पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केली आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत यामुळे आश्चर्यदेखील व्यक्त केले जात आहे.अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर दोन्ही गटांकडून नवीन नियुक्त्या केल्या जात आहे. पुणे पोटनिवडणुकीत दीपक मानकर यांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवल्यानंतर प्रशांत जगताप यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दीपक मानकर यांचा दांडगा जनसंपर्क, कोरोना काळात केलेली कामे, युवकांचे सोडवलेले अनेक प्रश्न या मानकर यांच्या जमेच्या तर बाजू आहेतच पण मास लीडर म्हणून त्यांची प्रतिमा आहे , आणि शहरच्या राजकारणात त्यांचा दबदबा देखील आहे.
पुणे शहर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून अजित पवार यांच्या नेतृत्त्वात मोठे संघटन शहरात आहे. याच संघटननाला मानकर यांचे नेतृत्च मिळाले आहे. मानकर यांनी शहराच्या उपमहापौरपदाची जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात मानकर यांची प्रभावी यंत्रणा असून याचा पक्ष संघटनेला मोठा फायदा होऊ शकेल. निवडीचे पत्र देत उपमुख्यमंत्री पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी मानकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पूर्ण क्षमतेने संघटना मजबूत करणार : दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
‘राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील पाया भक्कम आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खंबीर नेतृत्वात आणि मार्गदर्शनात संपूर्ण शहर पिंजून काढून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न असेल. पुणेकरांच्या प्रश्नांना न्याय देतानाच कार्यकर्त्यांना न्याय देणे, हा मुख्य अजेंडा काम करताना असणार आहे’ अशी प्रतिक्रिया दिपक मानकर यांनी निवडीनंतर व्यक्त केली आहे.
अजित पवार यांच्याकडून जयंत पाटील यांच्याऐवजी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर तटकरे यांनी अनेक नवीन नेमणुका केल्या आहे. रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.