Home Blog Page 1453

पोलिसांनी तपास कामांत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 :- जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक  परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पोलिस देशातील नावाजलेली संस्था आहे. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे. आता स्पर्धात्मक वातावरणास सामोरे जाण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. आपल्याला सर्वोत्तम रहावेच लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण पोलिसिंग केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि नावलौकिक आणखी वाढवण्यासाठी संस्थात्मक भाव (Institutional approach) आपल्या वागण्यात असला पाहिजे. उपलब्ध साधनसामग्रीचे योग्य व्यवस्थापन करून आता नवीन तंत्रज्ञान स्वीकारावेच लागेल. क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. मात्र बदलत्या काळानुसार यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर नवीन आणि वेगवान तंत्रज्ञान समाविष्ट करावे लागेल. प्रत्येक नवीन प्रकल्प कालबद्ध मर्यादेतच पूर्ण झाले पाहिजेत. यासाठी पूर्ण कार्यक्षमतेने अभियान स्तरावर यासंदर्भात काम करावे. विभागाने यासंदर्भात एकसंघपणे व समन्वयाने काम करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

संवादात्मक पद्धतीने कामकाजावर भर द्यावा

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वरिष्ठ अधिकारी आणि सर्वात खालची व्यक्ती यात अधिक संवाद असला पाहिजे. आपल्या कार्यालयाच्या बाहेरच्या जगाशी सुद्धा आपला उत्तम संपर्क असला पाहिजे. संवादात्मक पद्धतीने कामकाजावर भर द्यावा. कम्युनिटी पोलिसिंगचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम पुढे कायमस्वरूपी सुरू राहिले पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. गुन्हे आणि पोलिस कार्यपद्धती दोन्ही सातत्याने बदलत आहे. अशात पोलिस कार्यपद्धती बदलली नाही तर आपण मागे पडू. प्रशिक्षणावरही भर द्यावा लागेल. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध विषयांतील प्रशिक्षण घेतले पाहिजे. तीन वर्षांनी ही परिषद झाली. परिषदेत विविध विषयांवर अतिशय चांगले सादरीकरण झाले. येथील चर्चा येथेच थांबून उपयोग नाही तर त्याचे प्रतिबिंब शेवटच्या स्तरापर्यंत कसे जाईल, याचे नियोजन झाले पाहिजे. ज्यावर चर्चा झाली, त्यावर कृती आराखडा तयार झाला पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीचा दर तीन महिन्यांनी महासंचालकांनी आढावा घ्यावा. परिषदेतील विविध विषयांवरील सादरीकरण व चर्चांमुळे अनेक विषयांवर विचारमंथन झाले.

सर्वांनाच पुढील वाटचालीसाठी हे उपयुक्त ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम, कम्युनिटी पोलिसिंग, मानवी तस्करी, दहशतवाद प्रतिबंधन या विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

हौशी नाट्य कलावंतांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मंत्री मुनगंटीवार यांची ग्वाही

मुंबई, दि.11 जुलै 2023 :

राज्यातील नाट्य आणि इतर कलावंतांना प्रोत्साहन देण्याचीच भूमिका राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ हे निश्चित वेळेत आणि कालावधीत होईल, यादृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येत असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्या हौशी नाट्य कलावंतांच्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या प्रतिनिधींसोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या कलावंतांच्या मागण्या ऐकून घेतल्या. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध पारितोषिके आणि पुरस्कार दिले जातात. यापूर्वी हे पुरस्कार अथवा पारितोषिके वेळेत दिले जात नसल्याची तक्रार येत होती. त्यामुळे विभागाने सकारात्मक पुढाकार घेत पुरस्कार वितरणाबाबत निश्चित कार्यक्रम तयार करून त्याच दिवशी संबंधित पुरस्कार अथवा पारितोषिके वितरित होतील, यादृष्टीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी हौशी नाट्य कलावंत संघटनेच्या पदाधिकारी यांनी केलेल्या विविध मागण्यांचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. नाट्य प्रयोग निर्मिती खर्च, दैनिक भत्त्यात वाढ करणे आदी मागण्यांची व्यवहार्यता तपासून पाहू. राज्य नाट्य स्पर्धेत प्राथमिक फेरीत दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, संगीत, रंगभूषा आणि वेशभूषा या तांत्रिक बाबींसाठी तीन पारितोषिके द्यावीत, याचाही विचार करण्यात येईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे श्याम शिंदे, सलीम शेख, दिनेश कवडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 000

राज्यातील विद्यापीठांना सहकार्य करण्यास अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक

 मुंबई-जगातील युवा देश असलेला भारत हा प्रतिभासंपन्न लोकांचा देश असून आगामी काळात भारतातील कौशल्य प्रशिक्षित लोक जगातील अनेक देशांना व अर्थव्यवस्थांना मदत करताना दिसतील, असे नमूद करून भारत हा मानवी संसाधनांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश असेल, असे प्रतिपादन अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठाचे सहयोगी प्रोव्होस्ट डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांनी केले आहे.

२०५- वर्षे जुन्या सेंट लुईस विद्यापीठाच्या एका शिष्टमंडळाने डॉ. एरिक ऍम्ब्रेख्त यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे राज्यपाल तसेच कुलपती रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई विद्यापीठासह महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसोबत कौशल्य प्रशिक्षणासह विविध विषयांवर सहकार्याची क्षेत्रे ठरविण्यासाठी विद्यापीठाचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण, दुहेरी पदवी व कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत तसेच शिक्षकांच्या सक्षमीकरणाबाबत आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांना प्रशिक्षणासाठी अमेरिका व स्पेन येथे पाठविणार

सेंट लुईस विद्यापीठाचे शैक्षणिक कॅम्पस अमेरिकेतील मिसौरी व स्पेनमधील माद्रिद येथे असून भारतातून शिक्षकांना प्रशिक्षणासाठी तेथे पाठविले जाईल किंवा तेथील शिक्षकांना भारतात प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले जाईल असे त्यांनी सांगितले.

सेंट लुईस विद्यापीठ जनसंवाद व सहकार्य, नेतृत्वगुण, रचनात्मक चिंतन व गहन चिंतन ही कौशल्ये प्रदान करते तसेच विद्यार्थ्यांना आभासी माध्यमातून इंटर्नशिप, कार्यशाळा व स्पर्धांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी करून घेते अशी माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात सहा समूह विद्यापीठांसह एकूण २६ विद्यापीठे असून तीस लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत अशी माहिती देताना सेंट लुईस विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण द्यावे अशी अपेक्षा  राज्यपालांनी व्यक्त केली.

यावेळी सेंट लुईस विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाचे उपाध्यक्ष लूशेन ली, सल्लागार सुंदर कुमारसामी व जागतिक उपक्रम विभागाच्या संचालिका अनुशिका जैन उपस्थित होत्या.

कोल्हापूरची नुतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 11 : कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे-2024 पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर चित्रनगरीच्या नूतनीकरण आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे, कला दिग्दर्शक संतोष फुटाणे, वास्तू विशारद इंद्रजित नागेशकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरी येथे सुरु असलेल्या विविध कामांसंदर्भातील सादरीकरण व्यवस्थापकीय संचालक श्री. पाटील यांनी केले. यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी त्या अनुषंगाने विविध कामांची तपशीलवार माहिती घेतली. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील प्रस्तावित विकास कामांमध्ये चित्रीकरणासाठी बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, तीन वसतिगृहे, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडिओ अशी चित्रीकरण स्थळे, अंतर्गत रस्ते, वीज व पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि स्थळेही येथे विकसित करण्यात येणार आहेत. चित्रीकरणासोबतच येथे पर्यटनाला चालना मिळेल, अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराला संधी उपलब्ध होण्याबरोबरच राज्यातील चित्रपट व मालिका निर्मिती संस्थांसाठी ही दुसरी चित्रनगरी चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे येथील विकासालाही अधिक चालना मिळेल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दारूच्या नशेत छगन भुजबळांना दिली धमकी,महाड येथून तरुणाला अटक

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्याने भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे म्हटले. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एकाला महाड (जि. रायगड) येथून अटक केली आहे.दरम्यान, संबंधित व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.या पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

याबाबत माहिती अशी की. छगन भुजबळ सोमवारी पुण्यात) असताना त्यांच्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवर फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने भुजबळांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत दशरथ पाटील (24, रा . चंदगड, कोल्हापूर) या व्यक्तीला रायगड जिल्ह्यातील महाड येथून अटक केले. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, झोन 2 च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त सुनील तांबे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंढवा पोलिस आणि हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबीर

पुणे- मुंढवा पोलिस स्टेशन आणि हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात 75 ते 80 पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.

आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे, मुंढवा सह्याद्री हॉस्पीटलकडील डॉ. प्रसाद जाधव, डॉ. विजय गायकवाड, डॉ. शुभम श्रीवास्तव, डॉ. रेश्मा नवले, डॉ. रोशनी जाधव, डॉ. प्रेमनाथ मोरे, डॉ. विराज साकले यांच्यासह 75 ते 80 पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.

अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना स्वतःचे आरोग्य व शारिरिक स्वास्थ तसेच व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन केले. तेसच दैनंदिन कर्तव्या बरोबर व्यायाम, योगा, ध्यान इत्यादीचे माध्यमातून स्वतःची काळजी घेणे बाबत मार्गदर्शन केले. शिबीरामध्ये सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या सीबीसी शुगर, लिक्वीड प्रोफाईल इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.आरोग्य तपासणी शिबीर पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, यांच्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे, पोलिस अंमलदार तानाजी देशमुख, स्वप्निल शिवरकर, रविंद्र देवढे,आणि शितल काळे व इतर स्टाफ यांनी यशस्वी केले.

रुपाली चाकणकर यांच्या फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट;पुण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा व अजित पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक आणि युटयुबवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने सातजण गाेत्यात आले आहे. त्यांच्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी युवराज विलास चव्हाण (वय-31,रा.धायरी,पुणे) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी खासदार सुप्रिया सुळे बाेलत असताना पाच जणांकडून रुपाली चाकणकर यांच्याबाबत युटयूबवर आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत कमेंट केल्या हाेत्या.पोलिसांनी त्यानुसार आराेपी विरुध्द 354 ए, 509आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार युवराज चव्हाण हे चाकणकर यांच्या साेशल मिडियाचे कामकाज पाहतात. सहा जुलै राेजी दुपारी दाेन ते पाच यादरम्यान रुपाली चाकणकर या फेसबुकवर लाईव्ह बाेलणे करत असताना, दाेनजणांनी आक्षेपार्ह कमेंट केली हाेती. त्यामुळे याप्रकरणी सातजणांवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर पाटील, अॅड.विजय साखरे, युजर नेम आरपीएम, धनराज विश्वकर्मा, राज वाडे,,नितीन पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. यबााबत सायबर पोलिस पुढील तपास करत आहे.

भुजबळ, वळसे पा. ,मुश्रीफांसह मंत्र्यांना मिळाले बंगले ..

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना सिद्धगड तर दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला मिळाला आहे. आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाही. मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप झाले  हसन मुश्रींफांना विशालगड बंगला तर 407 क्रमांकांचे दालन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 मंत्र्यांना शासकीय निवास्थाने वाटप करण्यात आली असून आदिती तटकरे यांचा मात्र, यात उल्लेख करण्यात आला नाहीये. तर छगन भुजबळ यांना मंत्रलायत दुसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक 201 देण्यात आले आहे. हसन मुश्रीम यांना चौथ्या मजल्यावर दालन क्रमांक 407 मिळाले आहे. दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे यांना तिसऱ्या मजल्यावरील अनुक्रमे 303 आणि 301 दालन मिळाले आहे. धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावरील 201 ते 204 आणि 212 ही दालने मिळाली आहेत. धर्मरावबाबा आत्रम यांना सहाव्या मजल्यावर 601,602 आणि 604 ही दालने मिळाली आहेत. आदिती तटकरे यांना पहिल्या मजल्यावर 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

बंगल्याचे वाटप पुढील प्रमाणे

  • छगन भुजबळ – सिद्धगड
  • दिलीप वळसे पाटील – सुवर्णगड,
  • धनंजय मुंडे – प्रचितगड
  • धर्मरावबाबा आत्राम – सुरूचि – 3
  • अनिल पाटील – सुरूचि – 8
  • संजय बनसोडे – सुरूचि – 18

मनपा ब्रिजच्या खाली महिलेचा विनयभंग करणार्‍याला अटक

पुणे-शिवाजीनगर पोलिसांनी मनपा ब्रिजच्याखाली बावधन बस स्टॉपकडे पायी जाणार्‍या महिलेचा विनयभंग करणार्‍याला अटक केली आहे. लक्ष्मण तुकाराम घोडे (45, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 2 जुलै 2023 रोजी शिवाजीनगर येथील मनपा ब्रिजच्या खालुन फिर्यादी महिला बावधन बस स्टॉपकडे पायी जात होत्या. त्यावेळी अंधारात खुडे चौकाकडुन मनपा ब्रिजच्या दिेशेने एकजण आला आणि तो फिर्यादीच्या अंगावर गेला. त्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यादिवशी पासुन मनपा ब्रिजखाली रात्री 8 ते 12 वाजण्याच्या दरम्यान नजर ठेवली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण तुकाराम घोडे याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक ,अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड ,तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रताप साळवे , महिला पोलिस उपनिरीक्षक मनिषा जाधव, पोलिस हवालदार रणजित फडतरे, बशीर सय्यद, रूपेश वाघमारे, आदेश चलवादी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

पोलीस आणि नागरिक सतर्कतेमुळे रस्ता चुकलेली 8 वर्षाची सिमरन घरी सुखरूप पोहचली

पुणे-सायंकाळी ७वाजण्याच्या दरम्यान जनसेवा बँक जवळ, केशवनगर येथे एक लहान मुलगी रडत असल्याचे येथे राहणारे रहिवाशी निलकंठ शरन्नप्पा मानिकशेट्टी, (रा. जनसेवा बँक मागील बाजुस, केशवनगर, मुंढवा, पुणे )यांचे निदर्शनास आल्याने, त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली. परंतु तीने काहीएक माहिती न सांगितल्याने त्यांनी लहान मुलीस तिचे कुटूंबियाची भेट पोलीसच करुन देवु शकतात या आशेने केशवनगर पोलीस चौकीस घेवुन आले. त्यांनी या मुलीस पोलीस अंमलदार, दिपक कदम यांचे ताब्यात दिले. त्यांनी लहान मुलीस आपुलकीने विचारपुस केली. परंतु त्या मुलीस तीचे नाव राहण्याचा पत्ता काही एक सांगता येत नव्हते. त्यावेळी या हरविलेल्या मुलीची माहिती पोलीस अंमलदार, दिपक कदम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विष्णु ताम्हाणे यांना दिली.
या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी तात्काळ दखल घेवून, तीचे आई- वडील व नातेवाईक यांचा शोध घेणेकरीता पोलीस उप-निरीक्षक, कोळेकर, पोलीस अंमलदार, दिपक कदम, सचिन बोराटे, दयानंद गायकवाड यांना मार्गदर्शन केले. आणि या पथकाने चिमकुलीस घेवून केशवनगर भागामध्ये शोध घेवून स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली असता, लहान मुलगी कु. सिमरन उर्फ पुतुन ही नागपुरे चाळ, केशवनगर, मुंढवा, पुणे येथे आई व आजी यांचेसह राहण्यास असल्याची माहिती प्राप्त झाली. केशवनगर मुंढवा परिसरात आई व आजी यांचे समवेत राहण्यास असलेली लहान मुलगी कु. सिमरन उर्फ पुतुन मिथलेश राय, वय – ८ वर्षे हि तीचे राहत्या घरातून एकटीच बाहेर पडली.असे लक्षात आले मग या चिमुकलीच्या आई व नातेवाईकांचा रात्रीच्या वेळी एक ते दिड तास शोध घेतल्यानंतर त्यांचे घर सापडण्यात पोलीसांना यश मिळाले. कु. सिमरन उर्फ पुतुन ही तीचे आई व आजीस भेटल्यानंतर त्यांचे डोळ्यातुन आनंदाश्रु आले. सिमरनला तीचे पालकांकडे सुखरुपपणे ताब्यात देण्यात आले. त्याबाबत तीची आई व आजी तसेच सदर परिसरातील नागरिकांनी पुणे शहर पोलीस दलाचे आभार मानले असुन, पोलीसांचे या तत्पर कामगिरी बद्दल सर्व स्तरांतुन कौतुक केले आहे. यासाठी चा तपास पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – ५, पुणे शहर. विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त,हडपसर विभाग, पुणे शहर,आश्विनी राख यांचे मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), प्रदिप काकडे यांचे सुचना प्रमाणे पोलीस उप-निरीक्षक, कोळेकर, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, सचिन बोराटे, दयानंद गायकवाड यांनी केली आहे.

पुणे लोकसभेची जागा भाजपाचा उमेदवार लढेल …

शब्द दिला असेल …तर निश्चित अजित पवार मुख्यमंत्री होतील-भाजपा नेते संजय काकडे

पुणे- शहरात भारतीय जनता पक्षाचे ९८ नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल, असे त्यांनी सांगितले. पक्षात ज्याला संधी मिळेल तो पुणे लोकसभेची जागा लढवेल, असे भाजप नेते,माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा भाजप अन् मित्र पक्षाला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांचा आम्हाला फायदाच होणार आहे.वरिष्ठांनी शब्द दिला असेल तर अजित पवार नक्कीच मुख्यमंत्री होतील असेही विधान संजय काकडे यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे. वरिष्ठ स्तरावर काय ठरले आहे ते पाहावे लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, अजित पवारांसह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खाते वाटप झालेले नाही. त्यामुळे भाजप – शिंदे गट- अजित पवार गट यांच्यात सारे काही आलबेल दिसत नाही अशी चर्चा आहे. अजित पवार गटाच्या भाजप नेते फडणवीसांसोबत बैठका सुरू आहेत. मात्र अद्याप काही तोडगा निघालेला नाही.

गेली काही दिवस राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ पाहायला मिळत आहे. यात वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या 40 आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. आता भाजपसोबत येताना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? यासंदर्भात भाजप नेत्याने दावा केला आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना भाजपचे माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, आता जर आमच्या वरिष्ठांनी आणि त्यांच्या नेतृत्त्वाचे काही ठरले असेल आणि ज्याचे जास्त आमदार निवडून येतील तोच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. परंतु, काही वेळ, काही प्रसंग असे येतात की पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावे लागतात की जर शब्द दिले असतील तर… आणि त्यांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेटवर्क चांगले आहे, त्याचा भाजपला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे वरिष्ठांनी शब्द दिले असतील तर मला काही त्यात गैर वाटत नाही. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण

मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण झाले. निर्भया वाहन पथकात नव्याने 40 चारचाकी वाहने तर 184 दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत.

नरिमन पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री अतुल सावे, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्विक रिस्पॉन्स टीम या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेने काम करते आहे. नवीन वाहनांचा पथकात समावेश होत असल्याने पथक नक्कीच अधिक कार्यक्षम बनेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

वीजबिलांपोटी दरमहा ६ हजारांवर ग्राहकांचे ‘चेक बाऊंस

धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे, दि. ११ जुलै २०२३: महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये लघुदाब वर्गवारीतील दरमहा ६ हजार ५०० ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेले धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व ग्राहकांना दरमहा सुमारे ४८ लाख ७५ हजारांच्या बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेसचा तसेच १.२५ टक्के विलंब आकाराचा नाहक दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिलांचा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’ किंवा इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीमद्वारे (ईसीएस)भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत सुमारे ९८ हजार ५०० ते ९९ हजार वीजग्राहक दरमहा धनादेशाद्वारे सुमारे ११९ कोटी ५० लाख रुपयांच्या वीजबिल भरणा करीत आहे. यातील सुमारे ६ हजार ते ६ हजार ५०० ग्राहकांनी दिलेले साधारणतः ४ कोटी ६५ लाख रुपयांचे धनादेश विविध कारणांमुळे अनादरीत होत आहे. यामध्ये पुणे शहरातील ४ हजार ४५०, पिंपरी चिंचवड- १०५० आणि मुळशी, वेल्हे, हवेली, आंबेगाव, जुन्नर, खेड व मावळ तालुक्यांतील सुमारे एक हजार ग्राहकांचे धनादेश दरमहा अनादरीत होत असल्याचे दिसून येत आहे.

अनादरीत धनादेशासाठी चुकीची तारीखखाडाखोडचुकीची स्वाक्षरीचुकीचे नावसंबंधीत खात्यात रक्कम नसणे आदी कारणे दिसून येत आहेत. अनादरीत धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम व विलंब आकार लावण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक वीजबिलासाठी ७५०/- रुपये बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व १.२५ टक्के विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत आहे.

याउलट पुणे परिमंडलामध्ये राज्यात सर्वाधिक दरमहा २० लाख लघुदाब ग्राहकांकडून तब्बल ६०० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ‘ऑनलाइन’द्वारे सोयीने व सुरक्षितपणे केला जात आहे. तसेच थेट बँकेद्वारे दरमहा वीजबिल भरणा करण्यासाठी ‘ईसीएस’ची सोय उपलब्ध आहे. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे वीजबिल भरण्याची मर्यादा यापूर्वी १० हजार रुपयांपेक्षा अधिक होती. ही मर्यादा आता किमान ५ हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार या ग्राहकांच्या ५ हजारांपेक्षा अधिक रुपयांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे.

घरबसल्या एका क्लिकवर ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के तर प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड वगळता ‘ऑनलाइन’द्वारे होणारा वीजबिल भरणा नि:शुल्क आहे. महावितरणच्या ऑनलाइन वीजबिल भरणा पध्दतीस आरबीआय बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी वीजबिलांचा धनादेशाऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

…तर ईट का जबाब पत्थर से! चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

देवेंद्र फडणवीस कर्तृत्वाचे धनी,उद्धव ठाकरे कलंकित करंटा

नागपूर,दि. ११ जुलै २०२३-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘ईट का जबाव पत्थर से’ देणार असल्याचा इशारा दिला आहे.मंगळवारी त्यांनी नागपुरात पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे तुमचे संतुलन बिघडले असेल, तर मनोरुग्णालयात जा. नागपुरात मनोरुग्णालय आहे. तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आत्ता रस्त्यावर आंदोलन केलेय, पुढचे आंदोलनात आमचे लोक तुमच्या गाड्या अडवल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार असाल, अशा शब्दात त्यांना स्पष्ट इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाचे धनी आहेत. तर, उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा आहे, असे सांगून श्री. बावनकुळे म्हणाले,”यापुढे तुम्ही पुन्हा असे काही बोललात तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने बदडेल.’

पत्रकार परिषदेला नागपूर भाजपा शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश प्रवक्ता धर्मपाल मेश्राम, माजी आमदार मिलिंद माने, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, अजय बोढारे, सुनील कोढे, जयप्रकाश गुप्ता, विष्णू चांगदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हे देवेंद्रजींचे कर्तृत्व!
उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी डेटा तयार केला. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकविले व परत मिळवून दिले. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे नेटवर्क देवेंद्र फडणवीस यांनी उभारले . महाराष्ट्रातील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरु केली. राज्यात लोड शेडिंग कमी करण्यासाठी योजना राबविली. एक रुपयांत पीक विमा योजना आणली. महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार केला. ही देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आहे

• उद्धव ठाकरे म्हणजेच कलंक
उद्धव ठाकरेंची सुरुवात माझे वडील, त्यापुढे माझा कॅमेरा, माझी पत्नी. वयाच्या ६० व्या वर्षी मी, माझा मुलगा, मंत्री, माझी पत्नी आणि मुख्यमंत्री असा असून तेच ‘कलंक’ आहेत, असे सांगून श्री. बावनकुळे म्हणाले की, ठाकरेनी मराठा समाजाचे, ओबीसींचे आरक्षण घालविले. स्वत:च्या अहंकारासाठी जलयुक्त शिवार योजना बंद पाडली. कमिशन मिळत नसल्याने मेट्रो प्रकल्पाची कामे बंद पाडली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला अंधारात लोटले.. बरेच कलंकित कामे केली.

अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचाविले
संभाजीनगर, धाराशीव, अहिल्यादेवीनगर अशी नावे देऊन अभिमानाने महाराष्ट्राचे नाव उंचविणारे देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे आणि त्याचवेळी संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही अशांची साथ देणारे कलंकित व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे. स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान कॉंग्रेस करीत असताना त्यांचा विचार, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे व पुढच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी रात्रंदिवस काम करणारे व्यक्ती देवेंद्र फडणवीस असून, स्वातंत्र्यवीरांचा अपमान करणाऱ्यांची साथ देणारे उद्धव ठाकरे कलंकित करंटे आहेत. नक्षलवादी, जिहादी आणि औरंग्यांच्या प्रेमी पडलेल्या लोकांना तरुंगात टाकणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहे. जिहाद्यांना नक्षलवाद्यांच्या मुव्हमेंटला संरक्षण देणारा त्याच्यावर कुठलीही कारवाई न करणारा कलंकित व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उच्चपदापर्यंत यशस्वी प्रवास केला. तर उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या नेतृत्वाला कर्तृत्व समजून जनतेशी बेईमानी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा अयशस्वी प्रवास केला.

  • चंद्रशेखर बावनकुळे
    प्रदेशाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र

आम आदमी पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी मयूर दौंडकर यांची नियुक्ती

सामान्य कुटुंबातून आलेल्या युवकाला ‘आप’कडून मोठी जबाबदारी

पुणे: लोकचळवळीतून निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाची यशस्वी राजकीय वाटचाल देशभरात होत आहे. पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे पंजाबमध्ये देखील पक्षाला मोठे यश मिळाले. देशभरात आज जातीय आणि सामाजिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु असताना सामान्य जनतेसह युवकांना आम आदमी पक्ष आशेचा किरण दिसत आहे. त्यामुळे पक्षाकडून देखील विस्तार केला जात असून महाराष्ट्रामध्ये नव्याने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील सामान्य कुटुंबातील असणारे मयूर दौंडकर यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ संदीप पाठक, महाराष्ट्र प्रभारी दीपक सिंघला, राज्याचे सह प्रभारी गोपाल इटालीय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मयूर दौंडकर यांची राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. दौंडकर हे सध्या खेड -आळंदी विधानसभा युवक अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. या काळामध्ये त्यांनी तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये युवकांचे संघटन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. युवा संवाद सारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी काम केलं. जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजारामध्ये गावातल्या साडेचारशे जनावरांना मोफत लसी देणे, कोरोना काळामध्ये पक्षातर्फे रक्त, प्लाझ्मा मिळवून देण्यापासून ते अगदी रूग्णांना डबे पोहोचवण्यापर्यंतचे सामाजिक काम मयूर दौंडकर यांच्याकडून करण्यात आले.

आम आदमी पक्षाच्या राज्य युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मयूर दौंडकर म्हणाले, “शाळा तसेच महाविद्यालयीन जीवनापासून श्री. अरविंदजी केजरीवाल यांचे विचार, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे मी प्रभावित झालो. आपल्या लोकांच्या आणि समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोणताच देश विकास करू शकणार नाही. आज देशात आणि राज्यामध्ये अनिश्चिततेच राजकारण सुरु असल्याने युवकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. या युवकांनी आता पुढे येऊन राजकरणात सक्रीय होणे गरजेचे आहे. येत्या काळामध्ये पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांना ‘आप’मध्ये सक्रीय करण्यासाठी काम करणार आहे.”

माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील युवकाला राज्य पातळीवर संघटन बांधणीसाठी जबाबदारी दिल्याबद्दल आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री मा. श्री अरविंद केजरीवालजी, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्री. डॉ संदीप पाठकजी, महाराष्ट्र प्रभारी श्री. दीपक सिंघलाजी, राज्याचे सह प्रभारी श्री. गोपाल इटालियाजी यांचा मी आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील घराघरामध्ये पक्षाचे विचार पोहचवण्यासाठी तसेच युवकांना संघटीत करण्यासाठी मी मेहनत घेण्याचा विश्वास व्यक्त करतो, असेही मयूर दौंडकर यांनी म्हंटले आहे.