पुणे-काल गिरीश बापट कसब्यात प्रचारासाठी आले होते. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारसभेत बापट यांनी भाग घेतला. यावेळी बापट यांच्या नाकात ऑक्सिजनची नळी होती. हाताला ऑक्सिमीटर लावले होते. त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत होती. तरीही बापट प्रचारात सहभागी झाले होते.आपला मतदारसंघ राखण्यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भाजपाने गिरीश बापटांना प्रचार रिंगणात उतरवले आहे. काल झालेल्या प्रचारात गिरीश बापट नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घालून सहभागी झाले होते. बापटांना बोलतानाही त्रास होत असल्याचे दिसून आले होते. बापट यांची ही अवस्था बघून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी आज निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे म्हणाले की, जेव्हा युद्ध भूमीवर शत्रू सोबत लढ्या होतात. तेव्हा देखील सहा सात वाजल्यानंतर शत्रूच्या सैन्यातील जखमींची देखील विचारपूस केली जाते.ही हिंदू संस्कृतीची एक पद्धत असताना. केवळ एक विधानसभा पोटनिवडणुक जिंकता यावी. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट आणि आमचे संबध जवळपास २५ वर्षापासून आहे. त्यामुळे आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख मानतो. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे.