पुणे,दि.२२: कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात आली.
भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चविषयक तपासणी केली जात आहे. या तपासणीचा दुसरा टप्पा २० फेब्रुवारी रोजी पार पडला. उमेदवारांच्या निवडणूक प्रचार खर्चाच्या तपासणीचे निरीक्षण निवडणूक खर्च निरीक्षक मंझरुल हसन यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सहायक खर्च निरीक्षक म्हणून सुधीर पलांडे हे भूमिका बजावत आहेत. खर्चाच्या तपासणीकरिता खर्च तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला त्याच्या पथकप्रमुख लेखा अधिकारी नंदा हंडाळ आहेत. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण या कक्षाकडून करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी १५ फेब्रुवारी रोजी पार पडली आहे. तिसरी तपासणी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या विहित वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांनी दिली.
0000