पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ताफा सेनापती बापट रस्त्यावरून जात असताना निदर्शने करणाऱ्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्यातील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय अनिलकुमार जैन, पुणे शहराध्यक्ष राहुल दुर्योधन शिरसाठ, राजू पांडू ठोंबरे, स्वप्नील रवींद्र नाईक, आशुतोष नितीन जाधवराव, अक्षय प्रकाश माने आणि योगेश सर्जेराव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
अमित शहा हे रविवारी सेनापती बापट रस्त्यावरील मेरीएट हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमाव जमवून घोषणाबाजी केली. शहा यांचा ताफा जात असताना फलक दाखवून घोषणाबाजी केली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली.