Home Blog Page 1460

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विविध पदांच्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर

अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

मुंबई, दि.६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ करिता दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून दुय्यम निबंधक (श्रेणी- १) / मुद्रांक निरीक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता राज्य कर निरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून राज्य कर निरिक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरिता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित, मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता पोलीस उपनिरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरिक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरीता पूर्व परिक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परिक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

या संवर्गाकरीता पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत, विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्वपरिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परिक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सहाय्य व मार्गदर्शन केंद्र विद्यापीठाने सुरू करावे

राजीव गांधी स्मारक समिती कडुन नव्या कुलगुरूंचे अभिनंदन..!

पुणे, दि. 6 जुलै 2023 -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील “प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया” सध्या सुरू झाली आहे. या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरणे, अभ्यासक्रमाबाबत माहिती देणे, प्रवेशा बाबतच्या अडचणी सोडवणे यासाठी एक ‘मदत व मार्गदर्शन केंद्र’ विद्यापीठाने सुरू करावे अशी मागणी राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे बुधवारी करण्यात आली. राजीव गांधी स्मारक समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. गोसावी यांची कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांचे पुढील कारकिर्दीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या..!! यावेळी काँग्रेस नेते व स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, ॲड फैय्याज शेख, ॲड श्रीकांत पाटील, ॲड बाळासाहेब बावणे, भोला वांजळे, दीपक जाधव (पत्रकार), धनंजय भिलारे, ॲड स्वप्निल जगताप, ॲड रेशमा शिकलगार, ॲड अश्विनी गवारे, ॲड संतोष जाधव, दिपक जाधव, आबा जगताप, संजय अभंग, विकास दवे इ. धैर्यशील हांडे, नरेश आवटे आदी उपस्थित होते. कुलगुरूंसोबत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहाची क्षमता खूप अपुरी पडते आहे, ती वाढविण्यात यावी. कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांचे मानधन वाढविण्यात यावे. बंद ठेवण्यात आलेले अनिकेत कॅन्टीन तातडीने सुरू करण्यात यावे. पदवीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तातडीने लावून नवे शैक्षिणक वर्ष लवकर सुरू करावे. विद्यापीठातील सर्व निविदा प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणून त्यामध्ये गैरव्यवहार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आदी मागण्या निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे करण्यात आल्या. कुलगुरूंनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या काळात याबाबत योग्य ते निर्णय घेतले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न; कोणीही पक्ष सोडणार नाही.

मुंबई, दि. ६ जुलै
भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे विधान परिषदेतील गटनेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील बैठकीला उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, भाजपाच्या सत्तापिपासू राजकारणावर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता व त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता? नरेंद्र मोदी व भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिणलेला आहे. कर्नाटकमध्ये ४० टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते व त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. भाजपाचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. समृद्धी महामार्गावर बस अपघातात २६ लोक होरपळून मेले त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपाच्या लोकांना जराही लाज वाटली नाही.
भाजपा सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. भाजपाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात विविध आंदोलने करणार आहे तसेच पत्रकार परिषदा घेऊन भाजपाचा खरा चेहरा उघडा करणार आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसबद्दल भाजपा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु असतानाही अशाच बातम्या पेरल्या होत्या, आताही अफवा पसरवल्या जात आहेत पण काँग्रेस पक्षातून कोणीही जाणार नाही. सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीतून बिभीषण प्रवृत्ती गेली ते बरेच झाले असे स्पष्ट करुन नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्षाबरोबर जे पक्ष येणार त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. विधानसभेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे आणखी चांगले काम करु. पण राज्यात जे राजकारण सुरु आहे ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपाच्या या राजकारणाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष पदावर दीपक मानकर

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष खा. सुनील  तटकरे यांनी केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत यामुळे आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे.अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर दोन्ही गटांकडून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. पुणे पोटनिवडणुकीत दीपक मानकर यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवल्यानंतर प्रशांत जगताप यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपक मानकर यांचा  दांडगा जनसंपर्क, कोरोना काळात केलेली कामे, युवकांचे सोडवलेले अनेक प्रश्न या मानकर यांच्या जमेच्या तर बाजू आहेतच पण मास लीडर म्हणून त्यांची प्रतिमा आहे , आणि शहरच्या राजकारणात त्यांचा दबदबा देखील आहे.

पुणे शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून अजित पवार यांच्या नेतृत्त्वात मोठे संघटन शहरात आहे. याच संघटननाला मानकर यांचे नेतृत्च मिळाले आहे. मानकर यांनी शहराच्या उपमहापौरपदाची जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मानकर यांची प्रभावी यंत्रणा असून याचा पक्ष संघटनेला मोठा फायदा होऊ शकेल. निवडीचे पत्र देत उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मानकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पूर्ण क्षमतेने संघटना मजबूत करणार : दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

‘राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया भक्कम आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खंबीर नेतृत्वात आणि मार्गदर्शनात संपूर्ण शहर पिंजून काढून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. पुणेकरांच्या प्रश्नांना न्याय देतानाच कार्यकर्त्यांना न्याय देणे, हा मुख्य अजेंडा काम करताना असणार आहे’ अशी प्रतिक्रिया दिपक मानकर यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्याऐवजी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर तटकरे यांनी अनेक नवीन नेमणुका केल्या आहे. रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.

शासकीय शेतजमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी आराखडा तयार करावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. ६ : राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी. महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट उभे करण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांमार्फत आराखडा तयार करण्याच्या सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या.

राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३१८ व्या बैठकीत मंत्री  श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने, लाभक्षेत्र विकासचे सचिव संजय बेलसरे, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त श्री. पुलकुंडवार, नाशिक विभाग पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता श्री. मिसाळ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले की, अहमदनगर येथील शेती महामंडळाच्या जमिनीमधून महामंडळाला उत्पन्न घ्यावयाचे आहे. तेथे विकास होण्यासाठी लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट, औद्योगिक पार्क उभारण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी लवकर आराखडा तयार करण्यासाठी शासकीय कंपन्यांची बैठक येत्या आठवड्यात घ्यावी. मोजणीसाठी ड्रोनऐवजी आधुनिक रोव्हर्सचा वापर करावा. रोव्हर्स कमी पडत असतील, तर आणखी घेवून झिरो पेन्डन्सी करावी.

यावेळी सार्वजनिक उपक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, सरकारी योजना, गावठाण विस्तार आदी वापरासाठी शेती महामंडळाची जमीन देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी घेवून काही अटी-शर्तीच्या अधिन राहून देण्यास मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या कामगारांना कामगार कायद्यानुसार 8.33 टक्क्यांप्रमाणे बोनस देण्यासही मान्यता देण्यात आली.

पुणे येथील शेती महामंडळाच्या मुख्य इमारतीच्या जागेचा वाणिज्यिक वापर करण्यासाठी पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवावा, कार्यालय वापर, इतर व्यावसायिक वापरासाठी अटी व शर्ती बिनचूक कराव्यात. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या धर्तीवर प्रस्ताव पाठवून त्यासाठी तज्ज्ञ वास्तूविशारद नियुक्त करावा. या इमारतीमध्ये मोठे कार्यक्रम, इव्हेंट घेण्यासाठी व्यावसायिक वापर करता यावा, यादृष्टीने इमारतीचे मॉडेल तयार करावे, अशा सूचना मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या.

खंडकरी शेतकऱ्यांना जमीन देण्यासाठी नियमात बदल करून एक गुंठा ते २० गुंठे आणि २० ते ४० गुंठे यापद्धतीने याद्या तयार कराव्यात. त्यांना जमिनीचा लाभ देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महामंडळाच्या जमिनीमध्ये विहीर घेण्यासाठी परवाना घेणे बंधनकारक असून भाडेतत्वावर जमिनी देताना वापरमूल्य आणि त्यावर जीएसटी लावण्याबाबत मान्यता देण्यात आली. ई-करार नियमावलीमध्ये दुरुस्ती करून अटी व शर्तीचा भंग करणाऱ्यांना नोटीसा देण्याचाही ठराव करण्यात आला.

यावेळी खंडकऱ्यांच्या जमिनीवरील शर्त कमी करण्याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांना जमिनी देताना ज्यांची वर्ग एकमधून घेतली त्यांना त्याच पद्धतीने विनामोबदला देणे, वर्ग दोनच्या बाबतीत मोबदला घेवून जमीन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्य शेती महामंडळ मर्यादितऐवजी महाराष्ट्र राज्य शेती प्राधिकरण या नावाने स्वतंत्र प्राधिकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

डॉ. देवरा यांनी विविध सूचना केल्या, तर श्री. माने आणि महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली आवले-डंबे यांनी सादरीकरण केले.

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या जेलरच्या पहिल्या गाण्याची झलक ! 

सध्या बी टाऊन मध्ये जीची चर्चा आहे अशी अभिनेत्री तमन्ना भाटिया ! तिच्या बॅक टू बॅक अफलातून प्रोजेक्ट्स मुळे ती चर्चेत आहेत. अलीकडेच तिच्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील जी करदा  आणि नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज 2 या हिंदी रिलीज अद्भुत यशा नंतर अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि याच कारण तितकच खास आहे तमिळ चित्रपट जेलर मधला ” कावला ” डान्स ने प्रेक्षकांची मन जिंकली. 6 जुलै रोजी हा बहुचर्चित गाण्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. तमन्ना या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिग्गज अभिनेते रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. व्हायरल झालेला संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि दिग्दर्शक नेल्सन यांच हे गाणं लाँच झालं असून एका खास प्रोमो मधून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कावलाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाने तिच्या अफलातून डान्स मूव्ह्सने स्क्रीन वर एक वेगळी मज्जा आणली आहे. जेलर मधल्या गाण्याच्या आकर्षक ट्यूनमध्ये प्रेक्षक गुंतले आहेत. ती कावलामध्ये दिसते तशी ती कधीच आकर्षक आणि मोहक दिसली नाही आणि म्युझिक व्हिडिओमध्ये तिचं सौंदर्य अजून खुलले आहे.  तमन्ना भाटिया तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रत्येक प्रकल्पांच्या यशाने ती सध्या टॉप लिस्ट वर आहे.  कावलाच्या रिलीजसह प्रेक्षकांचे अपार प्रेम तिला मिळत आहे. जेलर व्यतिरिक्त तिच्याकडे मल्याळममध्ये बांद्रा आणि तेलुगुमध्ये भोला शंकर हे चित्रपट असून तमिळमध्ये अरनामनाई 4 हा एक मोठा चित्रपट ती करणार आहे

शहर कॉंग्रेस आता दर सोमवारी साप्ताहिक बैठक घेणार -अरविंद शिंदे

पुणे-

     पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आज काँग्रेस भवन येथे जाहिर केले की, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.

     या बैठकीस काँग्रेसचे आजी माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी व प्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, विविध विभाग व सेलचे अध्यक्ष, महिला, युवक , विद्यार्थी संघटना आदी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सदर साप्ताहिक बैठक सोमवार दि. १० जुलै २०२३ रोजी सायं. ४.०० वा., काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

     या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा व पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात चर्चा विनिमय होणार आहे. अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे. 

उपेंद्र आणि वीणाची जोडी जमली

नेमक्याच तरीही सशक्त भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर ही नाव आवर्जून घेतली जातात. हे दोन चतुरस्त्र कलाकार आता ‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित आणीबाणी  या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या आणीबाणी साठी पुढाकार घेतला आहे. २८ जुलै ला आणीबाणी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले.  केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात आहेत. ‘आणीबाणी’ चित्रपटाचा वेगळा विषय व आमचे काम प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वासही दोघांनी व्यक्त केला.

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे. देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. छायांकन मंगेश गाडेकर, संकलन प्रमोद कहार, नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत.

राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्या!

राजा माने यांची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें यांच्याकडे मागणी.
मुंबई:- राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्या संदर्भातील नियम,निकष व अटी निश्चित करुन राजस्थान सरकारने तसा अध्यादेश (जी.आर) दि.२६ जून २०२३ रोजी जारी केला.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्म्ससाठी धोरण ठरवून शासकीय जाहिराती देण्याची मागणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांकडे आज केली.


केंद्र सरकारच्या डिजिटल मिडियासह राज्यातील रेडिओ व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल राज्यातील डिजिटल मिडियाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे राजा माने यांनी आभार मानले.राजस्थान सरकारने त्या राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासाठी धोरण ठरवून दि.२६जून २०२३ रोजी तसा अध्यादेश (जी.आर.) जारी केला.फेसबुक, यूट्यूब आदी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मच्या फॉलोवर्स व सबस्क्राईबर्सची दहा लाखांपासन दहा हजार पर्यंतची अ,ब,क,ड.अशी वर्गवारी करुन अनेक नियम,निकष व अटी निश्चित करुन शासकीय जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्रातील महानगरांतील घराघरात आणि ग्रामीण महाराष्ट्रात वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या डिजिटल मिडियाच्या विकासासाठी व शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती तातडीने सुरु कराव्यात अशी मागणी राजा माने आपल्या निवेदनात केली आहे.

दोन महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे(PRAB)-

हाराष्ट्रातील राजकारणात अनपेक्षितपणे उलथापालथ होत असताना राज्यातील भाजप सेना युती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने धास्तावलेल्या विद्यमान मंत्र्यांना आपल्याकडील खाते बदलाच्या भीतीने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु ठेवल्याचे चित्र प्रशासनात दिसून येत आहे. अनेक विभागांमध्ये बदल्यांचे पेव फुटले असून मंत्र्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची लगबग आढळून येत आहे. अपेक्षित ठिकाणी बदली व्हावी असा सर्वच अधिकाऱ्यांचा अट्टाहास असतो त्यामुळे हात ओले केल्याशिवाय मनाप्रमाणे बदलीचे ठिकाण मिळत नाही त्यामुळे अर्थपूर्ण बोलण्याला फार महत्व प्राप्त झालेले आहे. सत्ताधारी कोणताही पक्ष असो बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण बोलण्याला फार महत्व असते ते अजूनही कायम आहे. सहकार मंत्र्यांकडून खाते बदलण्याच्या भीतीने कार्यतत्परता दर्शवून दोन महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दर 5 ते 10 दिवसांच्या फरकाने काढण्यात आलेले आहेत. सहकार विभागात बदल्यांचा धडाका सुरूच आहे त्यामुळे अधिकारी कर्मचारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे.       सहकार विभागाकडून गेल्या दोन महिन्यात बदल्यांचे आदेश काढले त्याचा तपशील पाहता पदस्थापनाबाबत १ आदेश व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाचे दिनांक 23/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले. रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट-ब या सवंर्गातून उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात तदर्थ स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबत दिनांक 24/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे दिनांक 26/05/2023 रोजी 11 आदेश काढण्यात आले.      उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 26/05/2023 रोजी 23 आदेश काढण्यात आले. असे एकूण एकाच दिवशी 34 बदल्यांचे आदेश काढण्यात आले. रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-2, गट-ब (अराजपत्रित) पदावरून रेशीम विकास अधिकारी, श्रेणी-1 या पदावरील पदोन्नतीबाबत दिनांक 31/05/2023 रोजी 1 आदेश काढण्यात आला. लगेच दुसऱ्या दिवशीच दिनांक 01/06/2023 रोजी रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक संचालक, गट-अ या पदावरून उप संचालक, गट-अ या पदावर तात्पुरती पदोन्नतीचा १ आदेश काढण्यात आला. सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबतचे दिनांक 16/06/2023 रोजी 8 आदेश काढण्यात आले. त्यानंतर ६ दिवसांनी पुन्हा 3 आदेश दिनांक 22/06/2023 रोजी काढले. त्यानंतर 13 दिवसांनी सहनिबंधक सहकारी संस्था गट-अ या सवंर्गातून अपर निबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गात निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापनाबाबतचे दिनांक 05/07/2023 रोजी 5 बदल्यांचे आदेश काढण्यात आले.       अशाप्रकारे २ महिन्यांमध्ये 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत. गेल्या 3 वर्षाचा विचार केला तर सन 2021 ला 94 आणि सन 2022 ला 44 बदल्यांचे आदेश काढलेले आहेत. सन 2023 ला मे, जून या दोन महिन्यातच 65 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आलेले आहेत.  

महावितरणचा धडाका,दोन लाख तक्रारींचे दहा दिवसात निवारण

मुंबई: वीज ग्राहकांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याच्या उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज पुरवठा बंद झाल्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याची सूचना दिली. त्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दहा दिवसात जुन्या प्रलंबित आणि नव्या अशा दोन लाख तक्रारींचे निवारण केले. त्याच सोबत बिलांबाबतच्या एक लाख ४२ हजार तक्रारींचे निवारणही दहा दिवसात युद्ध पातळीवर करण्यात आले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहक हा केंद्रबिंदू मानून सेवा देण्याची सूचना कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दि. २० जून रोजी ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्याचा स्पष्ट आदेश दिला. पावसाळी हवामानात वीज पुरवठा बंद झाल्याच्या तक्रारी वाढू शकतात हे ध्यानात घेऊन काम करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून दहा दिवसात वीज पुरवठा बंदच्या दोन लाख तक्रारींचे निवारण केले.

महावितरणने विशेष उपक्रम राबवून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण केले. गेल्या दहा दिवसात नव्याने दाखल झालेल्या वीज पुरवठा बंदच्या १,३८,०७२ तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्यासोबत आधीच्या प्रलंबित ६७,००० तक्रारीही निकाली काढण्यात आल्या. वीज पुरवठा बंदच्या तक्रारींचे निवारण करताना या तक्रारी लवकरात लवकर म्हणजे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या काल मर्यादेत दूर व्हाव्यात यावर भर देण्यात येत आहे.

बिलांच्या बाबतीत एकूण १,४२,६०० तक्रारींचे दहा दिवसात निराकरण करण्यात आले. त्यापैकी १,१०,९२० तक्रारी दि. २० जूनपूर्वी दाखल झालेल्या होत्या. त्यासोबत दि. २० जूननंतरच्या ३१,६८७ तक्रारींचेही निराकरण करण्यात आले. यामध्ये बिल दुरुस्तीच्या ४३,४६० तक्रारींचे निवारण समाविष्ट आहे.

अध्यक्षांच्या सूचनेनुसार महावितरणच्या मुख्यालयात वीज ग्राहकांच्या राज्यभरातील तक्रारींचा व त्यावर केलेल्या उपायांचा नियमित आढावा घेण्यात येत आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी याबाबत देखरेख करत आहेत.

राहुल गांधींनी घेतली शरद पवार यांची भेट

सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडांशीही केली चर्चा …

नवी दिल्ली-शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली . यावेळी नुकतीच पवार यांची पत्रकार परिषद संपली होती , जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी राहुल गांधी यांचे स्वागत केले. शरद पवार , सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड या तिघांशी राहुल यांनी सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली

त्यानंतर दिल्लीती नेत्या सोनिया दुहान यांनी माध्यमांना माहिती दिली कि, राहुल गांधी यांनी पवार यांना आपण त्यांच्या समवेत असल्याचे सांगितले ,बहुतेक सर्व विरोधी पक्ष आपल्या बरोबर असतील असा विश्वास देखील गांधी यांनी शरद पवार यांना दिला . इडी सीबीआय चा गैरवापर लोकशाहीला घातक ठरत असून यावर आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे असेही दोघांत ठरले आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीस १०० टक्के कार्यकारिणीची उपस्थिती होती असेही त्या म्हणाल्या.

विरोधकांच्यात फोडाफोडी करणारांना किंमत चुकवावीच लागेल-शरद पवार

अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी

राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नाही

कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही

वेळ आल्यावर बहुमताचे पाहू..निवडणूक आयोगावर आमचा विश्वास

२०२४ ला कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचीच सत्ता येईल

नवी दिल्ली: पक्ष फोडणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी दिला आहे. आम्ही जनतेमध्ये जाणार असून जनतेवर पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं असून तशी घोषणा दिल्लीतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर करण्यात आली. तसेच ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती त्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय बैठकीत आज आठ प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत. जर राष्ट्रवादीच्या विचारधारेच्या विरोधात कुणी जात असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना असल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकाररिणीचा शरद पवारांवर पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीच्या बातमीत काहीही तथ्य नसून मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळे कुणी काही नियुक्त्या केल्या तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास असून आयोगासमोर आम्ही आमची बाजू मांडू असं शरद पवारांनी माध्यमांना सांगितलंअजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, कुणाला काय व्हायचंय याच्याशी मला काही घेणं-देणं नाही.

पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपल न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

अजित पवारांसह 11 जणांची हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आलं आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण ८ ठराव मंजूर केले आहेत.

“…तर १५ रुपये लिटर पेट्रोल मिळेल”, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा जर तरचा दावा

पेट्रोलच्या किंमती १०० रुपये लिटरच्या पुढे गेल्या आहेत. देशातल्या मुख्य शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटर १०४ ते १०७ रुपये प्रति लिटर आहे. अशात नितीन गडकरी यांनी देशात पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होऊ शकते असा दावा केला आहे. राजस्थानमधल्ये कार्यक्रमात जनतेला संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे जे चांगलंच चर्चेत आहे.

नितीन गडकरींनी राजस्थानातील प्रतापगढ या ठिकाणी ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामाचं उद्घाटन केलं. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित केलं. भारतात इंधनाची आयात १६ लाख कोटी रुपयांची आहे. ही आयात कमी केल्यास हा पैसा परदेशात जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाईल. उसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते आणि भारतात लाखो ऊस उत्पादक शेतकरी आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे आहे. त्यामुळे असं झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

“६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज वापरली गेली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये लिटरपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे देशातील इंधनाची आयातही कमी होईल आणि पैसा सरकारकडे जाईल. हा निधी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरता येऊ शकतो. शेतकरी हा आपल्या देशाचा फक्त अन्नदाताच नाही तर उर्जादाताही होईल. ऑगस्ट महिन्यात टोयोटा कंपनीची वाहनं लाँच करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर ही वाहनं चालतील. ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, त्याची सरासरी पकडली तर पेट्रोलची किंमत १५ रुपये प्रति लिटर होईल.”

पीएमआरडीए’मध्ये मागेल त्यांना वीजजोडणी

नवीन वीजमीटरचा तुटवडा नाही – महावितरण

पुणे, दि. ०६ जुलै २०२३पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणकडून (पीएमआरडीए)जाधववाडी, सेक्टर १२ येथील प्रकल्पामध्ये मागेल त्यांना तात्काळ वीजजोडणी देण्यात येत असून नवीन वीजमीटरचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. या प्रकल्पातील सुमारे ४ हजार ८८५ घरांना नवीन वीजजोडणी देण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आले असून त्यासाठी तब्बल २ हजार नवीन वीजमीटर अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महावितरणकडे मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवार (दि. ५) पर्यंत नवीन वीजजोडणीचे २७१९ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील २१०६ ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे. तर कोटेशनच्या रकमेचा भरणा केलेल्या १७७७ ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.‘पीएमआरडीए’कडून

जाधववाडीमध्ये सेक्टर १२ मध्ये परवडणारी घरे उभारण्यात आली आहेत. त्याचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार १०० लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात आला आहे. या घरांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात आणखी दोन अतिरिक्त कर्मचारी नेमून मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.

‘पीएमआरडीए’मधील ज्या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांनी संबंधित घराचे ताबापत्र (अलॉटमेंट लेटर), ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव कार्यालयाशी संपर्क साधल्यास पुढील सर्व कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत आहे. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.