पुणे- छेडकाढणाऱ्या तरुणाची त्याच्या मोठ्या भावाकडे तक्रार घेऊन गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे.पीडित 15 वर्षीय तरुणी पुण्याच्या कोथरुड परिसरात राहते. ती शिकवणीला जात असताना तिच्या क्लासजवळ राहणारा एक तरुण तिची छेड काढत होता. त्यामुळे त्याची तक्रार करण्यासाठी ती त्याच्या मोठ्या भावाकडे गेली असता संबंधित तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आराेपी किशाेर परमेश्वर केदार (वय-23) व नकुल परमेश्वर केदार (21, दाेघे रा.काेथरुड,पुणे) या आराेपींना अटक केली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी ही दररोज क्लासला ये-जा करते. त्यावेळी क्लासच्या जवळ राहणारा नकुल केदार हा तरुण तिची वारंवार छेड काढून तिला त्रास देत हाेता. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून संबंधित मुलगी त्याचा भाऊ किशाेर केदार याच्याकडे तक्रार करण्यास गेली होती. त्यावेळी आराेपीने तिला जबरदस्तीने ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच माझ्या भावाची तक्रार करते का? तुला राहायचे की नाही, अशी धमकी दिली. मी सांगेल तेव्हा माझ्याकडे यायचे, आली नाही तर तुझे काय करायचे ते बघताे, तुम्ही कुणीच माझे काही वाकडे करु शकत नाही, असेही आरोपीने पीडितेला धमकावले. याप्रकरणी पुढील तपास काेथरुड पाेलिस करत आहेत.