Home Blog Page 1356

सोमनाथ कुंभार आणि त्याच्या साथीदारावर मोक्का ची कारवाई

पुणे-संघटीत टोळी तयार करुन टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी खुन, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे जनमानसात दहशत पसरविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी सोमनाथ अशोक कुंभार (टोळी प्रमुख) व त्याचा एक साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे .मकोका अंतर्गत केलेली ही ९२ वी कारवाई आहे.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १६/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांचे वडील हे सोमनाथ कुंभार याचे घरी उसने दिलेले १०,०००/- रुपये मागण्यासाठी गेले असता, सोमनाथ कुंभार व त्याचा मित्र रोहित पाटेकर यांनी त्यांचेकडे उसने दिलेले १०,०००/- रुपये मागितल्याचे कारणावरुन, लोंखडी विळी, लाकडी दांडके, लोखंडी फुकणी इत्यादी हत्याराने फिर्यादी यांचे वडिलांच्या डोक्यावर, गळ्यावर व शरीराचे इतर भागावर वार करून, त्यांना गंभीर जखमी करून, जीवे ठार मारले. त्यानंतर सोमनाथ कुंभार याने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हातात लोखंडी फुकणी घेवुन फिर्यादी यांचे अंगावर धावुन आला म्हणुन फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. ५८६/२३, भादवि ३०२,५०४, ५०६ (२), ३५२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) सोमनाथ अशोक कुंभार, वय २८ वर्ष, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव-खुर्द, पुणे (टोळी प्रमुख) २) रोहित दिलीप पाटेकर, वय २० वर्षे, रा. गल्ली नं.०१, गणेश चौक, धनकवडी, पुणे (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आली असुन, ते सद्या येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे आहेत.
सदर नमुद आरोपी सोमनाथ अशोक कुंभार (टोळी प्रमुख) याने त्याचे सह अन्य सदस्यांसाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवुन स्वतःची संघटीत टोळी तयार करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले असुन त्यांनी टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व इतर फायदयासाठी खुन, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी, बेकायदेशिर हत्यार जवळ बाळगणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे जनमानसात दहशत पसरविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हे केलेले आहेत. यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने
व इतर फायदयासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन१९९९ चे कलम ३ (१) (i)(ii),३ (२) व ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेकामी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड यांनी मा.पो.उप-आयुक्त, परि-२, पुणे शहर, श्रीमती. स्मार्तना पाटील यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केलेला होता.
सदर प्रकरणाची छाननी करुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं.५८६/२३ भादविक ३०२ ५०४,५०६ (२),३५२,३४ या गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(i)(ii),३ (२)व ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री. नारायण शिरगांवकर हे करीत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि-२, पुणे शहर, श्रीमती. स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), श्री. विजय पुराणिक, श्री. गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, कुलदीप व्हटकर, सहा. पोलीस फौज चंद्रकांत माने, पोलीस अंमलदार, नरेंद्र महांगरे, विशाल वारुळे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून, शरीराविरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. .

प्रकाश आंबेडकरांना अटक करायला हवी; मनोज जरांगे आहेत कोण? त्यांना ओळखत नाही:नारायण राणे पहा नेमके काय म्हणाले

पुणे- 3 डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता असल्याचा दावा वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांना अटक करुन त्यांची चौकशी करायला हवी, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. दरम्यान लगेचच नंतर प्रकाश आंबेडकरांना अटक करावी असे तुमचे मत आहे काय ?असा प्रश्न राणेंना केला असता , मी कुठे म्हणालो क्राईम झाला असेल तर करावं… असेही ते म्हणाले . मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावर मनोज जरांगे आहेत कोण? मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय?, असेही नारायण राणेंनी सुनावले.

केंद्राच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी “विकसित भारत संकल्प यात्रा” राबवत आहे. आज पुण्यात ही यात्रा काढण्यात आली. त्यानिमित्त नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर नारायण राणेंनी आपली मते व्यक्त केली.

दंगलीचा आधार काय?

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर FIR दाखल करुन त्यांना अटक करायला हवी. दंगलीसारख्या महत्त्वाच्या घटनांबाबत कुणी माहिती लपवत असेल तर तो गुन्हा आहे. दंगलीचा आधार काय? हे त्यांनी सांगायला हवे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल पोलिसांनी घ्यायला पाहीजे. ते कोणत्या माहितीच्या आधारावर हे बोलत आहे, याचा तपास पोलिसांनी करायला हवा. राज्यात दंगल घडू नये, यासाठीची ही खबरदारी बाळगायला हवी.

प्रकाश आंबेडकर राजकीयदृष्ट्या संपलेले

पुढे प्रकाश आंबेडकरांवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या संपलेले लोक आता का बोलत आहेत, समजत नाही. त्यांनी घरात बसावे. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलिस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

मनोज जरांगेंचा अभ्यास काय?

मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर नारायण राणे म्हणाले, कोण आहेत मनोज जरांगे? मला माहिती नाही. मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय? घटनेच्या कुठल्या कलमाने आरक्षण देता येते, हे त्यांना सांगता येते का पाहा. मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक नेत्याची भूमिका ही वेगवेगळी आहे. कुणाचेही आरक्षण न काढता 52 टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा नेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका आहे. यासाठी मागास आयोगाला मराठा समाजाचा सर्व्हे करावा लागणार आहे.

ऋषभ शेट्टी, ‘कांतारा’साठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित

गोवा29 नोव्‍हेंबर 2023प्रतिष्ठित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते आणि लेखक ऋषभ शेट्टी यांना ‘कांतारा’ चित्रपटासाठीच्या अजोड कामगिरीसाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.रौप्य मयूर पदक, 15 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या पुरस्काराने शेट्टी यांना गौरवण्यात आले.

महोत्सवाच्या समारोप समारंभाच्या रोमांचक वातावरणात कांताराच्या प्रीक्वेल-कांतारा, चॅप्टर-1 च्या फर्स्ट लूक ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. रसिकांनी त्याचे मनापासून स्वागत केले. “अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर मिळालेले प्रेम आणि आदर पाहून मी कृतज्ञ आहे” अशा भावना व्यक्त करत  शेट्टी यांनी आभार मानले.

चित्रपटनिर्मिती मागचे तत्वज्ञान सांगताना शेट्टी म्हणाले, “आपल्या  चित्रपटांना स्वतः अभिव्यक्त होऊ देण्यावर  माझा विश्वास आहे.  जितके कमी बोलले जाईल तितके जास्त यश मिळेल”. ‘कांतारा’ कडे रसिकांचा ज्या प्रकारे ओढा राहीला त्यातून चित्रपटाप्रती त्यांची विनम्रता आणि समर्पण दिसून येते.

भारतीय सिनेमाच्या जागतिक विस्ताराचा संदर्भ देताना शेट्टी म्हणाले की, “भारतीय सिनेमा खरोखरच वैश्विक झाला आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या असाधारण आशयगर्भ कामाचा हा थेट परिणाम आहे”.

कन्नड सिनेमाच्या सार्वत्रिक पसंतीचा संदर्भ देत, भाषिक अडथळे पार करण्याची त्याची क्षमता शेट्टी यांनी अधोरेखित केली. या सर्वसमावेशकतेचा पुरावा म्हणून त्यांनी ‘कांतारा’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाचा उल्लेख केला.

“माझे चित्रपट हे आपल्याला व्यक्ती म्हणून बांधणाऱ्या कथा आणि भावनांचा विस्तार आहेत” असे शेट्टी म्हणाले.

शेट्टींच्या दिग्दर्शन कौशल्यावर मोहर उमटवत, स्वदेशी संस्कृतीत रुजलेल्या, सांस्कृतिक आणि सामाजिक सीमांच्या पलीकडे जाऊन आणि सर्वत्र प्रतिध्वनित होणाऱ्या कथा सांगण्याच्या त्यांच्या क्षमतेवर ज्यूरींनी शिक्कामोर्तब केले आहे. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संघर्षामध्ये  परिणामकारक  संदेश देत, कांतारा एका काल्पनिक खेड्यातील मानवता आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेते.

लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्या – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. २९ :- लातूर, धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्या व प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी संबधित विभागांनी प्राधान्य द्यावे. या कामासाठी निश्चित कालमर्यादा अखून त्या नुसार कार्यवाही करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांच्या समस्यांबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक संपन्न झाली. बैठकीस आमदार अभिमन्यू पवार व ज्ञानराज चौगुले, मदत व पुनर्वसन उप सचिव श्री. सत्यनारायण बजाज, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, वन विभागाचे अवर सचिव गणेश जाधव यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व लातूर आणि धराशीव जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांचे प्रतिनिधी उद्धव काळे, रविराज चव्हाण, वैभव पवार, फजल कादरी, बाळाजी पवार, सुरेश पवार, सुनील माने, युसूफ पठाण, जीवन मांडे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सन १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या या विनाशकारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही भूकंपग्रस्तांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न, समस्या सोडवण्यास जिल्हा प्रशासनाने व शासनाने अधिक गती देणे आवश्यक आहे. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना वाणिज्य वापरासाठी भूखंड वाटप करण्यापूर्वी प्रत्येक गावात किती भूखंड शिल्लक आहेत याची पडताळणी करून त्या बाबतचा प्रस्ताव संबधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर करावा.

तसेच आजही त्या भागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. जर त्याठिकाणी भूकंपाचा तीन स्केल पेक्षा मोठा धक्का असेल तर त्याभागातील लोकांना मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत NDRF च्या निकषांचा अभ्यास करून मदत दिली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अद्यापही जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी निश्चितच शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

मालकी हक्काने वाटप केलेल्या दुकानांच्या हस्तातरणांबबत ज्या पद्धतीने शासन निर्णय घेण्यात आला आहे त्याच पद्धतीने भूकंप बधितांच्या घरांच्या हस्तातरणांबाबत निर्णय घेण्याबाबत कार्यवाही व्हावी. भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसित वसाहतीमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांसाठीचा प्रस्ताव सादर करावा. गढीबाधित भूकंपग्रस्तांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाच्या पुनर्वसन विभागाने कार्यवाही करावी, ८ व्या व ९ व्या फेरीत घरे वाटप,घरे पुनर्बांधणी, पाणी पुरवठा योजना विद्युत पंपास स्वतंत्र रोहित्र बसवणे यांचा ही आवश्यक बाबींचा प्रस्ताव सादर करावा, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत सूचित केले.

भूकंप बाधित गावांमध्ये अद्यापि भूकंपामुळे काय परिणाम जाणवत आहेत याबाबतचा अभ्यास करून त्यावर काय उपाय योजना करता येतील याचा अहवाल सादर करावा. तसेच या गावातील महिलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत वेगळा उपक्रम सुरू करणे, भूकंपग्रस्तांच्या वसाहतीमध्ये सुविधांसाठी CSR फंडातून निधी मिळणे बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

इंद्रायणी नदी स्वच्छता अन्‌ संवर्धनाच्या जागृतीसाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’ : सचिन लांडगे

शनिवारी गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् आणि रविवारी ‘रिव्हर सायक्लोथॉन’

अविरत श्रमदान, सायकल मित्र पुणे, पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलीस आयुक्तालय यांचा रेकॉर्ड ब्रेक उपक्रम

पुणे (दि. २९ नोव्हेंबर २०२३) इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत ‘रिव्हर सायक्लोथॉन – २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे आपले ६ वे वर्ष आहे. ‘‘आपली इंद्रायणी नदी सर्वांनी प्रदूषित मुक्त करून स्वच्छ ठेवावी’’. या संकल्पनेवर भर दिला आहे. गतवर्षी या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला असून, प्रतिवर्षी मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता यावर्षी आपण ‘सायकलची सर्वात मोठी रांग’ हे (‘Longest line of bicycles (static)’) हे रेकॉर्ड, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे रेकॉर्ड शनिवारी, दि.२ डिसेंबर रोजी भोसरी गावजत्रा मैदान येथे सकाळी ६ वाजता करण्यात येईल आणि रिव्हर सायक्लोथॉन रॅली ही रविवार, दि.३ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता भोसरी गावजत्रा मैदान येथे होणार आहे अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी दिली.
बुधवारी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी रिव्हर सायक्लोथॉनचे मुख्य समन्वयक डॉ. निलेश लोंढे आणि सचिन लांडगे, अविरत श्रमदानचे दिगंबर जोशी, डॉ. आनंद पिसे, सचिन मरगज, सायकल मित्र पुणेचे बापू शिंदे, संतोष गाढवे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे बापू बांगर, वाहतूक विभागाचे साळुंखे, गिनीस वर्ल्ड रेकॉर्डस् चे भारतातील फॅसिलिटेटर मिलिंद वेर्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थातर्फे डब्ल्युटीई इन्फ्रा चे विवेक जोशी, आयआयबीचे ॲड. लोहारे, रोटरी क्लब ऑफ उद्योग नगरीचे प्रेसिडेंट विवेक येवले, लायन्स क्लब ऑफ भोजापुर गोल्डचे सदस्य उपस्थित होते.
डॉ. नितीन लोंढे यांनी सांगितले की, रविवारी रिव्हर सायक्लोथॉन तीन विभागात होणार आहे. पाच किलोमीटर, १५ किलोमीटर आणि २५ किलोमीटर असे हे विभाग आहेत. या रॅलीसाठी २५ हजारपेक्षा जास्त सायकलिस्ट येतील असा अंदाज आहे असे नियोजन करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस करणार सारथ्य…
रिव्हर सायक्लोथॉनचे यावर्षीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रॅलीचे सारथ्य पिंपरी चिंचवडच्या पोलीस विभागाकडून करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून लोकांनी रहदारीचे नियम काटेकोर पाळण्याचे आवाहनसुद्धा या रॅलीद्वारे करणार आहेत. प्रत्येक आठवड्याचा सोमवार हा ‘हॉर्न फ्री’ दिवस पाळून हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण नियंत्रणचा संदेश देता येईल. तसेच प्रत्येक आठवड्याचा बुधवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जावा यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयुक्तालय आणि पोलिस अधिकारी, कर्मचारी पुढाकार घेणार आहेत.
आयोजनात अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड नगरपालिका, पिंपरी चिंचवड पोलीस विभाग आणि इतर पर्यावरण प्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या दोन्ही कार्यक्रमांची माहिती व इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान याबद्दलची माहिती पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळा आणि हाउसिंग सोसायटी यांना भेट देऊन दिलेली आहे, असेही दिगंबर जोशी यांनी सांगितले.
या उपक्रमामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शेखर सिंह (आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ), विनय कुमार चौबे ( पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड) व आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

हौशी मेंडोलिन वादकांनी एकत्र येत भरवला मेंडोलिन महोत्सव

मेंडोलिन लव्हर्सच्या वतीने आयोजन :  ७ व्या मेंडोलिन महोत्सवात देशभरातून वादक सहभागी
पुणे : मेंडोलिन हे मूळचे इटलीतील वाद्य. भारतीय चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून हे वाद्य भारतीय संगीत रसिकांच्या मनात विशेष घर करुन आहे. परंतु मेंडोलिन वाद्य वाजविणारे वादक भारतामध्ये अतिशय कमी आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या अजून कमी होत आहे. या मेंडोलिन वाद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी  मेंडोलिन लव्हर्स च्या माध्यमातून हौशी वादकांनी एकत्र येत ७ व्या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन केले होते. 

कर्वे रस्त्यावरील प्रेसिडेंट हाॅटेल येथे या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पुण्यासह देशाच्या विविध भागातील ४० पेक्षा अधिक मेंडोलिन वादकांनी सहभाग घेतला. भारतीय सिनेस्ृष्टीतील ख्यातनाम मेंडोलिन वादक तापस राॅय यांनी उपस्थित मेंडोलिन वादकांना मार्गदर्शन केले. मेटाफर अलॉईज, कुबेरा मनी बेस फायनान्शिअल सर्विसेस यांचे सहकार्य महोत्सवाला मिळाले.

तापस राॅय म्हणाले, मेंडोलिन हे अतिशय सुंदर वाद्य आहे. चित्रपटांमध्ये अनेक गाजलेल्या गीतांमध्ये हे वाद्य वाजविले आहे. परंतु हे वाद्य वाजविणारे वादक कमी होत आहेत. अनेकांना मेंडोलिन हे वाद्य माहित नाही. त्यामुळे ज्यांना वाद्य वाजवता येते त्यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून आपले वादन लोकांपर्यंत पोहोचवावे. 
अनिल पेंडसे म्हणाले,  या महोत्सवासाठी देशभरातून मेंडोलीन प्रेमी दरवर्षी येतात. यावर्षी देशभरातून ४० हुन अधिक कलाकारांनी मेंडोलीन वाद्य वाजवून आपली अनोखी कला सादर केली.  मेंडोलिन हे वाद्य पूर्वीपासून आजपर्यंत हिंदी सिनेसंगीतात वापरत आहेत. लंडन ठुमकदा…दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा बाॅलिवूड गाण्यांवर उपस्थितांनी मेंडोलिन वादन केले. 

ग्रामपंचायत भागात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी – उपायुक्त रामदास जगताप

पुणे- गावाच्या सुनियोजित व शाश्वत विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपायुक्त रामदास जगताप यांनी केले.सुदवडी येथील नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थांनचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील होते.

यावेळी जगताप म्हणाले, प्रत्येक गावच्या सरपंचाने आपल्या भागात अनाधिकृत प्लॉटिंग होवू देवू नये तरच आपलं गाव अनाधिकृत बांधकाम मुक्त राहील. पीएमआरडीएने नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध  केला असून लवकरच हा आराखडा मंजूर होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.कोणीही यापुढे अनधिकृत बांधकाम करू नये आणि पीएमआरडीएने मंजूर केलेल्या मंजूर रेखांकानातील भूखंड गृह बांधणीसाठी नागरिकांनी खरेदी करावेत. यामुळे गावच्या विकासासाठी मोठे रस्ते, खुले क्षेत्र व पुरेशे सुविधा क्षेत्र उपलब्ध होईल. प्राधिकरणाबद्दल ग्रामस्थांच्या मनात खूप गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावे हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी आलो आहोत, असे देखील त्यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता शहरी विकासातील भागीदार व्हावे. 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्राचे सर्व शेतकरी एकत्र आले तर त्याच्या विकासाठी व नियोजानासाठी पीएमआरडीए संपूर्ण सहकार्य करेल असे देखील रामदास जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी सहा वर्ष राज्यातील शेतकर्यासाठी महत्वाचा असणारा सातबारा संगणीकृत करून ऑनलाईन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले म्हणून आज सर्वसामान्य लोकांना पंधरा रुपयात ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीत सातबारा मिळतो. यासाठी कृतज्ञता व्यक्त करीत संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी सरपंच आणि उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांना पुढील विकासासाठी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कैवल्यधाम योग संस्थेच्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती

पुणे, दि. २९: योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उत्कृष्टतेचे माध्यम म्हणून योग प्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेचा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या.

कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री तथा शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी, सचिव सुबोध तिवारी आदी उपस्थित होते.

स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलेल्या ‘कैवल्यधाम’च्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून आनंद झाला, असे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, भारताचे योग शिक्षण ही जागतिक समुदायासाठी आपली अमूल्य देणगी आहे. भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. योग प्रणाली ही आरोग्य आणि कल्याणासाठी सर्वांगीण दृष्टीकोन प्रदान करते आणि ती संपूर्ण जागतिक समुदायाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्पष्ट केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, योगाच्या अमूल्य ज्ञानाचा आपल्या मुलांना आणि आपल्या तरुण पिढीला फायदा व्हायला हवा या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलमध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.

आपल्या परंपरेत कैवल्य म्हणजेच मोक्ष हा सर्वोत्तम प्रयत्न मानला जातो. अर्थ, काम आणि धर्म या पायऱ्या पार करून माणसाला कैवल्य प्राप्त करायचे असते. व्यावहारिक ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान एकमेकांना पूरक असल्याचे इश उपनिषदात स्पष्ट केले आहे. समग्र शिक्षणामध्ये व्यावहारिक आणि आध्यात्मिक ज्ञानाची सांगड घातली जाते.

योगाची शिस्त कैवल्यप्राप्तीसाठी उपयुक्त आहे हे सत्य आपल्या ऋषीमुनींनी प्राचीन काळी विस्तृत संशोधन आणि चाचण्यांनंतर मांडले होते. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात योगविषयी महत्वपूर्ण संशोधन संकलित केले. विसाव्या शतकात स्वामी कुवलयानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींनी योगपद्धतीची वैज्ञानिकता आणि उपयोगिता नव्या ऊर्जेने मांडली. योग आणि आध्यात्मावर आधारित आधुनिक विज्ञानातील तत्वे त्यांनी जागतिक समुदायासमोर मांडली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर स्वामी कुवलयानंद यांच्या संपर्कात होते. स्वामीजींच्या मार्गदर्शनाचा देशातील महान व्यक्तिमत्त्व आणि सामान्य लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला. स्वामीजींची योग शिकवण त्यांच्या शिष्य परंपरेने पुढे नेली जात आहे असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

आपल्याला रायरंगपूर, ओडिशा येथील ‘श्री अरबिंदो इंटेग्रल एज्युकेशन सेंटर’ मध्ये शिकविण्याची आणि आज कैवल्यधामच्या शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होण्याची संधी मिळाली हे आनंददायी असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

स्वामी कुवलयानंद शाळांमध्ये योगशिक्षणाच्या प्रसाराला खूप महत्त्व देत असत. कैवल्यधाम संस्थान संचालित कैवल्य विद्या निकेतन नावाची शाळा इतर शाळांसमोर याबाबतचे उदाहरण ठेवण्यास प्रेरणा देईल, असेही त्या म्हणाल्या.

सुरेश प्रभू म्हणाले, लोणावळा या पुण्यभूमीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे राष्ट्रपती आले आहेत. योग ही एक विद्या आहे त्यामुळे त्याचा अभ्यास व्हावा. ते शास्त्र आणि कला असल्यामुळे त्याचे आकलन, तसेच संस्कृतीचा एक हिस्सा असल्यामुळे त्याचे जतन व्हावे. आस्था असल्यामुळे स्मरण व्हावे, आध्यात्म असल्यामुळे चिंतन व्हावे आणि स्वीकार व्हावा म्हणून विश्लेषणही झाले पाहिजे. या सर्व बाबी कैवल्याधम येथे एकच ठिकाणी मिळतात. कैवल्यधाम हे येणारी हजारो वर्षे विश्वाला ऊर्जा देणारे स्थान ठरेल, असेही श्री. प्रभू म्हणाले.

यावेळी संस्थेचे सचिव श्री. तिवारी यांनी स्वागत केले.

याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच कैवल्यधाम प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपती महोदयांनी कैवल्यधामचा इतिहास चित्ररूपाने मांडणाऱ्या गॅलरीला भेट देऊन पाहणी केली.

पुणे महापालिकेने उचलली रस्त्यावरील १३९ वाहने..पहा तुमची तर नाहीत ना …

पुणे- कित्येक दिवस, महिने अन वर्षानुवर्षे धूळ खात ,सार्वजनिक ठिकाणी दुर्लक्षित पडलेली १३९ वाहने पुणे महापालिकेने उचलून नेली आहेत . हि वाहने ७ दिवसांच्या आत दंड भरून संबधितांना परत मिळतील पण उशीर झाला तर ….

महापालिकेने या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’पुणे महानगरपालिका हद्दीत रस्ता, पथ इत्यादी ठिकाणी बंद व बेवारस वाहने, पडीक ना-दुरुस्त वाहने आढळ होत आहेत. सदर वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होण्याबरोबरच. सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत त्यामुळे सदर वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येत असून जप्त केलेली वाहने मा. मुख्य सभेच्या ठराव क्र. ५/२७० दि. १९/०५/२०१७ नुसार रिमुव्हल चार्जेस भरून संबंधित वाहन मालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येत असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिके मार्फत १३९ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. अशा बेवारस व ना-दुरुस्त वाहनांकरिता पुणे महानगरपालिकेच्या मार्फत ९६८९९३९९०० या व्हॉटसप नंबर वर फोटो व लोकेशनसह तक्रारी पाठविण्यात याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात झोपडीधारकांना मोठा दिलासा

0

मुंबई-

झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते .सध्या 1 लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते 50 हजार रुपये घेतले जाईल.

झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका या गरीब झोपडीधारकांना विनामुल्य दिलेल्या असतात.  त्याचे हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्कासमवेत १ लाख रुपये हस्तांतरण शुल्क आकारले जाते.  यामुळे सदनिका विकत घेणाऱ्याला आर्थिक भुर्दंड होतो.  मुंबईत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली होती.

खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 मधील कलम 28-1 अअ (3) अन्वये माजी पात्र खंडकऱ्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटादार वर्ग-1 करण्यासाठी, राज्यशासनाला शेती महामंडळाकडील गावाच्या गावठाण हद्दीपासुन 5 किलोमिटरच्या परिसरातील जमिनीबाबत  शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

तसेच या अधिनियमाच्या कलम 29 च्या पहिल्या परंतुकामध्ये शर्तभंगासाठी  जमिनीच्या चालु बाजारदर मुल्याच्या 50% ऐवजी 75% रक्कम विनिर्दिष्ट करणे, कलम 27 खाली वाटप केलेल्या सिलिंग जमिनीकरीता वाटपाच्या 10 वर्षानंतर शर्तभंग असल्यास नियमानुकुल केल्यानंतर व रुपांतरण अधिमुल्य भरल्यानंतर वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे, तसेच अधिनियमातील शास्तीबाबतचे कलम 40अ व्यपगत करणे यासाठी सुधारणा करण्यात येईल.

राहाता, कोपरगाव येथील शेती महामंडळाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील मौजे सावळीविहीर बु. व मौजे सावळीविहीर खु. आणि कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे येथील लक्ष्मीवाडी मळ्यातील शेती महामंडळाची 203.46 हे. आर जमीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याकरीता नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याकरीता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास विनामुल्य हस्तांतरीत करावी किंवा प्रचलित मुल्यानुसार संपुर्ण रक्कम आकारण्यात यावी याबाबत महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि मुख्य सचिव हे निर्णय घेतील. तसेच  या औद्योगिक क्षेत्रास ग्रूप ड प्लस औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत उद्योग विभागाने नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्ती वेतन

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित सेवानिवृत्ती वेतन व अन्य बाबी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सर्वोच्च न्यायालयाने 19 मे 2023 रोजी आदेश देऊन या न्याचिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यास सांगितले होते.  1 जानेवारी 2016 पासून वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित निवृत्ती वेतन लागू करण्यात येईल.  या अधिकाऱ्यांना थकबाकी देण्यासाठी 4 कोटी 10 लाख 63 हजार 926 तर मासिक खर्चापोटी 6 लाख 49 हजार 810 इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अधिकारांसोबत कर्तव्येही महत्वाची-माजी. न्या.अरुणा फरसवाणी

एमआयटी एडीटी विद्यापीठात संविधान दिन 
पुणेः ‘आपल्या भारतीय संविधानाने मिळवून दिलेल्या अधिकारांचा उपभोग घेत असताना, या अधिकारांसोबत काही कर्तव्येही येतात, ज्यांचे देशाच्या प्रत्येक नागरिकाने पालन करणे, अत्यंत महत्वाचे आहे. तसेच आपल्या अधिकारांचा उपभोग घेताना आपण देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि एकता यांस बाधा पोचणार नाही याची काळीज घेतली पाहिजे,’ असे मत कौटुंबिक न्यायालय, ठाणेच्या माजी प्रधान न्यायमूर्ती अरुणा फरसवाणी यांनी व्यक्त केले. 
त्या एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ लाॅ व स्कुल ऑफ भारतीय प्रशासकीय सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी, ‘स्कुल ऑफ लाॅ’ च्या अधिष्ठाता डाॅ.सपना देव, डाॅ.सुजित धर्मपात्रे आदी आदी उपस्थित होते. 
न्या. फरसवाणी यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना, त्यांच्या लिव्ह इन रिलेशनशिप, वाढलेल्या घटस्फोटांचे प्रमाण, सोशल मीडिया कायदे यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच, याप्रसंगी न्या. फरवाणी यांच्या हस्ते “घटनात्मक कायदा अभ्यास आणि संशोधन केंद्र” चे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कायद्याविषयीची कल्पकता वाढविणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 
विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलसचिव डाॅ. महेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व  लाॅ व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी ठरला. 

81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य : केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

0

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2023

केंद्र सरकार 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय ) अंतर्गत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान करणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे.हा एक ऐतिहासिक निर्णय असून या योजनेने  जगातील सर्वात मोठ्या सामाजिक कल्याण योजनांमध्ये स्थान मिळवले आहे. या योजनेचे उद्दिष्ट   81.35 कोटी लोकांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे असून  5 वर्षांसाठी खर्च अंदाजे  11.80 लाख कोटी रुपये  आहे.

लोकसंख्येच्या मूलभूत अन्न आणि पोषणविषयक  गरजा पूर्ण करून कार्यक्षम आणि लक्ष्यित कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृढ वचनबद्धता या निर्णयातून दिसून येते. अमृत काळात  या प्रमाणात अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वाकांक्षी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

दिनांक 1.1.2024 पासून 5 वर्षांसाठी पीएमजीकेएवाय  अंतर्गत मोफत अन्नधान्य (तांदूळ, गहू आणि भरड  धान्य ) अन्न सुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणींचे शमन करेल.   सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधल्या   5 लाखांहून अधिक रास्त भाव दुकानांच्या जाळ्याच्या माध्यमातून  मोफत अन्नधान्य वितरणात  ही योजना राष्ट्रव्यापी एकसमानता प्रदान करेल.

ओएनओआरसी-वन नेशन वन रेशन कार्ड(एक देश एक शिधा पत्रिका )- उपक्रमांतर्गत लाभार्थींना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची  परवानगी मिळेल आणि राहणीमान सुलभ होणे शक्य होईल. डिजिटल इंडिया अंतर्गत तंत्रज्ञान आधारित सुधारणांचा भाग म्हणून स्थलांतरीतांना राज्यांतर्गत आणि आंतरराज्य सुवाह्यता  पात्रता मिळवून देण्यात येणार असल्याने हा उपक्रम स्थलांतरितांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.  देशभरात एक देश एक शिधा पत्रिका अंतर्गत मोफत अन्नधान्य, सुवाह्यतेची समान अंमलबजावणी सुनिश्चित करेल आणि निवड आधारित मंच अधिक बळकट करेल.

पीएमजीकेएवाय अंतर्गत  अन्नधान्य वितरणासाठी पुढील पाच वर्षांकरिता अन्न अनुदान सुमारे 11.80 लाख कोटी रुपये असेल.  अशा प्रकारे  केंद्र  सरकार लक्ष्यित लोकसंख्येला मोफत अन्नधान्य पुरवण्यासाठी  पीएमजीकेएवाय  अंतर्गत अन्न अनुदान म्हणून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत अंदाजे 11.80 लाख कोटी रुपये खर्च करेल.

पीएमजीकेएवाय  अंतर्गत 1 जानेवारी 2024 पासून पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्याची तरतूद, राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता आणि दूरदृष्टी दर्शवते. मोफत अन्नधान्याच्या तरतुदीमुळे समाजातील बाधित वर्गाच्या कोणत्याही आर्थिक अडथळ्याचे  शाश्वत रीतीने शमन होईल  आणि लाभार्थ्यांना शून्य खर्चासह दीर्घकालीन किंमत धोरणाची हमी राहील.

लाभार्थ्यांचे कल्याण लक्षात घेऊन आणि लक्ष्यित लोकसंख्येसाठी अन्नधान्याची उपलब्धता, किफायतशीरता  आणि सुलभता या  दृष्टीने अन्न सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच  राज्यांमध्ये एकसमानता राखण्यासाठी, पीएमजीकेएवाय  अंतर्गत पाच वर्षांसाठी मोफतअन्नधान्य पुरवणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील अन्न आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्पित वृत्ती  आणि वचनबद्धता दर्शवणारा हा ऐतिहासिक निर्णय आहे.

चरित्राबरोबरच चारित्र्य निर्मितीवर भर द्यावा- स्वामी बोधमायानंद

पुणे,दि.२९ नोव्हेंबर: “भारतीय प्राचीन वारसा अद्भूत निर्मितीने परिपूर्ण आहे. त्याचे जतन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार करण्याची नितांत गरज आहे. प्राचीन भारतातील विज्ञान आधारित पद्धती आणि ज्ञानाच्या आधारावर आजच्या युवकांचे चारित्र्य निर्माण होईल. त्यासाठी शिक्षकांनी शाळेत चरित्र शिकवण्या बरोबरच  चारित्र्य निर्मितीवर अधिक भर  द्यावा.”असा सल्ला हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्यमून एक्सलन्सचे संचालक स्वामी बोधमायानंद यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच डॉ. अभिजित सोनावणे, असिम पाटील आणि डॉ. रोहिणी पटवर्धन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
स्वामी बोधमायानंद म्हणाले,” भारतीय ज्ञान प्रणाली ही प्राचीन काळापासून भारतात उच्च पातळीवर विकसित झालेली ज्ञानाची पद्धतशीर संस्था आहे. यामध्ये विविध समुदायांनी पिढ्यानपिढ्या विकसित केलेल्या परिष्कृत आणि जतन केलेल्या सर्व परंपरेचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीचे वेगळेपण रामायण, महाभारत, पुराण  आणि अनेक भारतीय तत्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ हे वैदिक कालखंडांपासून  विविध क्षेत्रातील भक्ती परंपरेत आहेत.  ज्ञान,  कर्म आणि भक्ती योग अत्यंत महत्वपूर्ण आहे.”
“शैक्षणिक स्तरावर सरकारी नीति बदलणे गरजेचे आहे. तसेच शिक्षकांना त्यांच्या विषयातील सखोल ज्ञान असावे. आज गुगल मोठ्या प्रमाणात माहिती देऊ शकतो परंतू गुरू होऊ शकत नाही. भारताचे पूर्ननिर्माण करण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाने शिक्षण देण्याची गरज आहे.”
तत्पूर्व सकाळच्या सत्रात डॉक्टर्स फॉर बेगर्स या पदवी परिचीत डॉ. अभिजित सोनावणे यांनी सांगितले की,”मार्कांपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. आपल्यातील गुण शोधून त्यावर आयुष्यभर कार्य करावे. व्यक्तीमत्व आणि कॅरेक्टर वर ते म्हणाले की जग तुमच्याकडे बघत असेल ते व्यक्तीमत्व आणि ज्या वेळेस तुमच्याकडे कोणीही बघत नसेल त्यावेळी आपण जे वागतो, बोलतो त्याला कॅरेक्टर असे म्हणू शकतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना ही वेगळी असते.  ज्याच्या घरी आई-वडील असतात तोच जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे. माणसाने यशस्वी होण्यापेक्षा समाधानी व्हावे. देव होण्यापेक्षा माणूस व्हावे आणि एखाद्याची वेदना ओळखून माणुसकीचा धर्म पाळावा.”
असिम पाटील यांनी सांगितले की आध्यात्माशिवाय जीवन जगणे व्यर्थ आहे. विठ्ठलाच्या नावाने सुरू होणाऱ्या माझ्या दिवसाचा शेवट हरीपाठाने होतो. त्यामुळे माझे जीवन सुखमय झाले. आजच्या काळात तंत्रज्ञानाबरोबर मानवता जोडली तर यश आपल्या पदरी नक्कीच पडेल. त्यानंतर डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धांच्या जीवनात येणाऱ्या  विविध समस्यांची उकल केली.
प्रा.डॉ.अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गणेश राधाकृष्ण यांनी आभार मानले.

150हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये घोटाळा:पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

भविष्यनिधी निरीक्षकाची तक्रार

पीएफमध्ये गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच मारुती नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून, पीएफची रक्कम स्वतःच्या फायद्या करिता वापरली असल्याचा आरोप करत मारुती नवले यांच्याविरोधात कोंढवा पोलिसांत भविष्यनिधी निरीक्षक यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्याविरोधात पुणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेतील 150हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.दाखल तक्रारीनुसार, मारुती नवले यांची कोंढव्यात सिंहगड सिटी स्कूल नावाची संस्था आहे. येथे दीडशेहून अधिक कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांच्या पगारातून 2019 ते 22 पर्यंत पीएफ भरण्यासाठी लाखो रुपये कपात करण्यात आले होते. मात्र, कपात रक्कम पीएफ खात्यांमध्ये न भरता मारुती नवले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी ती रक्कम वापरली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे पीएफ विभागाच्या भविष्यनिधी निरीक्षक यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारीनुसार, भविष्यनिधी कार्यालयाच्या पथकाने सिंहगड सिटी स्कूल शाळेला भेट देऊन 5 जुलै 2022 रोजी तपासणी केली होती. यावेळी शाळेतील लेखापाल यांच्याकडे भविष्य निधी संदर्भातील सर्व कागदपत्र मागवण्यात आले. ज्यात पगारशीट, बँके डिटेल्स, व्यावसायिक कर, बॅलेन्स शीट सह इतर कागदपत्रे शाळेकडून सादर करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. दरम्यान, पगारपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या नोंदीनुसार 115 ते 116 कर्मचारी यांचे ऑक्टोबर 2019 ते जून 2022 पर्यंत मासिक पगारातून भविष्य निर्वाह निधीचे 74 लाख 68 हजार 636 रुपये कपात करण्यात आले होते. परंतु, यापैकी 3 लाख 75 हजार 774 रुपये एवढीच रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. तसेच, 70 लाख 92 हजार 862 एवढी उर्वरित रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यातच आली नाही.

छेड काढणाऱ्याची तक्रार करायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार,दोघा भावांना अटक

पुणे- छेडकाढणाऱ्या तरुणाची त्याच्या मोठ्या भावाकडे तक्रार घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे.पीडित 15 वर्षीय तरुणी पुण्याच्या कोथरुड परिसरात राहते. ती शिकवणीला जात असताना तिच्या क्लासजवळ राहणारा एक तरुण तिची छेड काढत होता. त्यामुळे त्याची तक्रार करण्यासाठी ती त्याच्या मोठ्या भावाकडे गेली असता संबंधित तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आराेपी किशाेर परमेश्वर केदार (वय-23) व नकुल परमेश्वर केदार (21, दाेघे रा.काेथरुड,पुणे) या आराेपींना अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही दररोज क्लासला ये-जा करते. त्यावेळी क्लासच्या जवळ राहणारा नकुल केदार हा तरुण तिची वारंवार छेड काढून तिला त्रास देत हाेता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून संबंधित मुलगी त्याचा भाऊ किशाेर केदार याच्याकडे तक्रार करण्यास गेली होती. त्यावेळी आराेपीने तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच माझ्या भावाची तक्रार करते का? तुला राहायचे की नाही, अशी धमकी दिली. मी सांगेल तेव्हा माझ्याकडे यायचे, आली नाही तर तुझे काय करायचे ते बघताे, तुम्ही कुणीच माझे काही वाकडे करु शकत नाही, असेही आरोपीने पीडितेला धमकावले. याप्रकरणी पुढील तपास काेथरुड पाेलिस करत आहेत.