Home Blog Page 1397

हेल्मेट न वापरल्याबद्दल दंड भरलेल्या नागरीकांनो हीच वेळ आहे भाजपाला धडा शिकवण्याची!- मोहन जोशी

पुणे- हेल्मेट न घालण्याबद्दल २ ते ५ हजार रुपये दंड सोसावा लागणाऱ्या नागरीकांनो, या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून बघ्याची भूमिका घेणाऱ्या भाजपा वाल्यांना धडा शिकवायची हीच वेळ आहे. यासाठीच रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी भरगोस मतदान करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना विजयी  करून हेल्मेट सक्तीपोटी नागरिकांची ससेहोलपट करणाऱ्या भाजपला धडा शिकवा. असे आवाहन प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले.

      रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पहिली कोपरा सभा प्रभाग क्रमांक २९ दत्तवाडी म्हसोबा चौक, दुसरी

कोपरा सभा प्रभाग क्रमांक २९ अबील वाडा कॉलनी आणि तिसरी कोपरा सभा प्रभाग क्रमांक १५

हिराबाग चौक येथे झाल्या. त्यात हिराबाग येथील कोपरा सभेत ते बोलत होते. या तीनही कोपरा सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

      मोहन जोशी पुढे म्हणाले, हेल्मेट वापरण्यावर आम्ही कधीच विरोध केला नाही. आमचा विरोध हेल्मेट सक्तीला होता. राज्यात भाजपा सत्तेवर असताना ‘पुण्यात हेल्मेट सक्ती करू नये’ या मागणीसाठी आम्ही अनेक आंदोलने केली, निदर्शने केली, निवेदने लिहिली. मात्र भाजपाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर हेल्मेट सक्तीची कडक अमंलबजावणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सुरु करताच नागरिकांचे झालेले हाल आपण विसरू शकत नाही. आपल्या कसब्यातच हेल्मेट नसल्यामुळे २००० रु ते ५००० रु. दंड भरावा लागलेल्या स्त्री-पुरुष नागरिकांची संख्या कित्येक हजार आहे. त्यात तरुणांची देखील संख्या मोठी आहे. त्यामुळेच हेल्मेट न वापरल्याबद्दल २०००रु ते ५००० रु. दंड भरावा लागलेल्या कसबा मतदार संघातील प्रत्येकाने महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना मतदान करावे व भाजपाला नागरिक विरोधी भूमिका घेतल्याबद्दल धडा शिकवावा असे आवाहन मोहन जोशी यांनी शेवटी केले.

मराठी चित्रपट, मालिका आणि ओटीटी क्षेत्राच्या विकासासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 22 : मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी याशिवाय विविध कार्यक्रमांचा विकास ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार आहे. हे पोर्टल 24/7 आणि 365 दिवस सुरु राहिल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक समितीचे अध्यक्ष असतील, तर स्वप्नील जोशी, संदीप घुगे, केतन मारु या समितीचे सदस्य असतील.

मराठी चित्रपट, दूरचित्रवाणीवरील विविध चॅनलच्या मराठी मालिका, कार्यक्रम तसेच ओटीटीवरील मराठी चित्रपट आणि मालिका यांच्या निर्मितीकरिता पटकथा, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि वित्त पुरवठादार इत्यादींना एका व्यासपीठावर आणून एकमेंकाशी समन्वय साधणे, त्यांना नियमितपणे सल्ला देणे आणि बिगर आर्थिक साह्य इत्यादी बाबी समितीच्या कार्यकक्षेत येतील. राज्यातील स्वातंत्र्यसेनानी, इतर महत्वाचे समाजसुधारक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती इत्यादींच्या जीवनावर आधारी चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब मालिका इत्यादी निर्मितीसाठी प्रयत्न करणे तसेच शासनाला अशा प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य आणि सल्ला देण्याचे काम ही नियुक्त समिती करणार आहे.

मराठी निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बँकांकडून कमीत कमी दरात हमी मिळेल का याबाबतही अभ्यास करणे. भौतिकरित्या होणाऱ्या फिल्मबाजार पद्धतीचा अभ्यास करुन ऑनलाईन पोर्टल तयार करण्याबाबतचा आराखडा शासनास सादर करणे, तसेच आवश्यकतेप्रमाणे मराठी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती/ संस्था यांच्याशी समन्वय करणे हे काम समिती करेल. याशिवाय पोर्टल तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विकासक यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधण्याचे काम करेल.

एटीव्हीसी २०२३’ राष्ट्रीय स्पर्धेमधून घडणार शिक्षण, संशोधन व इनोव्हेशनचा अविष्कार

शिक्षण, संशोधन व इनोव्हेशनचा अविष्कार
घडवणारी ‘एटीव्हीसी २०२३’ राष्ट्रीय स्पर्धा

  • इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सच्या वतीने १ ते ५ मार्चदरम्यान तळेगाव दाभाडे येथे आयोजन
  • नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व ओरायझन इंडियाचा सहयोग
  • देशभरातून १०० टीम, ३५०० स्पर्धकांचा सहभाग; केंद्रीय मंत्र्यांची राहणार उपस्थिती

पुणे : इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सतर्फे सहाव्या ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप (एटीव्हीसी) २०२३’चे येत्या १ ते ५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन व इनोव्हेशन फेस्टिव्हल असलेली ही स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे होत आहे. यामध्ये भारत सरकारच्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, गो ग्रीन व मेक इन इंडिया या उपक्रमांचे विविध अविष्कार पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती इन्फिलीग मोटरस्पोर्ट्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पवन तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विलास देवतरे, इन्फिलीगचे सीएमओ चंद्रेश शर्मा, संचालक (विपणन) आदित्य संकलेचा, ओरायझन इंडियाच्या कार्यक्रम संचालक रीमा कुमारी आदी उपस्थित होते. यावेळी ‘एटीव्हीसी २०२३’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

पवन तिवारी म्हणाले, “या स्पर्धेत कार रेसिंग सह विद्यार्थ्यांनी बनवलेली नाविन्यपूर्ण कारची मॉडेल्स, एचआर समिट, भव्य जॉब फेअर आदी असणार आहे. देशभरातून २२ राज्यातील आयआयटी, एनआयटीसह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०० पेक्षा जास्त संघ, १२० पेक्षा जास्त उद्योग कंपन्यांतून साडेतीन हजार पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारत सरकारच्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, गो ग्रीन व मेक इन इंडिया आदी उपक्रमांचे सादरीकरण या फेस्टिव्हलमधून होणार आहे.”

राजेश म्हस्के म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना वाव देणाऱ्या या स्पर्धेचे संयोजन करण्याची संधी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूटला मिळाली आहे. यामध्ये आमचे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. अभियांत्रिकीच्या मुलांना अनुभवसंपन्न करणारी ही स्पर्धा असते. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि. १ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या पाच दिवसांच्या स्पर्धेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही कॅबिनेट मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्योग जगतातील अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येणार आहेत.”

विजेत्यांना १० लाखाची बक्षिसे

‘एटीव्हीसी २०२३’मध्ये चार किलोमीटरचे तीन ट्रॅक बनविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गाडीची विविध १५ प्रकारच्या तांत्रिक तपासण्या झाल्यानंतर अंतिम फेरीत कार रेसिंगसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण १० लाखाची रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे पवन तिवारी म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्माईल’ आणि ‘फायर’

शालेय विद्यार्थ्यांना संशोधन व इनोव्हेशन याची गोडी लागावी यासाठी इन्फीलीग मोटर स्पोर्ट्स आणि ओरायझन एज्युकेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फ मोटिव्हेटेड इंटेलिजंट लर्निंग एन्व्हायरन्मेंट’ (स्माईल) आणि फायनान्स, इनोव्हेशन, रिसर्च अँड एंटरप्रेन्युअरशिप (फायर) हे दोन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याअंतर्गत २५ निमंत्रित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दोन तासांचे मोफत प्रशिक्षण सत्र आयोजिले आहे. यामध्ये इतर शाळांतील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात.

“ही स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि संधी यांचे मिलन आहे. साहसी क्रीडा आणि तंत्रप्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा, शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या स्पर्धेला विशेष सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगती आणि संधी जाणून घेता येणार आहेत. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, वुमेन एम्पॉवरमेंट, स्वच्छ भारत अभियान, स्टॅन्ड अप इंडिया, स्वयंरोजगार योजना, पंतप्रधान रोजगार निर्माण योजना याचे दर्शन या स्पर्धेतून घडणार आहे.”

  • पवन तिवारी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, इन्फीलीग मोटरस्पोर्ट्स

धंगेकर यांच्या प्रचारार्थ प्रणिती शिंदे यांची पदयात्रा

    पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी महात्मा फुले वाडा, समाताभूमी येथे वंदनकरून सकाळी प्रचार पदयात्रेस प्रारंभ केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे यांसह विक्रम खन्ना, हेमंत राजभोज, यासिर बागवे, गणेश नलावडे, सारिका पारेख, रत्ना नाईक, वनिता जगताप, सरिता काळे आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

         ही पदयात्रा बागवे कमान,  महात्मा फुले वाडा,  चांदतारा चौक,  जोहरा कॉम्प्लेक्स मार्गे सुमित डांगी यांच्या दुकानापाशी समाप्त झाली. जोहरा कॉम्प्लेक्स आणि रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे प्रणिती शिंदे यांनी कोपरा सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे चर्मकार समाजाने धंगेकर यांना पाठींबा दिला. खडकमाळ आळी येथे लोधी समाजानेदेखील धंगेकर यांना पाठींबा दिला. याप्रसंगी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकारने महागाई आणि बेकारी आणली, त्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली, कॉंग्रेसच्या नेत्या खा.सोनिया गांधी अन्नसुरक्षा कायदा आणला. प्रत्येक गरिबाला स्वस्त दरात पुरेसे धान्य देण्याची तरतूद केली. मोदी सरकारने मात्र हे सारे बदलले. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतदान करून धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली

कसबा पेठ मतदार संघातील उमेदवारांच्यानिवडणूक खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

पुणे,दि.२२: कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली.

भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चविषयक तपासणी केली जात आहे. या तपासणीचा दुसरा टप्पा २० फेब्रुवारी रोजी पार पडला. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीचे निरीक्षण निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सहायक खर्च निरीक्षक म्हणून सुधीर पलांडे हे भूमिका बजावत आहेत. खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला त्याच्या पथकप्रमुख लेखा अधिकारी नंदा हंडाळ आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण या कक्षाकडून करण्यात येत आहे.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी १५ फेब्रुवारी रोजी पार पडली आहे. तिसरी तपासणी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली.
0000

ओबीसींच्या प्रश्नानाकडे भाजपचे दुर्लक्ष- विजय वडेट्टीवार

पुणे-राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत असूनही ओबीसींच्या प्रश्नाकडे या मंडळींनी दुर्लक्ष केल्याने कसब्यातील ३६ टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे व्यक्त केला.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार पुण्यात आले असता कॉंग्रेस भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून आपण ओबीसी बांधवांसाठी वर्ग तीन, वर्ग चारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, घरकुल, विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्वाधार योजना तसेच महाज्योती संस्था आदी कामांचा पायाभूत आराखडा निश्चित केला होता. मात्र असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना आता सर्वत्र पसरली आहे. असे ते म्हणाले. राज्यात मंत्रिमंडळ पूर्ण अस्तित्वात आले नसून केवळ आमदार पोसण्याचे काम सुरु आहे. या मंडळांना विकास व सामान्य माणूस दिसत नसून मने कलुषित करणे आणि जात व धर्मात भांडणे लावायची एवढाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपच्या मंडळीनी बेताल वक्तव्ये सुरु केले असून सोशल मीडियात शिव्या खाण्याच्या प्रकारावरून ते किती अस्वस्थ झाले आहेत हे ध्यानात येते. चार वर्षे स्थायी अध्यक्ष राहिलेल्या उमेदवाराने शनिवारवाडा पाच मजली करण्याची भाषा करणे योग्यच म्हणावे लागेल. कारण मजले वाढविण्याचे काम त्यांच्या तोंडी सहज येते. ३५ वर्षे कसबा ताब्यात असताना मजले का वाढले नाहीत हे आता कसबेकर जनतेने ओळखले आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी , कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मुसंडी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

पुणे-यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या मुसंडी या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत, गोवर्धन दोलताडे लिखित, निर्मित आणि शिवाजी दोलताडे दिग्दर्शित मुसंडी   हा मराठी चित्रपट २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  यावेळी मंत्री संदीपान भुमरे,  मंत्री उदय सामंत,  मंत्री शंभूराज देसाई,  मंत्री संजय राठोड,  मंत्री गुलाबराव पाटील, रामदास कदम,  अर्जुन खोतकर, खासदार हेमंत गोडसे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुहास कांदे, आमदार संजय शिरसाट, आमदार शहाजीबाप्पू पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार शांताराम मोरे, आमदार बालाजी कल्याणकर व चित्रपट निर्माते गोवर्धन दोलताडे यांच्यासह मंत्रीमंडळातील  अनेक सहकारी  उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना नियोजन करणं महत्त्वाचं आहे. हे नियोजन कशाप्रकारे करावं हे सांगताना या परीक्षेतल्या अपयशाकडेही सकारात्मक दृष्टीने पहात जिद्दीने यश मिळवता येऊ शकते हे सांगणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी  सांगितले. वेगळ्या विषयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसंडी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. 

रोहन पाटील आणि गायत्री जाधव ही जोडी या चित्रपटात  मध्यवर्ती भूमिकेत असून या दोघांसोबत  सुरेश  विश्वकर्मा, शुभांगी लाटकर, तान्हाजी गळगुंडे, शिवाजी दोलताडे,  सुरज चव्हाण,  अरबाज शेख, प्रणव रावराणे,  अक्षय टाक, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी),सनमीता धापटे,  वैष्णवी शिंदे, माणिक काळे,  सुजीत मगर, मयुर झिंजे, ऋतुजा वावरे, विकास वरे, राधाकृष्ण कराळे यांच्या भूमिका आहेत. राज्यासह देशातील IAS, IPS आणि यशस्वी उदयोजक यांचे मार्गदर्शन घेऊन या चित्रपटाची कथा रचना करण्यात आली आहे.

मुसंडी   चित्रपट २६ मे ला प्रदर्शित होणार आहे.  

लष्कराच्या जेसीओ/ओआर च्या नवीन भरती प्रक्रियेमध्ये सीईई ठरणार पहिली निवड चाचणी

पुणे-

भारतीय लष्कराने जेसीओ/ओआर च्या भर्ती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यात, joinindianarmy.nic.in (JIA वेबसाइट) वर ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना सामाईक प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. टप्पा II मध्ये, निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित एआरओ ने ठरवलेल्या ठिकाणी भरती मेळाव्यासाठी बोलावले जाईल, जेथे त्यांची शारीरिक सक्षमता चाचणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी घेतली जाईल. शेवटी, टप्पा III मध्ये निवड झालेल्या उमेदवारांची रॅलीच्या ठिकाणी वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

ऑनलाईन नोंदणी

जेआयए (JIA) वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी 16 फेब्रुवारी 23 ते 15 मार्च 23 पर्यंत सुरू आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहील. उमेदवार आपले आधार कार्ड, अथवा दहावीचे प्रमाणपत्र वापरून नोंदणी करू शकतात. सतत ऑटोमेशनचा एक भाग म्हणून, अधिक पारदर्शकतेसाठी जॉईन इंडियन आर्मी (Join Indian Army) वेबसाईट आता डीजीलॉकर बरोबर जोडण्यात आली आहे.
ऑनलाइन सीईई संपूर्ण भारतात 176 ठिकाणी आयोजित केले जात आहे. उमेदवारांना पाच परीक्षा केंद्रे निवडण्याचे पर्याय आहेत आणि त्यांना त्यांच्या पर्यायापैकी एक परीक्षा केंद्र दिले जाईल. ऑनलाइन सीईई साठी प्रति उमेदवार 500/- रुपये शुल्क आहे. शुल्काचा 50 टक्के वाटा लष्कराकडून उचलला जाईल. नोंदणी प्रक्रियेच्या शेवटी उमेदवारांना पेमेंट पोर्टलवर निर्देशित केले जाईल. उमेद्वारांनी इंटरनेट बँकिंग, UPI/BHIM किंवा Maestro, Maestro Card, VISA किंवा RuPay कार्डांसह सर्व प्रमुख बँकांचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून संबंधित बँक शुल्कासह रु. 250/- भरणे आवश्यक आहे. ऑनलाइन व्यवहारांसाठी उमेदवारांना त्यांचे डेबिट कार्ड सक्रिय करण्याचा
सल्ला देण्यात आला आहे. उमेदवाराचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतरच नोंदणीकृत मानले जाईल आणि या टप्प्यावर रोल नंबर तयार केला जाईल, जो परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर वापरला जाईल.

जॉईन इंडियन आर्मी वेबसाइट आणि यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये “अर्ज कसा करायचा” यावरील संपूर्ण प्रक्रिया दिली आहे.

ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई)

ऑनलाइन सीईई चाचणीला बसण्यासाठीची, प्रवेशपत्रे परीक्षा सुरू होण्याच्या 10-14 दिवस आधी जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर उपलब्ध असतील. परीक्षेची सूचना उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे आणि त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राचा अचूक पत्ता असेल.

ऑनलाइन सीईई ही संगणकावर आधारित परीक्षा आहे. परीक्षेला बसण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी, ‘ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षेला कसे बसावे’ या विषयावरील व्हिडिओ जॉईन इंडियन आर्मी वेबसाइट आणि यूट्यूबवर देखील उपलब्ध आहे. परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणि पद्धतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन सीईई ची तयारी करण्यामध्ये उमेदवारांना मदत करण्यासाठी, सर्व विषयांच्या सराव चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत आणि जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर एक लिंक देण्यात आली आहे. अशा प्रकारे उमेदवार घरबसल्या या परीक्षेचा सराव करू शकतील. सराव चाचणीमध्ये प्रवेश केल्यावर, उमेदवारांना संगणकावर तीच स्क्रीन पाहता येईल जी त्यांना प्रत्यक्ष परीक्षे दरम्यान दिसेल. या सराव चाचण्या मोबाईलवर देखील देता येतील.

भरती रॅली

ऑनलाइन सीईई मधील कामगिरीच्या आधारावर, निवड झालेल्या उमेदवारांना भर्ती रॅलीसाठी नामनिर्देशित ठिकाणी बोलावले जाईल. भर्ती मेळाव्याची पद्धत कायम आहे. अंतिम गुणवत्ता ऑनलाइन सीईई निकाल आणि शारीरिक चाचणीच्या गुणांवर आधारित असेल.

मदत कक्ष

उमेदवारांच्या कोणत्याही शंकांचे स्पष्टीकरण देण्यासाठी, एक हे मदत कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे, ज्याचा तपशील जॉईन इंडियन आर्मी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ऑनलाइन सीईई संबंधित प्रश्नांसाठी, मोबाईल क्रमांक 7996157222 वर देखील स्पष्टीकरण उपलब्ध आहे.

फायदे

बदललेली कार्यपद्धती भरती दरम्यान अधिक बौद्धिक पैलूंवर लक्ष केंद्रित करेल आणि परिणामी देशभरात व्यापक स्तरावर पोहोचेल. यामुळे भरती रॅलींमध्ये जमणारी मोठी गर्दी कमी होईल आणि तेथे जास्त प्रशासकीय व्यवस्था लागणार नाही. ही प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित, उमेदवारांसाठी सोपी होईल आणि देशाच्या सध्याच्या तांत्रिक प्रगतीशी सुसंगत असेल.

पेपर फुटीला आळा

उमेदवारांच्या लक्षात येईल की, ही प्रक्रिया कमीत कमी मानवी हस्तक्षेपाद्वारे पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आली आहे. उमेदवारांनी पेपर फुटी करणाऱ्यांना बळी पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे, कारण ते त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाहीत. भर्ती प्रक्रिया पूर्णपणे निःपक्षपाती, निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित आहे.

पाचही वर्षे धरणे हाउसफुल्ल,दरवर्षी पाणीपट्टीत वाढ तरीही पाण्याची दैना सुरूच ..महापालिकेचा कारभार

दक्षिण पुण्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

पुणे-

कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्वर साठवण टाकी आणि कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यामध्ये येणाऱ्या पाण्याची मोजणी करण्यासाठी राजीव गांधी पंपिंग स्थानक येथील जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्याचे काम येत्या शनिवारी (२५ फेब्रुवारी) करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे. रविवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कात्रज गावठाण, गुजरफाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार सोसायटी, राजस सोसायटी, वरखडे नगर, माऊली नगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागर नगर भाग-१ आणि २, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकर नगर, येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, ताबाला कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, खडी मशीन परिसर, वधेनगर, येवलेवाडी मुख्य रस्ता, राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराच्या भागाचा पाणीपुरवठा शनिवारी बंद राहणार आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत’आर. बी. होरांगी’च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

पुणे : सेऊल येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आर. बी.होरांगीच्या खेळाडूंनी सहा सुवर्ण, ९ रौप्य आणि १८ कांस्यपदक मिळवून देशाचे नाव उंचावले. यासह पुण्यात नुकत्याच झालेल्या पहिल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आर. बी .होरांगी तायक्वांदोच्या खेळाडूंनी २२ सुवर्ण, १६ रौप्य व २० कांस्यपदकाची कमाई करत स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.

आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन यांच्या वतीने चंदननगर-खराडी येथे नुकतीच ही स्पर्धा आयोजिली होती. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातील पंधराशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. आर. बी. होरांगीचे ५० पेक्षा अधिक खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते. आर. बी. होरांगीचे अध्यक्ष मास्टर रवींद्र भंडारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेत माजी नगरसेवक योगेश मुळीक, माजी नगरसेविका शीतल शिंदे, सुनिता गलांडे, संजय गलांडे एकनाथ भंडारी, पोरित्रन शर्मा, तिरुपती भंडारी, बसवराज भंडारी यांनी उपस्थिती लावून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी योगेश मुदलियार, श्रीनिवास केदगोनी, सारंग धोका, गिरीष पाटील, प्रशांत वांद्रे, विनोद बांगर, जयदेव पाल, किरण गायकवाड, आरती पसारकर, लिना पॉल, महेंद्र वानखेडे, विशाल गवते, शिवाजी भंडारी, गिरीष बागलकोट, प्रणव परमार, मनीषा विश्वकर्मा, माधुरी अनमल आणि वैष्णवी वांद्रे यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे आयोजक कपिल अनमल आणि रवींद्र भंडारी यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची २४ तारखेला कसब्यात रॅली

0

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीनच्या सुमारास कसबा विधानसभा मतदारसंघात रॅली होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत हेमंत रासने प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वासदेखील म्हस्के यांनी व्यक्त केला.

नरेश म्हस्के म्हणाले की, “कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना निवडणुकीला सामोर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विविध समाजातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक व्यथा मांडल्या. त्या सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. आजपर्यंत विविध समाजाची बैठक कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ती बैठक घेण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केल्याने नागरिक समाधानी आहे”, असे सांगत म्हस्के यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

शिंदे गटाला व्हीप बजावता येणार नाही, आयोगाच्या निर्णयाला तूर्त स्थगिती नाही

0

निवडणूक आयोग, शिंदे गटाला नोटीस

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह दिल्याच्या निर्णयालाही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली. त्यानंतर आता यावर दोन आठवड्यानंतर सुनावणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे शिंदे गट या काळात ठाकरे यांच्या आमदारांना व्हीप बजावू शकणार नाही.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाचे वाचन ठाकरेयांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केले आहे. त्यानंतर नीरज कौल यांनी शिंदे गटातर्फे बाजू मांडली.

निवडणूक आयोगाने पक्ष नाव व धनुष्यबाणाबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे, असा दावा ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर आज स्वतंत्र बेंच समोर सुनावणी आज झाली. केंद्रीय निवडणूक आयोग आणि शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालय नोटीस देणार आहे.

ठाकरे गटाची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल मांडत आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला. त्याबाबत बाजू मांडली. यादरम्यान निवडणूक आयोगाचा निकाल आम्हाला दाखवा असे कोर्टाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती. त्यापूर्वी खालच्या कोर्टात दाद मागता आली असती – शिंदे गटाचे वकील कौल

निवडणूक आयोगाने केवळ विधीमंडळ पक्षातील बहुमताचाच विचार केला, मात्र संघटनेचा नाही – सिब्बल

त्यांच्याकडे 40 आमदार आहेत, त्याच भरवशावर त्यांना पक्षचिन्ह दिलं गेलं – सिब्बल

निवडणूक आयोगानं त्यांच्या निकालात म्हणालं की संघटनात्मक संख्येचे दाखले पुरेसे नाहीत, यावर आमचा आक्षेप आहे – सिब्बल

राज्यसभेत आमच्याकडे बहुमत आहे, पण केवळ 40 या संख्याबळावर त्यांना चिन्ह दिलंय – सिब्बल

हा प्रश्न सुप्रीम कोर्टासमोरचा आहे, त्यात उच्च न्यायालय काय करणार – सिब्बल

या संघर्षातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच हा आहे की तुम्ही विधीमंडळ पक्षालाच मुख्य पक्ष समजलात. आणि थेट सरकार पाडलं, पण विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा केवळ एक भाग असतो – सिब्बल

निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय देतांना राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता, मतं या सर्व बाबींचा विचार केलाय. आयोग पक्षाच्या पूर्ण स्ट्रक्चरचा विचार करतं – कौल

राजकीय पक्षाचा अविभाज्य घटक असतो विधीमंडळ पक्ष – कौल

येथे पक्षप्रमुख सर्वेसर्वा आहेत. नाराजीचाही निर्णय तेच करणार, त्या आधारावर आमदार अपात्र ठरवलेच जाणार आणि पक्षातून बाहेर फेकले जाणार – कौल

इथली पक्ष घटना अशी आहे ज्यात कुणालाही बोलण्याची मुभा नाही, म्हणूनच आयोगाने आमदारांची संख्या, मतं या सर्व बाबींचा विचार केला – कौल

अपात्रतेबाबत जोवर निर्णय होता नाही तोवर आमदार किंवा खासदाराला सभागृहातील कामकाजात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार असतो – कौल

विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष असा भेद करता येत नाही कारण एकच व्यक्ती दोन्हीचा भाग असते. तोच आमदार पुढे जाऊन निवडणूकही लढतो – कौल

हाच (अपात्रतेचा) मुद्दा होता जो विचारात घेत सुप्रीम कोर्टाने चिन्हाबाबत निर्णय घेण्यास आयोगाला सुचना दिल्या होत्या – मनिंनदर सिंह
 
याचिका ऐकण्यास कोर्टाचा होकार, दोन्ही पक्षांना नोटीस देणार असे न्यायमुर्ती चंद्रचूड म्हणाले.

निर्णयाला स्थगिती देण्याची सिब्बलांची मागणी. 

स्थगिती दिली नाही तर काय होऊ शकेल – चंद्रचूड

सिंघवी – ते व्हिप जारी करतील आणि व्हिप पाळला नाही म्हणून आमच्या आमदारांना अपात्र ठरवतील. 

आम्ही हे प्रकरण दोन आठवड्यांनी घेतलं तर तुम्ही व्हिप जारी करणार का?

कौल – म्हणतात नाही

पार्टी फंड, ऑफिसेस यावरही ते दावा करु शकतात – सिब्बल

देवदत्त कामत – आम्हाला निवडणुकीपुरतं मशाल चिन्ह मिळालं होतं.

हे प्रकरण या कोर्टात असेपर्यंत हे चिन्ह आमच्याकडे राहील असे निर्देश द्यावेत..

अन्यथा आम्हाला राजकीयदृष्ट्या अडचणी येतील – कामत

दोन्ही पक्षांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी

आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलं. 

सुप्रीम कोर्ट काय म्हणाले ?

प्रकरण हायकोर्टात नाही तर सुप्रीम कोर्टातच ऐकलं जाणार
 
दोन आठवडे शिंदे गटाकडून व्हिप जारी केला जाणार नाही
 
ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही.

सुप्रीम कोर्टात प्रकरण असेपर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहील.

ठाकरे आणि शिंदे गटाला कोर्ट नोटीस पाठवणार.
 
नोटीशीला उत्तरासाठी दोन्ही गटाला दोन आठवड्याची मुदत.

पक्षाची संपत्ती आणि निधीबाबत स्थगिती नाही.

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  • निवडणूक आयोगाने शिवसेनेची घटना ऑन रेकार्ड नसल्याचे म्हटले आहे.
  • शिवसेनेची (ठाकरे) घटना ऑन रेकार्ड असून त्याचे पुरावेही आहेत.
  • निर्णय देताना पक्षाचे सदस्यत्व विचारात घेतले नाही.
  • फक्त आमदार, खासदारांच्या संख्येवर शिंदे गटाला चिन्ह मिळाले.
  • सत्तासंघर्षाचे प्रकरण आणि निवडणूक आयोगाने नुकताच दिलेला निकालाचे प्रकरण एकसारखे म्हणून सुप्रीम कोर्टात आलो.
  • निवडणूक आयोगाने पक्षाची बांधणी विचारात घेतली नाही.
  • कपिल सिब्बल म्हणाले – आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्या

शिंदे गटातर्फे नीरज कौल यांचा युक्तिवाद

  • तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात येऊ शकत नाही – शिंदे गटाच्या वकील निरज कौल यांचा युक्तिवाद
  • घटनेचा 136 चा अधिकार सुप्रीम कोर्टाने येथे वापरू नये.
  • सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी हस्तक्षेप करू नये.
  • निवडणूक आयोगाने निकाल देताना पक्षाचे स्ट्र्क्चर विचारात घेतले.
  • खासदार, आमदारांच्या संख्येवरूनच पक्षाचे रजिस्ट्रेशन होते.
  • पक्षप्रमुखाकडे सर्वाधिकार हे लोकशाहीविरोधी
  • पक्ष रजिस्टर करताना निवडणूक आयोग मतदानाचा विचार करतो. याच तर्कावरून विधीमंडळ पक्ष वेगळा मानला गेला.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सोमवारी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. त्यावर आधी तुमचे म्हणणे ऐकून घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे न्यायमूर्तींनी गेल्या सुनावणीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे आज सुनावणीत नेमके काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.सोमवारी अ‌ॅड. कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी. अन्यथा शिवसेनेचे बँक अकाऊंट, पक्षनिधी सर्व जाईल. यावर निवडणूक आयोगाविरोधात तुमचे काय म्हणणे आहे?, हे प्रथम आम्ही घेऊ. त्यानंतर मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

पहाटेचा शपविधी झाला नसता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : शरद पवार

पुणे-: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनंतर राष्ट्रपती राजवट उठली. जर राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. ते चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तुम्हाला पहाटेच्या शपथविधीबाबत माहीत होते का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी शरद पवारांना विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असेही पवार म्हणाले. चिंचवडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार चिंचवडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्यावेळी सरकार बदलायचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्याचा एक फायदा झाला, तो म्हणजे राष्ट्रपती राजवट उठली, असे पवार म्हणाले. काही गोष्टी सांगणं उचित नसतं, पण राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? असे पवार म्हणालेकेंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनसंदर्भात दिलेल्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष होतो. मात्र सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेणं असं कधीच झालं नाही. मी देखील काँग्रेसमधून बाहेर पडलो. मात्र मी असं काही केलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाने आम्हाला सुचवलं मग त्यांनी हात आणि आम्ही घड्याळ घेतलं. पण इथं वैशिष्ट्य निवडणूक आयोगाचे आहे की, पक्षाचे नाव आणि चिन्ह देऊन टाकलं. देशाच्या इतिहासात असं कधीच घडलं नसल्याचे शरद पवार म्हणाले. निवडणूक आयोगाचे निर्णय नेमकं कोण घेतंय याची शंका आहे. आयोग कोणाच्या सांगण्यावरुन बोलतोय असा प्रश्न देखील निर्माण होत असल्याचे शरद पवार म्हणाले. यामागे कोणती तरी शक्ती आणि त्यांचं मार्गदर्शन असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, अशावेळी ज्या पक्षावर अन्याय झाला त्याच्या बाजूने जनता जाते. सध्या मी राज्यात फिरतोय, त्यातून जनता उद्धव ठाकरेंच्या बाजूने हे दिसतंय. याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसतील असेही शरद पवार म्हणाले. जे झालं ते चुकीचं झालं असल्याचे पवार म्हणाले.

निवडून आलेल्या 45 आमदारांनी लेटरहेडचा गैरवापर करत पक्षप्रमुखांना न विचारता गोगावलेंची नियुक्ती केली ती बेकायदेशीर- कपिल सिब्बल

0

पक्षातील आमदारांनी वेगळे होऊन स्वतंत्र ओळख निर्माण करणे, हा पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार; कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली- सुनावणीत दुसऱ्या दिवशीही ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे. अध्यक्षांचे अधिकार, अपात्रतेची कारवाई यावरून घमासान सुरू न्यायालयात सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले 39 आमदार हे विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहेत.  मात्र ते पक्ष हायजॅक करू शकत नाहीत. जर तुम्ही त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला तर तो सरकार पाडण्याचे नवीन मॉडेल असेल, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केला आहे.कपिल सिब्बल म्हणाले,  39 सदस्य विधीमंडळ पक्षाचे सदस्य आहेत. मुद्दा इतकाच आहे की, 39 सदस्य पक्षाला हायजॅक करू शकत नाहीत.  मी एवढेच म्हणू शकतो की जर तुम्ही त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ दिला तर ते सरकार पाडण्याचे नवीन मॉडेल असेल.  दुसरे म्हणजे कोणत्याही विधिमंडळात ‘एक्स’ संख्येचे लोक वेगळी ओळख निर्माण करतात आणि म्हणू शकतात की आम्ही पक्षाचे ऐकणार नाही?  महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की, एका पक्षातील काही आमदार वेगळे होऊन स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु शकतात का? जर करू शकत असतील तर हा तर पक्ष हायजॅक करण्याचा प्रकार झाला. 

निवडून आलेल्या 45 आमदारांनी लेटरहेडचा गैरवापर केला. पक्षप्रमुखांना न विचारता केलेली गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर आहे. निवडून आलेले आमदार पक्षप्रमुखांना विचारूनच निर्णय घेऊ शकतात. दुसऱ्या राज्यात बसून आमदारांनी निर्णय घेणे चुकीचे असल्याचे युक्तिवाद करताना कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.. सर्वोच्च न्यायालय पक्षाची रचना समजून घेत आहे. आज दिवसभर ठाकरे गट आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. ही सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज सुनावणीदरम्यान शिवसेनेचे ठराव मराठीतून वाचून दाखवले. घटनापीठातील इतर न्यायाधीशांनी शिवसेनेच्या ठरावाबाबत म्हटले की, आपले सरन्यायाधीश आहेत यामुळे मराठी भाषेत असलेले ठराव ते वाचू शकतील. यानंतर सीजेआय चंद्रचूड यांनी या ठरावांचे मराठीतून वाचन केले.

सीजेआय म्हणाले की, गुरुवार दि. 31 ऑक्टोबर 2019 रोजी शिवसेना भवन दादर मुंबई येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2019 मध्ये निवडून आलेल्या आमदारांनी या बैठकीच्या सुरुवातीलाच होणाऱ्या निर्णयांचे सर्वस्वी अधिकार अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले. याप्रमाणे बैठकीत विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आमदार श्री. एकनाथ संभाजी शिंदे व विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार श्री. सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली. या दोन्ही निवडींचे दोन ठराव पुढीलप्रमाणे आहेत. यानंतर सरन्यायाधीशांनी घटनापीठातील इतर न्यायाधीशांना याचे इंग्रजी भाषांतर समजावून सांगितले.

यावेळी कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंना या बैठकीच्या ठरावात बहाल केलेल्या अधिकारांचा उल्लेख केला. सरन्यायाधीशांनी म्हटले की, या शिवाय या ठरावांखाली सर्व नवनिर्वाचीत आमदारांची स्वाक्षरीही आहे.या सुनावणीदरम्यान कोर्टाने काही प्रश्नही उपस्थित केले. 2019ला ठाकरे आमदार नव्हते तरी त्यांना अधिकार कसे? पक्षाचे सर्व अधिकार एका व्यक्तीकडे असू शकतात का? असा सवाल सरन्यायाधीशांनी केला.

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणास १४ मार्चपर्यंत बंदी

0

मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅराहॅण्ड ग्लायडर्स, हॉट एअरच्या विनापरवाना उड्डाणाला १४ मार्च पर्यंत बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल ठाकूर यांनी जारी केले आहेत.

संभाव्य घातपात रोखण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात अशा घटकांच्या कारवाया रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि सक्रिय उपाययोजना करणे आवश्यक असल्याने बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १४ मार्च २०२३ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपआयुक्त(अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.

हा आदेश १४ मार्च २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती दंडास पात्र असेल.