पुणे-राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत असूनही ओबीसींच्या प्रश्नाकडे या मंडळींनी दुर्लक्ष केल्याने कसब्यातील ३६ टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे व्यक्त केला.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी वडेट्टीवार पुण्यात आले असता कॉंग्रेस भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी खात्याचा मंत्री म्हणून आपण ओबीसी बांधवांसाठी वर्ग तीन, वर्ग चारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, घरकुल, विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्वाधार योजना तसेच महाज्योती संस्था आदी कामांचा पायाभूत आराखडा निश्चित केला होता. मात्र असंविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या शिंदे व भाजप सरकारने अडथळा निर्माण करून ओबीसींना दूर ढकलल्याची भावना आता सर्वत्र पसरली आहे. असे ते म्हणाले. राज्यात मंत्रिमंडळ पूर्ण अस्तित्वात आले नसून केवळ आमदार पोसण्याचे काम सुरु आहे. या मंडळांना विकास व सामान्य माणूस दिसत नसून मने कलुषित करणे आणि जात व धर्मात भांडणे लावायची एवढाच उद्योग त्यांनी सुरु ठेवला असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले.भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याने भाजपच्या मंडळीनी बेताल वक्तव्ये सुरु केले असून सोशल मीडियात शिव्या खाण्याच्या प्रकारावरून ते किती अस्वस्थ झाले आहेत हे ध्यानात येते. चार वर्षे स्थायी अध्यक्ष राहिलेल्या उमेदवाराने शनिवारवाडा पाच मजली करण्याची भाषा करणे योग्यच म्हणावे लागेल. कारण मजले वाढविण्याचे काम त्यांच्या तोंडी सहज येते. ३५ वर्षे कसबा ताब्यात असताना मजले का वाढले नाहीत हे आता कसबेकर जनतेने ओळखले आहे. असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी , कॉंग्रेसचे निरीक्षक संजय राठोड आदी उपस्थित होते.