पुणे- 3 डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता असल्याचा दावा वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांना अटक करुन त्यांची चौकशी करायला हवी, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. दरम्यान लगेचच नंतर प्रकाश आंबेडकरांना अटक करावी असे तुमचे मत आहे काय ?असा प्रश्न राणेंना केला असता , मी कुठे म्हणालो क्राईम झाला असेल तर करावं… असेही ते म्हणाले . मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला 24 डिसेंबरचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावर मनोज जरांगे आहेत कोण? मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय?, असेही नारायण राणेंनी सुनावले.
केंद्राच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यासाठी भाजप देशव्यापी “विकसित भारत संकल्प यात्रा” राबवत आहे. आज पुण्यात ही यात्रा काढण्यात आली. त्यानिमित्त नारायण राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील विविध घडामोडींवर नारायण राणेंनी आपली मते व्यक्त केली.
दंगलीचा आधार काय?
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर FIR दाखल करुन त्यांना अटक करायला हवी. दंगलीसारख्या महत्त्वाच्या घटनांबाबत कुणी माहिती लपवत असेल तर तो गुन्हा आहे. दंगलीचा आधार काय? हे त्यांनी सांगायला हवे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल पोलिसांनी घ्यायला पाहीजे. ते कोणत्या माहितीच्या आधारावर हे बोलत आहे, याचा तपास पोलिसांनी करायला हवा. राज्यात दंगल घडू नये, यासाठीची ही खबरदारी बाळगायला हवी.
प्रकाश आंबेडकर राजकीयदृष्ट्या संपलेले
पुढे प्रकाश आंबेडकरांवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या संपलेले लोक आता का बोलत आहेत, समजत नाही. त्यांनी घरात बसावे. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलिस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
मनोज जरांगेंचा अभ्यास काय?
मनोज जरांगेंच्या अल्टीमेटमवर नारायण राणे म्हणाले, कोण आहेत मनोज जरांगे? मला माहिती नाही. मराठा आरक्षणावर त्यांचा अभ्यास काय? घटनेच्या कुठल्या कलमाने आरक्षण देता येते, हे त्यांना सांगता येते का पाहा. मराठा आरक्षणाबाबत प्रत्येक नेत्याची भूमिका ही वेगवेगळी आहे. कुणाचेही आरक्षण न काढता 52 टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा नेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आमची भूमिका आहे. यासाठी मागास आयोगाला मराठा समाजाचा सर्व्हे करावा लागणार आहे.