पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख ८९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३० जूनच्या मध्यरात्री घडली असून १ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शयनगृहातील कपाट उचकटून त्यामधील दागिने लंपास केले. घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.
अप्पा बळवंत चौकातील बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न
अप्पा बळवंत चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रात चोरट्यांनी प्रवेश करून तोडफोड करत रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ जुलैच्या पहाटे घडली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार खरात पुढील तपास करत आहेत.
एम.जी. रोडवरील कपड्याच्या दुकानात घरफोडी; ₹१.७० लाखांची रोकड लंपास, एकाला अटक
कॅम्प परिसरातील एम.जी. रोडवरील ‘इंटरस्टाईल मेन्स अँड किड्स शॉप’ या कपड्याच्या दुकानात खिडकी उचकटून प्रवेश करत चोरट्यांनी १ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सचिन प्रताप परिहार (वय २०) याला अटक केली असून अभिषेक राम कुमार याच्यासह त्याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३० जून रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता आरोपींनी दुकानाच्या मागील बाजूची खिडकी व लोखंडी ग्रील काढून आत प्रवेश केला आणि कॅश काउंटरमधील रोकड लंपास केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

