मुंबई-मुख्यमंत्री असताना मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले, असे वक्तव्य काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले होते. यावरून आता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे.पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर आज विखे-पाटील म्हणाले, २०१४मध्ये सरकार घालवण्याचे काम पृथ्वीराज चव्हाणांनीच केले. काँग्रेसच्या वाताहातीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनीही टीका केली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता. पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही.
याशिवाय २०१४नंतर पुन्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आले असते तर मराठा आरक्षण टीकले असते, असाही दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर प्रथमच आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हाती घेतला होता. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, नंतर न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले व आमचे सरकार पडले. नंतर कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला. आम्ही कायदेशीर अभ्यास करुनच हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आमचे सरकार टीकले असते तर कोर्टात आम्ही आणखी चांगल्या रितीने बाजू मांडली असती व आरक्षण टीकले असते.पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले, सत्ता गेल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत चव्हाणांना शहाणपण सूचत आहे. पण, यात काहीही तथ्य नाही. तर, सुनील तटकरे म्हणाले, सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. हल्ली पृथ्वीराज चव्हाण विनोद का करत आहे, हे समजत नाही.