वल्लरी प्रकाशन तर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित बकुळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पुणे : समाजाला आता निखळ कवितांची गरज आहे. कारण कविता आणि राजकारण अधिकाधिक उथळ होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने बघायचे कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला उद्याची आशा निर्माण करून देऊन त्यांच्यामध्ये संवेदना जागृत ठेवण्याचे आव्हान आज कवींसमोर आहे, असे मत ज्येष्ठ गझलकार कवी म.भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशन तर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित बकुळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन म.भा. चव्हाण यांच्या हस्ते झाले,त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, वल्लरी प्रकाशनचे व्यंकटेश कल्याणकर, किरण इनामदार, ज्योती इनामदार, आर्या इनामदार, कीर्ती देसाई यावेळी उपस्थित होते.
म.भा. चव्हाण म्हणाले, मी आयुष्यात अनेक थातूरमातूर नोकऱ्या केल्या परंतु माझे मन तिथे रमले नाही. कविता मात्र मी मनापासून केल्या कवी म्हणून करिअर करता येऊ शकते हे मी माझ्या उदाहरणावरून सांगू शकतो त्यासाठी मन मारून कुठेही काम काम करण्याची गरज नाही.
बबन पोतदार म्हणाले, कवींनी सतत लिहिले पाहिजे आणि भरपूर वाचन केले पाहिजे कवी होण्यासाठी प्रेमभंग झाला पाहिजे, असे नाही तर समाजाकडे संवेदनशील मनाने पाहूनही आपण कवी होऊ शकतो कवितेतून केवळ साहित्य निर्मिती होत नाही, तर एक पिढी घडते आणि त्यामधून समाजाची निर्मिती होते.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आजच्या काळात शब्दांच्या माध्यमातून भावना जिवंत ठेवण्याचे काम कवीने केले पाहिजे. यांत्रिक काम करून घेण्यासाठी आज यंत्र आणि रोबोट निर्माण केले जात आहेत, परंतु भावना त्या पद्धतीने निर्माण करता येऊ शकत नाही. संवेदना निर्माण करण्यासाठी कवीची आणि कवितेची समाजाला अत्यंत गरज आहे. कारण माणुसकी जिवंत राहिली तरच समाज जिवंत राहू शकतो. त्यांनी बकुळमधील सर्व कवी कवयित्रींच्या कवितांचे विश्लेषण केले.
‘बकुळ’ मध्ये ज्योती आळंदकर, दिपक दाते, प्रल्हाद दुधाळ, संपत गर्जे, वीणा कडू, निर्मला लोंढे, मीनल महाजन, शीतल महेश माने, मानसी राऊत (पवार) , कविता सामंत नायक, रत्नाकर सोहनी, अजित उबाळे, स्नेहा विरगावकर आदी कवी कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे.
या कवींनी यावेळी आपल्या कविता सादरीकरण केले. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. तर ज्योती इनामदार यांनी आभार मानले.