Home Blog Page 1454

बालाजीनगरला रिक्षा चोर पकडला

पुणे- सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर च्या सिद्धी हॉस्पिटल नजीक एका रिक्षा चोराला पकडले २ रिक्षा चोरीचे गुन्हे त्याने केल्याचे उघड झाले आहे. हिरेन किरणकुमार दोशी वय ३७ वर्षे रा. अमित कॉम्लेक्स, फ्लॅट नं. १०, चाफेकर चौक, चिंचवड गाव असे या रिक्षा चोराचे नाव असून केवळ मौजमजा करण्यासाठी त्याने रिक्षा चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ दि.३०/०४ / २०२३ रोजी सकाळी ०६.०० वाजता गारवल ॲटोटेक समोर अरण्येश्वर पुणे या इसम नामे अजीज इब्राहीम पानसरे वय ४० वर्षे रा. भुई आळी, भोर जि.पुणे यांनी त्यांची रिक्षा क्र. MH-12 VB 0172 दुकानासमोर ही लॉक करुन ठेवली असता ती कोणीतरी चोरी केली म्हणुन पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११५/२०२३ भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच दि. २६/०६/२०२३ रोजी सकाळी ०६.४५ वाजता पुणे सातारा रोडवरील धोंडू पाटील वडेवाले यांचे दुकानासमोर बालाजीनगर धनकवडी पुणे येथे इसम नागे राजेंद्र रामचंद्र बरदाडे वय ४८ वर्षे धंदा रिक्षा चालक रा. काशीनाथ पाटील नगर धनकवडी पुणे यांनी त्यांची रिक्षा क्र.MH-12-DG-5259 ही लॉक करुन ठेवली असता ती चोरीस गेली म्हणुन बरदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६३/२०२३ भादवी कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे.वरील दोन्ही दाखल गुन्हयाचा तपास श्री. सुरेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व श्री. संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे व तपास पथकाचे स्टाफने सुरु केला. अज्ञात आरोपीचा बातमीचे आधारे शोध घेत असताना पो.हवा.६३ भुजंग इंगळे व पो.ना.६७८५ फरांदे यांना बातमी मिळाली की, रिक्षाची चोरी करणारा चोरटा हा रिक्षा क्र. MH-12 VB 0172 ही घेवुन सिध्दी हॉस्पीटल बालाजीनगर पुणे येथे थांबला आहे. लागलीच त्यास सदर ठिकाणी जावुन ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव हिरेन किरणकुमार दोशी वय ३७ वर्षे रा. अमित कॉम्लेक्स, फ्लॅट नं. १०, चाफेकर चौक, चिंचवड गाव पुणे असे असल्याचे सांगीतले. सदरची रिक्षा ताब्यात घेवुन गुन्हे अभिलेख पाडताळुन पाहता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने वरील रिक्षा व्यतिरीक्त MH-12-DG 5259 ही रिक्षा चोरली असुन ती के. के. मार्केट भागात ठेवली असल्याचे सांगीतले. त्याचे ताब्यात चोरीस गेलेल्या किंमत रुपये २,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन रिक्षा जप्त केल्या असुन दोन्ही रिक्षा मौजमजा करण्यासाठी चोरी केल्याचे त्याने तपासात सांगीतले आहे. रिक्षा चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग प्रवीणकुमार पाटील सो, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ श्रीमती स्मार्तना पाटील सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ यांनी केली आहे.

राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईविरोधात उद्या बुधवारी १२ जुलै रोजी काँग्रेसचे ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन.

मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० पासून आंदोलन.

मुंबई, दि. ११ जुलै
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने सुडबुद्धीने कारवाई करत खासदारकी रद्द करुन त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मोदी सरकारच्या या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी उद्या बुधवार दिनांक १२ जुलै रोजी मुंबईत मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, विधान परिषद गटनेता सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हे मौन सत्याग्रह आंदोलन सकाळी १० वाजता सुरु होईल.

सुहास शिरवळकर परिवारातर्फे आयोजित आणि स्टोरीटेल इंडिया प्रायोजित सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित!

 पुणे- प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २० व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५ व्या जन्मदिनानिमित्त) आयोजित केलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत एकूण २१ लेखक सहभागी झाले होते. त्यांपैकी लेखक रवींद्र भयवाल लिखित ‘’मिशन गोल्डन कॅट्स’’, या कादंबरीची निवड परीक्षकांनी विजेती कादंबरी म्हणून केली आहे.लेखक रवींद्र भयवाल यांचे सुहास शिरवळकर परिवार, स्टोरीटेल इंडिया व परीक्षकांतर्फे अभिनंदन करण्यात आले असून सर्व सहभागी लेखकांनी केलेल्या प्रयत्नांसाठी व सहकार्यासाठी त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, हृषीकेश गुप्ते तसेच स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांनी काम पाहिले. या कामात सुहास शिरवळकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी त्यांना साहाय्य केले.

नेदरलँड्सचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी घेतली उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

मुंबई दि. ११: भारत आणि नेदरलँड्स देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेदरलँडचे मुंबईतील कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी व्यक्त केले.

श्री. हेल्डन यांनी आज विधानभवनातील उप सभापती यांच्या दालनात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. हेल्डन यांच्यासमवेत नेदरलँड्स उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सौरभ सांगळे हे देखील उपस्थित होते.

युरोपीय देशांमधील संसद, संसदीय समित्या, महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला संरक्षण विषयक कायदे, ज्येष्ठांसाठीचे कायदे, बाल आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींसाठी चर्चा-अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. नेदरलँड्समध्येदेखील अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. नेदरलँड्समधील आगामी अभ्यासभेटीसंदर्भातील नियोजन यादृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. भारत आणि नेदरलँडचे संबंध व्यापार आणि सामाजिक दृष्टीने अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा श्री. हेल्डन यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आरोग्य, कृत्रीम बुद्धीमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात आणखी करारमदार व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रात नगरपालिकास्तरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी सामजंस्य कराराच्या माध्यमातून काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत वातावरणीय बदल, प्रदूषण, महिलांचे सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरूष समानता यासंदर्भात विचार मांडले. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जागतिक महिला धोरणासंदर्भात परिषद होत आहे. त्यात नेदरलँड्सचे प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे, असे निमंत्रण उप सभापती यांनी श्री. हेल्डन यांना दिले.

फॉक्सकॉनने वेदांताची साथ सोडल्याने देशाचे १० लाख कोटींचे नुकसान…

मोदी देशासाठी तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी हानिकारक :- अतुल लोंढे

वेदांता-फॉक्सकॉन भाजपा सरकारने घालवल्याने महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान.

फॉक्सकॉनने माघार घेतल्याने मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पावरही संशयाचे ढग.

मुंबई/नागपूर, दि. ११ जुलै

वेदांदा-फॉक्सकॉन हा सेमीकंडक्टर प्रकल्प पुण्याजवळ प्रस्तावित होता पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी तो गुजरातला पळवण्यात आला पण आता हा प्रकल्प गुजरातमध्ये साकार होणार नाही. वेदांताबरोबरच्या भागिदारीतून फॉक्सकॉनने माघार घेतल्याने हा प्रकल्प बारगळला आहे. हा प्रकल्प पुण्यात होणार होता, त्याची सर्व प्रक्रिया पार पडली होती, मविआ सरकारनेही सर्व सवलती व सुविधा देण्याची तयारी दर्शवली होती पण महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळवून नेला पण आता तो तिथेही होत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. म्हणूनच मोदी हे देशासाठी तर फडणवीस हे राज्यासाठी हानीकारक आहेत, अशी घणाघाती टीका महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन हा महत्वाचा प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रातून पळवून नेला. तब्बल १.५ लाख कोटी रुपये गुंतवणुक व १ लाख नोकऱ्या निर्माण करणारा हा प्रकल्प होता. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी पुणे परिसरातील वातावरण अत्यंत अनुकुल असे आहे, पुणे हे औद्योगीक क्लस्टर असून विमानतळ, बंदरे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, आवश्यक सोयी सुविधा या परिसरात उपलब्ध आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी द्यावयाच्या सुविधा व सवलतीसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती पण हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. गुजरातमध्ये ज्या भागात य प्रकल्पाला जागा देण्यात आली त्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणे अशक्यच होते, शेवटी तेच झाले. हा प्रकल्प गेल्यामुळे देशाचे तब्बल १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांच्या हाताखालून गेला. राज्यातील लाखो तरुणांचे रोजगारही गेले. प्रकल्प गुजरातला नेला पण गुजरात सरकार व केंद्र सरकारने या प्रकल्पाना सोयी सुविधा दिल्या नाहीत असे रॉयटर या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

फॉक्सकॉनने वेदांताबरोबरचा करार मोडीत काढल्याने आता मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या भवितव्यावरही संशयाचे ढग जमा झालेत. वायब्रंट गुजरात व मेक इन इंडियाच्या नावाने मोठ्य-मोठ्या घोषणा केल्या गेल्या पण प्रत्यक्षात त्यातील किती प्रकल्प आले यावर श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. फॉक्सकॉनने माघार घेतल्याने इतर कंपन्यांच्या परदेशी गुंतवणुकीवरही याचा परिणाम होऊन भारताचे नुकसानच होणार आहे. महाराष्ट्रातून याआधी वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क केमीकल्स यासह अनेक उद्योग व संस्था महाराष्ट्राबाहेर गेल्या त्याला भाजपा, फडणवीस हेच जबाबदार आहेत. रशिया-युक्रेनचे युद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी थांबवू शकतात पण देशातून जाणारे उद्योग मात्र थांबवू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. सरकार कोणाचेही असो उद्योग निघून जाणे विकासाच्या दृष्टीने चांगले नाही, असेही लोंढे म्हणाले.

मोदी शरद पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार घेणार? मग 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे काय?चक्की पिसिंगचे काय ? उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टिळक पुरस्कार स्वीकारणार आहेत. मग अशावेळी त्यांनी केलेल्या सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे काय झाले, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी ‘चक्की पिसिंग’ म्हणून अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्या ‘चक्की पिसिंग’चे काय झाले? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपूर दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कलंकित शब्दावर राज्यात गदारोळ होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी पक्षाच्या नव्या मंत्र्यांमुळे मिंद्यांच्या नाकी नऊ आले असल्याचा खोचक टोला, उद्धव ठाकरे यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांना आता मिरची देखील गोड लागत असल्याचे देखील ते म्हणाले.

चक्की पिसिंगचे काय?

भ्रष्टाचाराचे आरोप करून तुम्ही एखाद्यावर कलंक लावता त्याचे काय होते? असा सवाल त्यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. चक्की पिसिंग म्हणून अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्या वेळी केलेल्या त्या आरोपांचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.जनतेच्या मनामध्ये सरकार विरोधात राग आहे. त्यामुळे जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. सरकारचे राज्यातील समस्यांवर लक्ष नाही. त्यामुळे आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.राजकारणात सुसंस्कृतपणा दाखवला पाहिजे, हे मला देखील वाटते. मात्र, तुम्ही म्हणाल तो कलंकित आणि तुम्ही म्हणाल तो देव, असे चालणार नाही. तुम्ही ज्यांच्यावर कलंक लावला होता त्यांच्या बाजूला मांडी लावून तुम्ही बसत आहात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नितीन गडकरी यांनी केलेल्या टीकेवर थेट उत्तर देणे उद्धव ठाकरे यांनी टाळले.

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठली; आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा

दिल्ली-महाराष्ट्राचं विधिमंडळाच्या विधानपरिषदेच्या एकूण सदस्यसंख्या 78 आहे. त्यापैकी 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर करतात. मात्र, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली असून त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई हायकोर्टात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका करणारे नाशिकमधील रतन सोली लुथ यांनी हायकोर्टाने 13 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. त्या अपिलावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यावर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना आपली याचिका परत घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर कोणताच निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. राज्यपालांनी घटेनची पायमल्ली केलीय, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने दिलेली मूळ यादीच कायम ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली होती.

IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तमन्ना भाटियाने शाहरुख खानला टाकलं मागे ! 

IMDb यादीत तमन्ना भाटिया ठरली अव्वल ! 
तमन्ना भाटिया हिच्या दोन रिलीज नंतर तिने तिच्या कामात अव्वल ठरली आहे. जी करदा आणि लस्ट स्टोरीज 2 च्या यशाने उंच भरारी घेतली असून तिच्या तामिळ चित्रपट जेलर मधलं कावला हे गाणं नुकतंच आल आणि या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या गाण्यात तिच्यासोबत ओजी रजनीकांत देखील आहे. आता तमन्नाने आणखी एक पराक्रम केला आहे तो म्हणजे IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे.
https://www.instagram.com/p/CujCcNOylI4/?igshid=MzRlODBiNWFlZA
तमन्ना भाटियाने ‘बॉलिवुडचा किंग खान’ शाहरुख खानला मागे टाकले आहे जो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने मृणाल ठाकूर, कियारा अडवाणी, राम चरण, रणवीर सिंग आणि थलपथी विजय यांनाही मागे टाकून यादीत अव्वल स्थान मिळवले. एक अभिनेत्री म्हणून तिची अष्टपैलुत्व पुन्हा एकदा सगळ्यांना समजलं आहे.
तमन्ना तिच्या प्रवासात पुढे जात असताना  तिच्या पुढच्या प्रवासात मल्याळममध्ये ‘बांद्रा’, ‘जेलर’ आणि ‘अरनमनाई 4’ तमिळमध्ये आणि ‘भोला शंकर हे चित्रपट करणार आहे.

मी माझे कर्तव्य पार पाडले, शेवटी पक्षाचा निर्णय; राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशावर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

मुंबई-मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष विशिष्ट पद्धतीने काम करत असतो. अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. न्यायालयात खटला सुरू असताना त्यावर बोलणे बरोबर नाही, असे मत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशावर व्यक्त केले आहे.गेली काही दिवस अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजप नेते किरीट सोमय्या यांना ट्रोल करण्यात येत आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांनी आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते मुंबईतील माहिम रेल्वे स्टेशन इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 17 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर मीडियाशी ते बोलत होते.

दरम्यान किरीट सोमय्या पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्वाला कलंक लावला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंनी तिलांजली वाहिली आहे. उद्धव ठाकरेंनी अमरावती आणि नागपूरमध्ये झालेल्या सभेत किरीट सोमय्यांचा उल्लेख उपरा असा केला होता, त्यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

पुणे: विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सातत्याने खा. शरद पवार यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करत आहेत. या गोष्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून काल पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सदा खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारत आंदोलन केले. यावेळी “सदा खोत मुर्दाबाद” , “अगोदर बिल द्या…मग ज्ञान पाजळा”, “खोताच्या बैलाला घो”, अशा प्रकारच्या घोषणा देत बालगंधर्व रंग मंदिराचा परिसर दणाणून सोडला

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेटलमेंट करत आमदारकी मिळविणाऱ्या सदा खोत नावाच्या आमदाराने आदरणीय पवारसाहेबांवर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली आहे.
टाकलेला तुकडा संपत आला की पुन्हा तुकडा मिळावा यासाठी गेटकडे पाहून रखवालदारीचा आव आणणाऱ्या या प्रवृत्ती केवळ आमदारकीची टर्म संपत आल्याने अशी विधाने करत आहेत.
“आज सदा खोत यांच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत केले असलो, तरी भविष्यात जर अशा प्रकारची टीका टीपणी पुन्हा सदा खोत यांनी केली तर आम्ही त्यांच्या चेहऱ्याला काळेफासत त्यांच्या कृत्यांचा निषेध करू”, असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला सदर आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, काकासाहेब चव्हाण, उदय महाले, आप्पासाहेब जाधव, मृणालिनीताई वाणी, स्वातीताई पोकळे, प्रभावतीताई भुमकर, नितीन कदम, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, दीपक कामठे, आनंदजी सावणे,राजू साने,युसुफ शेख,मनोज पाचपुते ,अनिताताई पवार,तन्वीर शेख, विविध सेलचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू

पुणे, दि. १० : भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली.

बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन उपायुक्त वर्षा पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. नारनवरे यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश जवादे, उपसंचालक सुचिता साकोरे, सहाय्यक आयुक्त मनीषा बिरारीस, सहाय्यक आयुक्त ममता शिंदे, परीविक्षाधीन अधीक्षक दत्तात्रय मुंडे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, सांख्यिकी अधिकारी प्रमोद निकाळजे, झुंबर जाधव, अश्विनी कांबळे आदी उपस्थित होते.

डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी सांगली येथील जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी, उस्मानाबाद व पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सिडकाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि समाज कल्याण आयुक्त यासारखी अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. समाज कल्याण आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
0000

अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत- कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.१० : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

राज्याचे सरासरी पर्जन्यमान ३१४.३ मिमी असून आत्तापर्यंत २२७.३ मिमी एवढा पाऊस झाला आहे. खरीप हंगामासाठी ४६.७ मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. चालू खरीप हंगामातील पेरणीचे क्षेत्र १४२ हेक्टर आहे. आजअखेर ४७.१३ लाख हेक्टरवर ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत कापूस, सोयाबीन व तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटिकेची कामे सुरु आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास या आठवड्यात पेरणीच्या कामाला वेग येईल.

राज्यात पुरेसे बियाणे उपलब्ध असून फसवणूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरेदीची पावती व टॅग जपून ठेवावेत. कृषिविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
0000

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा:पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई, दि. १० : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन २०२३ च्या गणेशोत्सवात उत्कृ्ष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे वने, मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यामध्ये महानगर क्षेत्रातील पारितोषिकांची संख्या वाढविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात सन २०२२ मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात आले होते. त्या अनुषंगाने सन २०२३ मध्ये राज्यातील सार्वजनिक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा निधी आणि या पुरस्कारसाठीचे निकष याबाबतीत नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यातील पहिल्या तीन विजेत्या क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख रुपये व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

या पुरस्कारासाठीच्या २४ लाख ६० हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत) १५ गुण, ध्वनिप्रदूषण रहित वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी २० गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी २५ गुण असतील.गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जाबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी २० गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल १५ गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी १५ गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी १० गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी दहा गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे २५ गुण मिळून अशी १५० गुणांची ही स्पर्धा असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल आयडीवर १० जुलै ते ५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत नोंदणी करावी.

विजेत्यांच्या निवडीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी या समितीचा अध्यक्ष असेल. याशिवाय या समितीत शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी सदस्य असतील, तर जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव असतील. निवड समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देतील तसेच मंडळाकडून व्हीडीओग्राफी व कागदपत्र जमा करुन घेतील. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येईल. सदर समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्हयातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस करुन त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करेल.

जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस केलेल्या याद्यांमधून तीन विजेते क्रमांक निवडीसाठी राज्यस्तरावर समिती असेल. या समितीत सर जे. जे. कला विद्यालयाचे अधिष्ठाता, वरीष्ठ प्राध्यापक अध्यक्ष् असतील, तर पोलीस महासंचालक कार्यालयातील वरीष्ठ गट ‘अ’ मधील अधिकारी सदस्य, तर राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील.राज्यस्तरीय समिती ही जिल्हास्तरीय समिती मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या ४ जिल्हयांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्हयातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ प्राप्त शिफारशीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधून गुणांकन व संबंधित कागदपत्राच्या आधारे पहिल्या ३ विजेत्यांची निवड करतील.

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरील प्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

राज्यात राजकीय आणीबाणी : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

पुणे येथे धाराशिव फाऊंडेशनचे उद्घाटन संपन्न

पुणे (ता.१०): ‘ सद्या राज्यासह देशातील राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे. ईडी,सीबीआय सारख्या सरकारी यंत्रणांचा वापर करून आणि धमकावून विरोधी पक्षातील आमदार खासदार फोडण्याचे काम सुरू याचे उत्तर जनता मतदानातून देईल.जे लोक राजकारण जगले ,राजकारणात वाढले ते आता कसे वागले ते आपण पाहिले.हा प्रकार म्हणजे राजकीय आणीबाणी नाही तर काय आहे ? ‘ असा सवाल धाराशिव लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजनिंबाळकर यांनी उपस्थित केला.पुणे येथे धाराशिव फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला यावेळी ते बोलत होते.

१९७२ च्या दुष्काळानंतर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून नागरिकांचे स्थलांतर पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच पुणे,पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी झाले.गावाकडे अपुऱ्या पावसामुळे व उद्योग व्यवसाय नसल्याने उपजीविकेसाठी कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आपली जन्मभूमी सोडून कर्मभूमी मध्ये नाव कमवत असलेल्या नागरिकांना एकमेकांशी संपर्क करता यावा यासाठी धाराशिव फाउंडेशनची स्थापना करत असल्याचे ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी यावेळी सांगितले.

फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणासाठी मदत,राहण्यासाठी होस्टेल, विविध आयटी व खाजगी कंपनी मध्ये नोकरीची संधी खाजगी व सरकारी रुग्णालयास लागणारी मदत, गावाकडील कुठल्याही शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे मदत विविध विषयांवर मार्गदर्शने आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
कार्यक्रमास,ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, अभिनेते उमेश जगताप, रोहित कोकाटे, माजी पोलीस आयुक्त विठ्ठल जाधव, स्टरलिन जनरेटर कंपनीचे ceo संजय जाधव, धाराशिव पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष महेश पोतदार,व्यंगचित्रकार धनराज गरड, आकाशवाणी उस्मानाबादचे निवेदक दौलत निपाणीकर, माजी उप नगराध्यक्ष जयंत पाटील, शिक्षक संघटनेचे विक्रम पाटील, राहुल गवळी, केदार साळुंखे, पंकज पाटील, चेतन वाटवडे, आतिश पाटील,
कुलदीप आंबेकर, नारायण चापके, संजय जाधव ,प्रदीप तांबे,ॲड संतोष शिंदे , प्रवीण गवळी ,अमोल वरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

फॉक्सकॉनने वेदांतासोबतचा करार मोडला; महाराष्ट्रातून गुजरातेत हलवला होता प्रकल्प,1 लाख रोजगारांची निर्मिती होणार होती

सेमीकंडक्टरची निर्मिती करणाऱ्या फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी वेदांतासोबतचा करार मोडण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्सकॉनने याची माहिती दिली आहे. गेल्या वर्षी वेदांता आणि फॉक्सकॉने गुजरातमध्ये 19.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याची घोषणा केली होती. आधी हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र नंतर गुजरातला गेल्याने यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.’रॉयटर्स’ने याविषयीचे वृत्त दिले आहे. फॉक्सकॉनने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. वेदांतासोबत संयुक्त प्रकल्प न करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे फॉक्सकॉनने जाहीर केले आहे.

मागील आठवड्यात शेअर बाजार नियामक सेबीने वेदांताला दंड ठोठावणार असल्याचे जाहीर केले होते. वेदांताने फॉक्सकॉनसोबत भागिदारी केली असल्याचे भासवले. ही कृती नियामकांच्या विरोधात असल्याचे सेबीने म्हटले.शुक्रवारी, वेदांताने ज्वाइंट व्हेंचर असलेल्या होल्डिंग कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याचे जाहीर केले होते. या कंपनीने फॉक्सकॉनसोबत सेमीकंडक्टर तयार करण्यासाठीचा करार केला होता. कंपनीने सांगितले होते की, ते डिस्प्ले ग्रास मॅन्यूफॅक्चरिंग व्हेंचरचे वॉलकॅन इन्व्हेस्टमेंटकडून अधिग्रहण करणार आहे.

गेल्या वर्षी गुजरातेत हलवला प्रकल्प,महाराष्ट्रात होणार होता प्रकल्प,1 लाख रोजगारांची निर्मिती होणार होती

मागील वर्षी, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता कंपनीने फॉक्सकॉनसोबत गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. वेदांता समूहाला सेमीकंडक्टर प्लांट लावण्यासाठी गुजरात सरकारकडून आर्थिक आणि बिगर-वित्तीय अनुदान देण्यात आले होते. यामध्ये स्वस्त दरात वीज आणि इतर बाबींचा समावेश होता.

वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प हा महाराष्ट्रात येणार होता. मात्र, हा प्रकल्प गुजरातला अचानकपणे गेल्याने मोठं राजकारण गाजलं. मागील वर्षी सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने प्रयत्न न केल्याने केंद्राच्या मदतीने हा प्रकल्प गुजरातला गेला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता. तर, मविआ सरकार सत्तेवर असताना परवानगी आणि इतर बाबी रखडल्यानेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे शिवसेना शिंदे गट-भाजपने म्हटले होते.हा प्रकल्प हा पुण्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण झाला असता. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असणार होता. तर, जवळपास 50 टक्के रोजगार हा अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन आणि 63 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच 3800 कोटी रुपयाचे सेमीकंडक्टर असेंबली आणि टेस्टिंग फॅसिलिटी होणार होती.