पुणे लोकसभेसाठी निरीक्षक प्रणिती शिंदे ,समन्वयक उत्कर्षां रूपवते
पुणे- एकीकडे दिल्लीत राष्ट्रवादीच्या मदतीला पुण्यातून जायला कोणी नगरसेवक तयार झाले नसल्याची चर्चा उसळली असताना दुसरीकडे शहर कॉंग्रेस मधील गटबाजीचा तिढा आणखी गुंतागुंतीचा होत चालल्याचे बोलले जाते आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुण्यात आले तेव्हाच पुण्यातील गटबाजी नेत्यांच्या समोर चव्हाट्यावर आली होती. शहर अध्यक्षांनी गाडीतून मधूनच उतरून नेत्यांना संकेत दिले होते.माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी अरविंद शिंदे यांच्यात मतभेद असल्याचे सांगितले जात असताना,बागवे यांनी कॉंग्रेस पक्षात आणलेले आणि आता आमदार झालेले रवींद्र धंगेकर,माजी आमदार मोहन जोशी यांचा एक गट निर्माण झाल्याचे बोलले जाते आहे.हे तीन गट असताना आबा बागुल,अभय छाजेड,संजय बालगुडे असे मान्यवर आपापल्या स्थानावर अढळ आहेत.हडपसरला माजी मंत्री शिवरकर त्यांच्या स्थानी आहेत.या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून वडेट्टीवार यांनी पुण्यात आल्यावर आणि हि स्थिती लक्षात आल्यावर त्याच रात्री विश्वजित कदम यांच्या निवासस्थानी रात्री बैठक घेऊन गटबाजीचा तिढा सोडविण्यासाठी चर्चा केल्याचे वृत्त येथे समजले होते. या बैठकीत पुण्यातील तिढा सोडविण्यासाठी दरमहा अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार याचौघांनी एक दिवस पुण्यासाठी एकत्र येऊन एक बैठक घेऊन समन्वय साधून कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न करावेत असे ठरल्याचे सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात तसे होईल कि नाही याची शाश्वती नसतानाच आता महाराष्ट्रभर यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना, त्याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही आपल्या पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार आहे. आणि याबाबतची पुण्यातील जबाबदारी अभय छाजेड यांच्यावर टाकण्यात आली आहे.छाजेड हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत तर पुण्यासाठी प्रमुख नेते म्हणून अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात,नाना पटोले आणि वडेट्टीवार हे कोणीही नसून ज्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची आणि रायगडची जबाबदारी आहे त्याच पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुण्याचे प्रमुख नेते पद सोपविण्यात आले आहे. यामुळे छाजेड यापुढे आता बहुधा कार्यकर्त्यांच्या समुहात दिसू लागतील अशी अपेक्षा काहीजण व्यक्त करत असले तरी त्यांच्यावर समन्वयक म्हणून पुण्यासह कोल्हापूर,सोलापूर, सांगली, साताराचीही जबाबदारी आहे हे विशेष आहे.

प्रदेश च्या पदयात्रे साठी प्रमुख नेते
अशोक चव्हाणांकडे मराठवाडा देण्यात आला आहे तर नाना पटोले नागपूर, ठाणे पाहणार आहेत,वडेट्टीवार अमरावती, सिंधुदुर्ग तर बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्र आणि पालघर पाहणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण कोल्हापूर,सोलापूर, सांगली,सातारा,पुणे आणि रायगड चे प्रमुख नेते म्हणून काम पाहणार आहेत .या प्रमुख नेत्यांसह पदयात्रा समन्वयक म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत त्यात पुण्यासाठी पुण्याचे अभय छाजेड यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
लोकसभेसाठी निरीक्षक व समन्वयक









