पुणे-कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.प्रणिती शिंदे यांनी महात्मा फुले वाडा, समाताभूमी येथे वंदनकरून सकाळी प्रचार पदयात्रेस प्रारंभ केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस अध्यक्षा विद्या चव्हाण, प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे यांसह विक्रम खन्ना, हेमंत राजभोज, यासिर बागवे, गणेश नलावडे, सारिका पारेख, रत्ना नाईक, वनिता जगताप, सरिता काळे आदी नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
ही पदयात्रा बागवे कमान, महात्मा फुले वाडा, चांदतारा चौक, जोहरा कॉम्प्लेक्स मार्गे सुमित डांगी यांच्या दुकानापाशी समाप्त झाली. जोहरा कॉम्प्लेक्स आणि रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे प्रणिती शिंदे यांनी कोपरा सभा घेऊन नागरिकांशी संवाद साधला. रामकृष्ण हौसिंग सोसायटी येथे चर्मकार समाजाने धंगेकर यांना पाठींबा दिला. खडकमाळ आळी येथे लोधी समाजानेदेखील धंगेकर यांना पाठींबा दिला. याप्रसंगी प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मोदी सरकारने महागाई आणि बेकारी आणली, त्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली, कॉंग्रेसच्या नेत्या खा.सोनिया गांधी अन्नसुरक्षा कायदा आणला. प्रत्येक गरिबाला स्वस्त दरात पुरेसे धान्य देण्याची तरतूद केली. मोदी सरकारने मात्र हे सारे बदलले. त्यामुळेच आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मतदान करून धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली