शिक्षण, संशोधन व इनोव्हेशनचा अविष्कार
घडवणारी ‘एटीव्हीसी २०२३’ राष्ट्रीय स्पर्धा
- इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सच्या वतीने १ ते ५ मार्चदरम्यान तळेगाव दाभाडे येथे आयोजन
- नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी व ओरायझन इंडियाचा सहयोग
- देशभरातून १०० टीम, ३५०० स्पर्धकांचा सहभाग; केंद्रीय मंत्र्यांची राहणार उपस्थिती
पुणे : इन्फिलीग मोटर स्पोर्ट्सतर्फे सहाव्या ‘अरावल्ली टेरेन व्हेईकल चॅम्पियनशिप (एटीव्हीसी) २०२३’चे येत्या १ ते ५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन व इनोव्हेशन फेस्टिव्हल असलेली ही स्पर्धा तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे होत आहे. यामध्ये भारत सरकारच्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, गो ग्रीन व मेक इन इंडिया या उपक्रमांचे विविध अविष्कार पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती इन्फिलीग मोटरस्पोर्ट्सचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पवन तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. विलास देवतरे, इन्फिलीगचे सीएमओ चंद्रेश शर्मा, संचालक (विपणन) आदित्य संकलेचा, ओरायझन इंडियाच्या कार्यक्रम संचालक रीमा कुमारी आदी उपस्थित होते. यावेळी ‘एटीव्हीसी २०२३’च्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
पवन तिवारी म्हणाले, “या स्पर्धेत कार रेसिंग सह विद्यार्थ्यांनी बनवलेली नाविन्यपूर्ण कारची मॉडेल्स, एचआर समिट, भव्य जॉब फेअर आदी असणार आहे. देशभरातून २२ राज्यातील आयआयटी, एनआयटीसह विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०० पेक्षा जास्त संघ, १२० पेक्षा जास्त उद्योग कंपन्यांतून साडेतीन हजार पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. भारत सरकारच्या स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, गो ग्रीन व मेक इन इंडिया आदी उपक्रमांचे सादरीकरण या फेस्टिव्हलमधून होणार आहे.”
राजेश म्हस्के म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना वाव देणाऱ्या या स्पर्धेचे संयोजन करण्याची संधी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूटला मिळाली आहे. यामध्ये आमचे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत. अभियांत्रिकीच्या मुलांना अनुभवसंपन्न करणारी ही स्पर्धा असते. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, दि. १ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या पाच दिवसांच्या स्पर्धेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही कॅबिनेट मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्योग जगतातील अनेक मान्यवर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येणार आहेत.”
विजेत्यांना १० लाखाची बक्षिसे
‘एटीव्हीसी २०२३’मध्ये चार किलोमीटरचे तीन ट्रॅक बनविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गाडीची विविध १५ प्रकारच्या तांत्रिक तपासण्या झाल्यानंतर अंतिम फेरीत कार रेसिंगसाठी पात्र ठरतील. स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एकूण १० लाखाची रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे पवन तिवारी म्हणाले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘स्माईल’ आणि ‘फायर’
शालेय विद्यार्थ्यांना संशोधन व इनोव्हेशन याची गोडी लागावी यासाठी इन्फीलीग मोटर स्पोर्ट्स आणि ओरायझन एज्युकेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फ मोटिव्हेटेड इंटेलिजंट लर्निंग एन्व्हायरन्मेंट’ (स्माईल) आणि फायनान्स, इनोव्हेशन, रिसर्च अँड एंटरप्रेन्युअरशिप (फायर) हे दोन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याअंतर्गत २५ निमंत्रित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दोन तासांचे मोफत प्रशिक्षण सत्र आयोजिले आहे. यामध्ये इतर शाळांतील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात.
“ही स्पर्धा म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन, तंत्रज्ञान आणि संधी यांचे मिलन आहे. साहसी क्रीडा आणि तंत्रप्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा, शिक्षण व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या स्पर्धेला विशेष सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगती आणि संधी जाणून घेता येणार आहेत. स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, वुमेन एम्पॉवरमेंट, स्वच्छ भारत अभियान, स्टॅन्ड अप इंडिया, स्वयंरोजगार योजना, पंतप्रधान रोजगार निर्माण योजना याचे दर्शन या स्पर्धेतून घडणार आहे.”
- पवन तिवारी, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, इन्फीलीग मोटरस्पोर्ट्स