पुणे-शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना पुणे लष्कर न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान यापुर्वी याप्रकरात त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला चार एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती अद्याप तो कारागृहात आहे. दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगणमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (50, रा. मु. पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख व 15 लाख रुपये असे 27 लाख रुपये घेतले. पैसे घेऊन वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे 44 जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याबाबत पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांना पुणे येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी दराडे यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, 2019 साली दराडे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी पदाचा गैरवापर करून नोकरीस लवण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींचा अपहार केल्याचे यावेळी नवगिरे युक्तीवाद करताना सांगितले. शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी एकुण 44 लोकांची फसवणुक केली आहे. काही लोकांना टीईटी पास करणे, शिक्षक पदावर, आरटीओ, तसचे तलाठी पदावर नोकरी लावतो सांगून मोठ्या रकमा स्विकारल्या आहेत.
गुन्हा दाखल नंतर सहा महिन्यांनी अटक
शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४४ जणांकडून ५ कोटी रुपये लाटणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडेंसह त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध फेब्रुवारीत हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांना अटक करण्यात आली.
शिक्षक पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी याबाबत फिर्याद दिली होती. सूर्यवंशी यांच्या नात्यातील महिलेला शिक्षकाची नोकरी हवी होती. जून २०१९ मध्ये पोपट यांची भेट दादासाहेब याच्याशी झाली. त्याने आपली बहीण शैलजा शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्यामार्फत तुमच्या नातलगाच्या नोकरीचे काम करुन देतो असे आमिष दाखवले. या कामासाठी दादासाहेबने पोपट यांच्याकडून २७ लाख रुपये घेतले. मात्र, अनेक महिने उलटले तरी नोकरीचे काम झाले नाही. त्यामुळे पोपट यांनी आरोपीला पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे पोपट यांनी पोलिसात धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शैलजा यांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे कोर्टात धाव घेतली होती, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, दराडे यांनी ४४ जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
शिक्षण आयुक्तांनी यापूर्वी केली होती निलंबनाची कारवाई
शिक्षण आयुक्तालयाने शैलजा दराडेंकडून याबाबत खुलासा मागवला होता. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनीही राज्य सरकारला या प्रकरणाचा अहवाल दिला होता. त्यात दराडे यांच्या कृती व कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या अहवालाची दखल घेऊन दराडे यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश राज्य सरकारचे उपसचिव टी. वा. करपते यांनी दिले होते.