Home Blog Page 1452

वर्ग ७ आणि शिक्षक २ : सांगा यांना बोलणार कोण ?

पुणे-महापालिका बरखास्त कधीच झाली , त्याहून आधी शिक्षण मंडळ देखील बरखास्त झाले .. सारे काही केंद्रित झाले अधिकाऱ्यांच्या मर्जीने सुरु झाले .. लोकांच्या प्रतिनिधीना नाही उरला अधिकार आणि जनतेला , सामन्यांना नाही उरला आधार अशा अवस्थेत एकीकडे हजारो कोटीची नदी सुधार योजना ,G 20 ज्याचा सामन्यांना गंध हि नाही अशा बाबींवर शेकडो कोटी उधळले जात असताना महापालिकेच्या शाळांची मात्र दयनीय अवस्था होते आहे. बाणेर मध्ये एका शाळेत ४ विद्यार्थी आणि ५ शिक्षक अशी अवस्था आहे तर काही शाळेत शेकडो विद्यार्थी आणि २/ ४ शिक्षक अशी अवस्था आहे. पण या अवस्थेतही लढताहेत काही मुले , ज्यांना घ्यावयाचे आहे शिक्षण .. गरिबांची असली म्हणून काय झाले सारीच थोडी बिघडणार … पण त्यांच्या लढाईला सलाम हि करावा तेवढा थोड्काच असे वाटावे अशी स्थिती हि आहे.

आम्ही सिंहगड रस्त्यावरील कल्पना चावला आणि खाशाबा जाधव शाळेला भेट दिली . कल्पना चावला यांच्या नावे असलेली शाळा हि इंग्रजी माध्यमाची शाळा तर खाशाबा जाधव हि शाळा मराठी माध्यमाची शाळा .. कल्पना चावला हे नाव मोठ्या आतुरतेने आणि नवलाईने , हौसेने दिले गेले ..काय आहे तेथील अवस्था … तिथे आम्ही जाताच एक कार्यकर्ते अभिजित बारवकर आणि माजी नगरसेवक शंकर पवार देखील भेटले .काही पालक आणि विद्यार्थी भेटले .. सारेच काही उघड बोलेनात पण निर्भीडपणे उघड बोलले काही … आणि झाला महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा बाजारूपणा उघड .. शिक्षणाच्या माहेरघरात काही अधिकाऱ्यांनी सुरु ठेवलेला थिल्लरपणा, आणि कुचेष्टाच यातून स्पष्ट होते .. तेव्हा जरूर पहा हा एक रिपोर्ट ….

अजितदादा, शिंदे, फडणवीसांमध्ये सलग चौथ्या दिवशी मध्यरात्री खलबते, महत्त्वाची खाती सोडण्यास शिंदेंचा नकार

अजित पवारांना अर्थ खाते देण्यास नकार,

फडणवीस वरिष्ठ नेत्यांशी करणार चर्चा

मुंबई- गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. मंगळवारी रात्रीदेखील 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र, अजूनतरी खातेवाटपावर तोडगा निघालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अर्थ, सहकार, सांस्कृतिक, महिला व बालविकास, वस्त्र उद्योग, अन्न व पुरवठा, क्रीडा, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी कल्याण या खात्यांसाठी आग्रह धरला आहे. तर, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते अजित पवार यांना द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. मात्र, शिंदे गटाने अर्थखाते अजित पवारांकडे देण्यास विरोध केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाट्याला आलेली दोन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला सोडण्यास ठाम नकार दिल्याची माहिती आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडले आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान वर्षावर अजितदादा, शिंदे व फडणवीसांची चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. परंतु, भाजपने अजित पवार यांना अर्थ खाते देण्याचेच आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीत असताना निधीवाटपावरून आमदारांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता गेल्या आठवड्यात वांद्रे येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी निधी वाटपात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, ऐवढ्यावरून शिंदे गट मागे हटायला तयार नाही.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिमंडळात सहभागी झाल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. अजित पवार गटामुळे शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे आता कमी होणार आहेत. त्यात महत्त्वाच्या खात्यांवरच अजित पवारांनी आग्रह धरल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असून मंत्रिपद जाणार म्हणून अनेक आमदारांनी आपलील नाराजी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात आपल्या आमदारांची बैठक घेतली. तेव्हा भाजपसोबत असताना शिंदे गटाच्या वाट्याला आलेली खाती राष्ट्रवादीसाठी सोडू नयेत, अशी मागणी या आमदारांनी केली होती. त्यावर भाजपने मान्य केलेली आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांपैकी कोणतेही खाते राष्ट्रवादीला दिले जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते.

सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटप करावे लागणार आहे. भाजपने अजित पवार यांना अर्थखाते देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. मात्र, शिंदे गटाने याला जोरदार विरोध केला आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अजित पवारांकडे अर्थखाते देण्यास शिंदे गटातील आमदारांचा विरोध असल्याचे सांगितले आहे. भाजपने सत्तेत सहभागी होण्यासाठी अजितदादांना अर्थखात्याचेच आश्वासन दिल्याने भाजपची कोंडी झालेली दिसत आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती

मुंबई : गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या वास्तू आराखड्यासाठी विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यांतर्गत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध वास्तू विशारद संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला आता गती येणार आहे.

मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कला संचालनालयाचे संचालक राजेश मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद गोसावी, मुख्य वास्तु शास्त्रज्ञ आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. वास्तू आराखडा (डिझाइन) विविध वास्तु विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वास्तु विशारद संस्थांचाही प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेंतर्गत वास्तु आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वास्तु विशारद संस्थांचा पुरस्कार देवून सन्मान देखील केला जाणार आहे. लवकरच या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे.

अ‍ॅक्सिस बँक ठरली वरले येथे ग्रामीण शाखा सुरू करणारी पहिलीच बँक

पुणे११ जुलै २०२३ – अ‍ॅक्सिस बँक ही भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असून बँकेने वरले, पुणे येथे नुकतेच ग्रामीण शाखेचे उद्घाटन केले. बँकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे  श्री. शरद बुट्टे पाटील – माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य, पुणे आणि श्री. दत्तात्रय मांडेकर- माजी सरपंच, आंबेथान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅक्सिस बँकेचे प्रतिनिधी – श्रीमती सृष्टी राजन नंदा, परिमंडळ प्रमुख – पुणे, श्री. अनंत विश्वासराव चौधरी, क्लस्टर प्रमुख – पिंपरी, श्री. निलेश महाजन, परिमंडळ व्यवस्थापक – भारत बँकिंग, श्री. सुरज चन्नापटनम, शाखा प्रमुख, वरले उपस्थित होते.

नवी शाखा तळमजला, शॉप क्रमांक ११ आणि १२, सी- बिल्डिंग, रोशन वन, वरले, चाकण, पुणे येथे वसलेली आहे.

नव्या शाखेच्या लाँचमुळे या वंचित भागात सेवा देणारी अ‍ॅक्सिस बँक ही खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील पहिलीच बँक ठरली आहे. या शाखेच्या माध्यमातून अ‍ॅक्सिस बँक पश्चिम भागाचा विकास आणि विस्तारासाठी हातभार लावणार आहे. त्यासाठी बँकेतर्फे सुवर्ण कर्ज, शेती कर्ज, शेती उपकरण कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, खेळत्या भांडवलासाठी कर्ज, टर्म कर्ज अशाप्रकारची सर्वसमावेशक उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्याशिवाय ठेवी उत्पादने म्हणजे बचत खाते, करंट खाते, निश्चित ठेवी अशा सुविधाही या भागातील नागरिकांना दिल्या जाणार आहेत.

शाखेच्या उद्घाटनाविषयी अ‍ॅक्सिस बँकेच्या भारत बँकिंग विभागाचे समूह एक्झक्युटिव्ह आणि प्रमुख मुनीश शारदा म्हणाले, ‘अ‍ॅक्सिस बँकेसाठी ग्रामीण आणि निमशहरी बाजारपेठा महत्त्वाच्या आहेत. सरकारच्या आर्थिक सर्वसमावेशकतेच्या धोरणाला अनुसरत या बाजारपेठांतील विकासाला हातभार लावण्यास आमचे प्राधान्य आहे. या नव्या शाखेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवणे आणि या भागातील ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करणे आम्हाला शक्य होणार आहे. बँकेच्या निमशहरी आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये मिळून २२६५ पेक्षा जास्त शाखा आहेत. आमच्या दिल से ओपन या तत्वाशी सुसंगत राहात ग्राहकांना सेवा देण्याचे आणि देशभरात अशा नव्या शाखा सुरू करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे

या भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेतर्फे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये रेफरल ड्राइव्हज, जीएसटी ड्राइव्ह्ज, लीफलेटचे वाटप, प्रादेशिक प्रदर्शनांमध्ये सहभाग, स्पर्धा यांचा समावेश आहे. बँकेतर्फे कर्ज मेळा, इतर प्रादेशिक उपक्रम आणि मंडईमध्ये जागरूकता उपक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दहा लाख

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ : नाशिकमधील कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन (एस टी) महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सप्तश्रृंगीच्या घाटात एसटीचा अपघात, बस थेट 400 फूट दरीत कोसळली

जखमींना तातडीने मोफत वैद्यकीय उपचार
पुरवण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासनाला सूचना

नाशिक-वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये 23 प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला आहे.आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी रवाना. त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची ही बस आहे. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

आज सकाळी अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने नाशिक जिल्हाधिकारी आणि कळवणच्या प्रांताधिकाऱ्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच जखमींना मोफत वैद्यकीय उपचार पुरवण्याच्या सूचना दिल्या. पालकमंत्री दादा भूसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनामार्फत मदतकार्य सुरु असल्याचे सांगत, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

सुभेदारांच्या घरातली‘लगीनघाई’

महाराजांच्या प्रत्येक मावळ्याने स्वराज्यासाठी सर्वस्वाचा त्याग  केला.  आयुष्यात फक्त एकच देव मानून कार्य करत राहिले, ते देव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्याच्या शूर मावळ्यांचे शौर्य जाणून घेताना त्यांच्या व्यक्तिगत  आयुष्याचे  पदर फार क्वचित चित्रपटातून पहायला मिळतात. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान!  त्यांचे भावनिक आणि  कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचे पराक्रमी पान उलगडणारा  दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित  ‘सुभेदार’  हा चित्रपट २५ ऑगस्टला  प्रेक्षकांच्या भेटीला  येतोय.

आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर तान्हाजी  मालुसरे ! स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अनमोल देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत मोहीम फत्ते करणाऱ्या या शूर योद्ध्याला त्यांच्या कुटुंबाने ही  तितकीच मोलाची साथ दिली. हा भावनिक पदर ही ‘सुभेदार’ चित्रपटात पहायला मिळणार असून आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या समस्त मालुसरे कुटुंबीयांच आगामी ‘सुभेदार’ या चित्रपटातील एक देखणं पोस्टर नुकतंच  प्रदर्शित झालं  आहे. 

यात मालुसरे यांचं संपूर्ण कुटुंब पहायला मिळतंय. त्यात त्यांची आई, पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सदैव खंबीर साथ देणारे शेलारमामा दिसतायेत. यातील सुभेदारांची भूमिका अभिनेता अजय पूरकर तर त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीची सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. सावलीप्रमाणे आपल्या थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरेंच्या दमदार भूमिकेत अभिजीत श्वेतचंद्र, तर त्यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रांगोळे हिने साकारली आहे तर मालुसरे कुटुंबीयांचा आधारवड असणाऱ्या शेलारमामांच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी दिसतायेत. तान्हाजीरावांच्या आई म्हणजे पार्वतीबाईंच्या भूमिकेत उमा सरदेशमुख तर मुलगा रायबाच्या भूमिकेत अर्णव पेंढारकर आहे.     

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत  पेंढारकर, अनिल वरखडे,  दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. 

” जाम जाम जज्जनका ”  भोला शंकर चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !

” तमन्ना भाटिया ऑन अ रोल ” थलैवा’ रजनीकांतसोबत काम केल्या  ‘मेगास्टार’ चिरंजीवीसोबत ‘जाम जाम जज्जनका’ या गाण्यात दिसली तमन्ना ! 
अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या ओटीटीने जी कारदा आणि लस्ट स्टोरीज 2 रिलीज केल्यापासून चर्चेत आहे. जेलरमधील तिच्या ‘कावला’ या गाण्यातील तिची मूव्ह व्हायरल झाल्यानंतर तिच्या तेलगू चित्रपटाच्या निर्मात्यांनी ” जाम जाम जज्जनाका ” हे आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून जिथे तमन्ना मेगास्टार चिरंजीवी आणि सहकलाकार कीर्ती सुरेश यांच्या सोबत दिसली आहे. 
गाण्यातील फूट-टॅपिंग बीट्स आणि आकर्षक बोल यामुळे चाहते या गाण्या कडे आकर्षित झाले. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. जेलर आणि भोला शंकर यांच्या सोबतीने तमन्नाकडे मल्याळममध्ये ‘बांद्रा’ आणि तमिळमध्ये ‘अरनामनाई 4’ हे चित्रपट येणार आहे.

जेजुरी येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात ५ हजारावर रिक्त पदांच्या भरतीची संधी

पुणे, दि. ११: शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे १३ जुलै रोजी आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात ५ हजार २९० रिक्तपदांसाठी भरतीची संधी उपलब्ध असल्याचे कळविण्यात आले आहे.

जेजुरी येथे १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता पाचवी, दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधारक, आयटीआय, बीई-बीटेक आदी पात्रताधारक उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

यामध्ये टूल अँड डाय मेकर, फिटर, वेल्डर, हेल्पर, सीएनसी ऑपरेटर, वीजतंत्री, असेंबली लाईन ऑपरेटर, विक्री अधिकारी, लेखापाल, बँकेमध्ये पर्यवेक्षक, विक्री समन्वयक, प्रक्षिणार्थी, रासायनिक पदविकाधारक, हाऊस किपींग, निर्माता क्षेत्रातील पुरवठादार, गुणवत्ताधारक, मशीन ऑपरेटर, रंगारी, टर्नर, मॅकनिकल संचालक, वाहनचालक, वैज्ञानिक, शैक्षणिक सल्लागार, व्यवसाय विकास व्यवस्थापक, ग्राहक प्रतिनिधी, बॉयलर ऑपरेटर, डिझायन अभियंता, पेट्रोल-डिझेल फिलींग, मिलर, ग्रांडर, बीई इलेक्ट्रीकल, मॅकेनिकल आदी रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पध्दतीने नोंदवावे. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी इच्छूक उमेदवारांनी या महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपल्या बायोडाटा सह आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधार कार्ड यांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. इच्छुकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.

चांदणी चौक उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पुणे दि. ११: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी एनडीए चौकात (चांदणी चौक) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत असलेल्या उड्डाणपूल आणि रस्त्याच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदणी चौकातील कामाची पाहणी करून नवीन व्हीओपीच्या सद्यस्थितीतील कामाबद्दल व चौकातील इतर कामाबद्दल आढावा घेतला.

श्री. देशमुख म्हणाले, चांदणी चौक हा पुण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे. या ठिकाणाहून पाच वेगवेगळे मार्ग जातात. गेल्या वर्षभरात प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील मुख्य अडचणी म्हणजे रखडलेले भूसंपादन, सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, न्यायालयीन प्रकरणे व स्थानिक अतिक्रमणे आदी अडचणी गतीने कार्यवाही करत दूर करण्यात आल्या आहेत. गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपूलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बिम ऑफ कॉलम) चे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी (गर्डर लांबी २२ ते ३५ मी) २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे ९ पैकी ५ गर्डरचे (गर्डरची लांबी ५७.५ मी) काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम प्रगतीपथावर आहे. सेवा रस्त्याच्या ४ स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर तत्सम कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

चांदणी चौक प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले असून जुलै, ऑगस्ट २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी दिली.
0000

नृत्यांगनाच्या घरात चोरी करणाऱ्या तरुणाला पकडून सव्वा बारा लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- एक नृत्यांगना गुजरात येथे कार्यक्रमासाठी गेली असताना तिच्या घराची घरफोडी करून १३ लाख १० हजाराचा ऐवज चोरून नेणाऱ्या मांगडेवाडीतील २३ वर्षीय तरुणाला बेड्या घालून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेल्या ऐवाजातील सुमारे सव्वाबारा लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे .

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २६/०६/२०२३ रोजी ते दिनांक ०९/०७/२०२३ रोजीचे पहाटे ०५/३० वा. दरम्यान फिर्यादी हे लग्नामध्ये डान्सचे कार्यक्रमा करीता गुजरात येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे लॉक कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधुन ५,६०,००० /- रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चैन, तसेच ७,५०,०००/- रुपये रोख असा एकुण १३,१०,००० /- रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इरादयाने चोरी केला आहे म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५४/२०२३, भादवि कलम ४५४,४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फेत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे शुभम अशोक माने, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ४१०, सुदरतिर्थ अपार्टमेन्ट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यास अटक केली आहे. तपास करता त्याचेकडुन गुन्हयातील एकुण १२,२२,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

गोसावी वस्ती, हडपसर व सातवनगर, वानवडी येथील जुगार अड्डयावर छापे,२७ जणांवर कारवाई

पुणे-सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी दोन जुगार अड्डयावर छापा टाकुन २७ इसमावर कारवाई करून रोख २७,९३०/- रू.व १,२१,०००/- रू.कि. चे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १,४८,९३० रू. कि. चा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले कि,’ दि.१०.०७.२०२३ रोजी गोसावी वस्ती, हडपसर व सातवनगर, वानवडी पुणे परीसरात काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही इसम बेकायदेशीरपणे मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळुन आल्याने २७ इसमावर कारवाई करून रोख २७,९३०/- रू. व १,२१,०००/- रू. कि. चे मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकुण १,४८,९३० रू. कि. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी जुगार खेळताना मिळुन आलेले इसम व दोन पाहिजे आरोपी अशा २७ इसमांविरूध्द हडपसर व वानवडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर व वानवडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, पुणे शहर.संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे,तुषार भिवरकर, इरफान पठाण, हणमंत कांबळे, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ या पथकाने यशस्वी केली आहे.

नगरसेवक मेहबुब पानसरे यांच्या मारेक-यास केले जेरबंद


पुणे- जेजुरीच्या माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या मारेकऱ्याला अटक करण्यात आली असून दत्ता मारुती मळेकर, वय ४५ वर्षे रा. ६८३, गुरुवार पेठ, महाराणा प्रताप रोड, पुणे असे त्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले .

पोलिसांनी असे सांगितले कि,’ दि.०७/०७/२०२३ रोजी धालेवाडी, जेजुरी ता. पुरंदर, जि. पुणे येथे महेबुब सय्यदलाल पानसरे यांचा जमिनीच्या वादातुन जेजुरी येथे निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३०१/२०२३, भा.द.वि.क. ३०२,३०७,३२४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयांची गंभीरता व संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्त, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सदर गुन्हयातील आरोपींतांचा शोध घेणेकरिता सुचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने दि. ११/०७/२०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रजनीश निर्मल गुन्हे शाखा, युनिट-६,पुणे शहर यांना नमुद गुन्हयातील आरोपी नामे दत्ता मळेकर हा गायरानवस्ती, वाघोली, पुणे येथे रोडच्या कडेला संशयितरित्या थांबलेला असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथकाने गायरानवस्ती, वाघोली, पुणे येथे जावुन सापळा रचुन बातमीतील वर्णनाच्या इसम दत्ता मारुती मळेकर, वय ४५ वर्षे रा. ६८३, गुरुवार पेठ, महाराणा प्रताप रोड, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने,त्यास विश्वासात घेवुन तपास करता, त्याने ४ दिवसापुर्वी त्याचे साथीदार वनेश परदेशी, महादेव गुरव ऊर्फ काका परदेशी व इतर असे सर्वांनी मिळुन माजी नगरसेवक महेबुब पानसरे यांचा जमीनीच्या वादातुन खुन केल्याची कबुली दिली. त्यास पुढील कारवाई कामी जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह- आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनिश निर्मल, पोउनि भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, अशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

फिनले मिलच्या कामगारांचे वेतन नियमित वेळेवर करा-वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश

मुंबई, दि. ११ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांना देण्यात येत असलेले अर्धे वेतन नियमित व वेळत देण्यात यावे असे आदेश वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात फिनले मिल विषयी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी केंद्र शासनाच्या अधिका-यांना सूचना देतांना बोलत होते.

यावेळी आमदार ओमप्रकाश(बच्चु) कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,वस्त्रोद्योग विभागाचे एस.के.सिंग नँशनल टेक्स्टाईल कार्पोरेशन लिमिटेडचे पी. कुंगूमराज पी.,डि.के.नासा,किशोर पवार , व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विदर्भातील या फिनले मिलमधील ९०० कामगारांना रोजगार मिळण्यासाठी राज्य सरकारकडून २० कोटी रूपयांची तरतूद करण्याची तयारी आहे.

मिलमधील कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल यांना तात्काळ पत्र पाठवून मिल सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा.असेही मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज : मंत्री सुधीर मुनगंटीवार

ग्रंथ प्रकाशनास आवश्यक ते सर्व सहकार्य करणार

मुंबई, दि.11 जुलै 2023 :

मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. येत्या वर्षभरात हा मोलाचा साहित्य दस्तावेज प्रकाशित होईल यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

दर्शनिका (गॅझेटियर) विभागाच्या वतीने मराठी संगीत रंगभूमीच्या 175 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा ग्रंथ तीन खंडात प्रकाशित केला जाणार आहे. त्याअनुषंगाने सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी एका बैठकीत आढावा घेतला. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर, ग्रंथ खंड निर्मिती समितीचे सदस्य डॉ. वंदना घांगुर्डे, संजय गोसावी, पं. शौनक अभिषेकी, सुलेखनकार अच्युत पालव आदींची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, संगीत रंगभूमीचा इतिहास जपणे हे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल ही वैभवशाली इतिहासाचे पान आहे. त्यामुळे ती वाटचाल सध्याच्या पिढीसमोर येणे महत्वाचे आहे. कालबद्ध कार्यक्रम आखून त्या वेळेत तीनही खंड प्रकाशित होण्याच्या दृष्टीने संपादकीय मंडळातील सर्व समिती सदस्यांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक सहकार्य विभागाच्या वतीने करण्यात येईल.

तीन खंडात हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार असून त्याची माहिती यावेळी डॉ. घांगुर्डे यांनी दिली. 0000