मेंडोलिन लव्हर्सच्या वतीने आयोजन : ७ व्या मेंडोलिन महोत्सवात देशभरातून वादक सहभागी
पुणे : मेंडोलिन हे मूळचे इटलीतील वाद्य. भारतीय चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून हे वाद्य भारतीय संगीत रसिकांच्या मनात विशेष घर करुन आहे. परंतु मेंडोलिन वाद्य वाजविणारे वादक भारतामध्ये अतिशय कमी आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या अजून कमी होत आहे. या मेंडोलिन वाद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मेंडोलिन लव्हर्स च्या माध्यमातून हौशी वादकांनी एकत्र येत ७ व्या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन केले होते.
कर्वे रस्त्यावरील प्रेसिडेंट हाॅटेल येथे या मेंडोलिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात पुण्यासह देशाच्या विविध भागातील ४० पेक्षा अधिक मेंडोलिन वादकांनी सहभाग घेतला. भारतीय सिनेस्ृष्टीतील ख्यातनाम मेंडोलिन वादक तापस राॅय यांनी उपस्थित मेंडोलिन वादकांना मार्गदर्शन केले. मेटाफर अलॉईज, कुबेरा मनी बेस फायनान्शिअल सर्विसेस यांचे सहकार्य महोत्सवाला मिळाले.
तापस राॅय म्हणाले, मेंडोलिन हे अतिशय सुंदर वाद्य आहे. चित्रपटांमध्ये अनेक गाजलेल्या गीतांमध्ये हे वाद्य वाजविले आहे. परंतु हे वाद्य वाजविणारे वादक कमी होत आहेत. अनेकांना मेंडोलिन हे वाद्य माहित नाही. त्यामुळे ज्यांना वाद्य वाजवता येते त्यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून आपले वादन लोकांपर्यंत पोहोचवावे.
अनिल पेंडसे म्हणाले, या महोत्सवासाठी देशभरातून मेंडोलीन प्रेमी दरवर्षी येतात. यावर्षी देशभरातून ४० हुन अधिक कलाकारांनी मेंडोलीन वाद्य वाजवून आपली अनोखी कला सादर केली. मेंडोलिन हे वाद्य पूर्वीपासून आजपर्यंत हिंदी सिनेसंगीतात वापरत आहेत. लंडन ठुमकदा…दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे अशा बाॅलिवूड गाण्यांवर उपस्थितांनी मेंडोलिन वादन केले.