पुणे,दि.२९ नोव्हेंबर: “भारतीय प्राचीन वारसा अद्भूत निर्मितीने परिपूर्ण आहे. त्याचे जतन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार करण्याची नितांत गरज आहे. प्राचीन भारतातील विज्ञान आधारित पद्धती आणि ज्ञानाच्या आधारावर आजच्या युवकांचे चारित्र्य निर्माण होईल. त्यासाठी शिक्षकांनी शाळेत चरित्र शिकवण्या बरोबरच चारित्र्य निर्मितीवर अधिक भर द्यावा.”असा सल्ला हैदराबाद येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ ह्यमून एक्सलन्सचे संचालक स्वामी बोधमायानंद यांनी दिला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयावर बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच डॉ. अभिजित सोनावणे, असिम पाटील आणि डॉ. रोहिणी पटवर्धन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
स्वामी बोधमायानंद म्हणाले,” भारतीय ज्ञान प्रणाली ही प्राचीन काळापासून भारतात उच्च पातळीवर विकसित झालेली ज्ञानाची पद्धतशीर संस्था आहे. यामध्ये विविध समुदायांनी पिढ्यानपिढ्या विकसित केलेल्या परिष्कृत आणि जतन केलेल्या सर्व परंपरेचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीचे वेगळेपण रामायण, महाभारत, पुराण आणि अनेक भारतीय तत्वज्ञानाचे मूलभूत ग्रंथ हे वैदिक कालखंडांपासून विविध क्षेत्रातील भक्ती परंपरेत आहेत. ज्ञान, कर्म आणि भक्ती योग अत्यंत महत्वपूर्ण आहे.”
“शैक्षणिक स्तरावर सरकारी नीति बदलणे गरजेचे आहे. तसेच शिक्षकांना त्यांच्या विषयातील सखोल ज्ञान असावे. आज गुगल मोठ्या प्रमाणात माहिती देऊ शकतो परंतू गुरू होऊ शकत नाही. भारताचे पूर्ननिर्माण करण्यासाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयाने शिक्षण देण्याची गरज आहे.”
तत्पूर्व सकाळच्या सत्रात डॉक्टर्स फॉर बेगर्स या पदवी परिचीत डॉ. अभिजित सोनावणे यांनी सांगितले की,”मार्कांपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. आपल्यातील गुण शोधून त्यावर आयुष्यभर कार्य करावे. व्यक्तीमत्व आणि कॅरेक्टर वर ते म्हणाले की जग तुमच्याकडे बघत असेल ते व्यक्तीमत्व आणि ज्या वेळेस तुमच्याकडे कोणीही बघत नसेल त्यावेळी आपण जे वागतो, बोलतो त्याला कॅरेक्टर असे म्हणू शकतो. प्रत्येकाची सुखाची कल्पना ही वेगळी असते. ज्याच्या घरी आई-वडील असतात तोच जगातील सर्वात सुखी व्यक्ती आहे. माणसाने यशस्वी होण्यापेक्षा समाधानी व्हावे. देव होण्यापेक्षा माणूस व्हावे आणि एखाद्याची वेदना ओळखून माणुसकीचा धर्म पाळावा.”
असिम पाटील यांनी सांगितले की आध्यात्माशिवाय जीवन जगणे व्यर्थ आहे. विठ्ठलाच्या नावाने सुरू होणाऱ्या माझ्या दिवसाचा शेवट हरीपाठाने होतो. त्यामुळे माझे जीवन सुखमय झाले. आजच्या काळात तंत्रज्ञानाबरोबर मानवता जोडली तर यश आपल्या पदरी नक्कीच पडेल. त्यानंतर डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी वृद्धांच्या जीवनात येणाऱ्या विविध समस्यांची उकल केली.
प्रा.डॉ.अर्चना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गणेश राधाकृष्ण यांनी आभार मानले.