Home Blog Page 1461

पीएमआरडीए’मध्ये मागेल त्यांना वीजजोडणी

नवीन वीजमीटरचा तुटवडा नाही – महावितरण

पुणे, दि. ०६ जुलै २०२३पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणकडून (पीएमआरडीए)जाधववाडी, सेक्टर १२ येथील प्रकल्पामध्ये मागेल त्यांना तात्काळ वीजजोडणी देण्यात येत असून नवीन वीजमीटरचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. या प्रकल्पातील सुमारे ४ हजार ८८५ घरांना नवीन वीजजोडणी देण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आले असून त्यासाठी तब्बल २ हजार नवीन वीजमीटर अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर वीजग्राहकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, महावितरणकडे मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बुधवार (दि. ५) पर्यंत नवीन वीजजोडणीचे २७१९ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील २१०६ ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे. तर कोटेशनच्या रकमेचा भरणा केलेल्या १७७७ ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.‘पीएमआरडीए’कडून

जाधववाडीमध्ये सेक्टर १२ मध्ये परवडणारी घरे उभारण्यात आली आहेत. त्याचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. आतापर्यंत ३ हजार १०० लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्यात आला आहे. या घरांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात आणखी दोन अतिरिक्त कर्मचारी नेमून मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.

‘पीएमआरडीए’मधील ज्या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांनी संबंधित घराचे ताबापत्र (अलॉटमेंट लेटर), ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव कार्यालयाशी संपर्क साधल्यास पुढील सर्व कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत आहे. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 गद्दारांना माफी नाही,शरद पवारांच्या नेतृत्वात NCP कार्यकारिणीची बैठक सुरू अन अजित पवार म्हणाले,बैठक अवैध

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरी आता टोकाला पोहोचली आहे. अजित पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेत. त्यानंतर आता शरद पवारांच्या नेतृत्वात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. शरद पवार तिथे पोहोचण्यापूर्वीच अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांचे फोटो असणारे बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.

आता नवे पोस्टर छापण्यात आलेत. त्यात अजित पवार व प्रफुल्ल पटेलांचे फोटो नाहीत. यापैकी एका पोस्टरवर बाहुबली चित्रपटातील कट्टपाने बाहुबलीवर पाठीमागून वार केल्याचा फोटो आहे. त्यावर गद्दारांना जनता माफ करणार नाही, असा संदेश लिहिण्यात आला आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी व कार्यकारी समितीतून अजित पवारांसोबत गेलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव आधीच वगळण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा म्हणून नोंद असल्याची माहिती मिळत आहे.
  • शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, खासदार, श्रीनिवास पाटील, खासदार फौजिया खान, खासदार मोहम्मद फैजल, खासदार वंदना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी या बैठकीला हजर आहेत. देशातल्या विविध राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात दिल्लीत सुरू असणारी बैठक अवैध असल्याचा आरोप केला आहे.
  • शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक सुरू. पक्षाचे अनेक जुने जाणते नेते उपस्थित
  • अजित पवार यांच्याशी युती झाल्यानंतर आमदारांमधील मतभेदाच्या वृत्तावर एकनाथ शिंदे म्हणाले – पक्षात सर्व काही ठीक आहे. मी राजीनामा देत नाहीये. काही दिवसांतच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला जाईल, असे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. भाजपनेही प्रत्युत्तर देत म्हटले की, फक्त शिंदेच मुख्यमंत्री राहतील.
  • राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या 32 समर्थक आमदारांना ताज हॉटेलमध्ये पाठवले आहे. ते पुन्हा माघारी जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

वीजसुरक्षेसाठी १२ हजार नागरिकांशी थेट संवाद

गर्दीचे ठिकाणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये जागर

पुणे, दि. ०६ जुलै २०२३घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीज यंत्रणेपासून योग्य खबरदारी घेण्याची माहिती देत पुणे परिमंडलातील तब्बल १२ हजार नागरिकांशी महावितरणच्या ३७ वीजसुरक्षा दूतांनी थेट संवाद साधला. यासोबतच माहिती पत्रके व समाज माध्यमांद्वारे रिल्स, शॉर्ट फिल्म आणि छायाचित्रांद्वारे वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला.

महावितरण व विद्युत निरीक्षक विभागाच्या वतीने दि. २६ ते २ जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात महावितरणचे १८ प्रशिक्षणार्थी उमेदवार तसेच ‘नॉलेज शेअरिंग’ अंतर्गत सामंजस्य करार झालेल्या भारती विद्यापीठ तंत्रनिकेतन, शासकीय तंत्रनिकेतन व वाडिया तंत्रनिकेतनमधील १९ अभियांत्रिकी विद्यार्थी अशा ३७ सुरक्षा दूतांनी खास कामगिरी बजावली. पुणे व पिंपरी चिंचवड, चाकण, राजगुरुनगर आदी शहरांसह विविध रेल्वे स्थानके, बसस्टॉप, मंदिरे, उद्याने व इतर गर्दीचे ठिकाणे, घरगुती वसाहती, सोसायट्या आदी ठिकाणी सुमारे १२ हजार नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप केले व थेट संवाद साधला. यासोबतच १० शाळा व ३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खास वर्ग घेत उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांनी वीजसुरक्षेबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. या सप्ताहात वीजसुरक्षा दूत म्हणून थेट नागरिकांशी संवाद साधणारे ३७ अभियांत्रिकी विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कौतुक केले. 

महावितरण अंतर्गत या सप्ताहामध्ये १७५ अभियंते, २५० तंत्रज्ञ तसेच ७० यंत्रचालकांना वीजसुरक्षेचा प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, विद्युत निरीक्षक श्री. नितीन सूर्यवंशी यांच्यासह अनेक व्याख्यात्यांनी या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले. चित्रपटगृहात वीजसुरक्षेची ध्वनीचित्रफित तसेच महावितरणकडे इमेल आयडीची नोंदणी करणाऱ्या राज्यातील सर्व ग्राहकांना इमेलद्वारे वीजसुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती पाठविण्यात आली. यासाठी देखील मुख्य अभियंता श्री. पवार व उपकार्यकारी अभियंता डॉ. पटनी यांनी पुढाकार घेतला.

मनोगत श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – वीजसुरक्षेचा जागर हा सामाजिक उपक्रम आहे. विद्युत अपघाताचा धोका अधिक असणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडावर हा उपक्रम राबविण्यात आला. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणच्या वीज यंत्रणेपासून सर्वांनी नेहमी सतर्क राहावे.  

मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

मुंबई, दि. ६ :  मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित, असे निर्देश शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

या अर्थसंकल्प‍ित झालेल्या निधी अंतर्गत संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या कामांना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व संबंधित सदस्य, विशेष निमंत्रित तसेच उपस्थित अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती मान्यता दिली. या कामांची निकड व गरज लक्षात घेऊन प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी संबंधित विभागांना व यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना या बैठकीमध्ये त्यांनी दिल्या.

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक कफ परेड कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे काल आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अजय चौधरी, आमदार अमीन पटेल, आमदार सदा सरवणकर, आमदार सचिन अहीर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार ॲड. मनीषा कायंदे, आमदार यामिनी जाधव, आमदार सुनील शिंदे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल,  जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुपेकर, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबई शहरातील ‘म्हाडा’ आणि इतर वसाहतींच्या इमारतींमध्ये वास्तव्यास असणारा मूळ मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत मुंबईच्या बाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेत मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करावित. तसेच मुंबई शहरात अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावित. ज्या भागात अवैध व्यवसाय आढळून येतील त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबई शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत करार करण्यात आला असून त्यांचीही मदत घेण्यात येत आहे.

मुंबई शहरातील त्या- त्या भागातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी केंद्र (फूड कोर्ट) तसेच फूड ऑन व्ह‍िल कार्यान्वित करावे. या केंद्रांसाठी जागा निश्चित करावी. घनकचरा व्यवस्थापन, बाजारपेठांचे अद्ययावतीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक केंद्र सुरू करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आराखडा तयार करावा. या कामाला प्राधान्य देऊन अभियानस्तरावर काम पूर्ण करावे.  वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ‘रिड महाराष्ट्र’ योजना प्राधान्याने राबविण्यात यावी व यासाठीचा प्रस्ताव बृहन्मुंबई महापालिकेने तातडीने सादर करावा. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्यात.

मुंबईच्या वैभवात भर घालण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सौंदर्यीकरण आणि  पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा सादर करावा. मत्सालय उभारणीसाठी प्राधान्य द्यावे. अनुसूचित जातीच्या वसाहतीत ग्रंथालये आणि वाचनालये सुरू करावीत, असे सांगत मुंबई शहरातील प्रत्येक प्रभागात क्रीडा संकुलाची निर्मितीचा निर्णय या बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जाहीर केला.

बृहन्मुंबई महापालिकेने मुंबादेवी विकास विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जे. जे. फ्लायओवर व ब्रिजचे सौंदर्यकरण व सुशोभीकरण करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा 50 टक्के निधी व बृहन्मुंबई महापालिकेचा 50 टक्के निधी उपलब्ध करून द्यावा अशा सूचना पालकमंत्री श्री केसरकर यांनी केल्या. शहरात शिशुवर्ग सुरू करावेत. अंगणवाड्यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून जागा उपलब्ध करून द्यावी, अशाही सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी जिल्हा नियोजन समितीचा आराखडा, आतापर्यंत झालेला खर्च आणि निधी विनियोगाचे केलेले नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली.

काल मंजूर झालेल्या विकास आराखड्यात नागरी दलित वस्त्यांमध्ये सुधारणांसाठी १३२ कोटी रुपये, पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधांकरिता ३० कोटी, पोलिस वसाहतीत पायाभूत सोयीसुविधांसाठी ३० कोटी, शासकीय कार्यालयीन इमारतींची देखभाल, दुरुस्ती व सोयीसुविधांसाठी २७ कोटी, झोपडपट्टी वासीयांचे स्थलांतर व पुनर्वसनासाठी २६.९० कोटी, शासकीय महाविद्यालयांच्या विकासासाठी १५ कोटी, नावीन्यपूर्ण योजनांसाठी १२ कोटी, रुग्णालयांसाठी औषधे, साहित्य व साधनसामग्रीच्या खरेदीसाठी १० कोटी, गड, किल्ले, मंदिर व महत्त्वाच्या संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी ८ कोटी रुपये, रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी २० कोटी, रुग्णालयातील यंत्रसामग्रीसाठी १८ कोटी, लहान मच्छिमार बंदरांच्या विकासासाठी १० कोटी, महिला सबलीकरण व बालकांच्या विकासासाठी ५ कोटी ६५ लाख रुपये, व्यायाम शाळांच्या विकासासाठी 3 कोटी रुपये, यांसह विविध विकासकामांच्या प्रस्तावांना पालकमंत्री श्री. केसरकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली.

यावेळी अनुसूचित जाती योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेचाही सविस्तर आढावा घेवून निधी मंजूर करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

स्वस्थ मन स्वस्थ शरीर या संदेशाचा प्रसार करण्यासाठी ASICS ने श्रद्धा कपूरला त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून केले घोषित

पुणे: ASICS या अग्रगण्य जपानी स्पोर्ट्स परफॉर्मन्स ब्रँडने बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची ASICS इंडियाची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या सहयोगासह ASICS इंडिया स्वस्थ मन स्वस्थ शरीर (साउंड माइंड, साउंड बॉडी) या आपल्या तत्त्वज्ञानाला बळकट करत आहे आणि फिटनेस उत्साही भारतीय महिलांमध्ये एक मजबूत ब्रँड प्रतिमा निर्माण करत आहे. अभिनेत्री ब्रँडच्या फुटवेअर आणि महिला स्पोर्ट्सवेअर विभागाची  प्रसिद्धी करतानाही दिसणार आहे.

या सहयोगातून स्टाईल आणि आराम यांच्याशी तडजोड होणार नाही याची खात्री करून घेत ASICS इंडिया संतुलित आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासाठी सामायिक दृष्टीकोनातून आपले बाजारपेठीय स्थान मजबूत करत आहे. समृद्ध वारसा आणि नाविन्यपूर्णते बद्दलची बांधिलकी यासाठी ओळखली जाणारी ASICS जगभरातील खेळाडू आणि फिटनेस प्रेमी यांच्या गरजा पूर्ण करणारी उच्च दर्जाची उत्पादने सातत्याने वितरित करत आहे.

एक अभिनेत्री म्हणून श्रद्धा कपूरचे अष्टपैलुत्व ASICS इंडियाच्या मन आणि शरीर या दोनहीचे पोषण करण्याच्या मूळ तत्त्वज्ञानाला पूर्णपणे पूरक आहे. त्यामुळे ती ब्रँडसाठी एक आदर्श आहे.

या सहयोगाबाबत भाष्य करताना ASICS भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक रजत खुराना म्हणाले, “ASICS  इंडियाचा नवीन चेहरा म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. तिची मनमोहक कामगिरी आणि फिटनेस राखण्याविषयीचे  अतुलनीय समर्पण आमच्या ब्रँडच्या आदर्शांशी पूर्णपणे जुळते. मोठा चाहता वर्ग आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेली श्रद्धा कपूर मन आणि शरीर निरोगी राखण्याच्या महत्त्वाबद्दल लोकांना प्रेरित आणि शिक्षित करण्यासाठी एक आदर्श अॅम्बेसेडर आहे. हा सहयोग आमच्या ब्रँडचे आकर्षण उंचावेल आणि समग्र आणि सक्रिय जीवनशैलीला चालना देत संपूर्ण देशभरात आमची पोहोच वाढवेल.”

या सहयोगाबद्दल बोलताना आघाडीची बॉलीवूड सेलिब्रिटी श्रद्धा कपूर म्हणाली, “ASICS  इंडियासह या भारावून टाकणाऱ्या प्रवासाला सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे. शारीरिक आणि भावनिक आरोग्याच्या महत्त्वाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे प्रत्येकासाठी आपल्या एकूणच आरोग्याकडे प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे. माझा ठाम विश्वास आहे की निरोगी शरीर निरोगी मनाचे पोषण करते आणि ही मूल्ये माझ्या चाहत्यांसोबत शेअर करणे हे माझे नेहमीच ध्येय राहिले आहे. ASICS इंडिया ब्रँड माझ्या विश्वासाशी, समजुतीशी पूर्णपणे सुसंगत आहे. म्हणूनच ही भागीदारी जुळणारी आहे. मी या सहयोगाकडे आशेने पाहत आहे आणि टीमसोबत अद्भुत काम करत आहे.”

ASICS स्पोर्ट्सवेअर उद्योगक्षेत्रामध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास आली आहे. आपल्या उत्पादनांच्या सादरीकरणात आराम आणि कार्यप्रदर्शन अखंडपणे एकत्र करत आहे. भारतात धावण्याविषयी प्रेम असलेला आणि आरोग्याबाबत जागरूक समुदाय सतत वाढत आहे. अशा वेळी धावपटू आणि क्रीडापटूंमध्ये पसंतीचा पर्याय बनण्याचे ASICS इंडियाचे उद्दिष्ट आहे. लोकांना आव्हानात्मक वर्कआउट्स पार पाडण्यासाठी आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी सक्षम बनवत भारतभर पसरलेल्या ८८ दालनांसह ASICS भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाचे स्पोर्ट्सवेअर आणि पादत्राणे पुरविण्यासाठी कटिबद्ध आहे. मग ते धावणे असो, प्रशिक्षण असो किंवा रोजच्या दिवसाला वापरण्याच्या दृष्टीने सोयीचे असो, ASICS उत्पादने आराम, आधार  आणि शैलीच्या अतुलनीय मिश्रणाने उठून दिसतात.

ASICS शूज आणि पोशाखांचे नवीनतम कलेक्शन मिळवण्यासाठी विमान नगर (युनिट क्र.-६० पहिला मजला, फिनिक्स मार्केट सिटी, सव्हे क्रमांक २०७, विमान नगर, पुणे- ४११०१४), डेक्कन जिमखाना (५७३/३, तळमजला, जेएम रोड, डेक्कन जिमखाना, पुणे ४११००४), परिहार चौक (युनिट क्र. एचजीएफ ०६, परिहार चौक, औंध पुणे – ४११००७), शिवाजी नगर (Asics, युनिट क्र. एफएफ-०२, पॅव्हेलियन मॉल, सेनापती बापट रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र- ४११०१६) या चार पैकी एखाद्या ठिकाणी तुमच्या जवळच्या स्टोअरला भेट द्या.

संघर्ष करून पुढे जा ; समाजबांधवांचाही विकास करा- राष्ट्रपती

नागपूर,दि.६: जल, जमीन आणि जंगलाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना संघर्षाला सामोरे जावे लागते. आदिवासींनी न्यूनगंड सोडून शिक्षित होत संघर्ष करून पुढे गेले पाहिजे व स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतांनाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज विविध आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केले.

येथील राजभवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदिवासी समुहातील माडिया,कातकरी आणि कोलाम जमातींच्या प्रतिनिधींशी (आदिम जनजाती समूह) संवाद साधला. राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यावेळी उपस्थित होते.

शाळेत जायला रस्ते नव्हते, दप्तर नसायचे, डोक्यावर कापडी पोतं पांघरून भर पावसाळ्यात शाळेत जावे लागायचे. पदोपदी संघर्ष होता. दर मजल करत यश संपादन करून शिक्षिका, राज्यपाल आणि देशाची राष्ट्रपती झाले’, अशा शब्दात राष्ट्रपतींनी आपला जीवनप्रवास उलगडला. तो ऐकतांना सारेच उपस्थित भारावले होते. आदिवासींनी न्यूनगंड न बाळगता शालेय व उच्च  शिक्षण घेतले पाहिजे. उच्चपदे भूषवून आपल्या समाज बांधवांनाही विकासाच्या प्रवाहात पुढे नेले पाहिजे, असे उद्बोधक मार्गदर्शन राष्ट्रपतींनी केले.

पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर देशातील जवळपास सर्वच राज्यांना भेटी दिल्या. देशात एकूण ७०० आदिवासी जमाती असून यातील ७५ जमाती या अतिमागास असल्याचे चित्रही निदर्शनास आले. ७०० जमातींच्या १ हजारांहून अधिक बोलीभाषा आहेत. या भाषांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनांनी आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत. शासनाच्या मदतीसोबतच आदिवासींनी पुढाकार घेत आपल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. शासनानेही आदिवासींची सामाजिक स्थिती समजुन घेत त्यानुसार वेळोवेळी योजना व उपक्रमांमध्ये संयुक्तिक बदल करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. महाराष्ट्र शासन आदिवासी कल्याणाच्या योजना उत्तम प्रकारे राबवित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

न्यूनगंड हा आदिवासींच्या शिक्षणापुढील सर्वात मोठा अडसर असल्याचे अधोरेखित करतांना स्थानिक आदिवासी शिक्षित मुलांकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जावे, अशा सूचना राष्ट्रपतींनी केल्या. याविषयी त्यांनी शिक्षिका असतांना राबविलेले आनंददायी शिक्षण उपक्रमांबाबत अनुभव कथन केले.

 आदिवासी प्रतिनिधींशी विविध विषयांवर संवाद

उपस्थित आदिवासी प्रतिनिधीपैकी तिघांनी प्रातिनिधीक स्वरुपात राष्ट्रपतींशी संवाद साधला. सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील पहिले आदिवासी डॉक्टर असलेले डॉ.कन्ना मडावी यांनी, माडिया जमातीचे प्रतिनिधी म्हणून विचार व्यक्त केले. आदिवासींना  त्यांच्या बोलीभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. विकास करतांना आदिवासींचा प्राण असणारी जंगले वाचली पाहिजेत, आदिवासी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक असावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम जमातीचे प्रतिनिधी डॉ.गंगाधर आत्राम यांनी आदिवासींच्या रोजगाराचा मुद्दा मांडला. रोजगाराअभावी बालवयातच आदिवासींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.आदिवासींना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळाल्यास त्यांची मुले शिक्षण घेऊ शकतील व प्रगती करू शकतील अशी  अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कातकरी जमातीच्या प्रतिनिधी डॉ.कौशिका भोये यांनी आदिवासींसाठी मोफत, दर्जेदार आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात, अशा भावना व्यक्त केल्या. नीट (NEET) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या १० आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी प्रास्ताविक केले. राज्य शासन आदिवासी कल्याणासाठी राबवित असलेल्या विविध योजना व उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली.

तत्पूर्वी, रेला पारंपरिक आदिवासी नृत्याचे राष्ट्रपतींसमोर उत्तम सादरीकरण झाले. पारंपरिक वेशातील आदिवासी बांधव आणि त्यांनी वाद्यांवर धरलेला ठेका बघुन राष्ट्रपतींसह उपस्थितांनी दाद दिली. यावेळी माडिया, कोलाम जमातींद्वारा निर्मित वैशिष्ट्यपूर्ण हस्तशिल्पांच्या दालनास राष्ट्रपतींनी भेट दिली. याठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या हस्तशिल्पांची माहिती त्यांनी जाणून घेतली व कारागिरांची आस्थेने चौकशी केली.

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विभाग नागपूर यांनी समन्वय केला. रविंद्र ठाकरे ,अपर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लिना बनसोड, आदिवासी विकास नागपूरचे उपायुक्त दशरथ कुळमेथे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरचे प्रकल्प अधिकारी दीपक हेडाऊ आणि लेखाधिकारी डॉ.यशपाल गुडधे यावेळी उपस्थित होते.

000

संगीत साधनेत शुद्धता, एकाग्रता व निरपेक्ष भाव जपला-छाया गांगुली

शेखर सेन यांच्या हस्ते गांगुलींचा एकाहत्तरी निमित्ताने सत्कार

पुणे : “लहानपणापासून संगीताची आवड असल्याने संगीत साधनेकडे वळले. आकाशवाणीमध्ये कार्यरत असताना अनेक प्रतिष्ठित कलाकारांचे मार्गदर्शन सहवास लाभला. विविधभारतीवरील आरोही कार्यक्रमात, तर गमन या चित्रपटात पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली. शुद्ध, एकाग्र व निरपेक्ष भाव संगीत साधना करताना जपला,” अशी भावना ज्येष्ठ गायिका छाया गांगुली यांनी व्यक्त केली.
संगीत नाटक अकादमीचे माजी अध्यक्ष शेखर सेन यांच्या हस्ते छाया गांगुली यांचा एकाहत्तरीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी गांगुली व सेन यांच्या हस्ते नाद विदूषी गुरु अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनावरील सुरोपनिषद या पुस्तकाच्या बंगाली आवृत्तीचे प्रकाशन झाले. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने नवी पेठेतील पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमावेळी ज्येष्ठ बासरी वादक नित्यानंद हळदीपूर, लेखक डॉ. सुनील शास्त्री, चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्नील पोरे, संयोजक शिरीष चिटणीस, प्रतीक प्रकाशनाचे प्रवीण जोशी आदी उपस्थित होते. उचित मीडिया या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
छाया गांगुली म्हणाल्या, “आकाशवाणी व दूरदर्शनमध्ये जवळपास ३६ वर्षे सेवा केली. या काळात जयदेव, मधुराणी, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, आशा, पंचम दा यांसह इतर अनेक मान्यवर कलाकारांना आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेता आले. जयदेव यांनी गायनाची संधी दिली. मधुराणी यांनी संगीताची समज वाढवली. संगीत सरिता कार्यक्रमातून अनेक सादरीकरण करता आली. कलेचा सन्मान केला. कलेने मला सन्मान दिला.”
शेखर सेन म्हणाले, “महाराष्ट्र अणि बंगाल देशभक्तीची प्रेरणा देणारी ठिकाणे आहेत. संगीत क्षेत्रातील अन्नपूर्णा देवी, एम. एस. सुब्बूलक्ष्मी, लता मंगेशकर यांच्यासारखे आदर्श आमच्यासमोर आहेत. प्रत्येक व्यक्तीमधील ईश्वराची ओळख करणारी भारतीय संस्कृती आहे. अन्नपूर्णा देवी यांचे योगदान अतुलनीय असून, मला बालपणी त्यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले हे माझे भाग्य आहे. भारतीय संगीत क्षेत्राला एक वेगळा आयाम देणारे गांगुली यांचे योगदान आहे.”

नित्यानंद हळदीपूर म्हणाले, “अन्नपूर्णा देवी यांनी समर्पण भावनेने कलेची सेवा केली. त्यांचे समृद्ध संगीत अनुभवले. संगीत ही एक साधना आहे. गांगुली यांनी अनेक अजरामर गाणी गायली. आजही त्यांची अनेक गाणी रसिकांच्या तोंडी आहेत.”

डॉ. सुनील शास्त्री म्हणाले, “प्रतिभावान अन्नपूर्णा देवी यांच्या जीवनाचा पट मांडण्याचा अनुभव घेता आला. मूळ गुजरातीत असलेले हे चरित्र आता मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आता बंगाली अशा पाच भाषांत आले आहे.”
स्वप्नील पोरे म्हणाले, “गांगुली यांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजिला. त्यांनी प्रसारभारती, तसेच अनेक अजरामर गाण्यांतून आपली संगीत कारकीर्द दिमाखात घडवली.”
शिरीष चिटणीस यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कृपाशंकर शर्मा यांनी आभार मानले.

यश्वी, ईरा, नाव्या तिस-या फेरीत दाखल

सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए कप सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक सबज्युनियर गटाच्या राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत यश्वी पटेल, मनीषाकुमार, ईरा कुलकर्णी, नाव्या रांका यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.

पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन संघटनेच्या (पीडीएमबीए) सहकार्याने शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या दुस-या फेरीत पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या धून सांघवीला १५-६, १५-६ असे, पुण्याच्या मनीषा कुमारने साता-याच्या रिया सावंतला १५-१२, १२-१५, १५-१३ असे, तर ठाण्याच्या ईरा कुलकर्णीने रिशा परबला १५-६, १५-१२ असे पराभूत केले. पुण्याच्या नाव्या रांकाने नगरच्या पलक ढांगरला १५-४, १५-० असे, कोल्हापूरच्या हृदिका शिंदेने मुंबई उपनगरच्या गार्गी दाभोळकरला १५-६, १५-८ असे नमवून तिसरी फेरी गाठली.

स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या तिस-या फेरीत पुण्याच्या ईशान लागूने आपलाच सहकारी रणवीर टेमघरेवर १५-३, १५-३ असा, मुंबई उपनगरच्या सानिध्य अगरवालने सोलापूरच्या महंमद झैन शेखवर १५-७, १५-८ असा, सांगलीच्या लौकिक ओस्तवालने अमरावतीच्या देवव्रत खांडेकरवर १५-७, १५-७ असा विजय मिळवला.

निकाल – १५ वर्षांखालील मुली – दुसरी फेरी – तन्वी घारपुरे (ठाणे) वि. वि. अनन्या बाबर (पुणे) १५-०, १५-३, पूर्वा मुंदडे (पुणे) वि. वि. स्वराली पाटील १५-४, १५-३, खुशी पाहवा (मुंबई उपनगर) वि. वि. द्विती शाह (पुणे) १५-९, १५-१२, मौसमी लिखार (नागपूर) वि. वि. पलक मिसाळ (पुणे) १५-११, २१-१९, दितिशा सोमकुवर (नागपूर) वि. वि. तेजस्वी भुतडा (पुणे) १५-१, १५-५, अन्वी कुलकर्णी (सांगली) वि. वि. पूर्वा तपाडिया (सोलापूर) १५-५, १५-९, ऋतिका कांबळे (कोल्हापूर) वि. वि. हृदया साळवी (पुणे) १५-१२, १४-१६, १५-४, जुई जाधव (पुणे) वि. वि. मायरा ओक (मुंबई उपनगर) १२-१५, १५-८, १५-१०, सारा साळुंके () वि. वि. रिषा नंदिवडेकर () १५-९, १५-१०.

१५ वर्षांखालील मुले – तिसरी फेरी – देव रुपरेला (पालघर) वि. वि. कृष्णनील गोरे (पुणे) १५-८, १५-२, आरव ठाकरे (नागपूर) वि. वि. शरव जाधव (पुणे) १५-६, १५-१, अन्वीत नेने (ठाणे) वि. वि. पृथ्वीराज नागरगोजे (बीड) १५-८, १५-७, संग्राम खराडे (बुलढाणा) वि. वि. स्वरूप सोमाणी (नगर) १५-६, १५-४, विहान मुर्ती (पुणे) वि. वि. अवनीश बांगर (पुणे) १५-१०, १५-७, ईशान वानखेडे (नाशिक) वि. वि. आदित येनगेरेड्डी (छत्रपती संभाजीनगर) १५-८, १५-७, अवधूत कदम (पुणे) वि. वि. अमोघ अदोनी (पुणे) १५-९, १५-५, राघवेंद्र यादव (पुणे) वि. वि. प्रसन्न मन्ना (सांगली) १८-१६, १२-१५, १६-१४.

ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे…जितेंद्र आव्हाड

मुंबई-आज मुंबईत सभेला संबोधित करताना अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडले. ठाण्यातील तो पठ्ठा, त्यांच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईर, निरंजन डावखेरे असे पक्ष सोडून गेले, असा आरोप अजित पवारांनी केला. दुसरीकडे अजित पवारांच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. मला जे बोलायचे ते बोला, पण साहेबांवर जे काही बोलला आहात, त्यांच्याविरोधात मी उभा आहे.शरद पवार तुम्हाला का लुळे-लंगडे, एका ठिकाणी बसलेला माणूस हवा होता का, त्यांच्याविषयी असलेली आस्था तुम्हाला संपवायची आहे. त्यासाठी तुम्ही लोकांनी रचलेले षडयंत्र आहे. एवढाच त्यांच्याविषयी राग असेल तर त्यांचे कशाला फोटो वापरता.?ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला?ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे? असे सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केले आहे.

अजित पवारांच्या टीकेबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यामुळे पक्षाचे नेते पक्ष सोडून गेले, असं त्यांना तसं वाटत असेल. तर ठीक आहे. अजित पवारांबद्दल माझी काहीही तक्रार नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. शरद पवारांनी निवृत्ती घ्यावी आणि घरी बसावं, ही जी भावना तुम्ही व्यक्त करताय, त्याविरोधात मी तुमच्याविरोधात उभा राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट आमने-सामने आले आहेत. दोन्ही गटांकडून आज मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार गटाकडून मुंबईतील एमईटी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर शरद पवार गटाकडून वाय बी चव्हाण सेंटर सभागृहात मेळाव्याचं आयोजन केलं होते. या मेळाव्यातून दोन्ही गटातील नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन घरी बसावं आणि आशीर्वाद द्यावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचे आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही (अजित पवार) तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की, ते अजिबात घरात बसणार नाही.

आव्हाड म्हणाले की, कायद्याच्या बाजू गुंडाळून या देशाला कोणत्या दिशाकडे घेऊन जात आहात. ज्यांनी हा वटवृक्ष उभा केला. त्याला या घरट्यातूनच बाहेर काढायचे. त्यांचे ते छोटेसे घरटे होते. त्यातून बाहेर काढायचं. साहेबांनी तुमची कुठलीच महत्त्वकांक्षा रोखली नाही. त्याच व्यक्तीला तुम्ही लोक घरी जा, बाय बाय करू लागला आहात. यात काही माणुसकी असते का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

स्वतःचे मन असते. आपल्यासाठी कोणी कोणी कधी काय काय केले आहे. शरद पवारांनी त्यांच्यासाठी काय काय केले आहे. त्यांना माहित नाही का, त्यांनी अजिबात सत्ता भोगली नाही. तुम्हा सर्वांना सत्ता दिली. ज्या आईने खायला वाढले, त्या आईच्या हातातून भांडे ओढून घेण्यासाठी तयार झालात, असे सांगत आव्हाडांनी अजित गटावर निशाणा साधला.

शेवटी नारळ कोणावर फोडावे लागते. माझ्या मागे बाप-आई नाही. माझी कंपनी नाही, कारखाना नाही. कोणाचीही साथ नाही. माझ्यामागे फक्त शरद पवार ही एकमेव ताकद आहे. तरी देखील हा बोलतो. म्हणून काही लोकांचे दुखणं असू शकते. माझ्याविरूद्ध बोलणे सोपे आहे. पण मी कायम साहेबांसोबत राहील. शेवटच्या श्वासापर्यंत बोलत राहणार आहे.

आज मुंबईतील आमदार निवासातून एक आमदार घेऊन गेले. जे फेसबुक पेजवर पवारसाहेबांच्या समर्थनार्थ लिहतात. त्यांना धमक्या येत आहेत. परंतू अशा लोकांची घुसमट केली जात आहे. पण ते अजिबात घाबरणार नाहीत. आम्ही लढत राहणार आहोत.

पवार साहेबांवर कशा पद्धतीने जबरदस्ती केली जात होती. पण शरद पवार त्यांना नकोसे झाले होते. काही लोक म्हणतात माझ्याकडे वय आहे. ज्यांच्याकडे वय नाही त्यांना हाकलण्यासाठी इतका आटापीटा का सुरू झाला. त्यामुळे अशा पद्धतीने बोलून तुम्ही आम्हाला हरवू शकत नाही. असा घणाघात आव्हाडांनी केला.

भाजपचे हिंदुत्व मनूवादी, विषारी, विभाजन करणारे त्यांच्यासोबत जाणे मला कदापी मान्य नाही

अजित पवार गटाच्या प्रत्येक आक्षेपाला शरद पवारांनी दिले उत्तर

शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्वात काय फरक आहे ते सांगितले

नागालंड मध्ये बाहेरून पाठींबा का दिला ते स्पष्ट केले.

मी त्यांचा दैवत आहे ,सांगून फोटो लावतात … आणि …

मुंबई- शिवसेनेचे हिंदुत्व हे सर्वांना घेऊन जाणारे आहे म्हणून त्यांच्याबरोबर गेलो पण भाजपचे हिंदुत्व मनूवादी, विषारी, विभाजन करणारे जो विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यासोबत जाणे योग्य नाही, हे मला कदापी मान्य नाही, असा घणाघात शरद पवार यांनी केला.

 मुंबईत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर पक्षातून उभी फुट पाडत बाहेर पडलेल्या अजित पवार गटावर देखील त्यांनी टीका केली. ते म्आहणाले,’जची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे आहे. २४ वर्षांपूर्वी मुंबई शहरामध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. मुंबईत षण्मुखानंद सभागृहात बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर लाखोंची सभा झाली. पक्षाची स्थापना आपण केली. आज २४ वर्षे झाली. या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले.

अनेक कार्यकर्ते विधिमंडळात आले. कोणी आमदार, खासदार तर कोणी मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य सरकार चालवू शकतो, हे राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी देशाला दाखवले. अनेक नवीन नेते तयार केले. यात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा ही एकच भावना होती. राज्यातील शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामात तुमच्या कष्टाने आपण यशस्वी झालो. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत. ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामध्ये देशाची सूत्रं आहेत. ज्यांच्या हाती सूत्रं आहेत त्यांच्या सहकाऱ्यांनासुद्धा म्हणाव्या तशी कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहेत. केंद्र सरकारमध्ये मी अनेकदा काम केलंय. विरोधी पक्षनेता म्हणून काम केलंय. त्यावेळी एखादी गोष्ट योग्य नसेल, जनतेची भावना वेगळी असेल तर त्यासंबंधी सुसंवाद साधणे, त्यातून मार्ग काढणे, हे सूत्र या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज चित्र बदललं आहे. संवाद संपलाय. लोकशाहीमध्ये विरोधक असोत वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद हवा. मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत असायची की एखादा निर्णय आपण घेतला तर त्या निर्णयासंबंधी सामान्य माणसात काय प्रतिक्रिया आहे ती जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद ठेवायचा. अयोग्य असेल ते दुरुस्त करण्याची मानसिकता ठेवायची. आज देशात हा संवाद नाही. आम्ही सत्ताधारी पक्षात नाही पण लोकांमध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी सामान्य माणसाच्या दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण राज्यकर्त्यांचा संवादच नसेल तर त्या गोष्टींवर मर्यादा येतात. आज देशातील जनतेमध्ये अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूने आम्ही लोकांनी प्रयत्न सुरु केले की लोकशाही टिकवण्यासाठी संसदीय पद्धतीला शक्ती देण्यासाठी संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या पहिल्या संवादात सत्ताधारी पक्षात जे नाहीत त्या सगळ्यांना संघटीत करण्यास सुरुवात केली. यासाठी बैठका घेत आहोत. हे जसे घडायला लागले तशी ज्यांच्या हाती सत्ता आहे ते अस्वस्थ होऊ लागले. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आठ दिवसांपूर्वी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींचा आरोप केला. प्रधानमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विधानं आधार नसताना करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांना बोलण्यासंबंधी काळजी घ्यावी लागते. आरोप करायचे तर नुसते आरोप करून चालणार नाही. खरंच जर कोणी चुकीचे काम केले असेल त्यावर कारवाई केली पाहिजे. पण त्यांनी तेवढी धमक दाखवली नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर कालच्या शपथविधीमध्ये त्याच पक्षाला बरोबर का घेतले? याचा अर्थ हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात, आधार नसलेल्या गोष्टी बोलून जनमानसात वेगळे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. आमदारांना दमदाटी, नवी पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला तर त्यात अडथळे, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. राज्यात काहींनी बाजूला जायची भूमिका घेतली त्याचे दुःख आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या कष्टातून ते निवडून आले. ज्या कार्यकर्त्यांमुळे हे दिवस आणले त्यांना किंवा पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घ्यायची आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्या विचाराच्या पंक्तीला जाऊन बसायचे हे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. काल नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काही गडबड करण्यात आली. काही लोक पोलिसांच्या मदतीने कार्यालयाचा ताबा घेतात आणि सांगतात हा पक्ष आमचा, ही घड्याळाची खूण आमची आहे. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कोणाला दिली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. खूण कुठेही जाणार नाही. ही गोष्ट खरी असली तरी खूण हे देशाचे राजकारण करत नाही. मी अनेक निवडणुका लढलो. त्यात घड्याळ, हात, चरखा, गाय-वासरू अशा चिन्हांवर लढलो आहे. जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंत:करणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका आहे तोपर्यंत काही चिंता करण्याची गरज नाही. आज काही लोकांनी भाषणं केली, त्यात माझ्याबद्दल बोलताना मी त्यांचा गुरु आहे असे सांगत होते. आज त्या सहकाऱ्यांच्या मेळाव्यात मागे असलेला फोटो पाहिला तर त्यावर सर्वात मोठा फोटो माझा होता. अनेक पोस्टरमध्ये माझा फोटो लावला. त्यांना माहिती आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणारं नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाही, खण्णकन वाजत नाही हे लोक ओळखतील. पांडुरंगाच्या भेटीमध्ये बडवे येऊ देत नाहीत असा उल्लेख काहींनी केला. पांडुरंगाच्या दर्शनाला येणं देशात कोणी थांबवू शकत नाही. मला पांडुरंग, गुरु असे म्हणायचे आणि आमच्याकडे दुर्लक्ष झाले असे म्हणायचे. जेव्हा निवडणूक आली तेव्हा दिड-दोन वर्ष तुरुंगात राहिलेल्यांना संधी देऊ नका असे काहींनी मला सांगितले. पण त्यांच्यावर अन्याय झाला असे मला वाटले. अशावेळी सहकाऱ्याला तोंडावर पडू न देण्याची भूमिका घेतली. माझा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. तिकीट दिले, सरकार आले तेव्हा मंत्रिपदाची शपथ घेताना पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या नावांमध्ये पहिले नाव त्यांचे देण्यात आले, ही भूमिका आपण घेतली.राज्यकर्त्यांनी राज्य एकत्रित ठेवायची भूमिका घेतली पाहिजे. भाजपच्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा भाषणात हे राज्य तोडण्याची, वेगळा विदर्भ करण्याची वक्तव्यं केली. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी केली आहे. आपले काही सहकारी गेले म्हणून आपण अस्वस्थ आहोत. मात्र आठ-दहा दिवसांपूर्वी भाषण ऐकले तर राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री आला नाही असे त्यांचे भाषण होते. आता असल्या मुख्यमंत्र्यांसमोर नमस्कार करून काम करणार. आम्ही भाजपसोबत गेलो त्यात काय चुकलं असे सांगण्यात आले. नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली हे सांगितले. ते खरं आहे. प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर जी राज्यं आहेत तिथे अतिशय बारकाईने निर्णय घ्यावे लागतात. तिथे उद्रेक झाला आणि त्याचा गैरफायदा शेजारील देशाने घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागेल. त्यामुळे त्याठिकाणी बाहेरुन पाठिंबा दिला. इथे आतच जाऊन बसले. त्यामुळे त्यांनी दिलेले उदाहरण माझ्या मते योग्य नाही. जे जे लोक देशात भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले तिथे काही कालावधीनंतर जो सहकारी आहे तो उद्ध्वस्त करणे, त्याची मोडतोड करणे हे भाजपचे सूत्र आहे. त्यांनी पक्षात बसून, चर्चा करून निकाल घेतला असता तर अधिक चांगले झाले असते. जे इतर राज्यात घडलंय त्याशिवाय वेगळे काही घडणार नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात स्व. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केले की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात पाठिंबा दिला पाहिजे. सहकार्याची भूमिका घेताना विधानसभेला राज्यात एकही उमेदवार शिवसेनेने उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळात अजून कटुता वाढू नये यासाठी त्यांनी हा निकाल घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणारे हिंदुत्व भाजपकडून केले जाते. जो समाजाच्या ऐक्याला तडा देतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही. आज देशात महागाई, बेरोजगारी, महिलांवर हल्ले असे प्रश्न आहेत. राज्यात मागील सहा महिन्यांच्या कालावधीत चार हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. ज्या राजवटीत महिलांना संरक्षण मिळत नाही त्यांना राज्य चालवण्याचा काय अधिकार आहे? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहे. त्यामुळे या लोकांवर विश्वास योग्य नाही. त्यांना सत्तेपासून बाजूला करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शक्तीशाली करणे हे एककलमी काम आपल्या सर्वांना करायचे आहे. आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र आहोत. त्या सामूहिक शक्तीतून नवीन, कर्तृत्ववान अशा सहकाऱ्यांची पिढी उद्या महाराष्ट्रात उभी करू या.असे ते म्हणाले.

तुम्ही थांबणार आहात की नाही? राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? मला व्हिलन करू नका,अजित पवारांचे थेट शरद पवारांना आव्हान

शरद पवारांनी सभा घेतल्या तर मला बोलावे लागेल;

मुंबई : एक वय असतं. त्या वयात थांबावं लागतं. मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योपती किंवा राजकारणी… पण वरिष्ठ नेते थांबालयाच तयार नाहीत. ते खूप हट्टी आहेत? पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग… पण नाही, त्यांना थांबायचंच नाही. तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही, असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला. मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाची आज पहिलीच जाहीर सभा होतीये. या सभेत छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर यांनी भाषणं केल्यानंतर अजित पवार यांनीही शरद पवारांवर जोरदार टीका करणारे भाषण केलं. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीची त्यांनी एकप्रकारे चिरफाडच केली.

अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या मुशीत मी घडलो, त्यांच्या छत्रछायेखाली माझी जडण घडण झाली. ते आपले श्रद्धास्थान आहे. राज्यपातळीवर आणि देशपातळीवर राजकारण चाललंय ते पाहता काही निर्णय गरजेचे आहेत. एखादा पक्ष कशासाठी काम करतो तर लोकांच्या विकासासाठी….

आपल्या वरिष्ठ नेत्यांनी १९६२ ला राजकारणाची सुरुवात केली, ६७ साली आमदार झाले, पुढे मंत्री झाले, १९७८ ला वसंतदादांचं सरकार पाडून साहेब मुख्यमंत्री झाले, १९८० ला पुलोदचा प्रयोग झाला. जेव्हाचा जनसंघ आताचा भाजप साहेबांच्यासोबत होता. १९८० ला निवडणुका झाल्या, इंदिराजींची लाट झाली. इंदिराजी पंतप्रधान झाल्या. इतिहास बघितला तर या देशाला कुणी ना कुणी करिश्मा असलेलं नेतृत्व लागतं. १९७७ ला देशपातळीवर असणारा जनसंघ कुठेय? तर तो शोधावा लागतोय. कारण करिश्मा असणारं नेतृत्व नव्हतं. १९८६ साली समाजवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलिन झाली. पवारसाहेबांना देशाने गेली ५५ वर्ष साथ दिली, असं सांगतानाच अजित पवार यांनी विलिनिकरणाचा इतिहास मांडला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मी सुप्रीया सुळे यांना म्हटले होतो की शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांनी थांबायला हवे आणि आपल्याला मार्गदर्शन करायला हवे. पण सुप्रीया सुळे यांनी ते हट्टी आहेत ते ऐकणार नाही असे तिने स्पष्ट सांगितले. सुप्रीया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासही मी तयार होतो. मात्र, हे ठरवूननंतर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली. आम्ही शरद पवार यांना विठ्ठल मानतो त्यांनी आम्हाला आशीर्वाद देण्याची भूमिका स्वीकारायला हवी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, मला अनेकदा पुढे करत राजकीय टीका करण्यात आली. मला मिळणार असलेली संधी दुसऱ्यांना देण्यात आली. मात्र, मी कधीच काही म्हणालो नाही, मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. केवळ मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे का असा सवालही अजितदादांनी उपस्थित केला.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, ठाण्यात तर अशा पठ्याला नेतृत्व देण्यात आले आहे, ज्याने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते बाहेर काढले. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ते पक्षात मनमानी करतात म्हणून पक्षाला रामराम ठोकला. त्यांना संध देऊ नका असे मला अनेकदा लोकांनी सांगितले पण त्यांच्या हातात धुरा देण्यात आली. नेता होताना आपल्यासह ३ ते ४ आमदार निवडून आणावे लागतात. बेरजेचे राजकारण करता आले पाहिजे. त्सांना कधी ते जमलेच नाही अशा व्यक्तीच्या हातात पक्षाची धुरा दिली आहे असा टोलाही लगावला आहे.

बापाचा नाद करायचा नाय, पदर खोचून उभी राहीन, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा; पवारांच्या डोळ्यांत अश्रू

मुंबई-माझ्या बापाचा व आईचा नाद करायचा नाही. बाकी कुणाबद्दलही बोला. माझ्याबद्दल बोला. पण माझ्या बापाचा नाद करायचा नाही. मी महिला आहे. कुणी बोललं तर टचकण डोळ्यात पाणी येतं. पण संघर्षाची वेळ आली की, हीच महिला पदर खोचून मैदानात उभी राहते. तीच अहिल्या होते व जिजाऊही होते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांना दिला. काही जण पक्षातील वडिलधाऱ्यांना सांगतात की, तुमचे वय झाले, आता थांबा, अरे यांच्या पेक्षा आम्ही मुली बऱ्या, असेही त्या यावेळी अजित पवारांना उद्देशून म्हणाल्या.

काही जण पक्षातील ज्येष्ठांना घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे माझे मन अधिक घट्ट झाले आहे. वय केवळ आकडा असतो. आपल्यात जिद्द असली पाहिजे, असेही सुप्रिया यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समाचार घेतला. भाजप हा देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्ट पक्ष असल्याचा दावा करणाऱ्यांनीच आज राष्ट्रवादीत फूट पाडून संपूर्ण पक्षच तिकडे नेला, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी बुधवारी भाजपवर हल्लाबोल करताना केला. यावेळी त्यांनी शरद पवारांना घरी बसण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांचाही तिखट समाचार घेतला. बापाला घरी बस म्हणणाऱ्या मुलापेक्षा मुलगीच बरी, असे त्या यासंबंधी म्हणाल्या.

पक्ष पुन्हा बांधू त्यात काही होणार नाही, 2019 मध्ये राष्ट्रवादीला 11 जागा मिळणार होत्या, पण तेव्हा शरद पवार बाहेर पडले आणि 54 आमदार निवडून आले. आजपासून भाजपच्या खोटारडेपणाविरुद्ध लढायचे, असा निर्धार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधात नाही, फैजल आणि अलिल देशमुख यांच्यावर केस केल्या तरी ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. वय हा फक्त आकडा आहे, भाजपच्या विरोधात आता जिद्दीने लढणार. स्टेजवरील 8 ते 9 खूर्च्या रिकाम्या झाल्या आहेत तिथे नव्या उमेदवारांना संधी मिळणार असे म्हणत सुप्रीया सुळेंनी महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

शरद पवारांचीच केली अध्यक्षपदावरून हकालपट्टी, अजित पवार नवे अध्यक्ष; पक्षाच्या नाव व चिन्हावरही सांगितला दावा

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाने बुधवारी शरद पवारांची NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. तसेच अजित पवार पक्षाचे नवे अध्यक्ष असल्याचा प्रस्तावही पारित केला. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे, अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्याच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावरही दावा सांगितला आहे. यासंबंधीचे 40 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रावर 30 जूनची तारीख

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या प्रस्तावाचे दस्तऐवज निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यात अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा उल्लेख आहे. महत्वाचे म्हणजे या पत्रावर 30 जून ही तारीख आहे. त्यावर निवडणूक आयोगाने आपण दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता हा निर्णय निवडणूक आयोगाकडे गेल्यामुळे शरद पवारांना कायदेशीर लढाई लढावीच लागणार आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

शिवसेनेच्या मार्गाने जाणार लढा

उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातही शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी सादर करण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण सध्या या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहेत.

दुसरीकडे, शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे.

पवार गटाचे कॅव्हेट दाखल

आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीतील सत्तासंघर्ष शिवसेनेच्याच वाटेने जात असल्याचे दिसून येत आहे.

बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. त्यानंतर आता त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अजित पवारांच्या गटाच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 15 हून अधिक आमदारांची हजेरी होती.

शिष्याने गुरूचा धडा गिरवला तर त्यात गैर काय? बंडखोरीवरून धनंजय मुंडे यांचा शरद पवार यांना खोचक टोला

मुंबई-

एखाद्या शिष्याने गुरूचा धडा गिरवला तर त्यात गैर काय, हे तर चांगलेच आहे, असे मत मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तर अजित पवार यांच्यावर अनेकदा आरोप करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी टीका केली आहे.

दरम्यान धनंजय मुंडे म्हणाले की, 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्यावेळी छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम केले. पहिल्या वर्षांतच सत्ता आली त्यावेळी स्वाभिमानासाठी शरद पवार यांनी निर्णय घेतला होता. मात्र, 3 ते 4 बडव्यांमुळे हा सर्वांना निर्णय घ्यावा लागला, असा आरोप करत धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली.

धनंजय मुंडे म्हणाले की, कठीण प्रसंगामध्ये अतिशय वाईट काळात सर्व नेत्यांनी शरद पवार यांची साथ दिली. तटकेर यांनी 40 वरुण 54 पर्यंत संख्या नेली, कारण अजितदादांनी अनेक वेदना सहन केल्या. मात्र, आमच्या विठ्ठल असेलेल्या शरद पवारांचा शब्द आम्ही तोडला नाही,आणि आज हा निर्णय घ्यावा लागतो तेव्हा किती वेदना सहन कराव्या लागत असतील हे समजून घेणे घेण्यासारखे आहे.

धनंजय मुंडे म्हणाले की,अजितदादांनी अनेकदा त्यांना मिळणारे पद इतर लोकांना दिले आहे.घरातून आणि पक्षातून काढलेल्या माणसाला अजित पवार यांनी मोठे केले आणि ही संधी मला दिली आहे.अजित पवार यांनी त्यांच्या सवालीला देखील आपला अपमान आणि समजू दिला नाही. अजित पवार यांच्यावर अनेकदा अजितदादांना बदनाम करण्यात येत आहे. अजित पवार यांनी सर्व काही सहन करूनही काहीच केले नाही, असे म्हणत आपली खंत व्यक्त केली आहे.आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराज हे आहे. हसन मुश्रीफ यांनी राम मंदिर उभे केले आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करतो.

साहेब,वसंतदादा पाटलांनाही असेच वाईट वाटले असेल , छगन भुजबळांनी शरद पवारांना मारले टोमणे

मुंबई- आम्ही सत्तेत गेलो , साहेबांना वाईट वाटले असेल पण साहेब असेच वसंतदादा पाटलांनाही वाईट वाटले असेल अशा शब्दात काही मागच्या राजकारणाचे उल्लेख करत छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांना टोमणे मारले ते म्हणाले तुमच्या भोवतालच्या बडव्यांना बाजूला करा , आम्ही येतो सारे … जसा नागालँड मध्ये सत्तेत सहभागी होणाऱ्यांना आशीर्वाद देऊन त्यांचा सत्कार केला ,तसा साहेब आम्हालाही परवानगी देऊन आमचाही सत्कार करा असे छगन भुजबळ म्हणाले .

अजित पवार आणि त्यांच्या मातब्बर सहकाऱ्यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पद घेऊन भाजपा बरोबर सत्तेत सहभागी झाल्यावर आज मुंबईत अजित पवार गटाची बैठक होत आहे सुरुवातीलाच भुजबळ यांनी भाषण केले ते म्हणाले ,’

मागील अनेक दिवसांपासून अजित पवारांनी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आपला अध्यक्ष नियुक्त करण्याचा आग्रह धरला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळेच आम्ही वेगळी वाट निवडली, असा दावा छगन भुजबळ यांनी बुधवारी शरद पवार व जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. आम्ही सत्तासंघर्षाच्या निकालाचा अभ्यास करूनच वेगळी वाट निवडली. त्यामुळे आमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत व्यक्त केला.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

“मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा अनेकांनी आमिषं दाखवली. पण आम्ही गेलो नाही. शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलो आणि काम केलं. पण आता काय हा प्रश्न आहेच. साहेबांना (शरद पवार) वाईट वाटणं स्वाभाविक आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यापासून सगळी मंडळी गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी तरळणं स्वाभाविक आहे.” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे

शरद पवार आमचे विठ्ठल
“आम्हाला विचारलं जातं की शरद पवारांचा फोटो का वापरला? अरे, साहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या अशी माझी शरद पवार यांना विनंती आहे. मला एक सांगा ही सगळी मंडळी वेडी आहेत का? जी आमच्याबरोबर आली आहेत. आमच्या बरोबर आलेले काही लोक तर आमदार किंवा नामदारही नाहीत. पण तिथे (शरद पवार गट) काम करणारे पदाधिकारी या सगळ्याला जबाबदार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना नीट वागवायचं नाही.
आजही माझ्या मनात शरद पवारांविषयी प्रेम आहे. पण आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा वसंत दादांनीही असंच वाईट वाटलं. मी बाळासाहेब ठाकरेंसह होतो. मी त्यांना आई वडिलांच्या ठिकाणी मानत होतो. पण ३६ लोक तुमच्याकडे आले होते. तेव्हा मलाही येणं भाग पडलं. तुम्ही सांगितलं नाही की तिथे थांबा. मी तुमच्याबरोबर आलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांनाही असंच वाईट वाटलं. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेतलं तेव्हा त्यांचे काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे यांनाही असंच वाईट वाटलं. या सगळ्याची पुनरावृत्ती झाली आहे. अजूनही काही बिघडलेलं नाही. अजित पवारांच्या नेतृत्त्वात आम्ही शेतकऱ्यांसाठी, ओबीसींसाठी, दलितांना न्याय देण्यासाठी काम करणार आहोत.” असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ यांनी शरद पवार आमचे विठ्ठल आहेत आणि त्यांना बडव्यांनी घेरलं आहे असं वक्तव्य करताच राष्ट्रवादीतले बडवे कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे यामध्ये येतात का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.