’ नावाने बोलत होती. त्याच्या मोबाइलमध्ये तिने व्हिडिओ क्लिप पाठवण्यासाठी क्लाऊड चॅट, बिंगचॅट हे अॅप डाऊनलोड करण्यास लावले. तसेच तिने एक लिंक पाठवून त्यावर तिचा मेलआयडी, पासवर्ड टाकून ते अॅपदेखील त्याच्या मोबाइलवर इन्स्टाॅल करण्यास सांगितले. त्या माध्यमातून अग्नी-६ वापराबाबत माहिती दिली गेली. ‘मेंटॉर’ मिसाइलपेक्षा ‘अस्त्र मिसाइल’ जास्त अचूक लक्ष्य करते हेदेखील कुरुलकरने सांगितले.

पुणे महापालिकेच्या न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत

पुणे – पुणे महापालिकेच्या विविध विभागांची साडे तीन हजारापेक्षा जास्त खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. याचे कामकाज आठ न्यायाधीशांच्या माध्यमातून केले जात आहे. पण सध्याची जागा अपुरी पडत असल्याने व पूर्ण क्षमतेने न्यायालय चालावेत यासाठी महापालिका न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत बांधली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या बांधकाम, मिळकत कर, अतिक्रमण, पर्यावरण, आरोग्य, भूसंपादन यासह विविध विभागातील प्रकरणांचे खटले महापालिकेच्या जिल्हा न्यायालय, दिवाणी न्यायालय, प्रथम न्यायदंडाधिकारी, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद येथे सुरू आहेत.

या खटल्यांची संख्या पुणे महापालिकेच्या सर्वाच्च न्यायालयापासून ते पालिका न्यायालयापर्यंत तब्बल ३ हजार ८०० दावे प्रलंबित आहे. तर गेल्या एका वर्षापासून १ हजार प्रकरणांवर स्थगिती आहे, त्यांची पुढे सुनावणीच होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असून, त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी विधी विभाग, न्यायाधीश यांच्याशी नुकतीच चर्चा केली आहे. त्यामध्ये प्रलंबित खटले वेगाने काढण्यासाठी न्यायालये पूर्णवेळ चालविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पुरेशी जागा आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नवीन इमारत उभारून तेथे आठ न्यायालयांमध्ये एकाच वेळी कामकाज चालू शकेल अशी व्यवस्था केली जाणार आहे.

चर्मोद्योग महामंडळांतर्गत एनएसएफडीसी कर्जाच्या रकमेत वाढ; ४८०० लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, गोची, ढोर व होलार ) व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एनएसएफडीसी अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या योजनांसाठी चार हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट मिळाले आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता राज्य व केंद्र सरकारच्या (एनएसएफडीसी) योजनेसाठी  ४८०० लाभार्थींना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या योजनांतील मुदती कर्ज योजनेअंतर्गत लहान उद्योग १ लाख रुपये, दीड लाख व दोन लाख रुपये, चर्मोद्योग  दोन लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लहान उद्योगासाठी ५ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी १.४० लाख प्रकल्प मर्यादा तसेच एनएसएफडीसी यांची महिलांकरीता पाच लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे.

शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून देशामध्ये शिक्षणासाठी २० लाख व परदेशात शिक्षणासाठी ३० लाखांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती श्री. गजभिये यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासन आपल्या दारी अभियानात खडकीत १ हजार नागरिकांचा सहभाग-आमदार सिध्दार्थ शिरोळे

पुणे: राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी अभियान खडकी येथे शुक्रवारी राबविण्यात आले.त्यात १हजार नागरिकांनी सहभाग घेतला,अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

शासकीय दाखले आणि योजना एकाचं ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे तहसील कार्यालय या अंतर्गत नागरिकांना दाखले,योजना देण्यात आल्या.

सरकारी सेवा आणि लाभ मिळविण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत त्याचबरोबर महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा एकाच ठिकाणी मिळावीत याउद्देशाने मुख्य मंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आज (शुक्रवारी ) खडकी भागात शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात आले, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

शासनाच्या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील एक हजार नागरिकांनी उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, अशीही माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

या उपक्रमात धर्मेश शहा, गणेश बगाडे, दुर्योधन भापकर, अजित पवार, राहुल कांबळे, नेहाताई गोरे, संगिताताई गवळी, मुकेश गवळी, शाम काची, कार्तिकीताई हिवरकर, मनिषाताई कांबळे, जय शहा, रोहन मगर, नाना मोरे, सतीश बहिरट, रमेश भंडारी, अनिल भिसे, प्रकाश सोलंकी, बंडू कदम, तसेच भाजपा खडकी मंडलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

83 वर्षाच्या नेत्याला रोखायला ‘रणनीती’

येवल्यात शरद पवारांची सभा सुरु होईल तेव्हाच भुजबळांची नाशिक मध्ये रॅली सुरु होईल

टीव्हीवर सभा आणि रॅली दोन्ही एकाच वेळी दिसाव्यात असा राहील प्रयत्न ..

येवला- अजित पवारांच्या बंडामागे छगन भुजबळांची मोठी भूमिका लक्षात घेता शरद पवार पक्षफुटीनंतरची पहिली सभा ८ जुलैला येवल्यात घेणार आहेत.आणि याच वेळी भुजबळांनीही शक्ती दाखवत पवारांविरोधात नाशिकमध्ये रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे.आज शनिवारी दुपारी तीन वाजता येवला बाजार समितीच्या मैदानावर पवारांची सभा होणार आहे. स्थानिक नेते माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवारांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांची परतफेड म्हणून सभेला जास्तीत जास्त लोकांनी यावे अशी साद घातली जात आहे.

पवारांची सभा सुरू होईल त्याच वेळी इकडे भुजबळ यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे, जेणेकरून टीव्ही चॅनलमध्ये शेजारी-शेजारी दोन्ही घडामोडी लोकांना दिसतील व त्यातून संभाव्य डॅमेज कंट्रोल करता येईल अशी रणनीती भुजबळ कॅम्पने आखली आहे. दुपारी दोन वाजता भुजबळ इगतपुरीत येणार असून मुंबई-आग्रा महामार्गावर त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर पाथर्डी फाटा येथे त्यांचा भव्य सत्कार करून राष्ट्रवादी भवन येथे तेे दाखल होणार आहेत. हा सर्व मार्ग साधारण पंचवीस किलोमीटरचा असून येथून जाणाऱ्या रॅलीचे लाइव्ह प्रक्षेपण होणार असल्यामुळे शरद पवारांना मिळणारी संभाव्य मीडिया स्क्रीन निम्मी-निम्मी करण्याचा प्रयत्न आहे.

पुणे महापालिकेत नौकरी लावतो सांगून आर्थिक लुट ,भास्कर मोहोळवर गुन्हा दाखल

पुणे-महानगरपालिकेमध्ये नोकरी लावून देतो त्यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये लागतील. त्यापैकी चार लाख रुपये अॅडव्हांस रक्कम द्यावी लागेल तर उर्वरित एक लाख रुपये काम झाल्यावर द्यावी लागेल असे सांगून तरुणाची दोन लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

भास्कर लक्ष्मण मोहोळ( वय -38 ,राहणार -सदाशिव पेठ, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी मंगेश विष्णू चिकने (वय- 36 ,राहणार -शिवाजीनगर ,पुणे) यांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे सदरचा प्रकार जून 2019 ते नोव्हेंबर 2021 यादरम्यान टिळक स्मारक मंदिर टिळक रस्ता व इतर ठिकाणी घडलेला आहे .तक्रारदार मंगेश चिकने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ,आरोपी भास्कर मोहोळ यांनी त्यांना पीएमसी मध्ये नोकरी लावून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याच्यासह इतर साथीदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये लागतील ,त्यापैकी चार लाख रुपये अॅडव्हांस दिल्यानंतर पंधरा दिवसात काम करून देतो असे आरोपीने सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांच्या खात्यावरून स्वतःच्या बँक खात्याच्यावर आरोपीने दोन लाख 20 हजार रुपये हस्तांतरित करण्यास लावून त्यांना आतापर्यंत कोणतीही नोकरी न लावता तसेच वेळोवेळी टाळटाळ करून संबंधित रकमेची आर्थिक फसवणूक केलेली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस पाटील याबाबत पुढील तपास करत आहे.

डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश

मुंबई: डाळींसारख्या जीवनावश्यक वस्तूंची जास्त प्रमाणात दरवाढ होऊ नये, यासाठी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ च्या कलम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारात केंद्र शासनाच्या दि. २ जून २०२३ च्या अधिसूचनेन्वये डाळींच्या साठ्यावर (तूर व उडीद) घाऊक, किरकोळ व्यापारी, मिलर्स व इम्पोर्टर्स यांच्यावर ३१ ऑक्टोबर पर्यंत अतिरिक्त साठा करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.  साठेबाजी  करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूद्ध पुरवठा यंत्रणेकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

केंद्र शासनाच्या fcainfoweb.nic.in/psp या पोर्टलवर डाळींचा साठा नियमितपणे प्रकट करण्याबाबत आदेशित केले आहे.  तूर व उडीद डाळींचा साठा निर्बंध खालीलप्रमाणे –

घाऊक व्यापारी     :- प्रत्येक डाळीसाठी २०० मेट्रीक टन

किरकोळ व्यापारी  :-प्रत्येक डाळीसाठी ५ मेट्रीक टन

बिग चेन रिटेलर्स   :- प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी ५ मेट्रीक टन व डेपोसाठी २०० मेट्रीक टन मिलर्स            :-      गत तीन महिन्यांतील असलेले उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या २५ टक्के यामध्ये जे जास्त असेल ते लागू होईल.

इम्पोटर्स  :-  सीमा-शुल्क मंजूरीच्या दिनांकापासून ३० दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतर साठा करून ठेवता येणार नाही. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली आहे.

शासन नियुक्त संस्थांकडून प्रमुख शहरांमधील होलसेल / किरकोळ 23 जून 2023 चे दर पुढीलप्रमाणे :

जिल्हातूरडाळमूगडाळउदीड डाळहरभरा डाळमसूर डाळ
घाऊककिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दरघाऊक दरकिरकोळ दर
मुंबई105147105141105142649978107
नागपूर13515011011810511562727583
पुणे1201449811810010964697477
नाशिक1281459711410011761757287
लातूर13214310912111312663719091
औरंगाबाद (खुल्ताबाद)111117961179810361658998

निवडणूक आयोगाचा गोंधळ? एकीकडे सप्टेंबर,ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुकीचे स्पष्ट उल्लेख तर दुसरीकडे म्हटले ही घोषणा नाही…

गेल्या ५ जुलाई ला राजपत्र काढून निवडणूक आयोगाने सप्टेंबर २३ आणि ऑक्टोंबर २३ मध्ये महापालीकेच्या निवडणुका होत असल्याचे म्हटलेले असताना ७ जुलैला मात्र हि निवडणुकीची घोषणा नाही असे स्पष्ट करनारे पत्रक आयोगाने काढले आहे याप्रकारामुळे निवडणूक आयोगात नेमके चाललेय काय ? आयोग गोंधळला आहे काय ? असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत .

हे पहा ५ जुलाई चे राजपत्र

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
मुंबई, दि. ७ (रानिआ): राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय ग्रामपंचायत निवडणूक वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने “जैसे थे थे’ आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केले.
श्री. मदान यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार याद्या तयार करण्यात येत नाहीत. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या जशाच्या तशा घेवून केवळ प्रभागनिहाय विभाजित केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सर्वच सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या याद्या वापरण्याकरिता एक विशिष्ट तारीख (कट ऑफ डेट) निश्चित केली जाते. त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी संभाव्य सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी १ जुलै २०२३ ही कट ऑफ डेट निश्चित करण्याबाबतची अधिसूचना ५ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाच्या अद्ययावत मतदार याद्या वापरण्यासाठीच वेळोवेळी कट ऑफ डेट निश्चित केली जाते आणि त्यासंदर्भातील अधिसूचनाही प्रसिद्ध केली जाते. यापूर्वीदेखील या स्वरूपाच्या अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या अधिसूचना म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम नसतो. अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुका न झाल्यास, पुन्हा नव्याने कट ऑफ डेट निश्चित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध केली जाते, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

आणि हि पहा ७ जुलैला काढलेली प्रेसनोट

पण प्रत्यक्षात काढलेल्या आदेशानेमात्र सप्टेंबर मध्ये निवडणुका होत असल्याचे संकेत दिले आहेत .त्यात काय म्हटले आहे ते पहा……..आयोगाच्याच शब्दात ..

आदेश
क्रमांक रानिआ/ग्रापनि २०२२/ प्र.क्र. १२ / का-८ – मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ (१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९(१)(ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र. ५९) मधील कलम ७- अ, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, दिनांक १ जुलै २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक / पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे.
मा. राज्य निवडणूक आयुक्त यांचे आदेशानुसार,
के. उप सचिव,
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

भाजपकडून चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची नियुक्ती; प्रकाश जावडेकरांकडे मोठी जबाबदारी…

दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतीच भाजपने काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. यानंतर आता शुक्रवारी(दि.7) चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे.

यात महाराष्ट्रातील भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर तेलंगाणा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या वर्षाच्या शेवटी देशातील चार राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर या चारही राज्यांच्या निवडणूक प्रभारी आणि सह प्रभारींच्या नियुक्त्या भाजपने केल्या आहेत. 9 जणांच्या नियुक्त्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांचाही समावेश आहे.

अजित पवारांचा पुणे दौरा रद्द

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . या शपथविधीनंतर अजित पवार आपले होमग्राउंड असलेल्या पुणे शहरात शनिवारी प्रथमच येणार होते. मात्र अजित पवार यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द झाला आहे. ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याने त्यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. अजित पवार यांना पुणे शहरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. शहरातील दोनपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार सुनिल टिंगरे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर बहुतांश पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी देखील अजित पवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे ५० पेक्षा जास्त नॉटरिचेबल असणारे नगरसेवक देखील अजित पवारांच्या उद्याच्या पुणे दौऱ्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात होतं. तर, नवनिर्वाचित शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुण्यात अजित पवारांच्या जोरदार स्वागत आणि शक्तिप्रदर्शनाची तयारी केली होती.

तळजाई परिसरात कोयता गँगकडून पुन्हा ‘भाईगिरी’ करत दहशत माजविण्याची घटना :टोळक्याला अटक

पुणे : सहकार नगरमधील तळजाई परिसरात कोयता गँगकडून पुन्हा ‘भाईगिरी’ करत दहशत माजविण्याची घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वीच तळजाई वसाहतीत टोळक्याने २६ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी माऊली शिंदे (वय १९, रा. तळजाई वसाहत) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २२), रोहन ऊर्फ गायसोन्या राजू आरडे (वय २१), ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३), जयेश ऊर्फ जयड्या दत्ता ढावरे (वय १८), वृषभ शंकर कांबळे (वय २३), अनिकेत ऊर्फ गुड्डू रवींद्र शिंदे (वय २४), आकाश मनोज डाकले (वय २३), आदित्य ऊर्फ सँडी पद्माकर डाकले (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊली शिंदे आणि त्याचा मित्र पाच जुलै रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास तळजाई वसाहत परिसरात उभे होते. त्या वेळी दहा ते बारा जणांच्या टोळक्याने कोयते हवेत फिरवत ”तुम्ही या भागातील भाई झाले का”, असे म्हणत एका टपरीची तोडफोड केली. तसेच, नागरिकांना शिवीगाळ करून दहशत माजवली. ”आम्ही या भागातील भाई आहोत. आमच्या नादाला लागला, तर जीवे ठार मारू”, अशी धमकी दिली.

आता संधी आहे, काँग्रेस विचार घराघरात पोहचवा :नाना पटोले

प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकाऱ्यांचे जाळे.

प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाची एक दिवसीय कार्यशाळा ठाण्यात संपन्न.

मुंबई, दि. ७ जुलै २३
काँग्रेस हाच सर्व समाज घटकांचा विचार करणारा व सर्व समाज घटकाला संधी देणारा पक्ष आहे. प्रत्येक समाज घटकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे यासाठीच सेल व विविध विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काँग्रेसच्या विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, आदिवासी, भटके विमुक्त, दिव्यांग, संघटीत, असंघटीत कामगार, सहकार, विधी, डॉक्टर, इंजिनिअर, कृषी विभाग व समाज घटकांचे सेल स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात आज विविध घटकांचे ३९ सेल कार्यरत आहेत. सेलच्या पदाधिकाऱ्यांचे जाळे राज्यभर आहे, हे सेल व विभाग काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. तुम्हाला काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे, या संधीचे सोने करा. लोकांपर्यंत जा, त्यांच्या समस्या समजून घ्या व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा.देशात व राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. चांगले काम करा राज्यात व देशात काँग्रेसची पुन्हा विजयी पताका फडकेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी मंत्री व सेल व विभागचे प्रभारी सुनिल देशमुख यांनी केली, सुत्रसंचालन समीर वर्तक यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी केले.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे , राष्ट्रीय कार्याघ्यक्ष प्रफुल्लजी पटेल , छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देशमुख यांना आज मुंबईत हे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
प्रदीप देशमुख हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने आंदोलने केली होती. विरोधी पक्षात असताना जनहिताच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणारी अभिनव आंदोलने करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज पुणे शहरात तसेच राज्यभर नेहमीच बुलंद ठेवला.
प्रवक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत ठामपणे मांडणारे देशमुख अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रदीप देशमुख यांनी सांगितले की “आमचे नेते अजितदादा पवार यांनी विकासाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कार्यरत राहू. जनता आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून आपण काम करणार आहोत. “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. त्याला अनुसरून सर्व घटकांसोबत संवाद ठेवणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिका, मलेशिया तसेच आशियाई देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये देशमुख यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना, शून्यातून कार्यकर्ता म्हणून सुरुवात करत केवळ सचोटी आणि कार्यक्षमतेच्या बळावर त्यांनी पुणे शहर कार्याध्यक्ष पदापर्यंत मजल मारली आहे. या नियुक्तीबद्दल सर्व थरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहेत

दिल्लीतील पवार यांच्या नेतृत्वातील बैठक अवैध, राष्ट्रवादीत फुट नाही मात्र निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावासाठी अर्ज -प्रफुल्ल पटेल

मुंबई-अजित पवार गटाकडून शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षपद, नाव आणि चिन्हाविषयी माहिती दिली.

राष्ट्रवादीतील परिस्थिती सर्वांसमोर आहे. 30 तारखेला देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला बहुसंख्येने पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांची सर्वानुमते नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याच दिवशी म्हणजे 30 तारखेलाच दिल्लीत मुख्य निवडणूक आयोगात एक याचिका दाखल करत आम्हाला असे काम करायचे असून पक्षाचे नाव आणि चिन्ह आमच्याकडेच रहावे अशी विनंती आम्ही प्रतिज्ञापत्रांसह केली आहे.

अनिल पाटील आमचे प्रतोद असल्याचे आम्ही विधानसभा अध्यक्षांना कळवले आहे. तसेच विधान परिषदेत अमोल मिटकरी हे प्रतोद असतील. नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असून कार्यकारी अध्यक्ष आणि प्रतोदांची निवड 30 जूनलाच झाल्याचे पटेल यांनी सांगितले.

दिल्लीत झालेली राष्ट्रवादीची बैठक अनधिकृत असल्याचा दावाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी केला. यावेळी बोलताना शिवसेनेच्या राजकीय पक्षाच्या दावेदारीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीचा दाखलाही प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखवले. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष एकमेकांशी जोडलेले असल्याचे म्हणणे चुकीचे असेल असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आम्हाला कुठल्या पक्षात विलीन व्हायचे असेल तो भाग पूर्ण वेगळा आहे. पण पक्षांतर्गत जर काही असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थांबवता येत नाही.

राजकीय पक्ष कोण आहे याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. तर विधीमंडळ पक्षासंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. निवडणूक आयोगाकडे 30 तारखेला अजित पवार यांनी याचिका दाखल केली आहे अशी माहितीही पटेल यांनी दिली आहे.

काल झालेली बैठक आणि कारवाईसंदर्भात आम्हाला एकच म्हणायचे आहे की, जयंत पाटील यांनी अजित पवार आणि इतर 9 जणांविरोधात अपात्रतेच्या कारवाईचा अर्ज दाखल केला आहे. पण जयंत पाटील हे आमचे अध्यक्ष आहेत का हाच प्रश्न आहे. एकाही आमदाराला अपात्रतेची कारवाई लागू होऊ शकत नाही.

काल झालेल्या बैठकीसंदर्भात, पहिली गोष्ट बैठकीचाच अधिकार त्यांना नाही. त्यामुळे कारवाईबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही असे ते म्हणाले. आम्ही सर्वजण अधिकृत असून आमच्या याचिकेनुसार आमच्याकडे बहुमत आहे. निवडणूक आयोगाच्या निकषात आम्ही बसतो. आमच्याविरोधातील कारवाई अवैध आहे असेही पटेल म्हणाले. आम्ही कायदा किंवा तांत्रिक बाजूने काहीही चुकीचे केलेले नाही. आमच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही असेही पटेल म्हणाले.