Home Blog Page 1405

कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन

मुंबई, दि. 8 :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण या कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधित बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतिमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलिकडेच सुरुवात केली आहे. राज्यातील 44 स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे कोकण पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाश्यांना या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निसर्गसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, शासनाने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी रेल्वे स्थानकांचे रस्ते महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण असून स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी कोकणातील बारा रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटकरण व सुशोभिकरणाचे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायभूत सुविधांची उभारणी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यंत्र्यांची भूमिका आहे. कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभेलली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे. पर्यटक, प्रवासी यांच्या सोयीसुविधांमध्ये या माध्यमातून वाढ होणार आहे. त्याचा निश्चितच चांगला परिणाम याठिकाणच्या पर्यटन संधी वाढण्यासाठी होईल. या पार्श्वभूमीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तत्परतेने सात महिन्यात ही बारा रेल्वेस्थानके, रस्ते सुशोभिकरण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कोकणवासीय, चाकरमान्यांसाठी हे निश्चितच उपयुक्त ठरेल. कोकणात सिंचन प्रकल्पाची कामेही करण्यात येणार असून काजू फळ प्रक्रिया सोबत वेगवेगळे रोजगारवृद्धीसाठीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व माध्यमातून लवकरच कोकणाचा लक्षणीय विकास बघायला मिळेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

कोकण पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा – मंत्री रविंद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या कामात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्वे व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरुवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा निश्चितच व्यापक लाभ मिळेल, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव श्री. दशपुते, कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, वैशाली गायकवाड, कोकण भवन यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.

सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती

कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोचमार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या कामांना राज्य शासनामार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रकमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.

रेल्वे स्थानक सुशोभिकरण अंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे, अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी छत तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगमन निर्गमनाद्वारे सायकल, दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी  वाहनतळाची  व्यवस्था करण्यात येणार आहे.

वीजबिलांच्या ‘तत्पर’ भरण्यातून पुणेकरांची दरमहा सव्वादोन कोटींची आर्थिक बचत

महावितरणच्या ‘ऑनलाइन’, ‘गो-ग्रीन’मुळे बचतीत भर

पुणे, दि. ०८ ऑगस्ट २०२३: वीजग्राहकांनी वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास महावितरणकडून एक टक्के सवलत दिली जाते. राज्यात ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात व ‘गो-ग्रीन’ योजनेत आघाडीवर असलेल्या पुणे परिमंडलामध्ये सध्या दरमहा सरासरी ११ लाख ५ हजार वीजग्राहक या सवलतीद्वारे सुमारे २ कोटी २६ लाख ६५ हजार रुपयांची बचत करीत आहे. घरबसल्या व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणा करणे सोयीचे झाल्याने प्रॉम्ट पेमेंटच्या एक टक्का सवलतीचा लाभ मिळत असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.

महावितरणकडून वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरामध्ये दर महिन्यात सरासरी ६ लाख ४६ हजार ८७१ वीजग्राहक वीजबिलांचा तत्पर भरणा करून १ कोटी ३७ लाख ४ हजार रुपयांची सवलत घेत आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातील सरासरी २ लाख ८७ हजार ९० वीजग्राहक ५५ लाख ७० हजार रुपयांची तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये सरासरी १ लाख ७१ हजार ८१५ वीजग्राहक ३३ लाख ८७ हजार ७५० रुपयांची सवलत घेत आहेत.

जे वीजग्राहक प्रामुख्याने रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरतात ते प्रॉम्ट पेमेंटच्या सवलतीचा अधिक संख्येने लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केल्यास०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे सोयीने व सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे.

तसेच महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्यास छापील कागदी वीजबिलाची प्रतीक्षा करण्याऐवजी ते ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ने लगेचच संबंधित ग्राहकांना पाठविण्यात येते. सोबतच प्रतिबिलात १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. पुणे परिमंडलात ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी एक लाख ५ हजार १९ ग्राहकांच्या वीजबिलामध्ये वार्षिक १ कोटी २६ लाख २ हजार २८० रुपयांची बचत होत आहे.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल- वीजबिलांबाबत असलेल्या सवलतींचा लाभ घेतल्यास आर्थिक बचतीची वीजग्राहकांना संधी आहे. प्रत्येक वीजबिलासाठी ‘ऑनलाइन’ भरणा, प्रॉम्ट पेमेंट व ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये आर्थिक सवलत आहे. तसेच पर्यावरणपूरक इतरही फायदे आहेत. सर्व वीजग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा ही विनंती.’ 

 राहुल गांधींना जुना सरकारी बंगला परत मिळाला, हाऊसिंग कमिटीने 12 तुघलक लेन अलॉट केला

नवी दिल्ली-काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मंगळवारी 12 तुघलक लेन येथील त्यांचा जुना सरकारी बंगला परत मिळाला. संसदेच्या गृहनिर्माण समितीने राहुल यांची खासदारकी बहाल केल्यानंतर एक दिवसानंतर बंगल्याचे वाटप केले.

राहुल गांधी जेव्हा काँग्रेस मुख्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना बंगला परत मिळण्याबाबत विचारणा करण्यात आली. राहुल म्हणाले – संपूर्ण भारत माझे घर आहे.

राहुल गांधी 12 तुघलक लेनमध्ये 19 वर्षांपासून राहत होते. मोदी आडनाव प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर 22 एप्रिल 2023 रोजी त्यांना हा बंगला रिकामा करावा लागला होता.

राहुल 12 आणि 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडलाही भेट देणार आहेत. खासदारकी बहाल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वायनाड दौरा असेल.

2004 मध्ये राहुल गांधी पहिल्यांदा अमेठीतून खासदार झाले. तोपर्यंत ते आपल्या आईसोबत 10 जनपथ येथील बंगल्यात राहत होते. 2005 मध्ये ते खासदार झाल्यावर त्यांना पहिल्यांदा 12 तुघलक लेन येथे बंगला देण्यात आला होता.

हा दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये स्थित एक टाइप-8 बंगला आहे, जो सर्वोच्च श्रेणी आहे. या आलिशान बंगल्यात 5 बेडरूम, 1 हॉल, 1 डायनिंग रूम, 1 स्टडी रूम आणि सर्व्हंट क्वार्टर आहे. छोटेखानी गृहप्रवेश समारंभानंतर राहुल गांधी या बंगल्यात शिफ्ट झाले होते. या सोहळ्यात सोनिया, प्रियांका, रॉबर्ट यांच्यासह फक्त त्यांचे जवळचे लोक सहभागी झाले होते. त्याचा सार्वजनिक फोटोही नाही.

या वर्षी 26 फेब्रुवारीला राहुल यांनी काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात सांगितले होते की, माझ्याकडे घर नाही. 12, तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा करून राहुल 10 जनपथ येथील त्यांची आई सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शिफ्ट झाले.

12 तुघलक लेनशी संबंधित एक प्रसिद्ध किस्सा 2016 चा आहे. त्यावेळी हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसमध्ये होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते आसामच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी राहुल त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत खेळत होते. राहुल यांनी हिमंतांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या हिमंता यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

श्रीकांत शिंदेंचे लोकसभेत हनुमान चालिसा पठण

नवी दिल्ली-

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. युपीए नावाची लाज वाटत असल्यानेच यांनी इंडिया हे नाव दिल्याची टीका शिंदेंनी केली. .महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यावर यांनी निर्बंध आणले असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालिसाचे पठणही सदनात केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे लोक आहोत. आम्ही केवळ हिंदुत्वाचे नाव घेत नाही. सावरकरांना शिवी देणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचे पाप काही लोक करत आहेत. हाच यांचा इंडिया आहे अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.

आज अविश्वास प्रस्तावावर नव्हे तर अविश्वासाविरोधात जनविश्वासाची चर्चा होत आहे. तुमच्याविरोधात लोकांनीच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे, एकदा 2014 आणि दुसऱ्यांदा 2019 मध्ये. आता 2024 मध्ये जनता हॅट्ट्रीक करणार आहे. यांनी आपल्या आघाडीचे युपीए हे नाव बदलून इंडिया असे केल आहे. यामुळे देशातील लोक आपल्यासोबत येतील असे यांना वाटते. मात्र यांना युपीए नावाची लाज वाटत होती असे मला वाटते. कारण युपीएचे नाव ऐकताच लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे आठवतात. म्हणूनच लोकांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे मोदीजींकडे दिली. ज्यांच्याकडे कोणताही नेता नाही, नियत नाही आणि निती नाही त्यांची ही आघाडी आहे. या आघाडीतील प्रत्येक नेता पीएम इन वेटिंग आहे. प्रत्येकाला वाटतं मी पीएम होईल, कारण यांच्या टिमला कॅप्टनच नाही आणि यांना मॅच खेळून वर्ल्डकप जिंकायचाय. मराठीत एक म्हण आहे, अडला हरी, गाढवाचे पाय धरी. ही आघाडी नसून विनाशाची युती आहे. ही स्कीम वर्सेस स्कॅमची लढाई आहे.

विरोधकांना केवळ मणिपूरवर राजकारण करायचे आहे. काँग्रेस कधीही ईशान्येकडील राज्यांविषयी गंभीर नव्हती. त्यामुळेच तिथल्या लोकांनी काँग्रेसचा हात सोडला.महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या काळात केंद्राचे प्रकल्प थांबवण्याचेच काम करण्यात आले. अडीच वर्षांत केवळच अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

2019 मध्ये तुम्ही कुणाचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि लोकांनी कुणाला बहुमत दिले. मात्र निवडणुकीनंतर स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत आघाडी यांनी केली. यांनी मतदारांसोबत गद्दारी करण्याचे काम केले. 13 कोटी मतदारांशी गद्दारी यांनी केली.

9 वर्षांत 9 सरकारे पाडली, हीच तुमची नवरत्ने; मणिपूरबाबत सरकार असंवेदनशील-सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद असून याबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला. भाजपने नऊ वर्षांत नऊ सरकारे पाडली, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली.

मणिपूरवर बोलण्याआधी सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्द्यावरून केंद्रसरकारवर टीका केली. सरकारने घेतलेल्या भूमिकांचा विचार करता आम्ही या सरकारवर विश्वास कसा ठेवणार असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला कारण आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. सध्या लोकांच्या काय भावना आहेत हे आम्ही सांगू इच्छितो कारण आम्ही त्यांचे आवाज आहोत आणि हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले. हा प्रस्ताव म्हणजे सध्याच्या भारतीयांच्या खऱ्या भावना असल्याचंही त्यांनी म्हटले.

सरकार कामाचा प्रचार करताना नऊ वर्षातील नवरत्ने याचा उल्लेख करत आहेत. पण मी सरकारच्या नवरत्नांबाबत सांगू इच्छिते असे म्हणत, सुप्रिया सुळेंनी समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारांच्या कामामध्ये हस्तक्षेप, महागाई, एलपीजी सिलिंडरचे वाढलेले दर, देशातील महत्त्वाच्या संस्था मोडीत काढणे, जुमलेबाजी करणे, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश ही सरकारची नवरत्ने असल्याचे सुप्रिया म्हणाल्या. या नऊ वर्षात भाजपने विविध राज्यांमध्ये नऊ सरकारे पाडली त्यात महाराष्ट्रात दोनदा सरकार पाडल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

देशात वाढलेल्या प्रचंड महागाईवरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या संपूर्ण देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. युपीएच्या सरकारच्या काळात 500 रुपयाच्या आत असलेली थाळी ही आता 1000 च्या वर पोहोचली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सरकारची भूमिका ही कायम शेतकरी विरोधी राहिल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी कांद्याबाबत सरकारला वारंवार विनंती केली होती. कांद्याच्या निर्यातीची मागणी करत होते, कारण भारतात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन होते आणि जागतिक बाजारात कांदा नव्हता. पण सरकारने तसे केले नाही. उलट दुधाचे भरपूर उत्पादन असताना दुधाची आयात केली. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले, पण त्याचे काय झाले. त्यामुळे जर सरकार शेतकरी विरोधी असतील तर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारने वंदे भारत सुरू केले, पण त्याचबरोबर गरीब रथ रेल्वेही वाढवल्या असत्या तर आम्हीही कौतुक केले असते. कारण गरीब वंदे भारतमध्ये बसत नाहीत, तर गरीब रथ मध्ये बसतात. त्यात वंदे भारत अनेक ठिकाणी थांबेच नाहीत तर त्याचा फायदा काय. युपीएच्या काळात रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या, आता फक्त रेल्वे स्थानकावरून जातात, असेही सुप्रिया म्हणाल्या.

देशाच्या आर्थिक स्थितीवरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली. देशावर असलेले कर्ज 2014 मधील 55.87 लाख कोटींवरून 155.6 लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी सरकार एलआयसी, आयडीबीआय विकत आहेत आणखी काय विकतील माहिती नाही, असे सुप्रिया यांनी म्हटले.

मणिपूरमध्ये सरकारची अत्यंत लज्जास्पद भूमिका समोर आली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मणिपूरमध्ये 169 लोकांचा मृत्यू झाला 60 हजार लोक विस्थापित झाले. पण सरकार एवढे असंवेदनशील का झाले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केली. महिलांसोबत जे काही घडले ते कसे घडू दिले जाते, सरकार भूमिका का घेत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारसमोर केवळ एकच उद्दिष्ट आहे ते म्हणते 2024 मध्ये सत्ता मिळवणे अशी टीकाही त्यांनी केली.

महापालिकेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातीलप्रशिक्षक व सेवकांना सेवेत घेण्याची मागणी

पुणे, ता. ८ : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक व सेवकांना सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. याबाबतचे निवेदन कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व उपायुक्त रवींद्र बिनवडे यांना दिले. आयुक्तांनी प्रशिक्षकांसाठी सकारात्मकता दर्शवत पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाज विकास विभाग अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. संपूर्ण भारतातील यशस्वी उपक्रम म्हणून याची नोंद झालेली आहे. झोपडपट्ट्यातील बेरोजगारी व अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या केंद्रामार्फत विविध तंत्रज्ञान व कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देते. २००१ सालापासून सुरू झालेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षक महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले.
दि. ०१ जून २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय क्रमांक पीएमसी-२०२१/प्र.क्र.३७७. नवि-२२ यामध्ये १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. वरील शासन निर्णयासाठी लागणारा मुख्य ठराव  क्र. ८५१ मध्ये विविध योजनांबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचाही महत्त्वांच्या बाबीत उल्लेख झाला आहे. मात्र, प्रशिक्षक व सेवक यांना या शासन निर्णयामध्ये समाविष्ट केले गेले नाही. या प्रशिक्षक व सेवकांवर अन्याय होऊ नये, तसेच त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे, अशी विनंती प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. यावेळी अनेक प्रशिक्षक उपस्थित होते.

किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या५२ वा वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

पुणे : कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसह विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कामगार नेते, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांचे कामगारांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. 
बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन सभागृह, लेन नंबर ३, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार, सेवेची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या कामगारांचा सत्कार आणि विशेष प्राविण्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे युनियनच्या वतीने कळवण्यात आले आहे.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड

पुणे, दि. ७: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या ३ उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित प्रकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या मेळाव्यासाठी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली केली होती. तसेच उद्योजकांनी विविध पात्रतेच्या रिक्त पदांची मागणी नोंदविली होती. या महारोजगार मेळावा कार्यक्रमामध्ये ५ हजार ३९५ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३२ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये १ हजार २९ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यानुसार सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ६३९ उमेदवारांची निवड करण्यात आली.

राहुल गांधींची खासदारकी बहाल केल्याने देशातील जनतेच्या आशा पल्लवीत.

मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष.

मुंबई, दि. ७ ऑगस्ट.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाने बहाल केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला आहेच पण देशातील जनतेच्याही आशा पल्लवित झालेल्या आहेत. देशात सध्या हुकूमशाही कारभार सुरु असून या तानाशाहीविरोधात इमानदारीने लढाणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी कायम केल्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मा. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, त्यानंतर सोमवारी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी बहाल केली. राहुल गांधी यांच्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने षडयंत्र रचून खोट्या केसमध्ये अडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. कर्नाटकातील एका प्रचारसभेतील विधानावर सुरतच्या कोर्टात भाजपाचा स्थानिक नेता खोटी केस करतो व न्यायालय दोन वर्षांची शिक्षा ठोठावते, लगेच २४ तासाच्या आता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते व सरकारी निवासस्थानही सोडण्यास भाग पाडले जाते. हे सर्व राजकीय हेतूने करण्यात आले आहे. शेवटी मा. सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिली, हे समाधानकारक असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोश
लोकसभा सचिवलयाने राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मोठा जल्लोष करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम, देवानंद पवार, प्रमोद मोरे, रमेश शेट्टी, राणी अग्रवाल महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रवक्ते भरत सिंह, भावना जैन, जोजो थॉमस, सचिव राजाराम देशमुख, श्रीरंग बर्गे, गजानन देसाई, बी. जी. शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्यावर्षापेक्षा १६ टक्के पाणीसाठा जास्त,तरीही पुणेकरांनो पाणी जपून वापरा

पुण्यातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

पुणे- गेल्यावर्षापेक्षा १६ टक्के पाणीसाठा जास्त ,तरीही पुणेकरांनो पाणी जपून वापरा असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात आले आहे आणि पाणी कपातीचे संदेश देखील देण्यात आले आहेत . गेल्यावर्षी आजच्या दिवशी पुण्याच्या चारही धरणात ७२.८६ टक्के एवढा पाणी साठा झाला होता तर यंदा आज ८८. टक्के पाणीसाठा संध्याकाळपर्यंत जमा झालेला आहे. म्हणजे १६ टक्के पाणी साठा यंदा जास्त झालेला आहे.

वीजपुरवठा बंद त्यामुळे पाणी बंद -महापालिकेचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी ( ता. १०) पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद रहाणार आहे. शुक्रवारी (ता. ११) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा कोथरू़ड, डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, बालेवाडी, पाषाण या भागातील या भागातील पाणी पुरवठा सुरू रहाणार आहे.

या भागातील पाणी पुरवठा बंद असेल

पर्वती एम एल आर टाकी परिसर:- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एच एल आर टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट,

ढोलेमळा, सॅलेसबरी (पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्हें नं ४२,४६ ( कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी. पर्वती एल एल आर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर,

एस.एन.डी.टी. एम. एल. आर. टाकी परिसर : एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर, वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.

चतुःश्रृंगी टाकी परीसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर

लष्कर जलकेंद्र भाग :– लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

वडगाव जलकेंद्र परीसर :– हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इ.

कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाच्या कामांचे उद्या मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार भूमिपूजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई दि.७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या काँक्रीटीकरण व सुशोभिकरणाचे मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच केंद्रीय मंत्री सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, यांची प्रमुख उपस्थिती आहे.
खासदार विनायक राऊत, आमदार, निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या उपस्थित राहणार आहेत.
कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, रत्नाकगिरी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे छाया नाईक, कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधियता अजय कुमार सर्वगोड, वैभवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी कळविले आहे.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या एकूण १२ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे रस्ता काँक्रीटकरण व सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन होणार आहे.
कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.
त्यासाठी सामंजस्य करार कोकण रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी. या कामांना राज्य शासना मार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रक्कमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.

रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत ठळक बाबी :- रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, Street Lightening, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात Station Plaza उभारणे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात Bus Stop बांधणे. Station Plaza अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची (waiting area) व्यवस्था करणे. उन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी Canopy तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणान्या प्रवाश्यांची Entry & Exit करिता सायकल दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी Chanellized Parking यी व्यवस्था करण्यात येणार आहे.
००००

“काठी न घोंगडं घेऊ द्या की…” धनगरी वेशातील CM व DCM खंडोबाच्या गडावर..

पुणे- शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही जेजुरी येथेउपस्थित होते . आजच्या या कार्यक्रमात लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या धनगरी पोशाखाने. त्यांनी धनगरी फेटा, घोंगडी, हातात काठी अन् कपाळाला भंडारा लावत धनगरी वेष परिधान केला होता. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या या वेषाने लक्ष वेधून घेतले होते.यावेळी त्यांनी पुरंदर आणि परिसरातील विकास कामांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले. आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने ते जेजुरीत आले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांनी खंडेरायाचे दर्शन घेऊन श्री तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखडानुसार पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. दोन वेळा कार्यक्रमाची घोषणा होऊन ही काही कारणास्तव रद्द करण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर आज, सोमवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी जेजुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.अजित पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर पारंपारिक डोक्यावर पगडी, अंगावर घोंगडी, हातात घुंगराची काठी घेत गड उतरला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सगळ्यांचे भल व्होवो, अस साकडं आपण खंडोबा देवाला घातलं आहे. जय मल्हारचे आशीर्वाद असेल की सगळं होत असे देखील अजित पवार म्हणाले. जेजुरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडावर घोंगडी काठी आणि पारंपारिक पगडी घालून सत्कार केल्यानंतर कार्यक्रमाठिकाणी जाताना उपमुख्यमंत्री पवार यांनी हातातील काठी वाजवत गड उतरला. माध्यमांशी बोलता बोलता त्यांनी गड उतरला.

राज्यभर NOअलर्ट , महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा सोडण्यात आलेला विसर्ग पहा

मुंबई, दि. ७ : भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे:-

हातनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आतापर्यंत ४६४ क्यूमेक्स विसर्ग. गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आतापर्यंत २०५३.९८  क्यूमेक्स विसर्ग. भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आतापर्यंत ५४.९३ क्यूमेक्स विसर्ग. दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४  दलघमी) आतापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग. दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आतापर्यंत ६८ क्यूमेक्स विसर्ग. राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आतापर्यंत ८० क्यूमेक्स विसर्ग. ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आतापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग. बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आतापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग. निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आतापर्यंत १७.४३ क्यूमेक्स विसर्ग. वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आतापर्यंत ४५ क्यूमेक्स विसर्ग. सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आतापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग. चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आतापर्यंत ३१ क्यूमेक्स विसर्ग. पानशेत (पुणे) (एकूण क्षमता ३०१.६१ दलघमी) आतापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ४:५२ वाजता व दुपारी ४:३९ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.७ मीटर आणि दुपारी ३. ८ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व  इन्स्टॉल करावे.  हे ॲप वापरकर्त्यांना २० ते ४० किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.

नागरिकांनी आपत्तींचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.

राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900

ईमेल: controlroom@maharashtra.gov.in

राज्य शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ७ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र: हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासकीय योजनांचा मेळा-नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. ७ : जेजुरी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ६९ स्टॉल्सद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या उपक्रमात महिला, युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या दालनांमध्ये आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, केंद्र व राज्य शासन पुरस्कृत आवास योजना तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डोळ्यांची तपासणी, मोफत आयुष्यमान भारत कार्ड विशेष मोहीम, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत आरोग्य तपासणी, समाज कल्याण विभागामार्फत शाहू, फुले, आंबेडकर ग्राम अभ्यासिका, दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना, यशवंत निवास घरकुल योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर अनुदान आदी योजनांची माहिती देण्यात आली.

हिरकणी कक्षाद्वारे स्तनदा मातांना सुविधा
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आलेल्या स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता. हिरकणी कक्षात आलेल्या मातांना स्तनपानाचे फायदे सांगण्यात आले. तसेच अंगणवाडीतून कमी वजनाच्या बालकांना देण्यात येणाऱ्या आहाराविषयी माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाला आलेल्या श्रीमती सविता पोपट शेंडगे यांनी स्टॉलवर बरीच माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी कामगार विभागाच्यावतीने नोंदणी केल्यानंतर टिफीन, पाणी बाटली, चटई, टॉर्च, मच्छरदाणी, बूट, मास्क, सेफ्टी हेल्मेट, हॅन्डग्लोज, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असा सुरक्षा संच असलेले कीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

गुळूंचे येथून आलेल्या प्रियंका संतोष पाटोळे म्हणाल्या, शासनाने चांगला उपक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमाला आल्यामुळे बऱ्याच योजनांची माहिती मिळाली व मला पाहिजे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत योजनेची माहिती व आवश्यक अर्ज मिळाला.

पारगाव मेमाणे येथील स्वप्नील अशोक गायकवाड यांनी हा कार्यक्रम जास्त कालावधीचा घ्यावा व असे कार्यक्रम गावोगावी व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जेजुरीच्या नितीन राऊत यांनी शासनाला धन्यवाद देताना ‘खूप भारी उपक्रम आहे’ अशी प्रतिक्रिया दिली. तर माधुरी जितेंद्र मोरे यांनी बऱ्याच योजनांची माहिती व आवश्यक अर्ज एकाच ठिकाणी मिळाल्याचे सांगून हा उपक्रम उपयुक्त असल्याचे सांगितले.

‘शासन आपल्या दारी कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील २२ लाख नागरिकांना लाभ

पुणे, दि. ७: लोकांचे जीवन सुखी, आनंदी करणे आणि त्यांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवून आणणे हे शासनाचे उद्दीष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी घेवून अनेक निर्णय घेण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीपेक्षा अधिक आणि पुणे जिल्ह्यातील २२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना विविध लाभ दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर विविध योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद दिसत होता. राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम सुरू केला असून त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या माध्यमातून शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो आहे. अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतीमान करण्यात आली आहे. सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे, हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे.

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे, सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. नागरिकांना यातून ज्या योजनांचा लाभ मिळणार आहे. त्याचा आपल्या परिवाराला, भागाला उपयोग होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.

जनहिताचे आणि गतिमान निर्णय
मंत्रीमंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देता यावी यासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दिले आहेत. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेनुसार राज्य शासनही ६ हजार रुपयांची भर घालणार असल्याने १२ हजार रुपये इतका वार्षिक लाभ पात्र शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. जनहिताची कामे करताना केंद्र सरकारचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात ३५ सिंचन योजनांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे सहा ते सात लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले. राज्याच्या विकासाला गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागाला सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

जेजुरी विकास आराखड्यामुळे परिसर सुशोभीकरणासोबत भाविकांसाठी सोई सुविधांची निर्मिती होईल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत – उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जेजुरी विकासासाठी ३५० कोटींचा विकास आराखडा मंजूर केला होता, त्यापैकी १०९ कोटीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू होत आहे. भाविकांसाठी येत्या काळात सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे नमूद करून ते म्हणाले, शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शासनाकडे जाण्याची गरज नाही, आता शासन आपल्या दारी आले आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे. शेतकऱ्याला केवळ १ रुपयात पीक विमा सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वीज देणारे फिडर सोलरवर नेऊन शेतकऱ्याला १२ तास अखंड वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रयत्न
महिलांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. बचत गटांना फिरते भांडवल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला सक्षम होतील. ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत कुटुंब लखपती होईल अशी योजना सुरू केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे.

गावापर्यंत समृद्धी देण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतला, त्यासाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सांडपाणी शुद्ध करण्यात येणार असल्याने ते पाणी उद्योगांना दिल्यावर सिंचनासाठी पाणी टंचाई भासणार नाही.

पुण्याचा विमानतळासाठी सर्वांनी प्रयत्न करा
श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पुण्याला नवीन विमानतळाची आवश्यकता आहे. पुण्याच्या विकासासाठी उद्योग, शेती अशा सर्वांनाचा नवीन विमानतळाचा फायदा होणार आहे. यामुळे मोठे निर्यात केंद्र येथे उभे राहू शकते. सर्वांच्या अडचणी दूर करुन विमानतळ देऊ शकल्यास पुण्याचे पुढच्या २० वर्षाची प्रगती निश्चित होईल.

राज्याचा विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध

  • उपमुख्यमंत्री अजित पवार
    उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, जेजुरीच्या पवित्र भूमीत मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन सगळीकडे सुजलाम सुफलाम् वातावरण निर्माण व्हावे राज्यात मोठे उद्योग यावेत याची प्रार्थना केली. जेजुरी विकासासाठी १०९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्याचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. ८० हजार कोटींची कामे केंद्र सरकारच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. विकासासाठी महामार्ग महत्वाचे असून पालखी महामार्ग वारकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणार आहे. विमानतळ, रस्ते, उद्योग, कालवे करताना जमिनीची आवश्यकता असते. विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यात येईल.

राज्यातील उपसा सिंचन योजनांना सवलतीच्या दराने वीज पुरविण्यासाठी ६७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जनाई- शिरसाई उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती, पुरंदर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून गुंजवणी योजना मार्गी लावण्यात येईल. खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याच्या २ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे साडेतीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील सिंचन योजना मार्गी लावण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

लाभार्थ्यांनी विविध योजनांमधून मिळालेल्या लाभाचा उपयोग कुटुंबाच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक अमोल शिंदे यांनी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभांविषयी माहिती दिली. या उपक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतल्याने राज्यात अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शिबिराच्या आयोजनाबाबत आणि जिल्ह्यातील विकासकामांबाबत माहिती दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा आणि योजनांचा प्रत्यक्षात लाभ होण्यासाठी गावपातळीवर यंत्रणा पोहोचली. सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी, पीएम किसान योजना, सातबारा संगणकीकरणात जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अनेक महत्त्वाच्या रस्ते व मेट्रो प्रकल्पांनाही गती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार सर्वश्री दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, संजय जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार शरद सोनावणे,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.

शिबिरांतर्गत नागरिकांना विविध योजना आणि सेवांचा लाभ
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वयंसहायता समूहाला अनुदान, स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज परतावा योजना, श्रावणबाळ योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरी पालखीतळ (ता. पुरंदर) येथे उपस्थित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची भव्य व्यवस्थाही आज करण्यात आली. उपस्थित राहण्यासाठी प्रशासनाने बसेसची व्यवस्था केलेल्या लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी, बीएसएल, हिमोग्लोबीन, एसपीओटू आदी तपासणी करत आवश्यक त्यांना औषधोपचारही करण्यात आले.