प्र. के. अत्रे कोहिनूर रत्न पुरस्कार
बाबूराव कानडे यांना प्रदान करणार
पुणे – साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या १२५ वी जयंती वर्षाचा शुभारंभ येत्या रविवारी (१३ ऑगस्ट २०२३) होत आहे. हे औचित्य साधून अत्रे यांच्या स्मृती जीवंत ठेवणा-या बाबूराव कानडे यांना याच दिवशी ‘प्र. के अत्रे कोहिनूर रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अत्रे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा दृकश्राव्य कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संवाद पुणे आणि कोहिनूर ग्रूप यांनी केले आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षात अत्रे यांच्या स्मृती जागवण्यासाठी आगामी वर्षात विविध कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात येणार आहे.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते, अत्रे यांच्या स्मृती गेली ५० वर्षे जीवंत ठेवल्याबद्दल श्रीधर व्यंकटेश उर्फ बाबूराव कानडे यांना ‘प्र. के. अत्रे कोहिनूररत्न पुरस्काराने‘ गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी, (दि.१३) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भाधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे अशी महिती संवादचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिली आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. मानपत्र, स्मृतीचिन्हं व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
आचार्य अत्रे यांनी साहित्यिकापासून ते राजकीय नेत्यापर्यंत, नाटक – चित्रपट लेखकापासून ते निर्माता – दिग्दर्शकापर्यंत, शिक्षकापासून ते पत्रकारितेपर्यंत विविध भूमिका यशस्वीपणे बजावल्या आहेत. अत्रे यांच्या साहित्यावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रम ‘बहुआयामी अत्रे’ हा कार्यक्रम डॉ. विनिता आपटे सादर करणार आहेत. याची संहितालेखन आपटे यांनी केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारजे शाखेच्या अध्यक्षा माधुरी वैद्य या कार्यक्रमातील सहकालाकार आहेत.
हा कार्यक्रम येत्या रविवारी (दि. १३ ऑगस्ट), सकाळी १० वाजता टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अत्रे यांची ओळख करून घेण्याची संधी या निमित्ताने तरूण पिढीला मिळत असून सर्वांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. तरी आचार्य अत्रे यांच्या आठवणी जागवण्यासाठी रसिकांनी आवश्यक उपस्थित रहावे असे आवाहन महाजन यांनी केले आहे.