महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; कोंढवा येथील महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात ७० कुटुंबांना वाटप
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महासरस्वती, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री विष्णू या उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन तब्बल ७०० किलो धान्य कोंढवा येथील महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात ७० कुटुंबांना देण्यात आले. धार्मिकतेसोबत सामाजिकता जपत श्री महालक्ष्मी मंदिराने हा उपक्रम राबविला आहे.
श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह सुभाष सरपाले व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
धान्यतुलेमध्ये गहू, तांदूळ, साखर, डाळ, चहा पावडर, बिस्किट, राजगिरा लाडू, तेल, मीठ अशा पदार्थांचा समावेश होता. कुष्ठरोगी वसाहतीतील ७० कुटुंबांना हे धान्य देण्यात आले. वर्षभर अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
कुष्ठरोगी वसाहतीत महालक्ष्मी मंदिरातर्फे ७०० किलो धान्य
Date: