Home Blog Page 1459

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे, दि. ७ : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत.

मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी १३ जुलै रोजी सकाळी १० वा. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.

ललित मोदी, निरव मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कोण लागतात ?

ठाण्यात पटोलेंच्या नेतृत्वाखाली तर मुंबईत विलेपार्ले भागात नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन.

मुंबई, दि. ७ जुलै २०२३
राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले व हुकुमशाही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपा व मोदी सरकारवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही राजकीय द्वेषातून करण्यात आलेली असून त्यामागे कोणती शक्ती आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांची याचिका गुजरात हाय कोर्टाने फेटाळली आहे परंतु याविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात दाद मागेल. ही लढाई मोठी आहे आणि देशातील हुकुमशाही विरोधात काँग्रेस लढत आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्ट निरव मोदी, ललित मोदी यांच्याविरोधात टीका केली होती. भ्रष्ट लोकांवर टीका केली तर ती एखाद्या जातीविरोधात कशी होऊ शकते?
निरव मोदी, ललित मोदी यांनी जनतेचे कोट्यवधी रुपये लुटून परदेशात पळून गेले, हे मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोण लागतात, त्यावर नरेंद्र मोदी बोलत का नाहीत? त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? मोदी सरकार घाबरलेले असून सत्तेपासून दूर जात असल्याच्या भितीपोटी कारवाई केली आहे. भाजपाची ही कृती लोकशाहीचा गळा घोटणारी तसेच लोकशाहीला कलंक लावणारी आहे.

तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम द्रुतगती मार्गावर विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी उत्तर मध्य जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश अमीन, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिशा बागुल यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना नसीम खान म्हणाले मोदी सरकार राहुल गांधींना घाबरले आहे म्हणून त्यांचा आवाज दडपण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करत आहे. पण राहुल गांधी या असल्या दडपशाहीला घाबरणार नाहीत आम्ही सर्वजण देशातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

मुंबईतील दहिसर भागात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले तसेच राज्याच्या विविध भागातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारविरोधात तीव्र आंदोलन केले.

औंध आयटीआय येथे ३३ व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु

पुणे, दि. ७: औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक ते दोन वर्ष मुदतीच्या ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये १ हजार ६६४ प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून ११ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता १० वी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण अशी आहे. प्रशिक्षणार्थ्यांना प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये खर्च येणार आहे.

एक वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम: कारपेंटर (वुड वर्क टेक्निशियन), फोटोग्राफर, सुईंग टेक्नोलॉजी, सेक्रेटरियल प्रॅक्टीस (इंग्रजी), मेकॅनिक डिझेल, स्टेनोग्राफर सेक्रेटरियल असिस्टंट (इंग्रजी), शिट मेटल वर्कर, प्लंबर, वेल्डर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स, मेसन, कॉम्पुटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट, डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर आणि प्लॉस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर.

दोन वर्ष मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम: मशिनिस्ट, फीटर, मशिनिस्ट ग्राईंडर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक मशिन टुल मेन्टेनन्स, टर्नर, टूल ॲण्ड डायमेकर (डाईज ॲण्ड मोल्ड), टूल ॲण्ड डायमेकर (प्रेस टुल्स, जिग्ज आणि फिक्चर), ड्राफ्टसमन मेकॅनिकल, ड्राफ्टसमन सिव्हिल, इलेक्ट्रोप्लेटर, सर्व्हेअर, पेंटर (जनरल), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, एरोनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर, वायरमन आणि रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडीशनर टेक्निशियन.

प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. ११ जुलै पर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची व १२ जुलै पर्यंत निश्चित करुन विकल्प भरण्याची संस्थेमध्ये सुविधा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त शंभर विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेले आहेत परंतु निश्चित करुन विकल्प भरलेले नाहीत त्यांनी विहित मुदतीत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या पसंतीक्रमानुसार विकल्प भरावेत.

औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत चालू वर्षापासून एरोनॉटीकल स्ट्रक्चर अॅण्ड इक्विपमेंट फिटर हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला आहे. हा व्यवसाय पुर्ण केल्यानंतर विमान कंपनीमध्ये तसेच वाहन उद्योगामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. डेसॉल्ट एव्हिएशन या फ्रेंच कंपनीने नागपुर येथे नवीन शाखा स्थापन केलेली आहे. ही कंपनी आय. टी. आय. औंध, पुणे करीता तांत्रिक सहकार्य उपलब्ध करुन देणार आहेत.

स्टेनो (मराठी) हा व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, खेरवाडी, वांद्रे. मुंबई- ५ यांच्यामार्फत राबविण्याचे प्रस्तावित असून ऑफलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी संस्थेत प्रत्यक्ष भेट देवून किंवा संस्थेच्या भ्रमणध्वनी हेल्पलाईन क्रमांक ८८५७९८४८२२ वर मार्गदर्शन घ्यावे. http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून प्रवेश प्रक्रिया निश्चित करता येईल, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी कळविले आहे.
0000

श्रावणी कटके, स्वराज कोकाटेची चमक वरिष्ठ गटाची राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा : आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन 

पुणे : श्रावणी कटके आणि स्वराज कोकाटे यांनी ३२ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.अखिल महाराष्ट्र वुशू संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रावणी कटकेने महिला दुहेरीमध्ये तृप्ती चांदवडकरसह सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर वैयक्तिक गटात ताईचीक्वॉन आणि तायचीजैन या प्रकारात अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदक मिळवले. त्याचबरोबर सांघिक मध्ये महाराष्ट्रच्या संघाने रौप्यपदक मिळवले. त्या संघातही श्रावणीचा समावेश होता.

स्वराज कोकाटने नानगूनमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिक रौप्यपदकातही त्याने मोलाची कामगिरी केली.अखिल महाराष्ट्र वूश संघटनेचे महासचिव सोपान कटके यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन श्री जितेंद्र बाजवा अध्यक्ष असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या हस्ते झाले. या वेळी शोगिनी टेक्नोआर्टसचे निर्मिती संचालक ऋषिकेश मोडक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या हंगामी समितीचे सदस्य भूपेंद्रसिंह बाजवा,  रवींद्र डांगे आयुक्त जीएसटी विभाग पुणे, संभाजी झेंडे अध्यक्ष ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, चंद्रकांत कांबळे सहसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, विजय सराफ, सुहेल अहंमद, नामदेव शिरगावकर महासचिव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, बाळासाहेब पोळ, सचिन मोरे, अमित कांकरिया आदी उपस्थित होते.

पदक विजेते खेळाडू – सान्शू – ५२  किलो – सोमनाथ गुंजाळ (ब्राँझपदक), ६०  किलो – ऋषीकेश मलोरे (ब्राँझपदक). ताओलू – श्रावणी कटके – (तैजिक्वानमध्ये ब्राँझपदक आणि तैजिजैनमध्ये रौप्यपदक). स्वराज कोकाटे (नानगूनमध्ये सुवर्ण). प्रफुल्ल देशमुख (विंगचूनमध्ये ब्राँझपदक), सतीश दहीफळे (तैजिक्वानमध्ये ब्राँझपदक), वैष्णवी बांदबुचे (तैजिक्वानमध्ये रौप्यपदक), अंकिता भांगे (विंगू चूनमध्ये ब्राँझपदक), नयन निर्मल (नानक्वानमध्ये आणि फ्लेक्झिबल विपनमध्ये रौप्यपदक).दुहेरी – तृप्ती चांदवडकर – श्रावणी कटके (सुवर्णपदक), सांघिकमध्ये रौप्यपदक – श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकर, सलोनी जाधव, खुशी तेलकर, निखिल जाधव, ओंकार मोडक, स्वराज कोकाटे.

अजित पवारांना NCP मिळणार नाही, उद्धव ठाकरेंना पुन्हा धनुष्यबाण मिळणार!- ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल

कपिल सिब्बल ‘द वायर’शी बोलताना म्हणाले

‘उद्धव ठाकरे यांना धनुष्यबाण हे पक्षचिन्ह परत मिळेल. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव किंवा घड्याळ हे पक्षचिन्ह यापैकी काहीच मिळणार नाही,’ असा मोठा दावा ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांचा दावा या प्रकरणी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीमुळे अवघ्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना नाव धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील घटनाक्रमही त्याच मार्गाने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी एका इंग्रजी न्यूज पोर्टलशी बोलताना उपरोक्त दावा केला आहे.

कपिल सिब्बल ‘द वायर’शी बोलताना म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभा व संसदेतील सदस्यांच्या संख्येवरुन पक्ष कुणाचा? हे ठरवले जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. यासाठी न्यायालयाने संघटनेतील बहुमत विचारात घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना परत मिळू शकते. त्याचप्रमाणे आमदारांच्या संख्येवरुन अजित पवारांना राष्ट्रवादीचे नाव किंवा पक्षचिन्ह मिळणार नाही, असे सिब्बल म्हणाले.

 रेणुका शहाणे आणि अमेय वाघ’कोण होणार करोडपती’च्या मंचावर…

       जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं सूत्रसंचालन हे या  कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागात’ रेणुका शहाणे आणि पुण्याचा अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेत. रेणुका शहाणे आणि अमेय वाघ ‘कोण होणार करोडपती’चा खेळ मुक्तांगण मित्रसाठी खेळणार आहेत.  मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी ते ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे यांच्याशी आणि  अमेय वाघशी गप्पा रंगणार आहेत. 

                              रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर व्यक्त झाले. सचिन खेडेकरांबरोबर त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यांनी याआधी फार सुंदर अशा कलाकृतींमध्ये एकत्र काम केले आहे. अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांचा गाजलेला चित्रपट मुरंबा. मुरंबा चित्रपटाशी निगडित  आठवणी या वेळी त्यांनी व्यक्त केल्या. रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांनी सैलाब या हिंदी मालिकेत एकत्र काम केले होते. त्याच्या आठवणी आज ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. यामागचं विशेष कारण म्हणजे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांना सैलाब मालिकेचे दिग्दर्शक रवी राय हे व्हिडिओ कॉलद्वारे  भेटले. त्या वेळी मालिकेच्या जुन्या आठवणी  मंचावर ताज्या झाल्या.  रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. मंचावर चर्चा रंगली रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्या जोडीदारांची. अमेय आणि साजिरी यांची पहिली भेट ते लग्न असा आत्तापर्यंतचा प्रवास त्याने या मंचावर सांगितला. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी  सांगितला.

                        आता मुक्तांगण मित्रसाठी खेळताना ‘कोण होणार करोडपाती’च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ  किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.,’कोण होणार करोडपती’ चा हा भाग – , ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे.

-Sharad Lonkar

500 चौ.फुटाच्या घराला करमाफीसाठी आग्रही राहणार -दीपक मानकर

पुणे- अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आज दीपक मानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून , श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजाची आरती करून कामाला प्रारंभ केला . आज यावेळी मानकर यांना शुभेछ्या देण्यासाठी नारायण पेठेत देखील प्रचंड गर्दी झाली होती .

राष्ट्रवादी (अजित पवार गट ) पुणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर दीपक मानकर यांच्या परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आणि जनहिताच्या कार्यासाठी सदैव बरोबर राहू अशी ग्वाही दिली.

मानकर यांच्या परिवाराने त्यांचे अभिनंदन करून पुढील जनहिताच्या कार्यात त्यांच्या समवेत राहण्याचा विश्वास दिला .मानकर यांनी यावेळी विविध माध्यमांशी मिळेल तसा संवाद देखील साधला . यावेळी दीपक मानकर म्हणाले ,राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वी रित्या पार पडण्यासाठी प्रयत्न तर करेल पण या संधीचे सोने करण्याचा खास प्रयत्न असेल. सामान्य आणि मध्यमवर्गीयांना सत्तेचा फायदा कसा होईल याकडे विशेषतः लक्ष घालेल , मुंबईच्या धर्तीवर पुण्यात देखील ५०० चौरस फुटाच्या घरांना मिळकत कर माफी मिळावी आणि पुण्यात महापालिकेची शिवसृष्टी व्हावी या दोन गोष्टींना आपल्या कामकाजात सर्वाधिक प्राधान्य असेल असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचा प्रश्न उपस्थित करताच ते म्हणाले, प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या नावावर पक्षाच्या कार्यालयाचे करारपत्र करवून घेणे चुकीचे होते , त्यांनी स्वतः ते कार्यालय पक्षाला देणे अपेक्षित आहे . अन्यथा आम्ही याच परिसरात जवळपास दुसरीकडे कार्यालयासाठी जागा पाहू आणि कार्यालय उभारू , किंवा प्रशांत जगताप देखील अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत येऊन जनहिताच्या प्रश्नांची सोडवणूक करतील .

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का:विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे यांच्या सेनेत

मुंबई- उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

महिलांच्या प्रश्नावर तसेच इतर सामाजिक प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणारा, स्वच्छ चेहरा, म्हणून नीलम गोऱ्हे यांची ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू कार्यकर्त्या म्हणूनही त्यांना ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नीलम गोऱ्हे या सातत्याने ठाकरे गटाची बाजू मांडत होत्या. मात्र, आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करतानाच आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी गोऱ्हे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त केला. राज्यात महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर नाव न घेता टीका केली. सटरफटर लोकांमुळे मला नाराज होण्याचे कारण नव्हते. हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मला तरी वाटत नाही की, नीलम गोऱ्हे या शिंदे सोबत जातील, त्या ठाकरे गटातच राहणार असल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले होते. नीलम गोऱ्हे कुठेही जाणार नाहीत, त्या ठाकरे गटांसोबतच राहतील असा दावा देखील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला होता.

विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई:  विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असते. त्यानुसार विद्यार्थी प्रवेशाचे नियोजन करतात. या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणे गरजेचे असते. निकाल वेळेत जाहीर झाले नाहीत, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असतो त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये,यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी विद्यार्थी हितासाठी वेळेत निकाल जाहीर होतील याचे  नियोजन करून पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल,टेक-बी प्रोग्रामसाठी ३८ हजारांहून अधिक नोंदणी

मुंबई : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्य शासनातर्फे ‘महाराष्ट्र यंग लीडर ॲस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (MYLAP) राबविला जात आहे. एचसीएल टेक कंपनीच्या ‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत ३८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २० हजार विद्यार्थ्यांना स:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘एचसीएल टेक-बी’ या उपक्रमांतर्गत बारावी गणित विषय असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच सहा महिने सःशुल्क प्रशिक्षण व सहा महिने लाइव्ह प्रोजेक्टस् वर काम करण्याची संधी मिळणार आहे. या सहा महिन्यांच्या आंतरवासिता कालावधीमध्ये दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) मिळेल. एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आयटी प्रोफेशनल म्हणून पूर्णवेळ नोकरी, पगार व सोबतच उच्च शिक्षण घेण्यासाठीचेही नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांचे बिटस् पिलानी, शास्त्रा, ॲमिटी, आयआयएम-नागपूर व केएल अशा नामवंत विद्यापीठांमधूनच उच्च शिक्षण पूर्ण केले जाईल. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारा खर्च काही प्रमाणात एचसीएल कंपनी स्कॉलरशीप स्वरूपात देणार आहे.

अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड व पुणे येथील समग्र शिक्षा अभियान व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या मार्गदर्शन व नोंदणी कार्यशाळेमध्ये मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी सन २०२३ मध्ये बारावी विज्ञान शाखेमधून किमान ६० टक्के व गणित विषयात ६० गुण मिळविलेले विद्यार्थी www.hcltechbee.com  या संकेतस्थळावर निःशुल्क नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 7020637271 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘समग्र शिक्षा’चे राज्य प्रकल्प समन्वयक समीर सावंत यांनी केले आहे.

NIAने पुण्यात ताब्यात घेतलेला अभियंता जुबेर ‘इसिस’च्या संपर्कात, 20 जणांचे करत होता मन:परिवर्तन

पुणे-राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील कोंढवा परिसरातून २ दिवसांपूर्वी जुबेर नूर मोहंमद शेख (३६) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तरुणांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. विविध राज्यांतील २० जण त्याच्या संपर्कात असल्याचे तपास यंत्रणेच्या चाैकशीत समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.४ ते ५ वर्षांपासून तो सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क साधल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच प्रक्षोभक साहित्ची निर्मिती केल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएने त्याच्या घरी टाकलेल्या छाप्यात इसिस संघटनेशी संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे, साहित्य, लॅपटॉप, मेमरी कार्ड, मोबाइल असा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

जुबेर हा कराडचा रहिवासी असून तो संगणक अभियंता आहे. सुरुवातीला पुण्यातील खडकी परिसरात तो कुटुंबासोबत राहत होता. सन २०१३ पासून तो कोंढवा भागात राहण्यास गेला. तीन भाऊ, दोन बहिणी, आई-वडील, पत्नी, दोन मुले असा त्याचा मोठा परिवार आहे. हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत तो नोकरीला असून त्याला वार्षिक १५ लाखांचे पॅकेज आहे. त्यानंतरही तो इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया ग्रुपवर ‘अबू नुसैबा’ या नावाने वावरत होता. त्याद्वारे आपला धर्म कशा प्रकारे श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म कशा पद्धतीने कमी महत्त्वाचे आहेत, याबाबतची माहिती तो आपल्या समाजातील तरुणांना देऊन त्यांचे कट्टरतेकडे मन:परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नशील होता. बॉम्ब, शस्त्रनिर्मितीच्या प्रशिक्षणासाठी प्रयत्नशील

इसिस संघटनेच्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी जुबेर हा प्रयत्नशील असल्याने तपास यंत्रणांच्या रडारवर तो आला होता. त्याच्यासोबत इतर शहरांतील काही जण असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्यामुळे एकाच वेळी त्यांनी मुंबई, ठाणे व पुणे येथे छापा टाकून जुबेर शेख याच्यासोबत ठाण्यातून शरजील शेख व झुल्फिकार अली बडोदावाला व मुंबईतील नागपाडा येथून ताबीश नासेर सिद्दिकी यांना अटक केली आहे. इसिसच्या दहशतवादी कारवाया पुढे नेण्याचा कट आरोपींनी रचल्याची माहिती यंत्रणेने दिली. महाराष्ट्रात स्लीपर सेलचे जाळे विणण्याचे काम आरोपी करत होते. तसेच तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करून त्यांना बॉम्ब (आयईडी) बनवण्याचे व छोटे शस्त्र, पिस्तूल निर्मितीसाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समोर आले.

पुण्यात पोलिस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलिस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहगाव भागात शुक्रवारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र, पोलिसाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

वैभव दिलीप शिंदे (रा. खेसे काॅलनी, लोहगाव) असे असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. वैभव शिंदे, त्यांची पत्नी कांचन, भाऊ आणि चार वर्षांचा मुलगा खेसे काॅलनी भागात राहायला आहेत. शिंदे पुणे पोलिस दलात मोटार परिवहन विभागात नियुक्तीस होते. शिंदे यांच्या घराजवळ चिंचेचे झाड आहे. छतावर झाडाची फांदी आहे. शिंदे यांनी शुक्रवारी पहाटे फांदीला टाॅवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली. ‘पत्नी कांचन मला माफ कर. भाऊ आणि आई मला माफ करा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. भाऊ विजय याने पत्नीशी विवाह करावा’, असे शिंदे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. शिंदे यांना मूळव्याधीचा त्रास होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांची मूळव्याधीवरील शस्त्रक्रिया झाली होती. ते पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेची तयारी करत होते. शिंदे यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अगोदर ठाकरे आता शरद पवारांना धोका अन..

म. फुले ,सावित्रीमाई यांचा अवमान करणार्‍यांना साथ..

बहुजनांच्या फोडाफोडीचे एजंट फडणवीस

माजी आमदार लक्ष्मण माने यांचा आरोप

सातारा: देशातील बहुजन समाजाला सर्वाधिक धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आहे. याच संघाच्या लोकांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला असतानाही अजित पवार, छगन भुजबळांसह इतर काहीजण आता मांडीला-मांडी लावून सत्तेत सहभागी झाले आहेत.ही भूमिका आमच्या विचारधारेच्या विरोधी असल्याचे मत माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.शरद पवार यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून हे नऊ जण त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याची टीका माने यांनी केली. अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देऊन अडगळीत टाकण्याचा मानस असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार हे लढवय्ये असून, त्यांना शेवटपर्यंत साथ देणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणाचे एजंट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी प्रा. अशोक जाधव उपस्थित होते. श्री. माने म्हणाले, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाला पाहिजेत तोपर्यंत सत्तेत राहणार आहेत. लोकशाही, धर्मनिरपेक्षता पायदळी तुडविण्याचे काम संघाने केले असून, प्रादेशिक पक्षात फूट पाडून लोकशाही धोक्यात आणली जात आहे.देशातील ब्राह्मण समाज असुरक्षित असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. भाजप हा पक्ष लोकशाहीवादी पक्ष नसून देशात हुकूमशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपच्या मागे बुरखाधारी असलेली आरएसएसची छुपी कार्यपद्धती असल्याचे दिसून येत आहेसंघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळ असून, त्यांच्यासह अमित शहा, अदानी व अंबानी या चार जणांनी देश विकला आहे.” नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर लगेच अजित पवारांसह इतर काही जण भाजपसोबत सत्तेत सहभागी होत आहेत. त्यामुळे मोदींनी राष्ट्रवादीवर आरोप केले त्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

“शिवसेना, राष्ट्रवादी फोडली ते आता महाराष्ट्रही फोडतील,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई-महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्यामुळेच त्यांनी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी फोडली उद्या हे महाराष्ट्र फोडतील तेव्हा त्यांना विरोध करणारं कुणी नको आहे. त्यामुळे हे सगळे प्रकार सुरु आहेत. ही लढाई अत्यंत घाणेरडी आणि विकृत आहे. शिवसेना नको म्हणून शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.

अजित पवार यांनी 2 जुलै 2023 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीत या पक्षात आता शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. कारण अजित पवार यांनी चिन्हावर आणि पक्षावरही दावा सांगितला आहे. या सगळ्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली मत मांडत भाजपवर शरसंधान साधले.

राष्ट्रवादीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी फूट
रविवारी जेव्हा राज्यात राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका पार पडल्या. यापैकी एक शरद पवार गटाची होती तर दुसरी अजित पवार गटाची. अजित पवारांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचाच मुद्दा उपस्थित केला. तर शरद पवार यांनी अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर यथेच्छ टीका केली. यापुढच्या दिवसांमध्येही हे चित्र बघायला मिळणार आहे. अशात आता उद्धव ठाकरे यांनी हे सगळं घाणेरडं राजकारण असल्याचं म्हटलं आहे. तसंच भाजपाला महाराष्ट्र फोडायचा आहे असाही आरोप केला आहे.

अखिल भारतीय राजभाषा परिषद यशस्वी करण्यासाठी नियोजन करावे-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.६ :- हिंदी राजभाषा दिवस-२०२३ आणि अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाद्वारे योग्य नियोजन करुन परिषद यशस्वी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दिले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय राजभाषा विभागाच्यावतीने १४ आणि १५ सप्टेंबर २०२३ रोजी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल येथे आयोजित करण्यात येत असलेल्या संयुक्त परिषदेच्या आयोजनासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस भारत सरकारच्या राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, संयुक्त सचिव मीनाक्षी जौली, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रिडा आयुक्त सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, उपायुक्त श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल, अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरीया,बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, आयआरसीटीसीचे महाप्रबंधक पिनाकिन मोरावाला यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी देशभरातून मान्यवर तसेच जवळपास सात हजारपेक्षा अधिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने, कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, विद्युत पुरवठा, पिण्याचे पाणी, महत्वाच्या व्यक्तींसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्तीसंबधी कार्यवाही त्वरित करावी. इतर व्यवस्थेसंदर्भात सर्व संबधित यंत्रणांनी योग्य नियोजन करावे अशी सूचना श्री.राव यांनी यावेळी केली. बालेवाडी येथील क्रिडा संकुलात हस्तकला प्रदर्शन, वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी करावी असेही श्री.राव यांनी सांगितले.

राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या यांनी अखिल भारतीय पातळीवरील या परिषदेचे आयोजन करण्याची संधी पुण्याला मिळाली असल्याचे सांगितले. परिषदेचे आयोजन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा प्रशासनाला केले. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.