ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी मुंबईत एशियन हार्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे.
हरी रामचंद्र नरके असे त्यांचे पूर्ण नाव असून एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर अशी त्यांची ओळख होती. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य देखील होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या आणि तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस करतो.
प्रा. हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष देखील आहेत. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
दोन पुस्तके प्रसिद्ध
प्रा. हरी नरके यांची दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत. यात ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचा समावेश आहे.
पुणे- शहरातील विविध ठिकाणावरील एटीएम मशीन साेबत छेडछाड करुन पैसे काढत असलेल्या चाेरटयांना अटक करण्याची कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी धर्मंद्र श्रीशिवलाल सराेज (वय-30,रा.प्रतापगड,उत्तरप्रदेश) व साेनुकुमार जगदेव सराेज (वय-28,रा.उत्तरप्रदेश) या आराेपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना त्यांना महाराणा प्रताप चाैक, भारती विद्यापीठ,पुणे येथील एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन जवळ दाेन संशयित व्यक्ती मिळून आले. त्यानुसार धर्मंद्र सराेज व साेनुकुमार सराेज या दाेन आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात ते एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन टेम्परींग करुन त्यावर पट्टी लावून ग्राहकांचे पैसे काढत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन त्यांचे विराेधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातून सहा हजार रुपये राेख, टेम्परींग करण्यासाठी वापरलेली पट्टी, माेबाईल फाेन असा १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलिस उपायुक्त र्स्मातना पाटील, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीशकुमार दिघावकर यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय अमाेल रसाळ, पोलिस अंमलदार दिनेश वीर, याेगेश घाेडके, सचिन सरपाले, मितेश चाेरमाेले, अशिष गायकवाड, राहुल तांबे, अवधुत जमदाडे, मंगेश पवार यांचे पथकाने केली आहे.
घरफोडी : सराईत गुन्हेगारास केले ४८ तासात जेरबंद
दि.०४.०८.२०२३ रोजी निरंकार अपार्टमेंट, दुसरा मजला, एफ. सी. रोड, मॉडेल कॉलनी पुणे येथील एका ऑफीसचे दार तोडुन आत प्रवेश करुन ऑफीस मधील एकुण ०४ लॅपटॉप चोरी केले बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३ / २०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० गुन्हा दाखल झाला होता.
या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना युनिट कडील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज पाहुन सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत आरोपीचा फोटो गुप्त बातमीदारास दाखवुन अधिक तपास करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत इसमासारखा दिसणारा इसम हा दारुवाला पुल चौक नाल्यालगत, सार्वजनिक शौचालया लगत, रास्ता पेठ पुणे येथे थांबलेला आहे.खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे बातमीतील नमुद ठिकाणाचे थोडे अलिकडे आड बाजुला थांबुन व्यवस्थीत पाहणी केली असता दारुवाला पुल चौक, येथील सार्वजनिक शौचालया लगत असलेले नाल्याजवळ रास्ता पेठ पुणे येथे सीसीटिव्ही फुटेज मधील वर्णनाचा एक इसम थांबलेला दिसला. लागलीच वरील नमुद पोलीस स्टाफचे मदतीने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव पत्ता मंगेश विजय चव्हाण वय २६ वर्षे, रा. एस. एम. जोशी हॉल जवळ, नाल्यालगत, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ, पुणे ( फिरस्ता). असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हयाची कबुली दिली असुन त्याचे ताब्यातुन दाखल गुन्हयातील ३४,०००/- रु किं. चे एकुण ०४ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. आरोपीस पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर रितेश कुमार सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर . सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील वपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोउनि रमेश तापकीर पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, निलेश साबळे, आण्णा माने, अमोल पवार, आय्याज दड्डीकर, शंकर कुंभार यांनी केली आहे.
पुणे-वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा संकल्प करुयात, स्वावलंबी भारत, आत्मनिर्भर भारत बनवूया स्वदेशीचा वापर करूया विदेशी वस्तु टाळुया’ असा नारादेत धनकवडी, बालाजीनगरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला . राष्ट्रीय हॅण्डलूम डे निमित्ताने प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून अनेक बचत गटाच्या महिला हातामध्ये स्वदेशीच्या फलक घेऊन संपूर्ण धनकवडी बालाजी नगर परिसरात वातावरण निर्मिती करत स्वदेशीचा नारा दिला
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला असून, या दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्या उषा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली बालाजीनगर परिसरात प्रबोधन रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला, राजेश्री ताला, सोनाली सारीपल्ली, मुकुंद वर्मा, चंदन गार्वे, दिगंबर डवरी ,प्रीती खाडे, आरती घुले, महेश साळुंखे, जितेंद्रकुमार सिंह, ओमकार डवरी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. हातमाग हि कला आहे, हॅण्डलूमची उत्पादने वापरा असे आवाहन भाजपच्या उषा – वाजपेयी यांनी केले. प्रबोधन रॅली ची सुरुवात बालाजी नगर जळगाव बॅलन्स येथून झाली व घोषणा दे पवार हॉस्पिटल मार्ग धनकवडी मनपा हॉस्पिटल ते बालाजी नगर चौक पर्यंत करण्यात आली
पुणे, ८ ऑगस्ट, २०२३: भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनी टॉर्क मोटर्सने भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची बँक एचडीएफसी बँकेसोबत हातमिळवणी केल्याची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांना ९.५%* आकर्षक दराने ४८ महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी सहजसोप्या फायनान्स सेवासुविधा पुरवण्याच्या उद्देशाने टॉर्क मोटर्सने हे पाऊल उचलले आहे. दर महिन्याला कमीत कमी ४९९९* रुपयांची, सहज परवडण्याजोगी ईएमआय सुविधा देऊन, जास्तीत जास्त नव्या ग्राहकांना क्रेटॉस-आर विकत घेता यावी, टॉर्क मोटर्स ग्राहकांच्या गरजांना अनुरूप, विशेष तयार करण्यात आलेल्या फायनान्स सुविधा पुरवल्या जाव्यात हा या भागीदारीचा उद्देश आहे. या करारानुसार एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी टॉर्क मोटर्सच्या एक्सपीरियन्स सेंटर्सना उपस्थित राहतील आणि तिथे भेट देणाऱ्या ग्राहकांना आर्थिक सेवासुविधा मिळवण्यात मदत करतील.
टॉर्क मोटर्सचे संस्थापक व सीईओ श्री. कपिल शेळके यांनी या भागीदारीबद्दल सांगितले, “टॉर्क मोटर्सचे फायनान्स पार्टनर म्हणून एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आम्ही आमच्या सर्व डीलरशिप्समध्ये आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करवून दिलेल्या फायनान्शियल असिस्टंस पॅकेजच्या पोर्टफोलिओमध्ये वाढ झाली आहे. तातडीच्या आणि सर्वसमावेशक आर्थिक सेवासुविधा उपलब्ध करवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे आमच्या सर्व ग्राहकांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे पार पडू शकेल. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला जावा यासाठी प्रयत्न करण्यासाठी आम्ही बांधील आहोत, म्हणूनच आम्ही ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवासुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देत आहोत.”
एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड – रिटेल ऍसेट्स, श्री. अरविंद कपिल यांनी सांगितले, “ब्रँडच्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स उपलब्ध करवून देऊन त्यांच्या ई-मोबिलिटीचा स्वीकार व वापर करण्याच्या वाटचालीचे सहयोगी बनण्यासाठी टॉर्क मोटर्ससोबत हातमिळवणी केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ई-मोटरसायकल विकत घेणे हा आमच्या सर्व ग्राहकांसाठी एक आनंददायी अनुभव बनावा यासाठी आम्ही आकर्षक व्याज दर प्रस्तुत करत आहोत. आपले पर्यावरण अधिक जास्त हिरवेगार व अधिक स्वच्छ बनवण्यासाठी आम्ही योगदान देत असल्याचा देखील आम्हाला आनंद होत आहे.”
टॉर्क मोटर्सने २०२२ साली आपली पहिली मोटरसायकल क्रेटॉस-आर लॉन्च केली. तेव्हापासून आजतागायत या कंपनीच्या भारतात बनवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल्सना ग्राहकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर बुकिंग्सच्या रूपाने प्रचंड प्रतिसाद दिला जात आहे. यावर्षीच्या सुरुवातीला ऑटो एक्स्पोमध्ये या ब्रँडने नवी क्रेटॉस-आर सादर केली ज्यामध्ये लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. शहरी प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रीमियम इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये आता पूर्णपणे काळी मोटर व बॅटरी पॅक, त्यासोबत अधिक जास्त स्टायलिंगसाठी स्टायलिश डिकल्स आहेत. यामध्ये फास्ट-चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आले आहे. ही ई-मोटरसायकल पाच ट्रेंडी रंगांमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये ग्रे छटांसह जेट ब्लॅक या नव्या रंग पर्यायाचाही समावेश आहे.
क्रेटॉस-आर जास्तीत जास्त ग्राहकांना विकत घेता यावी यासाठी टॉर्क मोटर्सने आघाडीच्या फायनान्शियल संस्थांसोबत हातमिळवणी केली आहे. आधी ज्यांनी ही गाडी खरेदी केली आहे ते ग्राहक देखील फरकाची रक्कम भरून आपली सध्याची मोटरसायकल अपग्रेड करून घेऊ शकतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहक त्यांची क्रेटॉस-आर ऑनलाईन बुक करू शकतील
पुणेलोकसभेसाठी निरीक्षकप्रणिती शिंदे ,समन्वयक उत्कर्षां रूपवते
पुणे- एकीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या मदतीला पुण्यातून जायला कोणी नगरसेवक तयार झाले नसल्याची चर्चा उसळली असताना दुसरीकडे शहर कॉंग्रेस मधील गटबाजीचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होत चालल्याचे बोलले जाते आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुण्यात आले तेव्हाच पुण्यातील गटबाजी नेत्यांच्या समोर चव्हाट्यावर आली होती. शहर अध्यक्षांनी गाडीतून मधूनच उतरून नेत्यांना संकेत दिले होते.माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी अरविंद शिंदे यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात असताना,बागवे यांनी कॉंग्रेस पक्षात आणलेले आणि आता आमदार झालेले रवींद्र धंगेकर,माजी आमदार मोहन जोशी यांचा एक गट निर्माण झाल्याचे बोलले जाते आहे.हे तीन गट असताना आबा बागुल,अभय छाजेड,संजय बालगुडे असे मान्यवर आपापल्या स्थानावर अढळ आहेत.हडपसरला माजी मंत्री शिवरकर त्यांच्या स्थानी आहेत.या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून वडेट्टीवार यांनी पुण्यात आल्यावर आणि हि स्थिती लक्षात आल्यावर त्याच रात्री विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी रात्री बैठक घेऊन गटबाजीचा तिढा सोडविण्यासाठी चर्चा केल्याचे वृत्त येथे समजले होते. या बैठकीत पुण्यातील तिढा सोडविण्यासाठी दरमहा अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार याचौघांनी एक दिवस पुण्यासाठी एकत्र येऊन एक बैठक घेऊन समन्वय साधून कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न करावेत असे ठरल्याचे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात तसे होईल कि नाही याची शाश्वती नसतानाच आता महाराष्ट्रभर यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना, त्याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही आपल्या पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार आहे. आणि याबाबतची पुण्यातील जबाबदारी अभय छाजेड यांच्यावर टाकण्यात आली आहे.छाजेड हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत तर पुण्यासाठी प्रमुख नेते म्हणून अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार हे कोणीही नसून ज्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची आणि रायगडची जबाबदारी आहे त्याच पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुण्याचे प्रमुख नेते पद सोपविण्यात आले आहे. यामुळे छाजेड यापुढे आता बहुधा कार्यकर्त्यांच्या समुहात दिसू लागतील अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत असले तरी त्यांच्यावर समन्वयक म्हणून पुण्यासह कोल्हापूर,सोलापूर, सांगली, साताराचीही जबाबदारी आहे हे विशेष आहे.
प्रदेश च्या पदयात्रे साठी प्रमुख नेते
अशोक चव्हाणांकडे मराठवाडा देण्यात आला आहे तर नाना पटोले नागपूर, ठाणे पाहणार आहेत,वडेट्टीवार अमरावती, सिंधुदुर्ग तर बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र आणि पालघर पाहणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर,सोलापूर, सांगली,सातारा,पुणे आणि रायगड चे प्रमुख नेते म्हणून काम पाहणार आहेत .या प्रमुख नेत्यांसह पदयात्रा समन्वयक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यात पुण्यासाठी पुण्याचे अभय छाजेड यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
लोकसभेसाठी निरीक्षक व समन्वयक
पुणेलोकसभेसाठी निरीक्षकप्रणिती शिंदे ,समन्वयक उत्कर्षां रूपवते
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे नेतृत्व मी करणार आहे, अमरावती विभागात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मराठवाड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उत्तर महाराष्ट्र विभागात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबईत माजी मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. कोकण विभागात सर्व नेते एकत्र येऊन पदयात्रा काढतील. या पदयात्रेचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. ही पदयात्रा झाल्यानंतर बसयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला जाणार आहे. भाजपा सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. शेतकरी, कामगार, गरिब, कष्टकरी जनता, तरुणवर्ग, महिलांचे प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था अशा सर्व आघाड्यांवर केंद्र व राज्यातील भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा जाती धर्मात भांडणे लावून राजकीय पोळी भाजत आहेत. जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्या मित्रोंसाठी भाजपा सरकार काम करत आहे. यात्रेवेळी सभांच्या माध्यमातून हे सर्व मुद्दे जनतेच्या समोर मांडले जाणार आहेत.
लोकसभा मतदारसंघांचा आढावा…
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी निरिक्षकांची नियुक्त करण्यात आले आहेत. हे निरिक्षक ४८ मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील, तेथील राजकीय परिस्थिती, पक्ष संघटनेची ताकद या सर्वांचा अभ्यास करून १५ ऑगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करतील व त्यानंतर या अहवालावर चर्चा केली जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
राहुल गांधींचा मुंबईत भव्य सत्कार करणार..
राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने काँग्रेस पक्ष व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह संचारलेला आहे. राहुल गांधी हे न डगमगता केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करत असतात म्हणूनच भाजपाने षडयंत्र रचून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला. देशातील हुकूमशाही सरकार विरोधात लढणारा नेता अशी राहुल गांधी यांची प्रतिमा झालेली आहे. राहुल गांधी यांचा मुंबईत भव्य सत्कार करण्याचा प्रदेश काँग्रेसचा विचार असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी मंत्री नसीम खान यांनी यासंदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्याशी दिल्लीत चर्चा केली आहे. प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांना सत्काराचे निमंत्रण दिले आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रवक्ते, डॉ. राजू वाघमारे, भरतसिंग आदी उपस्थित होते.
पुणे-शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना पुणे लष्कर न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान यापुर्वी याप्रकरात त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला चार एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती अद्याप तो कारागृहात आहे. दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगणमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (50, रा. मु. पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख व 15 लाख रुपये असे 27 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे 44 जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांना पुणे येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी दराडे यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, 2019 साली दराडे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून नोकरीस लवण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींचा अपहार केल्याचे यावेळी नवगिरे युक्तीवाद करताना सांगितले. शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी एकुण 44 लोकांची फसवणुक केली आहे. काही लोकांना टीईटी पास करणे, शिक्षक पदावर, आरटीओ, तसचे तलाठी पदावर नोकरी लावतो सांगून मोठ्या रकमा स्विकारल्या आहेत.
गुन्हा दाखल नंतर सहा महिन्यांनी अटक
शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांकडून ५ कोटी रुपये लाटणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडेंसह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध फेब्रुवारीत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली.
शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. सूर्यवंशी यांच्या नात्यातील महिलेला शिक्षकाची नोकरी हवी होती. जून २०१९ मध्ये पोपट यांची भेट दादासाहेब याच्याशी झाली. त्याने आपली बहीण शैलजा शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्यामार्फत तुमच्या नातलगाच्या नोकरीचे काम करुन देतो असे आमिष दाखवले. या कामासाठी दादासाहेबने पोपट यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. मात्र, अनेक महिने उलटले तरी नोकरीचे काम झाले नाही. त्यामुळे पोपट यांनी आरोपीला पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे पोपट यांनी पोलिसात धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे कोर्टात धाव घेतली होती, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, दराडे यांनी ४४ जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शिक्षण आयुक्तांनी यापूर्वी केली होती निलंबनाची कारवाई
शिक्षण आयुक्तालयाने शैलजा दराडेंकडून याबाबत खुलासा मागवला होता. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीही राज्य सरकारला या प्रकरणाचा अहवाल दिला होता. त्यात दराडे यांच्या कृती व कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या अहवालाची दखल घेऊन दराडे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव टी. वा. करपते यांनी दिले होते.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन
मुंबई, दि. 8 :- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण व सुशोभिकरण या कामांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मंत्रालयात आयोजित या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे तर संबंधित बारा रेल्वे स्थानकांवर केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतिमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलिकडेच सुरुवात केली आहे. राज्यातील 44 स्थानकांचा त्यात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण व सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे कोकण पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल. पर्यटकांना, स्थानिक रहिवाश्यांना या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निसर्गसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, शासनाने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी रेल्वे स्थानकांचे रस्ते महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण असून स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी कोकणातील बारा रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटकरण व सुशोभिकरणाचे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायभूत सुविधांची उभारणी करण्यास शासनाचे प्राधान्य आहे. त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यंत्र्यांची भूमिका आहे. कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभेलली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे. पर्यटक, प्रवासी यांच्या सोयीसुविधांमध्ये या माध्यमातून वाढ होणार आहे. त्याचा निश्चितच चांगला परिणाम याठिकाणच्या पर्यटन संधी वाढण्यासाठी होईल. या पार्श्वभूमीवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तत्परतेने सात महिन्यात ही बारा रेल्वेस्थानके, रस्ते सुशोभिकरण संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कोकणवासीय, चाकरमान्यांसाठी हे निश्चितच उपयुक्त ठरेल. कोकणात सिंचन प्रकल्पाची कामेही करण्यात येणार असून काजू फळ प्रक्रिया सोबत वेगवेगळे रोजगारवृद्धीसाठीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व माध्यमातून लवकरच कोकणाचा लक्षणीय विकास बघायला मिळेल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
कोकण पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा – मंत्री रविंद्र चव्हाण
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या कामात उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्वे व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरुवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा निश्चितच व्यापक लाभ मिळेल, असे श्री.चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव श्री. दशपुते, कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, वैशाली गायकवाड, कोकण भवन यांच्यासह सर्व संबंधित उपस्थित होते.
सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती
कोकण विभागामध्ये पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोचमार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभिकरण करण्याचे नियोजन केले आहे.
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. एकूण ३७ रेल्वे स्थानकांपैकी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे व सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानक वीर, माणगाव व कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर व खेड; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या कामांना राज्य शासनामार्फत मंजूरी प्रदान केली असून सन मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये 12 कामांकरिता 56.25 कोटी इतक्या रकमेच्या कामांचा समावेश करण्यात आला असून आजमितीस या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात येत आहेत.
रेल्वे स्थानक सुशोभिकरण अंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे, अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी छत तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगमन निर्गमनाद्वारे सायकल, दुचाकी, चारचाकी, बस व रिक्षासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पुणे, दि. ०८ ऑगस्ट २०२३: वीजग्राहकांनी वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा (प्रॉम्ट पेमेंट) केल्यास महावितरणकडून एक टक्के सवलत दिली जाते. राज्यात ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात व ‘गो-ग्रीन’ योजनेत आघाडीवर असलेल्या पुणे परिमंडलामध्ये सध्या दरमहा सरासरी ११ लाख ५ हजार वीजग्राहक या सवलतीद्वारे सुमारे २ कोटी २६ लाख ६५ हजार रुपयांची बचत करीत आहे. घरबसल्या व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरणा करणे सोयीचे झाल्याने प्रॉम्ट पेमेंटच्या एक टक्का सवलतीचा लाभ मिळत असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
महावितरणकडून वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्ट पेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरामध्ये दर महिन्यात सरासरी ६ लाख ४६ हजार ८७१ वीजग्राहक वीजबिलांचा तत्पर भरणा करून १ कोटी ३७ लाख ४ हजार रुपयांची सवलत घेत आहेत. तर पिंपरी चिंचवड शहरातील सरासरी २ लाख ८७ हजार ९० वीजग्राहक ५५ लाख ७० हजार रुपयांची तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये सरासरी १ लाख ७१ हजार ८१५ वीजग्राहक ३३ लाख ८७ हजार ७५० रुपयांची सवलत घेत आहेत.
जे वीजग्राहक प्रामुख्याने रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’द्वारे वीजबिल भरतात ते प्रॉम्ट पेमेंटच्या सवलतीचा अधिक संख्येने लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केल्यास०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत वेबसाईटद्वारे ग्राहकांना क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे सोयीने व सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे.
तसेच महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झाल्यास छापील कागदी वीजबिलाची प्रतीक्षा करण्याऐवजी ते ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ने लगेचच संबंधित ग्राहकांना पाठविण्यात येते. सोबतच प्रतिबिलात १० रुपये सवलत दिली जाते. त्यामुळे वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. पुणे परिमंडलात ‘गो-ग्रीन’मध्ये सहभागी एक लाख ५ हजार १९ ग्राहकांच्या वीजबिलामध्ये वार्षिक १ कोटी २६ लाख २ हजार २८० रुपयांची बचत होत आहे.
राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल-‘वीजबिलांबाबत असलेल्या सवलतींचा लाभ घेतल्यास आर्थिक बचतीची वीजग्राहकांना संधी आहे. प्रत्येक वीजबिलासाठी ‘ऑनलाइन’ भरणा, प्रॉम्ट पेमेंट व ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये आर्थिक सवलत आहे. तसेच पर्यावरणपूरक इतरही फायदे आहेत. सर्व वीजग्राहकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा ही विनंती.’
नवी दिल्ली-काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मंगळवारी 12 तुघलक लेन येथील त्यांचा जुना सरकारी बंगला परत मिळाला. संसदेच्या गृहनिर्माण समितीने राहुल यांची खासदारकी बहाल केल्यानंतर एक दिवसानंतर बंगल्याचे वाटप केले.
राहुल गांधी जेव्हा काँग्रेस मुख्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना बंगला परत मिळण्याबाबत विचारणा करण्यात आली. राहुल म्हणाले – संपूर्ण भारत माझे घर आहे.
राहुल गांधी 12 तुघलक लेनमध्ये 19 वर्षांपासून राहत होते. मोदी आडनाव प्रकरणी 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतर 22 एप्रिल 2023 रोजी त्यांना हा बंगला रिकामा करावा लागला होता.
राहुल 12 आणि 13 ऑगस्ट रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वायनाडलाही भेट देणार आहेत. खासदारकी बहाल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वायनाड दौरा असेल.
2004 मध्ये राहुल गांधी पहिल्यांदा अमेठीतून खासदार झाले. तोपर्यंत ते आपल्या आईसोबत 10 जनपथ येथील बंगल्यात राहत होते. 2005 मध्ये ते खासदार झाल्यावर त्यांना पहिल्यांदा 12 तुघलक लेन येथे बंगला देण्यात आला होता.
हा दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये स्थित एक टाइप-8 बंगला आहे, जो सर्वोच्च श्रेणी आहे. या आलिशान बंगल्यात 5 बेडरूम, 1 हॉल, 1 डायनिंग रूम, 1 स्टडी रूम आणि सर्व्हंट क्वार्टर आहे. छोटेखानी गृहप्रवेश समारंभानंतर राहुल गांधी या बंगल्यात शिफ्ट झाले होते. या सोहळ्यात सोनिया, प्रियांका, रॉबर्ट यांच्यासह फक्त त्यांचे जवळचे लोक सहभागी झाले होते. त्याचा सार्वजनिक फोटोही नाही.
या वर्षी 26 फेब्रुवारीला राहुल यांनी काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात सांगितले होते की, माझ्याकडे घर नाही. 12, तुघलक लेन येथील सरकारी बंगला रिकामा करून राहुल 10 जनपथ येथील त्यांची आई सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी शिफ्ट झाले.
12 तुघलक लेनशी संबंधित एक प्रसिद्ध किस्सा 2016 चा आहे. त्यावेळी हिमंता बिस्वा सरमा काँग्रेसमध्ये होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते आसामच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटायला गेले होते. त्यावेळी राहुल त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत खेळत होते. राहुल यांनी हिमंतांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या हिमंता यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. युपीए नावाची लाज वाटत असल्यानेच यांनी इंडिया हे नाव दिल्याची टीका शिंदेंनी केली. .महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यावर यांनी निर्बंध आणले असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालिसाचे पठणही सदनात केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे लोक आहोत. आम्ही केवळ हिंदुत्वाचे नाव घेत नाही. सावरकरांना शिवी देणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचे पाप काही लोक करत आहेत. हाच यांचा इंडिया आहे अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.
आज अविश्वास प्रस्तावावर नव्हे तर अविश्वासाविरोधात जनविश्वासाची चर्चा होत आहे. तुमच्याविरोधात लोकांनीच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे, एकदा 2014 आणि दुसऱ्यांदा 2019 मध्ये. आता 2024 मध्ये जनता हॅट्ट्रीक करणार आहे. यांनी आपल्या आघाडीचे युपीए हे नाव बदलून इंडिया असे केल आहे. यामुळे देशातील लोक आपल्यासोबत येतील असे यांना वाटते. मात्र यांना युपीए नावाची लाज वाटत होती असे मला वाटते. कारण युपीएचे नाव ऐकताच लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे आठवतात. म्हणूनच लोकांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे मोदीजींकडे दिली. ज्यांच्याकडे कोणताही नेता नाही, नियत नाही आणि निती नाही त्यांची ही आघाडी आहे. या आघाडीतील प्रत्येक नेता पीएम इन वेटिंग आहे. प्रत्येकाला वाटतं मी पीएम होईल, कारण यांच्या टिमला कॅप्टनच नाही आणि यांना मॅच खेळून वर्ल्डकप जिंकायचाय. मराठीत एक म्हण आहे, अडला हरी, गाढवाचे पाय धरी. ही आघाडी नसून विनाशाची युती आहे. ही स्कीम वर्सेस स्कॅमची लढाई आहे.
विरोधकांना केवळ मणिपूरवर राजकारण करायचे आहे. काँग्रेस कधीही ईशान्येकडील राज्यांविषयी गंभीर नव्हती. त्यामुळेच तिथल्या लोकांनी काँग्रेसचा हात सोडला.महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या काळात केंद्राचे प्रकल्प थांबवण्याचेच काम करण्यात आले. अडीच वर्षांत केवळच अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
2019 मध्ये तुम्ही कुणाचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि लोकांनी कुणाला बहुमत दिले. मात्र निवडणुकीनंतर स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत आघाडी यांनी केली. यांनी मतदारांसोबत गद्दारी करण्याचे काम केले. 13 कोटी मतदारांशी गद्दारी यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये जे घडले ते लज्जास्पद असून याबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केला. भाजपने नऊ वर्षांत नऊ सरकारे पाडली, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी टीका केली.
मणिपूरवर बोलण्याआधी सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्द्यावरून केंद्रसरकारवर टीका केली. सरकारने घेतलेल्या भूमिकांचा विचार करता आम्ही या सरकारवर विश्वास कसा ठेवणार असे सुप्रिया सुळेंनी म्हटले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही हा अविश्वास प्रस्ताव आणला कारण आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी आहोत. सध्या लोकांच्या काय भावना आहेत हे आम्ही सांगू इच्छितो कारण आम्ही त्यांचे आवाज आहोत आणि हे आमचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले. हा प्रस्ताव म्हणजे सध्याच्या भारतीयांच्या खऱ्या भावना असल्याचंही त्यांनी म्हटले.
सरकार कामाचा प्रचार करताना नऊ वर्षातील नवरत्ने याचा उल्लेख करत आहेत. पण मी सरकारच्या नवरत्नांबाबत सांगू इच्छिते असे म्हणत, सुप्रिया सुळेंनी समस्यांचा पाढा वाचला. राज्य सरकारांच्या कामामध्ये हस्तक्षेप, महागाई, एलपीजी सिलिंडरचे वाढलेले दर, देशातील महत्त्वाच्या संस्था मोडीत काढणे, जुमलेबाजी करणे, कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश ही सरकारची नवरत्ने असल्याचे सुप्रिया म्हणाल्या. या नऊ वर्षात भाजपने विविध राज्यांमध्ये नऊ सरकारे पाडली त्यात महाराष्ट्रात दोनदा सरकार पाडल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशात वाढलेल्या प्रचंड महागाईवरूनही सुप्रिया सुळेंनी सरकारवर जोरदार टीका केली. सध्या संपूर्ण देशामध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. युपीएच्या सरकारच्या काळात 500 रुपयाच्या आत असलेली थाळी ही आता 1000 च्या वर पोहोचली असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.सरकारची भूमिका ही कायम शेतकरी विरोधी राहिल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी कांद्याबाबत सरकारला वारंवार विनंती केली होती. कांद्याच्या निर्यातीची मागणी करत होते, कारण भारतात कांद्याचे अतिरिक्त उत्पादन होते आणि जागतिक बाजारात कांदा नव्हता. पण सरकारने तसे केले नाही. उलट दुधाचे भरपूर उत्पादन असताना दुधाची आयात केली. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणाले, पण त्याचे काय झाले. त्यामुळे जर सरकार शेतकरी विरोधी असतील तर आम्ही सरकारवर कसा विश्वास ठेवणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सरकारने वंदे भारत सुरू केले, पण त्याचबरोबर गरीब रथ रेल्वेही वाढवल्या असत्या तर आम्हीही कौतुक केले असते. कारण गरीब वंदे भारतमध्ये बसत नाहीत, तर गरीब रथ मध्ये बसतात. त्यात वंदे भारत अनेक ठिकाणी थांबेच नाहीत तर त्याचा फायदा काय. युपीएच्या काळात रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या, आता फक्त रेल्वे स्थानकावरून जातात, असेही सुप्रिया म्हणाल्या.
देशाच्या आर्थिक स्थितीवरुनही सुप्रिया सुळेंनी टीका केली. देशावर असलेले कर्ज 2014 मधील 55.87 लाख कोटींवरून 155.6 लाख कोटींवर पोहोचले आहे. हे कर्ज फेडण्यासाठी सरकार एलआयसी, आयडीबीआय विकत आहेत आणखी काय विकतील माहिती नाही, असे सुप्रिया यांनी म्हटले.
मणिपूरमध्ये सरकारची अत्यंत लज्जास्पद भूमिका समोर आली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मणिपूरमध्ये 169 लोकांचा मृत्यू झाला 60 हजार लोक विस्थापित झाले. पण सरकार एवढे असंवेदनशील का झाले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केली. महिलांसोबत जे काही घडले ते कसे घडू दिले जाते, सरकार भूमिका का घेत नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारसमोर केवळ एकच उद्दिष्ट आहे ते म्हणते 2024 मध्ये सत्ता मिळवणे अशी टीकाही त्यांनी केली.
पुणे, ता. ८ : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक व सेवकांना सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली. याबाबतचे निवेदन कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार व उपायुक्त रवींद्र बिनवडे यांना दिले. आयुक्तांनी प्रशिक्षकांसाठी सकारात्मकता दर्शवत पुढील कारवाईचे आश्वासन दिले आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील तरुण-तरुणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी समाज विकास विभाग अंतर्गत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येते. संपूर्ण भारतातील यशस्वी उपक्रम म्हणून याची नोंद झालेली आहे. झोपडपट्ट्यातील बेरोजगारी व अल्प उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना या केंद्रामार्फत विविध तंत्रज्ञान व कौशल्याचे मोफत प्रशिक्षण देते. २००१ सालापासून सुरू झालेल्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षक महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नमूद केले. दि. ०१ जून २०२३ रोजी काढलेल्या शासन निर्णय क्रमांक पीएमसी-२०२१/प्र.क्र.३७७. नवि-२२ यामध्ये १६० कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिले आहेत. वरील शासन निर्णयासाठी लागणारा मुख्य ठराव क्र. ८५१ मध्ये विविध योजनांबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचाही महत्त्वांच्या बाबीत उल्लेख झाला आहे. मात्र, प्रशिक्षक व सेवक यांना या शासन निर्णयामध्ये समाविष्ट केले गेले नाही. या प्रशिक्षक व सेवकांवर अन्याय होऊ नये, तसेच त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे, अशी विनंती प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. यावेळी अनेक प्रशिक्षक उपस्थित होते.
पुणे : कामगारांच्या मूलभूत प्रश्नांसह विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होणाऱ्या किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनचा ५२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कामगार नेते, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांचे कामगारांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे. बुधवार, दि. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन सभागृह, लेन नंबर ३, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार, सेवेची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या कामगारांचा सत्कार आणि विशेष प्राविण्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, असे युनियनच्या वतीने कळवण्यात आले आहे.
पुणे, दि. ७: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महारोजगार मेळाव्यात निवड झालेल्या ३ उमेदवारांचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित प्रकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या मेळाव्यासाठी महास्वयम् पोर्टलवर रोजगारासाठी बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली केली होती. तसेच उद्योजकांनी विविध पात्रतेच्या रिक्त पदांची मागणी नोंदविली होती. या महारोजगार मेळावा कार्यक्रमामध्ये ५ हजार ३९५ रिक्त पदांच्या भरतीसाठी ३२ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. या मेळाव्यामध्ये १ हजार २९ उमेदवारांची नोंदणी झाली. त्यानुसार सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ६३९ उमेदवारांची निवड करण्यात आली.