Home Blog Page 1405

नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ‘सी-व्हिजिल’ ॲपवर नोंदविण्याची सुविधा

पुणे, दि. १७ : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जिल्ह्यातील चिंचवड व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना दोन्ही मतदारसंघातील आचारसंहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन पद्धतीने करता येईल. यामध्ये अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारींचा समावेश आहे.

सी-व्हिजिल ॲपमुळे आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करणे सोईचे झाले आहे. निवडणूक प्रशासनाने यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे. या माध्यमातून नागरिक स्वतंत्र व निष्पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजावू शकतात. या ॲपचा वापर मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत करता येईल.

ॲपद्वारे तक्रारींचे छायाचित्र अथवा व्हिडीओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. ॲप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून सुद्धा तक्रार नोंदविण्याचा पर्याय आहे. यामध्ये मोबाईल नंबर आणि इतर प्रोफाइल तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारींच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास पुढील स्थिती संदेश मिळणार नाहीत, मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई मात्र करण्यात येईल.

तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५९ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

अटल भूजल योजनेच्या उद्दीष्टपूर्तीसाठी नियोजनबद्धरित्या काम करावे- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे, दि. १७: अटल भूजल योजनेच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्ह्यात नियोजनबद्ध व प्रभावीपणे अमंलबजावणी करावी आणि योजनेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत आयोजित अटल भूजल योजनेअंतर्गत अटल भूजल पंधरवडा तसेच जिल्हा व तालुकास्तरीय संलग्न विभाग एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष गावडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय परीट, बारामती पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी नंदन जरांडे, सहायक वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजता सावळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशासह राज्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार या योजनेची बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यातील गावात कामे सुरु आहेत. मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जलसंपदा विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभाग या सर्व यंत्रणांनी समन्वयाने योजनेची अंमलबजावणी करावी.

गावपातळीवर अधिकाधिक नागरिकांपर्यंत या योजनेविषयी माहिती पोहोचवावी. नागरिकांचे सातत्याने प्रशिक्षण आयोजित करावे. या माध्यमातून पाणी वापराबाबत लोकशिक्षण देण्याची गरज आहे. गाव पातळीवर शोषखड्ड्यांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. शालेय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करुन विद्यार्थ्यांपर्यत माहिती पोहोचवावी. आराखडे तयार करताना नागरिकांना सहभागी करुन घेत ते सोप्या भाषेत तयार करावेत. योजनेंतर्गत झालेल्या कामांचे मूल्यमापन करुन त्यामधील त्रुटीची पुर्तता करावी. एकूणच योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

श्री. गावडे म्हणाले, पुरंदर, बारामती व इंदापूर या तालुक्यातील एकूण १०६ ग्रामपंचायती ११८ गावांमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्याबरोबरच लोकसहभागातून योजनेचे उद्दिष्टपुर्तीसाठी २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अटल भूजल पंधरवडाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर जल सुरक्षा आराखडा तयार करणे, शेतकरी, महिला मेळाव्याचे आयोजन करुन अटल भूजल योजना तसेच शासकीय योजना तसेच पाणी बचतीविषयी माहिती देण्यात येत आहे. जिल्हा व तालुकास्तरीय सभांचे आयोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

बालदिनाचे औचित्य साधून शालेय पातळीवर शालेय भूजल सप्ताह आयोजित करुन विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीविषयी जनजागृती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीध्ये पाणीपातळी, पाणी गुणवत्ता, आणि पर्जन्यमान आराखडा दर्शविणारे भितींचित्रे लावण्यात आलेली आहेत. तसचे योजनेचे स्वागत फलकही लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते अटल भूजल योजनेच्या प्रचार साहित्य व योजनेविषयी नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी१८००११०१२१ या टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात आले.

राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना

0

मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

विमानतळाकडे प्रस्थान करण्यापूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवारी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे शपथ घेणार आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध

आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत

पुणे दि.१७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

ही उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईनरित्या २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नोंदवता येतील. ऑनलाईन निवदेन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये नोंदवता येईल. मुदतीनंतर त्रुटी, आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल, समक्ष अथवा ईमेल आदी कोणत्याही प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाईन निवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती करण्याची कार्यपद्धती
विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन निवेदनपत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग आदी दुरुस्ती करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०२३ पर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही उपायुक्त श्री. राठोड यांनी कळविले आहे.

कुष्ठरोगी वसाहतीत महालक्ष्मी मंदिरातर्फे ७०० किलो धान्य

महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; कोंढवा येथील महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात ७० कुटुंबांना वाटप
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महासरस्वती, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री विष्णू या उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन तब्बल ७०० किलो धान्य कोंढवा येथील महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात ७० कुटुंबांना देण्यात आले. धार्मिकतेसोबत सामाजिकता जपत श्री महालक्ष्मी मंदिराने हा उपक्रम राबविला आहे. 
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह सुभाष सरपाले व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते. 
धान्यतुलेमध्ये गहू, तांदूळ, साखर, डाळ, चहा पावडर, बिस्किट, राजगिरा लाडू, तेल, मीठ अशा पदार्थांचा समावेश होता. कुष्ठरोगी वसाहतीतील ७० कुटुंबांना हे धान्य देण्यात आले. वर्षभर अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. 17 :- केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य  आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला सुरुवात झाली आहे. देशात गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्ट‍िनेशन’ झाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर (MACCIA) यांनी आयोजित केलेल्या  महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी  मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप व्यवस्थापकीय संचालक प्रवीण राघवेंद्र, करूणाकर शेट्टी, आशिष पेडणेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील उद्योजक ही राज्याची ताकद आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेला उपस्थित असलेल्या जगभरातील अनेक उद्योजकांनी महाराष्ट्राच्या दालनाला भेट दिली. अनेक उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दर्शवली. या परिषदेत सुमारे एक लाख 37 हजार कोटी रूपयांचे सामंजस्य करार झाले. केवळ सामंजस्य करार न करता त्याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू केलेली आहे. हे करार केवळ मुंबई, पुणे, नाशिक येथे नसून मराठवाडा, विदर्भाच्या दुर्गम भागाला प्रगतीकडे नेणारे आहेत. जमीन वाटप आणि इतर सुविधांची पूर्तता विभागामार्फत केली जात आहे.

देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा 15 टक्के वाटा आहे. औद्योगिक उत्पादनात 20 टक्के आणि परकीय गुंतवणुकीत सुमारे 30 टक्के एवढा वाटा आहे. राज्यात 12 लाख सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. त्यांच्या माध्यमातून 94 लाख लोकांना रोजगार मिळत आहे. नव्या उद्योगांच्या माध्यमातून नव्याने सुमारे दीड लाख रोजगार तयार होणार आहेत. कौशल्य विकास विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहेत, विविध रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळत आहे. एकीकडे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन होत आहे, त्याचबरोबर औद्योगिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्ग हा एक हरित मार्ग आहे. या महामार्गामुळे उद्योगाला चालना मिळणार आहे. लॉजिस्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क याठिकाणी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यभरात रस्त्यांचे जाळे विकसित केले जात आहे. मिसिंग लिंक कमी करून अंतर कमी केले जात आहेत. प्रवास वेगवान होत आहे. याचा फायदा उद्योगांना होणार आहे. नॅशनल पोर्ट विकसित करण्यासाठी ‘गती शक्ती ‘ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वेसाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये राज्याला दिले आहेत. सहकार क्षेत्रासाठी केंद्राने दहा हजार कोटी रूपयांचा दिलासा दिला आहे. प्रधानमंत्री यांचे पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आणि त्यात राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा सहभाग पूर्ण करण्यासाठी  या पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसह आपल्या सारख्या उद्योजकांचा हातभार लागणार आहे.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना एक चांगले व्यासपीठ मिळते. जगभरातून आलेल्या रिटेलर्स व मोठ्या उत्पादकांना इथे विक्रीची संधी मिळते. आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही ते म्हणाले.

जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे ऑक्टोबरमध्ये आयोजन – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी सांगितले की, उद्योजकांना वेळेत इन्सेन्टिव्ह आणि सबसिडी देण्यात येत आहे. 2300 कोटी इन्सेन्टिव्ह दिले. आणखी 15 दिवसांत 2000 कोटी इन्सेन्टिव्ह देणार आहे. उद्योगांना त्वरित परवानग्या मिळण्यासाठी मैत्री कायदा लागू केला. 30 दिवसांत उद्योगांना लागणाऱ्या सर्व परवानग्या याद्वारे मिळू लागल्या आहेत. याचे अधिकार उद्योग विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्याने परवानग्या मिळण्यास अडचणी येत नाहीत. उद्योगाला पुढे नेणारे महाराष्ट्र राज्य आहे. यामुळे राज्य शासन जगातील सर्वात मोठ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेचे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन (MITEX) हे 17 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर आयोजित करण्यात आले. विविध उद्योगांतील सहभागींना एकाच छताखाली आणून ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते यंत्रसामग्रीपर्यंतचे प्रदर्शन येथे होत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधणे आणि विक्री करणे हे व्यापार प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि रिटेल क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम व्यासपीठ असेल, अशी माहिती श्री. गांधी यांनी यावेळी दिली.

या प्रदर्शनात गुजरात, जम्मू – काश्मीर, राजस्थान, गोवा आणि परदेशातील उद्योजक सहभागी  झाले आहेत. उत्पादन, वस्त्रोद्योग, हस्तकला आणि हातमाग, अंतर्गत आणि बाह्य, जीवनशैली, फॅशन, भेटवस्तू, लेखन साधने, प्रवास आणि पर्यटन, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यासारख्या विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या उत्पादनांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत.

20 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसब्याच्या प्रचारात सहभागी होण्याची शक्यता

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रदेश समन्वयक,प्रवक्ते नरेश जी मस्के आणि निवडणूक प्रमुख माधुरी ताई मिसाळ यांची मध्यवर्ती कार्यालयात बैठक
पुणे-पुण्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रमुख माधुरी ताई मिसाळ यांची बैठक झाली असून कसबा विधानसभेतील प्रचाराची पुढची रणनीती कशी आखावी या बाबतीत दोहोंमध्ये सविस्तर चर्चा झाली. येणाऱ्या 20 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असून कसबा विधानसभेतील विविध समाज, विविध गणमान्य संस्था, स्थानिक प्रतिनिधी आणि समाज घटकांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नियोजन बैठक करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना या निवडणुकीमध्ये एकसंघ होवून एकदिलाने काम करीत असून कसब्यातील महायुतीचा आदर्श येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेत दिसेल असे सूचक वक्तव्य प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के यांनी केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सभागृह नेते गणेश बिडकर,युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी, शहर उपप्रमुख सुधीर कुरूमकर श्री.विनोद सातव आणि श्री.रमेश परदेशी उपस्थित होते.कसबा विधानसभा क्षेत्रात प्रचाराची वेगाने सुरुवात झाली असून राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानेकसबा विधानसभेतील प्रचार नियोजनाचा आढावा घेत असून प्रदेश समन्वयक नरेश म्हस्के मुख्यमंत्र्यांच्या आदेशनुसार प्रत्येक विभागाचे सूक्ष्म नियोजन करीत आहे

कोण म्हटलं पवारसाहेब २००६ पासून आजारी …रोहित पवार भडकले

कसब्याची लढाई बहुधा दवे यांच्याशी, दवे २ तर रासने ३ नंबर ला जातील …

कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार फेरीत रोहित पवार

पुणे-वैद्यकीय सल्ला झुगारून गिरीश बापटांच्या आजारपणाचा असा फायदाघेणे अनेकांना रुचलेले नाही , लोक म्हणतात आता आम्ही भाजपाला मत देणार नाही तर कॉंग्रेसला देऊ पण मला वाटते दोन नंबरला देखील भाजपचे रासने नसतील तर २ नंबरला आनंद दवे असतील आणि रासने तिसऱ्या नंबरवर फेकले जातील असा दावा करता करता पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावर प्रश्न विचारताच आज येथे राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार भडकले .

प्रश्न असा होता , बापटांच्या आजारपणाचा फायदा भाजपा लाटू पाहतो असे म्हटले तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात २००६ पासून शरद पवार आजारी आहेत , त्यांना गावोगाव प्रचारासाठी फिरविणे काय आहे ? त्यामुळे तांना सल्ला द्या .

यावर रोहित पवार म्हणाले,’ कोण म्हणालं ,’ साहेब २००६ पासून आजारी आहेत ? त्यांना सांगा त्यांचं जरी वय झालं असलं तरी अजूनही ते हृदयाने आणि मानाने तरुण आहेत .. चंद्रकांत पाटलांच किती आणि काय ऐकायचं हे तुम्हाला समजायला हवं …

पहा नेमका हा संवाद झाला तरी कसा …

ऑटो टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्नांसाठी खासदार शरद पवार सरसावले

  • बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील ऑटो टॅक्सी संघटना शिष्टमंडळासोबत पुण्यात बैठक केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत देशभरातील प्रतिनिधींची 14 मार्च रोजी बैठक आयोजित करण्याचे आश्वासन.

पुणे / प्रतिनिधी

देशभरातील 25 कोटी ऑटो टॅक्सी, ट्रक, टेम्पो, बस चालक मालकांच्या अनेक समस्या रखडलेल्या आहेत. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचे प्रश्न शासकीय पातळीवर सूचना देऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करू 14 मार्च रोजी दिल्ली येथे नितीन गडकरी यांच्यासोबत देशभरातील संघटनांचे बैठक आयोजित करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले.

रिक्षा मालक चालकांच्या विविध मुद्द्यांसाठी 6 मार्च रोजी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे ऑटो, रिक्षा, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत खासदार शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवर चर्चा करून आश्वासन दिले.

पुणे मोदी बाग येथे ही बैठक पार पडली. या वेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा फेडरेशनचे युवा अध्यक्ष शुभम तांदळे आदी शिष्टमंडळामध्ये उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे यांनी रिक्षा चालक मालकांच्या समस्या मांडल्या. ते म्हणाले की ओला उबर रीपिडो टू व्हीलर, टॅक्सीमुळे देशभरातील ऑटो, टॅक्सी व्यवसायावर परिणाम होत आहे. देशभरातील परिवहन व्यवस्था मोडीस निघत आहे. यासह देशभरातील चालक-मालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे. ड्रायव्हर डे घोषित करण्यात यावा. स्क्रॅप पॉलिसी रद्द करण्यात यावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या. रॅपिडो विरोधामध्ये आम्ही हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई जिंकली आहे. आता या भांडवलदार कंपन्या सरकारच्या माध्यमातून पुन्हा व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. या भांडवलदार कंपन्यांमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने व देशभरातील कुठल्याही राज्य सरकारने परवानगी देऊ, नये यासाठी आम्ही दिल्ली येथे हे आंदोलन करणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

यावेळी शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवरती चर्चा केली. 14 मार्च रोजी नितीन गडकरी यांच्यासोबत देशभरातील संघटना प्रतिनिधींचे शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित केली आहे. देशभरातील प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. रॅपीडो कंपनीची बेकायदेशीर प्रवास वाहतूक सुरू राहिल्यास रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होईल. या बाबत खासदार पवार यांनी चिंता व्यक्त केली. तसेच वेळ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

आनंद तांबे म्हणाले की, आदरणीय शरद पवार यांनी 20 मिनिटापेक्षा अधिक वेळा मला दिला. यामध्ये बऱ्याच प्रश्नावर चर्चा झाली. आठवणी त्याची प्रश्नपत्रिका या मिटींग बद्दल आम्हाला खूप आशा अपेक्षा निर्माण झाल्या असून हा प्रश्न देशभरात घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.

राहुल डंबाळे म्हणाले “बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखालील देशव्यापी आंदोलनासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचा पाठिंबा असून आंबेडकरी चळवतील कार्यकर्ते देखील या आंदोलन सहभागी होतील असे राहुल डोंबाळे म्हणाले.

अंकुश अण्णांच्या खेळीने मनसेला काढावे लागले पत्रक

पुणे : कसबा पेठ मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तो राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहेत . कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे.या पोटनिवडणूकीत मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर काल मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातील प्रचारादरम्यान अचानकमाजी महापौर अंकुश काकडे यांनी गंमत म्हणून खेळी केली आणि धंगेकर यांना घेऊन जवळच्या मनसे कार्यालयात प्रचारास भेट देऊन सर्वांना संभ्रमात टाकायचे काम केले.आणि मनसे कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यानंतर मनसेने या सर्व प्रकाराबद्दल पत्रक प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे.काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.

राजठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात श्रीमती अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये. असं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ता व सचिव योगेश खैरे यांनी जारी केले आहे.

२००६ पासून आजारी असलेल्या शरद पवारांच्या जीवावर लढणाऱ्या राष्ट्रवादीला बापटांच्या सहभागावर बोलायचा अधिकारच काय ?

पुणे- आजारी गिरीश बापटांच्या जीवाशी भाजपा खेळ खेळत असल्याच्या आरोपाला आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे, २००६ पासून आजाराने त्रस्त असलेल्या शरद पवारांना गावोगाव फिरवून त्यांच्या जीवावर लढणार्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासदार गिरीश बापटांच्या एका कार्यकर्ता मेळाव्यातील उपस्थिती खटकायचे कार काय ? आणि त्यांना अधिकारच काय ? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुक्ता टिळक , लक्ष्मण जगताप आणि गिरीश बापटांचा आम्हाला अभिमानच आहे. प्रकृती स्वास्थ्य बरे नसतानाही त्यांनी पक्षासाठी त्रास सहन करण्याची तयारी स्वतःहून केली आमचा त्यांना सलामच आहे असे ते म्हणाले.काल जगताप यांनी एक विधान केले. त्यांची मेमरी कमी आहे.
शरद पवार आजारी असूनही त्यांना आता कसब्यात यावं लागतंय असं समजलं…त्यांना फिरवता हे अमानवी नाही का ?
आम्हाला आमच्या नेत्यांचा अभिमान आहे.मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप यांचा आणि गिरीश बापट आजारी असतानाही ऑक्सीजन सिलेंडर घेऊन प्रचाराला आले… कारण प्रेस मध्ये चुकीचं चालवलं गेल. आम्हाला बापट यांचा अभिमान आहे.
त्यामुळे प्रशांत जगताप यांनी तुमच्या पवार साहेबांना ही हा सल्ला द्यावा.की पवार साहेब तुम्ही किती परिश्रम घेतले आता आराम करा. तुमच्यावर आणि तुमच्या वरच्या नेत्यांवर पणं विश्वास नाहीय.. म्हणून कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही फिरताय.

कसबा पोट निवडणुकीत चुरस कसली ? असा सवाल करत ते म्हणाले ,’ इथली लढाई हेमंत रासने विरोधात रवी धंगेकर अशी नाहीच हि लढली महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीही नाही , तर देशात , आणि राज्यात कॉंग्रेस उरलेली नाही ती गल्लीतही कशी असेल ? अशा कॉंग्रेस विरोधात भाजपा अशी हि लढाई आहे , ती चुरशीची नाही .शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला वाऱ्यावर सोडून दिले दिसत आहे.

नेमके चंद्रकांत पाटील काय म्हणाले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

“गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली”; माजी खासदार संजय काकडे

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील व्यक्तीने बदला वगैरे शब्द वापरले नाही पाहिजेत; काकडे यांच्या वक्तव्याची चर्चा

पुणे-भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आजारी असताना देखील हेमंत रासने यांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पण त्यावेळी गिरीश बापट यांना बोलताना होणारा त्रास, तर नाकात ऑक्सिजनची नळी आणि बाजूला सिलेंडर देखील होता. बापटांच्या या प्रचाराबाबत भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.भाजपाचे नेते माजी खासदार संजय काकडे म्हणाले की, गिरीश बापटसाहेब १९६८ पासून प्रचारामध्ये सहभागी होत आलेले आहेत. त्यामुळे घोडा किती ही म्हातारा झाला तरी पळतो. सिंह किती ही म्हातारा झाला तरी मास खातो. त्यामुळे गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची एक खुजली असल्याचे काकडे म्हणाले.गिरीश बापट हे प्रचारामध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नेमक अस काय झाल त्यावर संजय काकडे म्हणाले की,निवडणुका आल्या की,गिरीश बापट साहेब बाहेर पडतात.त्यामुळे गिरीश बापट यांच्यावर कोणीही दबाव आणला नसून स्व खुशीने प्रचारामध्ये आले आहेत. गिरीश बापट एवढे आजारी असताना निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक जोश आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांना भेटायला जायला म्हणजे झाडावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला झाली,एकच वेळ झाली असे काकडे म्हणाले .

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील व्यक्तीने बदला वगैरे शब्द वापरले नाही पाहिजेत असेही काकडे म्हणाल्याने ..भाजपच्या गोटात चर्चा उसळली आहे.

बापटांची अवस्था पाहून दवेंना दुखः,आत्मक्लेश म्हणून आज प्रचार बंद

पुणे-काल गिरीश बापट कसब्यात प्रचारासाठी आले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत बापट यांनी भाग घेतला. यावेळी बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. हाताला ऑक्सिमीटर लावले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती. तरीही बापट प्रचारात सहभागी झाले होते.आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना प्रचार रिंगणात उतरवले आहे. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे म्हणाले की, जेव्हा युद्ध भूमीवर शत्रू सोबत लढ्या होतात. तेव्हा देखील सहा सात वाजल्यानंतर शत्रूच्या सैन्यातील जखमींची देखील विचारपूस केली जाते.ही हिंदू संस्कृतीची एक पद्धत असताना. केवळ एक विधानसभा पोटनिवडणुक जिंकता यावी. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट आणि आमचे संबध जवळपास २५ वर्षापासून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख मानतो. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे.

सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला….

0

ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 21 फेब्रुवारी मंगळवारपासून पुन्हा सलग सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर गेले 3 दिवस सुनावणी झाली. प्रथमच असा पेचप्रसंग असल्याने हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी ठाकरे गटाने केली होती. आज याबाबतचा निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र, आज न्यायमूर्तींनी काही मुद्द्यांवर अधिक युक्तिवादाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

आता 21 फेब्रुवारीला सकाळी 10.30 वाजता पुन्हा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. यावेळी नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण, पक्षांतर बंदी कायदा, राज्यघटनेतील 10 व्या परिशिष्टाची व्याप्ती मुद्द्यांवर पुन्हा युक्तिवाद करण्यात येणार आहे.

अरुणाचल प्रदेशातील नबाम रेबिया प्रकरणाच्या निकालाचा संदर्भ या प्रकरणात लागू होतो की नाही? त्यावरुन हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यायचे की नाही?, याचा निर्णय सुनावणी झाल्यानंतर घटनापीठ देणार आहे.

पीठासीन अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा कळीचा मुद्दा ठरत आहे. नाबाम रेबिया प्रकरणात पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला. त्यात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना पीठासीन अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही असे हा निकाल सांगतो. शिंदे गट याच निकालाचा आधार घेत आहे व उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नसल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे.

बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे शिंदे गटाची खेळी : सरन्यायाधीश

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘राबिया केसमधल्या एका मुद्द्याबद्दलही आम्हाला काळजी वाटते. संबंधित राज्यात कशी परिस्थिती आहे त्यानुसार केसचा अर्थ निघेल. ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही, त्यामुळे मतदानाची वेळ आली नाही. म्हणून अपात्रतेचा मुद्दाच नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर राबिया केसचा संदर्भ इथे कसा लागू होतो?’ अपात्रतेची नोटीस जारी हाेण्यापूर्वी शिंदे गटाने अध्यक्षांचे अधिकार रोखण्यासाठी त्यांना अपात्रतेची नोटीस पाठवली याकडे सिब्बल यांनी लक्ष वेधले. शिंदे गटाने बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे पुढची खेळी ओळखली. पुढे काय होणार हे त्यांना माहिती असावे,’ अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.

हात जोडतो, सरकार पाडण्यासाठी १०व्या परिशिष्टाचा वापर नको : सिब्बल

  • उपाध्यक्षांना केवळ नोटीस दिली होती, त्यात ‘अविश्वास’ नव्हता, त्यामुळे ते आमदारांना अपात्र ठरवू शकतात.
  • गुवाहाटीत बसून राजकारण कसे करता? अपात्रतेची नोटीस येण्यापूर्वीच आमदारांनी उपाध्यक्षांना नोटीस दिली.
  • कायदेशीर असलेले ठाकरे सरकार आमदार खरेदी करून पाडण्यात आले.
  • शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अपात्र आमदारांनी दोन वेळा मतदान केले.
  • आमदारांनी वेगळा गट केला तरी इतर पक्षात विलीनीकरण हवे. ते झाले नाही.
  • हात जोडतो, सरकारे पाडण्यासाठी दहाव्या परिशिष्टाचा वापर होऊ नये.

हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी, मनिंदरसिंग यांच्यासह १० वकिलांची फौज शिंदे गटाकडून तैनात होती. त्यांचे युक्तिवाद…

  • आमदारांना घटनेने अधिकार दिले आहेत. उपाध्यक्ष त्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेऊ शकत नाहीत.
  • उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्याने त्यांना १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नव्हता.
  • जिवाला धोका असल्यामुळे आमदार गुवाहाटीत होते. उपाध्यक्षांनी नोटिसीत त्यांना १४ दिवसांची मुदत दिली नाही.
  • उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत म्हणून सरकार पडले.
  • ठाकरे गट नबाम रेबिया केसनुसार तथ्यावर युक्तिवाद करत नाही, तर केवळ दाव्यांवर ते बाजू मांडत आहेत.

राज्यपालांनी राजकारणामध्ये दखल देऊ नये : सुप्रीम कोर्ट

गुरुवारच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडली होती. ‘राज्यात घोडेबाजार करून सरकार स्थापन झाले. निवडणूकपूर्वीची युती बाजूला ठेवून सत्तेसाठी समविचारी नसलेल्या पक्षांशी तडजोड करण्यात आली,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांना मध्येच थांबवत सरन्यायाधीश म्हणाले, ‘सरकार स्थापनेबाबत राज्यपालांची अशी टिप्पणी युक्तिवाद म्हणून कशी मान्य होऊ शकते? राज्यपालांनी सत्तेसाठी होत असलेल्या राजकारणामध्ये दखल देणे अपेक्षित नाही.’ त्यावर मेहता म्हणाले, ‘मी केवळ नबाम रेबिया प्रकरणातील निर्णयाचे समर्थन करत हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्याचा विरोध करत आहे.’

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी

0

मुंबई, :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.

तत्पूर्वी श्री. बैस यांचे शुक्रवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.

श्री.रमेश बैस यांचा परिचय

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे. संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक २ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन १९७८ साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले.  सन १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन १९८९ साली श्री बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

सन १९९८ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन १९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन २००३ साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन २००९ ते २०१४ या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी  (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन २०१९ साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

महाराष्ट्राला अशा प्रकारचे विविधांगी कार्यानुभव असलेले व्यक्तिमत्त्व राज्यपाल म्हणून लाभलेले आहेत.