Home Blog Page 1406

राज्यभर NOअलर्ट , महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा सोडण्यात आलेला विसर्ग पहा

मुंबई, दि. ७ : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे:-

हातनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आतापर्यंत ४६४ क्यूमेक्स विसर्ग. गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आतापर्यंत २०५३.९८  क्यूमेक्स विसर्ग. भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आतापर्यंत ५४.९३ क्यूमेक्स विसर्ग. दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आतापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग. दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आतापर्यंत ६८ क्यूमेक्स विसर्ग. राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आतापर्यंत ८० क्यूमेक्स विसर्ग. ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आतापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग. बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आतापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग. निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आतापर्यंत १७.४३ क्यूमेक्स विसर्ग. वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आतापर्यंत ४५ क्यूमेक्स विसर्ग. सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आतापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग. चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आतापर्यंत ३१ क्यूमेक्स विसर्ग. पानशेत (पुणे) (एकूण क्षमता ३०१.६१ दलघमी) आतापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ४:५२ वाजता व दुपारी ४:३९ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.७ मीटर आणि दुपारी ३. ८ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना २० ते ४० किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.

नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

राज्य शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ७ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासकीय योजनांचा मेळा-नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. ७ : जेजुरी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या दालनांमध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डोळ्यांची तपासणी, मोफत आयुष्यमान भारत कार्ड विशेष मोहीम, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, समाज कल्याण विभागामार्फत शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, यशवंत निवास घरकुल योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान आदी योजनांची माहिती देण्यात आली.

हिरकणी कक्षाद्वारे स्तनदा मातांना सुविधा
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आलेल्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. हिरकणी कक्षात आलेल्या मातांना स्तनपानाचे फायदे सांगण्यात आले. तसेच अंगणवाडीतून कमी वजनाच्या बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला आलेल्या श्रीमती सविता पोपट शेंडगे यांनी स्टॉलवर बरीच माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी कामगार विभागाच्यावतीने नोंदणी केल्यानंतर टिफीन, पाणी बाटली, चटई, टॉर्च, मच्छरदाणी, बूट, मास्क, सेफ्टी हेल्मेट, हॅन्डग्लोज, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असा सुरक्षा संच असलेले कीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

गुळूंचे येथून आलेल्या प्रियंका संतोष पाटोळे म्हणाल्या, शासनाने चांगला उपक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाला आल्यामुळे बऱ्याच योजनांची माहिती मिळाली व मला पाहिजे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत योजनेची माहिती व आवश्यक अर्ज मिळाला.

पारगाव मेमाणे येथील स्वप्नील अशोक गायकवाड यांनी हा कार्यक्रम जास्त कालावधीचा घ्यावा व असे कार्यक्रम गावोगावी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जेजुरीच्या नितीन राऊत यांनी शासनाला धन्यवाद देताना ‘खूप भारी उपक्रम आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. तर माधुरी जितेंद्र मोरे यांनी बऱ्याच योजनांची माहिती व आवश्यक अर्ज एकाच ठिकाणी मिळाल्याचे सांगून हा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले.

‘शासन आपल्या दारी कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ

पुणे, दि. ७: लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद दिसत होता. राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.

जनहिताचे आणि गतिमान निर्णय
मंत्रीमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जनहिताची कामे करताना केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात ३५ सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सहा ते सात लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. राज्याच्या विकासाला गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

जेजुरी विकास आराखड्यामुळे परिसर सुशोभीकरणासोबत भाविकांसाठी सोई सुविधांची निर्मिती होईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत – उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी १०९ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे नमूद करून ते म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शासनाकडे जाण्याची गरज नाही, आता शासन आपल्या दारी आले आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न
महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बचत गटांना फिरते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला सक्षम होतील. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.

गावापर्यंत समृद्धी देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सांडपाणी शुद्ध करण्यात येणार असल्याने ते पाणी उद्योगांना दिल्यावर सिंचनासाठी पाणी टंचाई भासणार नाही.

पुण्याचा विमानतळासाठी सर्वांनी प्रयत्न करा
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी उद्योग, शेती अशा सर्वांनाचा नवीन विमानतळाचा फायदा होणार आहे. यामुळे मोठे निर्यात केंद्र येथे उभे राहू शकते. सर्वांच्या अडचणी दूर करुन विमानतळ देऊ शकल्यास पुण्याचे पुढच्या २० वर्षाची प्रगती निश्चित होईल.

राज्याचा विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध

  • उपमुख्यमंत्री अजित पवार
    उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.

राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरविण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून गुंजवणी योजना मार्गी लावण्यात येईल. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली. या उपक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतल्याने राज्यात अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा प्रत्यक्षात लाभ होण्यासाठी गावपातळीवर यंत्रणा पोहोचली. सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी, पीएम किसान योजना, सातबारा संगणकीकरणात जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या रस्ते व मेट्रो प्रकल्पांनाही गती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनावणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंसहायता समूहाला अनुदान, स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज परतावा योजना, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरी पालखीतळ (ता. पुरंदर) येथे उपस्थित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची भव्य व्यवस्थाही आज करण्यात आली. उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बसेसची व्यवस्था केलेल्या लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी, बीएसएल, हिमोग्लोबीन, एसपीओटू आदी तपासणी करत आवश्यक त्यांना औषधोपचारही करण्यात आले.

पुण्यात साथीच्या रुग्णांच्या उपचारासाठी मनसेचे आंदोलन

पुणे- शहरातील विविध भागात (Pune) डेंगू, मलेरिया, चिकन गुणिया यासारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्या आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत. या मागणीसाठी आज पुणे महापालिके समोर मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

यावेळी साईनाथ बाबर म्हणाले की, पुणे शहरातील भागात डेंगू, मलेरिया, चिकन गुणिया यासारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तर दुसर्‍या बाजूला महापालिकेची आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे. या विभागा मार्फत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नाही.

त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यात रुग्णांना रक्त तपासणी करतेवेळी खासगी लॅब चालक मोठ्या प्रमाणावर पैसे घेत असून नागरिकाची एक प्रकारे लूट होत आहे. या सर्व बाबीवर महापालिका प्रशासन नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे.

त्यामुळे आज आम्ही महापालिके समोर आंदोलन करित आहे. या आंदोलनाची दखल महापालिका विक्रम कुमार यांनी घ्यावी अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.

अमित शहा यांच्या दौऱ्यावेळी निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा सेनापती बापट रस्त्यावरून जात असताना निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यातील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय अनिलकुमार जैन, पुणे शहराध्यक्ष राहुल दुर्योधन शिरसाठ, राजू पांडू ठोंबरे, स्वप्नील रवींद्र नाईक, आशुतोष नितीन जाधवराव, अक्षय प्रकाश माने आणि योगेश सर्जेराव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

अमित शहा हे रविवारी सेनापती बापट रस्त्यावरील मेरीएट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमाव जमवून घोषणाबाजी केली. शहा यांचा ताफा जात असताना फलक दाखवून घोषणाबाजी केली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.

साहित्यसम्राट आचार्य अत्रे 125 वी जयंती वर्षाचा रविवारी शुभारंभ

प्र. के. अत्रे कोहिनूर रत्न पुरस्कार
बाबूराव कानडे यांना प्रदान करणार
पुणे – साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या १२५ वी जयंती वर्षाचा शुभारंभ येत्या रविवारी (१३ ऑगस्ट २०२३) होत आहे. हे औचित्य साधून अत्रे यांच्या स्मृती जीवंत ठेवणा-या बाबूराव कानडे यांना याच दिवशी ‘प्र. के अत्रे कोहिनूर रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अत्रे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा दृकश्राव्य कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रूप यांनी केले आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षात अत्रे यांच्या स्मृती जागवण्यासाठी आगामी वर्षात विविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात येणार आहे.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, अत्रे यांच्या स्मृती गेली ५० वर्षे जीवंत ठेवल्याबद्दल श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबूराव कानडे यांना ‘प्र. के. अत्रे कोहिनूररत्न पुरस्काराने‘ गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी, (दि.१३) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भाधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे अशी महिती संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. मानपत्र, स्मृतीचिन्हं व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आचार्य अत्रे यांनी साहित्यिकापासून ते राजकीय नेत्यापर्यंत, नाटक – चित्रपट लेखकापासून ते निर्माता – दिग्दर्शकापर्यंत, शिक्षकापासून ते पत्रकारितेपर्यंत विविध भूमिका यशस्वीपणे बजावल्या आहेत. अत्रे यांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम ‘बहुआयामी अत्रे’ हा कार्यक्रम डॉ. विनिता आपटे सादर करणार आहेत. याची संहितालेखन आपटे यांनी केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारजे शाखेच्या अध्यक्षा माधुरी वैद्य या कार्यक्रमातील सहकालाकार आहेत.
हा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. १३ ऑगस्ट), सकाळी १० वाजता टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अत्रे यांची ओळख करून घेण्याची संधी या निमित्ताने तरूण पिढीला मिळत असून सर्वांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. तरी आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवण्यासाठी रसिकांनी आवश्यक उपस्थित रहावे असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत

पुणे, दि. ७: पुणे ग्रामीण मधील १३ तालुक्यांमध्ये २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणमध्ये दौंड, बारामती, इंदापूर, मावळ, मुळशी, शिरुर, खेड, आंबेगाव, जुन्नर, हवेली, भोर, वेल्हा, पुरंदर या तालुक्यातील एकूण २४१ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाना मंजूरीचा जाहीरनामा १ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यातील काही भागातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता नवीन शिधावाटप, रास्त भाव दुकान मंजुरीसाठीच्या सहामाही कालबद्ध कार्यक्रमास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र संस्थांनी १ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी कळविले आहे.

‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले मल्हारी मार्तंडाचे दर्शन

जेजुरी गड विकास आराखडा पहिला टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे, दि.७: ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘सदानंदाचा येळकोट’ च्या जयघोषात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री मल्हारी मार्तंडाची पूजा करुन दर्शन घेतले. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्याच्या एकूण ३४९ कोटी रुपयांपैकी पहिला टप्प्यातील १०९ कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे तसेच जेजुरी देव संस्थानचे विश्वस्त पोपटराव खोमणे, अॅड.पांडुरंग थोरवे, अॅड.विश्वास पानसे, अनिल सौंदडे, मंगेश घोणे, राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते.

श्री मार्तंड देव संस्थान आणि ग्रामस्थांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शिंदेशाही पगडी, घोंगडी आणि काठी देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची वैशिष्ट्ये
एकूण ३४९ कोटी रुपये खर्चाच्या श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाने यापूर्वीच मंजूरी दिली आहे. तीन टप्प्यांमध्ये हा आराखडा राबविण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे.

पहिल्या टप्प्यात जेजुरी गडाच्या संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये गडकोटातील मुख्य मंदिर, इतर छोटी मंदिरे, ओवऱ्या आणि तटबंदीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य गडकोट व कडे पठार परिसरातील १५४ दीपमाळांची जतन व दुरुस्ती, १ हजार ३११ पायऱ्या आणि १५ कमानींची जतन व दुरुस्ती, कडे पठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर, परिसरातील इतर ८ मंदिरे व कमान, ओवऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे.

त्याच बरोबर जेजुरी शहरातील लवथळेश्वर, मल्हार गौतमेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरे, प्राचीन जलव्यवस्थापन होळकर व पेशवे तलाव, जननी तीर्थ व इतर कुंडे, बारवांची जतन व दुरुस्ती, कडे पठारावर जाणाऱ्या मार्गावरील जुन्या वास्तूंचे जतन, मार्गावरील पायऱ्या व मार्गाचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. परिसर नियोजनाची कामेसुद्धा प्रस्तावित करण्यात आली आहेत. याबरोबरच पायाभूत व्यवस्था, परिसर व्यवस्थापन व पर्यटक सुविधा, सुशोभीकरण यासाठी सुमारे १०९ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च करण्यात येणार आहेत.

क्रुडऑइलच्या किमती ११२ डॉलर्सवरून ६५-७० डॉलरपर्यंत खाली आल्या तरीही पेट्रोल,डिझेलच्या किमती कमी न करता मोदी सरकारने जनतेची लूट केली-मोहन जोशी

महागाईमुळे जेवण बनले बेचव

रोज एकदाच जेवायचे हे व्रत घ्यावे लागेल?

पुणे-महागाईच्यामुळे जनतेचे जेवण आता बेचव बनले असून, रोज एकदाच जेवायचे असे व्रत मोदी राजवटीत जनतेला घ्यावे लागेल काय, असा प्रश्न आता पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे भाजपा सरकार मात्र महागाई बाबत तोंड, डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. ते केवळ त्यांचे फोटो माध्यमात छापून यावेत, चॅनल्सवर रोज दिसावे आणि तासंतास निरर्थक भाषणे करीत राहावे यातच दंग आहेत. त्यामुळेच चिरडीला आलेली जनता आता निवडणुकीची वाट बघत असून मतदानातून निष्क्रिय मोदी सरकारला ते धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

मोहन जोशी म्हणाले की, जागतिक क्रुडऑइलच्या किमती ११२ डॉलर्सवरून ६५-७० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत, तरीही देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी न करता मोदी सरकारने जनतेची लूट चालू ठेवली आहे. ३ प्रमुख ऑइल कंपन्यांना तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा नफा होत आहे. कॉंग्रेसचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात क्रुडऑइलच्ये दर ११२ डॉलर्स एवढे वाढले तरीही सबसिडी देऊन त्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव ६० ते ७० रुपये एवढे कमी ठेवले होते. आता तर क्रुडऑइलच्या किमती ६५-७० डॉलर्स एवढ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे सबसिडी न देताही पेट्रोल व डिझेलचे दर ६५ रुपयेपर्यंत ठेवणे सहज शक्य आहे. मात्र मोदी सरकारला हे शक्य असूनही ते असे करीत नाहीत याबद्दल जनतेत आता चीड निर्माण झाली आहे.

ते पुढे म्हणाले की, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, साखर, तेल, तूप त्याबरोबरच मसाल्याचे पदार्थ, सर्व प्रकारच्या भाज्या, डाळी, साबुदाणा, पोहे, खोबरे अशा प्रत्येकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुप्पट अथवा तिप्पट वाढून गगनाला भिडले तरीही कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या मोदी सरकारला जाग येत नाही. भाजपच्या कोणाही खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या तोंडातून  महागाईबाबत म्हणजेच मोदी विरोधात ब्र देखील उच्चारला जात नाही. याबद्दलही जनतेत चीड निर्माण झाली आहे.

त्यामुळेच आता भाजपसारख्या पक्षाला मतदान करणाऱ्यांनादेखील मोदी सरकार सत्तेतून दूर करावे तरच ‘अच्छे दिन’ येतील असे वाटू लागले आहे. ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीने महागाई विरुद्ध रणशिंग फुंकले असून जनतेने त्यास साथ द्यावी आणि प्रत्येक वेळी पेट्रोल / डिझेल भरताना अकार्यक्षम मोदींमुळे जास्त दर द्यावा लागत आहे याची आठवण ठेवावी असे आवाहन मोहन जोशी यांनी शेवटी केले.

पुण्यातील १५,००० फ्लॅटमध्ये ६०० दशलक्ष (६० कोटी) लिटरचे व्यवस्थापन! पाण्याच्या वापरात २५% पर्यंत कपात करून, प्लॅनेट स्मार्ट सिटीचा डिजिटल प्लॅटफॉर्म

पुण्यातील रहिवासी सोसायट्यांमध्ये पाणी व्यवस्थापनात क्रांती घडवत आहे.

प्रमुख ठळक मुद्दे:·         ६०० दशलक्ष (६० कोटी) लिटर पाण्याचे व्यवस्थापन·         पुण्यातील १५,००० फ्लॅटमध्ये प्लॅनेट सिमचा वापर  ·         डिसेंबर २०२२ ते जून २०२३ दरम्यान (सात महिने) व्यवस्थापित पाण्याचे प्रमाण केलेदुप्पट·         समाजासाठी २५% पाणी बचत

पुणे, 07 Aug, २०२३ : रिअल इस्टेट विकासामध्ये प्रॉपटेक आणि ईएसजी कंप्लायंट सोल्यूशन्स एकत्र करून परवडणाऱ्या वाजवी किंमतीतील घरांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य जागतिक दर्जाची कंपनी असलेल्या प्लॅनेट स्मार्ट सिटीने कार्यक्षम आणि पर्यावरणास अनुकूल समुदाय निर्माण करण्याच्या प्रयत्नात भारतात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. कंपनीने तिच्या डिजिटल बिझनेस युनिटद्वारे अंतर्गत विकसित केलेल्या प्लॅनेट सिम या प्रगत जल व्यवस्थापन प्रणालीद्वारे तब्बल ६०० दशलक्ष (६० कोटी) लिटर पाण्याचे यशस्वीरित्या व्यवस्थापन केल्याचे आज जाहीर केले. पुण्यातील एकूण १५,००० फ्लॅट्स असलेल्या विविध रहिवासी समुदायांमध्ये ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली.

प्लॅनेट सिम प्लॅटफॉर्म सुरू झाल्यापासून प्लॅनेट स्मार्ट सिटी निवासी समुदायांमध्ये जल व्यवस्थापनात क्रांती घडवून आणण्यात आघाडीवर आहे. ईएसजी निकषांबाबत कंपनीच्या बांधिलकीचा परिणाम इतरांमध्ये पाण्याचा वापर इष्टतम करण्यात आणि निवासी जिल्ह्यांमध्ये शाश्वततेला चालना देण्यासाठी होतो. अनेक निवासी संकुलांमध्ये २५% पर्यंत घट होत या प्लॅटफॉर्ममुळे पाण्याची भरीव बचत झाली. सध्या, ही प्रणाली पुण्यातील ५० हून अधिक  सोसायट्यांच्या जलप्रणालीचे सक्रियपणे निरीक्षण आणि व्यवस्थापन करत आहे. ग्राहकांच्या वाढत्या संख्येसह पाण्याच्या वापराच्या पद्धतींवर उल्लेखनीय प्रभाव पडत आहे. २०२३ च्या अखेरीस शेकडो सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

या यशावर भाष्य करताना प्लॅनेट स्मार्ट सिटीचे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मार्को पिलिया म्हणाले, “प्लॅनेट स्मार्ट सिटीमध्ये, प्लॅनेट सिमच्या व्यावसायिकीकरणाच्या सुरुवातीपासून ७ महीने इतक्या कमी कालावधीत इतका महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचा आणि सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभावाला चालना देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या प्लॅनेट सिम या प्रगत जल व्यवस्थापन प्रणालीद्वारे आम्ही पुण्यातील अनेक प्रकल्पांमध्ये यशस्वीरित्या ६०० दशलक्ष लीटर पाणी व्यवस्थापित केले आहे. आणि ही संख्या वाढतच आहे. यावरून समुदायांना जलस्रोतांचे जतन करण्यात आणि समतोल भविष्यात योगदान देण्यात मदत करण्यास सक्षम करत प्लॅनेट सिमची परिणामकारकता दिसून येते. भारतातील निवासी जिल्ह्यांच्या मोठ्या भागामध्ये गंभीर प्रश्न सोडवत आम्ही वाढत्या महत्त्वाच्या समस्येचा सामना करत आहोत. प्रॉपटेक आणि ईएसजी कंप्लायंट सोल्यूशन्स एकत्र करून निवासी विकास कामांमध्ये बदलून शाश्वत, सर्वसमावेशक आणि एकत्रित जोडलेला समाज निर्माण करणे हा आमचा दृष्टीकोन आहे. आम्ही सर्वांसाठी अधिक चांगले आणि हरित भविष्य घडवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

“प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर आणि लाभ घेताना तसेच त्याचा आमच्या गृहनिर्माण संस्थेवर झालेला महत्त्वपूर्ण परिणाम पाहण्यात आम्हाला आनंद होत आहे,” असे स्पार्कल्स अॅव्हेन्यू सीएचएसचे अध्यक्ष श्री. रावसाहेब म्हणाले. “कंपनीचे प्रगत तंत्रज्ञान आणि जलसंवर्धनासाठी सक्रिय दृष्टीकोन याद्वारे, आम्ही पाण्याच्या वापरामध्ये लक्षणीय घट अनुभवली आहे आणि पाण्याशी संबंधित कामकाज चालवण्यामध्ये लक्षणीय इष्टतम परिणाम अनुभवला आहे. परिणामी खर्चात बचत झाली असून आमच्या रहिवाशांसाठी अधिक शाश्वत राहणीमान वातावरण तयार झाले आहे. अधिक चांगला, अधिक सक्षम समाज निर्माण करण्याची  प्लॅनेट स्मार्ट सिटीची बांधिलकी खरोखर प्रशंसनीय असून त्यांच्या महत्वपूर्ण उपक्रमांशी निगडीत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

ज्या सोसायट्यांमध्ये प्लॅनेट सिम सर्वात जास्त काळ बसवले गेले आहे, तेथे आम्ही १२  महिन्यांच्या कालावधीत २५% पर्यंत मासिक पाणी बचत केली आहे. त्यामुळे सरासरी मासिक वापर ६००.००० लिटर पाण्याने कमी झाला आहे. ज्या सोसायट्यांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत होते अशा संस्थांमध्ये अशा कपातीची जर आपण कल्पना केली, तर आपल्या पर्यावरणासाठी अर्थपूर्ण फायद्यांसह, पाणी खरेदी कमी केल्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक लाभ मिळतील.

शिवाय, बर्‍याच सोसायट्यांच्या जल व्यवस्थापन उपक्रमांसाठी २ ते ३ कर्मचार्‍यांची आवश्यकता असते, प्लॅनेट सिमसह ते एका व्यक्तीद्वारे सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते आणि अतिरिक्त स्त्रोत अधिक अर्थपूर्ण उपक्रमांमध्ये वापरले जाऊ शकतात.

प्लॅनेट सिम सिस्टीमद्वारे संकलित केलेल्या डेटामध्ये वापर करण्याच्या पद्धतींचे आणि सुधारात्मक कृती सुरू करण्याची प्रचंड क्षमता आहे. प्लॅनेट स्मार्ट सिटी संभाव्य पाणी गळतीचा मागोवा घेण्यासाठी आणि ओळखण्यासाठी, सतत देखरेख आणि वेळेवर सुधारात्मक उपाय पुरवत डेटाच्या या संपत्तीचा वापर करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.

प्लॅनेट सिमसह प्लॅनेट स्मार्ट सिटीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट २०२३ च्या अखेरीस शेकडो सोसायट्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे आणि ते पुण्याच्या पलीकडे जाण्यासाठी सज्ज आहे. ग्राहक  आधाराच्या विस्तारामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्यात आणि खर्च कमी करण्यात मदत होईल, शिवाय जमा झालेला मोठ्या प्रमाणातील डेटा कंपनीसाठी नवीन संधी खुल्या करेल. उदाहरणार्थ घरगुती पाणी वापरासाठी अंदाज मॉडेल सुधारित करण्याची क्षमता. पाणीटंचाईसारख्या महत्त्वाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी प्लॅनेट स्थानिक प्राधिकरणे आणि नगरपालिकांना मदत करण्यास तयार आहे.

महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त  सुवर्णमहोत्सवी ‘संपदा’ शुभारंभ सोहळा 
पुणे : देशातील सहकारी संस्थांना एकत्रित जोडण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच डिजिटल पोर्टल तयार केले आहे. या डिजिटल पोर्टल मध्ये येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी आहे. देशातील एकूण सहकारी संस्थांपैकी ४१ टक्के सहकारी संस्था या महाराष्ट्रामध्ये आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 
संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त आयोजित  टिळक स्मारक मंदिरात सुवर्णमहोत्सवी संपदा या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला  विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संचालक नानाजी जाधव, अम्ब्रेला आॅर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर, बँकेचे अध्यक्ष अश्विनी कुमार उपाध्ये, उपाध्यक्ष महेश लेले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे आणि आर्थिक साक्षरता अभियान पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,  महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये या सहकारी संस्थांनी मोठा वाटा उभारला आहे. या सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकास तळागाळापर्यंत पोहोचविला पाहिजे. व्यवसायिक आणि आंतरराष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करताना सहकारी बँका टिकतील की नाही अशी भीती अनेकांना होती. परंतु संपदा सहकारी बँके सारख्या अनेक सहकारी बँका या केवळ टिकल्याच नाहीत तर त्यांनी प्रगतीही केली. सहकारी बँका या सर्वसामान्यांना आधार वाटतात आणि त्या आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभ्या राहतील असा विश्वास वाटतो 
ते पुढे म्हणाले, संपदा सहकारी बँकेने सुरू केलेल्या महिला सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता या अभियानांना अतिशय महत्त्व आहे. राष्ट्र निर्मितीच्या विचारांनी प्रेरित झालेल्या या बँकेचे केवळ खातेदारांच्या विकासामध्येच नव्हे तर समाजाच्या विकासामध्ये ही मोठे योगदान आहे. बँकेने क्लाऊड कम्प्युटिंग च्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता नसते, परंतु अशावेळी सायबर गुन्हेगारी ला सामोरे जावे लागते, त्यामुळे सर्वसामान्यांना ऑनलाइन बँकिंग साक्षर केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
डॉ शंकर अभ्यंकर म्हणाले, मानवी जीवनामध्ये पैशाला सर्वाधिक महत्त्व आहे. परंतु त्या पैशाला कायम धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे. तरच त्यातून योग्य मनुष्य निर्मिती आणि समृद्ध समाज तयार होऊ शकतो. सावकारांना पर्याय म्हणून बँकिंग व्यवस्था निर्माण झाली. ही बँकिंग व्यवस्था देशाचा आर्थिक कणा आहे. ही व्यवस्था मजबूत व्हायची असेल तर देशातील प्रत्येक माणूस हा केवळ साक्षरच नव्हे तर आर्थिक साक्षर होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संपदा सहकारी बँकेने सुरू केलेल्या आर्थिक साक्षरतेचे अभियान निश्चितच इतर बँकांनाही मार्गदर्शक ठरू शकेल. 
सुरेश जाधव म्हणाले, बँक व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी सभासद, संचालक मंडळ, कर्मचारी आणि कर्जदार हे सक्षम असणे गरजेचे आहे. या चार घटकांमध्ये योग्य समन्वय असेल तरच कोणतीही बँक आणि सहकारी संस्था यशस्वीपणे वाटचाल करू शकते. संपदा सहकारी संस्थेने गेल्या पन्नास वर्षांमध्ये हे तत्व पाळल्यामुळेच बँकेची भरभराट झाली आहे. 
अतुल खिरवाडकर म्हणाले, बँक चालवणे अतिशय अवघड आहे त्यातही बँक नफ्यामध्ये चालविणे तारेवरची कसरत आहे. यामध्ये संपदा सहकारी बँक यशस्वी झाली आहे. संपदा सहकारी बँक ही ध्येयाने प्रेरित झालेली बँक आहे या बँकेने केवळ सर्वसामान्यांनाच आर्थिक सबल केलेले नाही तर समाजाच्या विकासामध्ये ही मोठे योगदान दिले आहे. 
डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स, सीए प्रकाश कुलकर्णी, जी डी आपटे अँड कंपनी, सीए विवेक मटकरी, जेजे आयटी संस्था आणि बँकेच्या निवृत्त कर्मचारी नंदिनी कुकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अश्विनी कुमार उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश सरदेशपांडे यांनी आभार मानले. 
फोटो ओळ – संपदा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ निमित्त आयोजित  टिळक स्मारक मंदिरात सुवर्णमहोत्सवी संपदा या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बँकेतर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे आणि आर्थिक साक्षरता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.

रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे ग्रामीण व शहरी भागात समृद्धी निर्माण होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि. 06 : भारतीय रेल्वे हे गरीब आणि श्रीमंत दोन्ही वर्गांना विकास आणि प्रगतीची समान संधी देणारे प्रवासाचे साधन असून रेल्वे स्टेशन पुनर्विकासामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक संपन्नता निर्माण होईल व विकास सर्वसमावेशक होईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये राज्यातील ४४ व मुंबईतील  परळ, विक्रोळी व कांजूरमार्ग रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.  या अनुषंगाने मध्य रेल्वेतर्फे रेल्वे कॉलनी मैदान परळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री रमेश पतंगे, स्वातंत्र्य सैनिक अनंत लक्ष्मण गुरव व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी उपस्थित होते.

एखाद्या संस्थेची प्रतिमा तिचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांकडून निर्माण होते असे सांगून रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानके पर्यावरण-स्नेही व दिव्यांग-सुलभ करावीत तसेच नैतिक व मानवी मूल्ये जपावी, असे राज्यपालांनी सांगितले.

रेल्वे सेवांमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले असून रेल्वे प्रवास अधिक सुखकर झाला असल्याचे सांगून आपण विमानापेक्षा शक्यतोवर रेल्वे प्रवासाला पसंती देतो असे राज्यपालांनी सांगितले.

रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा राष्ट्रव्यापी प्रकल्प हाती घेऊन केंद्र शासनाने सामान्य माणसाच्या स्वागतासाठी एक प्रकारे लाल गालिचा अंथरला आहे असे सांगून राज्यातील स्थानकांच्या विकासासाठी केंद्राने १६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन भारतीय रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या विकासासाठी देखील चांगले काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास मंत्री यांनी देखील रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

अन्यायाविरुद्ध लढणे ही काँग्रेसची परंपरा -विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

पुणे–कसबा मतदार संघ (महाविकास आघाडीच्या वतीने) वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा कार्यक्षम आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने भव्य नागरीक सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,ज्येष्ठ नेते उल्हास पवार,विशाल धनवडे,अविनाश बागवे,संजय बालगुडे,वीरेंद्र किराड, गजानन थरकुडेपल्लवी जावळे, नुरुद्दीन सोमजी,प्रवीण करपे गणेश नलावडे, चेतन अग्रवाल सुरेश कांबळे गौरव बोराडे, रमेश अय्यर निकिता मारटकर, रुपेश पवार, हे मान्यवर उपस्थित होते

” विरोधी पक्षनेते यांचा ढोल ताशाच्या गजरात व फटाकड्यांच्या आतिषबाजी मध्ये भव्य स्वागत करण्यात आले “

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की मी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्यावर माझा पहिला सत्कार पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात होत आहे छत्रपती शिवरायांच्या बालपण लाल महालात गेले आई जिजाऊंचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी व पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जी जबाबदारी मला सोपवली आहे ती मी यशस्वीरित्या पार पाडण्याचे काम करणार आहे राहुल गांधी यांच्यावर अनेक प्रकारचे दबाव आणून त्यांना गप्प करण्याचा कट भारतीय जनता पक्षाने रचला होता त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली भारत जोडो यात्रेच्या मार्फत राहुल गांधींनी देशातील सर्व जाती जमातीला एकत्र करून देशाची एकता आणि अखंडता टिकवण्याचे प्रयत्न करत आहे त्यांच्या भारत जोडो यात्रेला देशाच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला अन्यायाविरुद्ध लढणे ही काँग्रेसची परंपरा आहे आणि ही परंपरा घेऊन मी राज्याच्या जनतेच्या हितासाठी व महाराष्ट्राच्या विकासासाठी सदैव कार्य करत राहणार आहे.
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते यांचा सत्कार करण्यात येत आहे कार्यक्षम आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून विजय वडेट्टीवार यांचा सत्कार होत आहे ही फार अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या आक्रमक काम करण्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी सोपवली आहे मला खात्री आहे तेही जबाबदारी योग्यरीत्या व यशस्वीरित्या पार पाडतील

आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विजयी वडेट्टीवार यासारख्या काँग्रेसच्या दुसऱ्या फळीच्या नेत्याला विरोधी पक्षाच्या नेते पदाची जबाबदारी देऊन काँग्रेस पक्षाने एक नवीन पायंडा पाडला आहे गडचिरोली सारख्या नक्षलवादी दुर्गम भागात काम करणाऱ्या काँग्रेसने त्या कार्यकर्त्याला विरोधी पक्ष नेते पदाची धुरा देऊन पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल मी पक्षाचे मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यामुळे राज्यातील गोरगरीब कष्टकरी व वंचित समाजाला नागरिकांना नक्की न्याय मिळेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो,
आप्पा जाधव दीपक जगताप विजय वर भवन निलेश धुमाळ विठ्ठल थोरात राजू शेख गौरव बालिंदे परवेझ तांबोळी फयाज शेख जयकुमार ठोंबरे रोहन सुरवसे अविनाश अडसूळ मंगेश निरगुडकर साहिल राऊत, योगेश आंदे, सूर्यकांत मारणे, प्रसाद गावडे व माहाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ; महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश

मुंबई, दि. ६ – देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकांचा समावेश केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यातून राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत असून या स्थानकांमध्ये मूलभूत पायाभूत तसेच अद्ययावत सुविधा आणि रेल्वे मार्गांची कामे सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

देशातील रेल्वे स्थानकांच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी ‘अमृत भारत स्थानक’ योजनेचा शुभारंभ झाला आहे. या योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे, शिवाय प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन होईल,  शिवाय रेल्वे स्थानकातील प्रवेशाची ठिकाणे आणि स्थानक परिसराचा विकास, प्रतिक्षालये, स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्कलेटर, मोफत वायफाय, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र केंद्रे, प्रवाशांना माहिती देण्यासाठी उद्घोषणा प्रणाली, दिव्यांगासाठी सुविधा आदी सुविधा टप्प्या-टप्प्याने करण्यात येणार आहेत, असे सांगून या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

‘अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके :

सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर

पुणे रेल्वे विभाग – आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव

भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव

नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव

मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी

नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम

सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ

कवींसमोर समाजामध्ये संवेदना जागृत ठेवण्याचे आव्हान-ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण

वल्लरी प्रकाशन तर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित बकुळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : समाजाला आता निखळ कवितांची गरज आहे. कारण कविता आणि राजकारण अधिकाधिक उथळ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने बघायचे कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला उद्याची आशा निर्माण करून देऊन त्यांच्यामध्ये संवेदना जागृत ठेवण्याचे आव्हान आज कवींसमोर आहे, असे मत ज्येष्ठ गझलकार कवी म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.

वल्लरी प्रकाशन तर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित बकुळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन म.भा. चव्हाण यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, वल्लरी प्रकाशनचे व्यंकटेश कल्याणकर, किरण इनामदार, ज्योती इनामदार, आर्या इनामदार, कीर्ती देसाई  यावेळी उपस्थित होते. 
 म.भा. चव्हाण म्हणाले, मी आयुष्यात अनेक थातूरमातूर  नोकऱ्या केल्या परंतु माझे मन तिथे रमले नाही. कविता मात्र मी मनापासून केल्या कवी म्हणून करिअर करता येऊ शकते हे मी माझ्या उदाहरणावरून सांगू शकतो त्यासाठी मन मारून कुठेही काम काम करण्याची गरज नाही.
बबन पोतदार म्हणाले, कवींनी सतत लिहिले पाहिजे आणि भरपूर वाचन केले पाहिजे कवी होण्यासाठी प्रेमभंग झाला पाहिजे, असे नाही तर समाजाकडे संवेदनशील मनाने पाहूनही आपण कवी होऊ शकतो कवितेतून केवळ साहित्य निर्मिती होत नाही, तर एक पिढी घडते आणि त्यामधून समाजाची निर्मिती होते.

अंजली कुलकर्णी म्हणाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आजच्या काळात शब्दांच्या माध्यमातून भावना जिवंत ठेवण्याचे काम कवीने केले पाहिजे. यांत्रिक काम करून घेण्यासाठी आज यंत्र आणि रोबोट निर्माण केले जात आहेत, परंतु भावना त्या पद्धतीने निर्माण करता येऊ शकत नाही. संवेदना निर्माण करण्यासाठी कवीची आणि कवितेची समाजाला अत्यंत गरज आहे. कारण माणुसकी जिवंत राहिली तरच समाज जिवंत राहू शकतो. त्यांनी बकुळमधील सर्व कवी कवयित्रींच्या कवितांचे विश्लेषण केले.

 ‘बकुळ’ मध्ये ज्योती आळंदकर, दिपक दाते,  प्रल्हाद दुधाळ, संपत गर्जे,  वीणा कडू, निर्मला लोंढे, मीनल महाजन, शीतल महेश माने, मानसी राऊत (पवार) , कविता सामंत नायक, रत्नाकर सोहनी,  अजित उबाळे, स्नेहा विरगावकर आदी कवी कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे.

या कवींनी यावेळी आपल्या कविता सादरीकरण केले. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. तर ज्योती इनामदार यांनी आभार मानले.