नवी दिल्ली-
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. युपीए नावाची लाज वाटत असल्यानेच यांनी इंडिया हे नाव दिल्याची टीका शिंदेंनी केली. .महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणण्यावर यांनी निर्बंध आणले असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी हनुमान चालिसाचे पठणही सदनात केले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे लोक आहोत. आम्ही केवळ हिंदुत्वाचे नाव घेत नाही. सावरकरांना शिवी देणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसण्याचे पाप काही लोक करत आहेत. हाच यांचा इंडिया आहे अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.
आज अविश्वास प्रस्तावावर नव्हे तर अविश्वासाविरोधात जनविश्वासाची चर्चा होत आहे. तुमच्याविरोधात लोकांनीच दोन वेळा अविश्वास प्रस्ताव मंजूर केला आहे, एकदा 2014 आणि दुसऱ्यांदा 2019 मध्ये. आता 2024 मध्ये जनता हॅट्ट्रीक करणार आहे. यांनी आपल्या आघाडीचे युपीए हे नाव बदलून इंडिया असे केल आहे. यामुळे देशातील लोक आपल्यासोबत येतील असे यांना वाटते. मात्र यांना युपीए नावाची लाज वाटत होती असे मला वाटते. कारण युपीएचे नाव ऐकताच लोकांना भ्रष्टाचार आणि घोटाळे आठवतात. म्हणूनच लोकांनी 2014 मध्ये देशाची सूत्रे मोदीजींकडे दिली. ज्यांच्याकडे कोणताही नेता नाही, नियत नाही आणि निती नाही त्यांची ही आघाडी आहे. या आघाडीतील प्रत्येक नेता पीएम इन वेटिंग आहे. प्रत्येकाला वाटतं मी पीएम होईल, कारण यांच्या टिमला कॅप्टनच नाही आणि यांना मॅच खेळून वर्ल्डकप जिंकायचाय. मराठीत एक म्हण आहे, अडला हरी, गाढवाचे पाय धरी. ही आघाडी नसून विनाशाची युती आहे. ही स्कीम वर्सेस स्कॅमची लढाई आहे.
विरोधकांना केवळ मणिपूरवर राजकारण करायचे आहे. काँग्रेस कधीही ईशान्येकडील राज्यांविषयी गंभीर नव्हती. त्यामुळेच तिथल्या लोकांनी काँग्रेसचा हात सोडला.महाराष्ट्रात अडीच वर्षांच्या काळात केंद्राचे प्रकल्प थांबवण्याचेच काम करण्यात आले. अडीच वर्षांत केवळच अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा विक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
2019 मध्ये तुम्ही कुणाचे फोटो लावून निवडणूक लढवली आणि लोकांनी कुणाला बहुमत दिले. मात्र निवडणुकीनंतर स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत काँग्रेससोबत आघाडी यांनी केली. यांनी मतदारांसोबत गद्दारी करण्याचे काम केले. 13 कोटी मतदारांशी गद्दारी यांनी केली.