पुणे : कसबा पेठ मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो तो राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहेत . कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे.या पोटनिवडणूकीत मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर काल मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातील प्रचारादरम्यान अचानकमाजी महापौर अंकुश काकडे यांनी गंमत म्हणून खेळी केली आणि धंगेकर यांना घेऊन जवळच्या मनसे कार्यालयात प्रचारास भेट देऊन सर्वांना संभ्रमात टाकायचे काम केले.आणि मनसे कार्यालयाला भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
यानंतर मनसेने या सर्व प्रकाराबद्दल पत्रक प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे.काल पुणे मनसे शहर कार्यालयात कोअर कमिटीची साप्ताहिक बैठक चालू होती. दर गुरुवारी नियमित ही बैठक असते. त्यावेळी समोरून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा चालू होती. त्यादरम्यान ते आणि महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते अचानक थेट मनसे कार्यालयात आले. घरात आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि त्याच्याशी बोलणे ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे 2 मिनिटात ते भेट घेऊन बाहेर पडले. पण यासंदर्भात संभ्रम निर्माण होणाऱ्या बातम्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. खरंतर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला भेटणे आणि निवडणुकीत पाठिंबा देणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत.
राजठाकरेंच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीच कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात श्रीमती अश्विनीताई जगताप यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यासंदर्भात कुठलाही संभ्रम निर्माण करण्यात येऊ नये. असं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ता व सचिव योगेश खैरे यांनी जारी केले आहे.