Home Blog Page 1164

रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

रेल्वेच्या एकता मॉल प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 12 – नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज 85 हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’च्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, 2024 या वर्षात सुमारे 11 लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, जीवनवाहिनी ठरलेल्या रेल्वेच्या देशभर पसरलेल्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात जगातील सर्वात मोठा ऐतिहासिक बदल होत आहे. देशात दररोज 15 किमी.चे नवीन रेल्वे ट्रॅक तयार होत आहेत. रेल्वे गाडीप्रमाणेच देशाच्या विकासाची गाडी वेगाने धावत आहे. वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजना आणि एकता मॉलच्या माध्यमातून स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळत आहे. लातूर येथील कारखान्यात तयार होत असलेल्या वंदे भारत ट्रेनची राज्यातील संख्या सात वर पोहोचली असून राज्याच्या विकासात केंद्र सरकारचे मोठे साहाय्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. स्थानिकांना लाभ होणाऱ्या विविध योजना सुरु केल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

केंद्रीय मंत्री श्री.राणे यांनी जगाच्या प्रगतीत भारताचा मोठा वाटा असल्याचे सांगून 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मंत्री श्री.लोढा यांनी राज्यपाल श्री.बैस आणि मुख्यमंत्री श्री.शिंदे हे दोघेही सर्वसामान्यांच्या विकासाचा विचार करणारे कॉमन मॅन असल्याचा उल्लेख केला. रेल्वे ही सर्वसामान्यांसाठी अतिशय उपयुक्त सिद्ध होत असून रेल्वेमार्फत सुरू होत असलेल्या विविध उपक्रमांचा मुंबई आणि महाराष्ट्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकता मॉलविषयी…

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता, ‘मेक इन इंडिया’, जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) संकल्पनेला चालना देण्यासाठी  तसेच ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास मदत करण्यासाठी हा मॉल उपयुक्त ठरणार आहे. सिडकोला यासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमण्यात आले. नियोजन विभागाने उलवेमध्ये एकता मॉलसाठी भूखंड निश्चित केला आहे. हा भूखंड 5200 चौरस मीटर एवढा आहे. देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती देशभरातील 36 जिल्ह्यांमध्ये मॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे. अठरा महिन्यात या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

आज भूमिपूजन आणि लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये राज्यातील एकूण 506 प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये 150 वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स, 170 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम, 130 सौर पॅनेल, 18 नवीन रेल्वेमार्ग/ रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रुपांतरण, 12 गुड्स शेड, सात स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली, चार गती शक्ती कार्गो टर्मिनल, तीन विद्युतीकरण प्रकल्प, लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरूस्ती कार्यशाळा, पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपो, पाच जनऔषधी केंद्रांचे उद्घाटन, चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्घाटन आदींचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रास्ताविकाद्वारे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी अहमदाबाद-मुंबई मार्गावर सुरू होत असलेली वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस चालणार असल्याची माहिती दिली.

शासन आपल्या दारी उपक्रमाला कसबा मतदारसंघात उस्फुर्त प्रतिसाद

भाजपा निवडणूक प्रमुख श्री. हेमंत रासने यांच्या पुढाकारातून मिळाला हजारो नागरिकांना लाभ

पुणे- शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेकवेळा नागरिकांना संपूर्ण माहिती नसल्याने अडचणी येतात, हे लक्षात घेत आज भारतीय जनता पार्टी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभ मिळवून देण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करत लाभ मिळवून देण्यात आला. जवळपास ३२१४ नागरिकांना यामध्ये सहभाग नोंदवला.

कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात नागरिकांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, संजय गांधी निराधार योजना, आधारकार्ड दुरुस्ती, रेशनकार्ड, अन्न सुरक्षा योजना, महात्मा फुले आर्थिक विकास कर्ज योजना, अपंग कल्याणकारी योजना, आयुष्यमान भारत कार्ड, आवास योजना, विश्वकर्मा कर्ज योजना यांसारख्या विविध योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. पुणे शहर तहसीलदार श्री. सूर्यकांत येवले यांनी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली.

यावेळी बोलताना श्री. हेमंत रासने म्हणाले, “या उपक्रमाद्वारे नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल माहिती आणि लाभ मिळवून देणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांची चकरा मारव्या लागतात. परंतु आज आम्ही शासन आपल्या दारी या उपक्रमातून एकाच ठिकाणी नागरिकांना सर्व सरकारी योजना उपलब्ध करून दिल्या आणि या उपक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहत उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद”

यावेळी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, अर्चना पाटील, गायत्री खडके, योगेश समेळ, अजय खेडेकर, विजयालक्ष्मी हरिहर, आरती कोंढरे, मनिषा लडकत,उदय लेले, सुनिल खंडागळे, छगन बुलाखे, कसबा मतदारसंघाचे पालक संजय मामा देशमुख, कसबा मतदारसंघ सरचिटणीस अमित कंक, राजू परदेशी, प्रशांत सुर्वे, उमेश चव्हाण, वैशाली नाईक, प्रणव गंजीवाले, राणीताई कांबळे, चंद्रकांत पोटे, ओ बी सी आघाडी अध्यक्ष देवेंद्र वडके, कसबा मतदारसंघ महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार, कसबा मतदारसंघ युवा मोर्चा अध्यक्ष. निर्मल हरिहर तसेच कसबा मतदारसंघातील प्रभाग अध्यक्ष सुनिल रसाळ, भारत जाधव, सनी पवार, उमेश दुरंडे, अभिजित रजपूत, विजय गायकवाड तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सरचिटणीस अमित कंक व प्रभाग क्रमांक १६ चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स गुरुवारपासून

विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीपद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे आयोजनशिअरफोर्स २०२४
पुणे: विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पोर्ट्स लीगमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. वानवडी येथील एस.आर.पी. एफ. मैदानावर दिनांक १४ ते १७  मार्च दरम्यान या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सचिव जितेंद्र पितळीया,प्राचार्य प्रसन्न देसाई यांनी दिली.

 महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील शृंगेरी श्रोत्री, समीक्षा वणवे, श्रेयस वाघ, सनी गुंजाळ तसेच सानिका ठिगळे व यश नाईक या विद्यार्थ्यांनी संयोजनामधे योगदान दिलेले आहे.

बास्केटबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल या स्पर्धांमध्ये १८ ते २३ या वयोगटातील सुमारे ७०० मुला-मुलीं,१८० माजी विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये मुलांचे आणि मुलींचे एकूण ५० संघ सहभागी होतील.  स्पर्धेचे उद्घाटन १४ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गिर्यारोहक आणि मॅरेथॉन धावपटू  किशोर धनकुडे, एसआरपीएफ कमांडंट नम्रता पाटील  उपस्थित राहणार  आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १७ मार्च रोजी होणार आहे. 
विवेकानंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रस्ट या संस्थेचे चेअरमन ॲड. अभय छाजेड,विश्वस्त व सचिव जितेंद्र पितळीया हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून पी. व्ही .पी  वास्तुकला महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक अणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी या संपूर्ण कार्यक्रमात योगदान देत आहेत.

स्पर्धेमध्ये पुण्यातील १५ वास्तुकला महाविद्यालयातील संघाचा समावेश आहे. यामध्ये  मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एम.एम. सी. ओ. ए.) , डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील  स्कूल ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोहेगाव (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (बी. एन. सी. ए.), अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (ए. सी. ओ. ए.),  डाॅ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, अंबी (डी. वाय. पी. सी. ओ. ए.), ब्रिक स्कूल ऑफ  आर्किटेक्चर (बी. एस. ओ. ए.), आयोजन स्कूल ऑफ डीझाईन (ए. एस. ए. डी.) , भारती विद्यापीठ डीम्ड युनीव्हर्सिटी  कॉलेज ऑफ  आर्किटेक्चर (बी. व्ही. डी. यू.), सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (एस. सी. ओ. ए.),एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पिंपरी चिंचवड (एस.बी.पी. सी.ओ.ए.),मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ एन्विरॉन्मेंटल डिझाईन,डी.वाय.पी.सी.ई.टी. कोल्हापूर,श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर,पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पी. व्ही.पी. सी. ओ. ए.)आदी महाविद्यालये स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

आदिवासी देशाचे मूळ मालक:मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले, पण आदिवासींना कवडीही दिली नाही- राहुल गांधी

नंदुरबार-एकीकडे मोदी सरकारने या देशातील उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केले, पण आदिवासींना एक रुपयांचाही दिलासा दिला नाही, हे सरकार केवळ उद्योगपतींचा विचार करते, असा घणाघात गांधी यांनी मोदी सरकारवर केला.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाली. त्यानंतर त्यांनी आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातील टेंभली येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांचे स्थानिक आदिवासींनी स्वागत केले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले की, बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते पण आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो. देशाची पहिली ओळख असलेल्या आधारकार्ड सर्वात आधी आम्ही या नंदुरबारमध्येच का लागू केला. कारण आम्हाला संदेश द्यायचा होता की, आदिवासी हेच मुळ मालक आहेत. येथील जमीन, पाणी, जंगलावर तुमचा हक्क आहे. बीजेपी तुम्हाला वनवासी म्हणते आणि जंगल संपवण्याचे काम करते. जंगल, जमीन हे सर्व अदानी सारख्या करोडपतींना दिली जाईल आणि मग बीजेपी तुम्हाला म्हणेल की, तुम्ही वनवासी आहात, जंगल तर राहिलेच नाही. तुम्हाला रस्त्यावर आणण्याचे काम हे मोदी सरकार करत आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशातील 20 ते 25 करोडपती उसलेल्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये कर्ज माफ केले. पण आदिवासी बांधवांचा एक रुपयाही माफ केला नाही. महाविद्यालयीन युवा, महिलांचा विचार कधी झाला नाही. एक रुपयांची मदत देखील झाली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 16 लाख कोटी रुपये ही रक्कम किती मोठी आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या. 24 वर्षांला जेवढा मनरेगाला पैसा लागणार होता तेवढा पैसा या 20 ते 25 करोडपती लोकांचा पैसा माफ झाला आहे. यामध्ये अदानी, अंबानी यासारख्या लोकांचा यात समावेश आहे. यांच्याकडे एवढा पैसा आहे की, देशातील 70 कोटी लोकांकडे जेवढा पैसा आहे तेवढा पैसा या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडे आहे. उद्योगपतींसाठी हे सरकार सगळ करत आहे. पण आदिवासी, गरीबांसाठी काहीही करत नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी मीडिया, अदानी मीडिया यात कोणत्याही आदिवासींचा यात समावेश होत नाही. मुळात या ठिकाणी असलेल्या पत्रकारांची चूक नाही कारण हे पगारामुळे बांधिल आहे. मोठ मोठ्या अॅंकर व रिपोर्टरची लिस्ट जर तुम्ही काढली तर टीव्हीवर कधी आदिवासी रिपोर्टर पाहिला का, मीडियामध्ये तुमची शून्य टक्के भागीदारी आहे. जमीन, जल, जंगलाचा मुद्दा मीडियामध्ये दिसणार नाही. सोशल मीडियावर हे प्रश्न येतील पण माध्यमांवर येऊ शकत नाही, कारण हा मीडिया देखील बांधिल आहे. दुसरे म्हणजे देशातील सर्वात मोठ्या 200 कंपन्यांची लिस्ट काढा त्यात आदिवासी किती आहेत त्यात एकही आदिवासी दिसणार नाही. तुम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये देखील आदिवासींची भागीदारी नाही.

राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकार हे 90 लोक चालवतात. त्यात आदिवासी नेते किंवा प्रतिनिधी किती आहे. त्यात एक व्यक्ती आहे पण त्यालाही कोपऱ्यात ठेवलेले आहे. आदिवासींची जनसंख्या 8 टक्के आहे. तुमची भागिदारी 100 पैकी 8 पैसे. भारतात कुठेही जा, आदिवासींवर अन्याय होत आहे. मोठे मोठे प्रोजेक्ट येतात पण त्यात जमीन ही आदिवासींची जाते. गुजरातमध्ये 25 टक्के जमीन घेतली गेली. ती सर्व जमीन आदिवासींची आहे. पाणी, जमीन, जंगल हे सर्व आदिवासींचे जात आहे. मग देशात विकास कुठला होत आहे, असा सवाल देखील राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, पब्लिक स्कूल, प्रायव्हेट स्कूल, हॉस्पिटल यांची लिस्ट काढली त्यात कुठेही आदिवासी दिसत नाही. हे सर्व आम्हाला बदलायचे आहे. आदिवासी 8, दलित 15 तर मागासवर्गीय 50 टक्के आहे. पण या सर्वांवर अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व देशात जातनिहाय जनगणना करण्याची गरज आहे. जनगणना करण्याबरोबरच आर्थिक सर्वेक्षण करणे त्यात हिंदुस्थानच्या सरकारमध्ये, लोकशाही किती सहभाग आहे. जर 8 टक्के आदिवासींचा सहभाग नसेल तर ती झाली पाहिजे. त्यामुळे जनगणना व आर्थिक सर्वेक्षण हे आमचा अजेंडा आहे. आमचे सरकार आल्यावर आम्ही ते करून दाखवणार.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही देशाचा एक्स-रे करायचा आहे, एमआरआय करायचा आहे. यातून कोणाला किती त्रास झाला, कोणाला किती जखमा झाल्या याचा शोध घ्यायचा आहे. आदिवासींसाठी आम्ही पाच महत्त्वाच्या बाबी आमच्या बजेटमध्ये टाकल्या आहेत. गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेसने वनजमिनींच्या अधिकाराचा कायदा आणला होता. मात्र, भाजपने हा कायदा कमकुवत केला. आदिवासींचा जमिनीवरील दावा फेटाळण्यात आला.भाजपने आदिवासी समाजाला त्यांच्या जमिनींचा ताबा दिला नाही. देशात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही एका वर्षात आदिवासींना त्यांच्या जमिनी परत करु, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. जिथे आदिवासी समाजाची लोकसंख्या 50 टक्के आहे तिथे आम्ही संविधानातील शेड्यूल 6 ची अंमलबजावणी करु. जेणेकरुन आदिवासींना स्थानिक स्तरावरील निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

भारत ही श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण मूर्तींची खाण- ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर 

मंदिर कोष प्रकाशन च्यावतीने महाराष्ट्रातील तब्बल एक हजार गणपतींच्या ॥ सहस्र गणपती सहस्र कथा॥ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : भारतासह जगाच्या कानाकोप-यात गणपतीच्या विविध मूर्ती मोठया संख्येने पहायला मिळतात. मात्र, प्रत्येक मूर्तीमधील वैविध्य हे मूर्तीकलेचे वैशिष्टय आहे. भारत ही श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण मूर्तींची खाण आहे. मी अनेक ठिकाणी मूर्ती पाहिल्या आहेत. मात्र, कै. मोरेश्र्वर कुंटे व विजया कुंटे यांनी एम ५० दुचाकीवरुन प्रवास करीत मूर्तींची माहिती व फोटो संकलनाचे केलेले काम अभूतपूर्व आहे, असे मत ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी व्यक्त केले.

मंदिर कोष प्रकाशन च्यावतीने महाराष्ट्रातील तब्बल एक हजार गणपतींच्या ॥ सहस्र गणपती सहस्र कथा॥ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात झाले. पुस्तकाचे लेखक कै. मोरेश्र्वर कुंटे व विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील १८ हजार मंदिरे पाहिली असून फोटो काढून माहीती गोळा केली आहे. यावेळी पं. वसंतराव गाडगीळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, ज्ञानेश्वर रासने, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, आयोजक प्रभाकर कुंटे, प्रियांका कुंटे आदी उपस्थित होते.

डॉ.गो.बं.देगलूरकर म्हणाले, भारतात अनेक देवालये आहेत. दक्षिणेतील मंदिरांच्या वरच्या भागात देवी लक्ष्मीची मूर्ती आढळते, तर महाराष्ट्रात गणेशाची मूर्ती दिसून येते. महाराष्ट्रात गणेश पूजेचे महत्व मोठे आहे. श्री गणेश हे परमेश्वराचे सर्वव्यापी स्वरुप असून तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे गणेशाचे पूजन आपण सर्वप्रथम करतो. अगदी दोन भुजांपासून ते अष्टभुजांपर्यंत विविध प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती भारतात पहायला मिळत आहेत. त्याची माहिती या पुस्तकाद्वारे गणेशभक्तांना मिळणार आहे.

पं.वसंतराव गाडगीळ म्हणाले, प्रत्येकजण गणेशाची सेवा आपापल्यापरिने करीत असतो. मात्र, कुंटे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली आहे. त्यांनी सर्व प्रवास बजाज एम-५० वरून केला. त्याच्या या कामाचा उल्लेख लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला. मोरेश्र्वर कुंटे यांची आतापर्यंत जिल्हावार १६ पुस्तके, तसेच मंदिरा संबंधी विषयांची एकूण ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘ऑरा’मधून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, चौकटीबाहेरचा विचारांना प्रोत्साहन-शिल्पकार अभिजित धोंडफळे


पुणे : “कलाकाराच्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला, तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल आणि आपली मुल्ये समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे. सोबतच आपला सांस्कृतिक वारसा जपण्याला प्राधान्य द्यावे,” असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचलित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) आयोजित ‘ऑरा २०२४’ सजावट प्रदर्शनात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. प्रदर्शनाचे हे १८ वे वर्ष होते. यंदा ‘झरोका’ या संकल्पनेतून संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल दाखवण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून ही संकल्पना साकारण्यात आली.

या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. यामध्ये प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे, वास्तुविशारद महेश बांगड, फॅमिली इंटेरियरचे मितेश पतंगे, रवींद्र माळवदकर, ऍड. पांडुरंग थोरवे, प्रसन्न पाटील, सुभाष कांकरिया, राजकुमार सुराणा, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांनी प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी असलेल्या ‘पीआयएटी’ संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लास्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चितारल्या होत्या.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. पाठ्यक्रम शिकवण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वावलंबन, प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गेली २० वर्षे मुलांच्या पुढाकारातून व कल्पकतेतून हे प्रदर्शन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यातून मुलांच्या प्लेसमेंट्स होतात.”

अभिजित धोंडफळे म्हणाले, “कौशल्य विकास कार्यक्रमात अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना समाविष्ट करायला हवे. कल्पकतेला पैसे द्यावेत, ही भावना रुजायला हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असतानाच कमावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. ‘ऑरा’ सारख्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील कलात्मकतेला, चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते.”

महेश बांगड म्हणाले, “माणसाने सतत नवनवीन गोष्टी शिकाव्यात, आत्मसात कराव्यात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्या क्षेत्रात सखोल ज्ञान घेतले पाहिजे. आपले काम उत्तम आणि इतरांपेक्षा वेगळे करण्यावर भर द्यावा. कलाकृती चांगल्या असतील, तर लोकांचा प्रतिसाद तितकाच उदंड मिळतो.”

“हा अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक बाबी पक्क्या होण्यावर भर दिला पाहिजे. समाजाला नेमके काय हवे, याचा विचार करून आपल्याला नाविन्यपूर्ण, कल्पक रचना निर्माण करता याव्यात. प्रात्यक्षिक अनुभव घेण्याला प्राधान्य द्यावे. गटागटाने कंसल्टंसी सुरु करून त्यातून अर्थार्जन करता येऊ शकते, असे प्राचार्य अजित शिंदे म्हणाले.

प्रा. अजित शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका व प्रक्रिया सांगितली. आयुष पोकर्णा, दीपिका पटेल यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन पल्लवी पुरंदरे, अनिकेत नाईकरे, अमित जगदाळे, ऋतुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

‘स्वरसम्राज्ञी – अभिजात स्वरानुभूती’ कार्यक्रम गुरुवारी

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजन ; राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती ; विनामूल्य प्रवेश
पुणे : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल स्वरसम्राज्ञी – एक अभिजात स्वरानुभूती या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे पुण्यात अनुभविता येणार आहे. गुरुवार, दिनांक १४ मार्च रोजी कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमाला पुणेकरांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती क्लबच्या कल्चरल कमिटीच्या संचालिका अमृता देवगांवकर व सहसंचालिक स्नेहल भट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी होणा-या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोटरी क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, रोटरी क्लब ऑफ पुणे बावधन एलिट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे.

अमृता देवगांवकर म्हणाल्या, रसिकांसाठी ही संगीत मैफल विनामूल्य खुली असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. तसेच कार्यक्रमात विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या स्मित फाऊंडेशनला आर्थिक व वस्तुरुपी मदत देखील देण्यात येणार आहे. स्वरसम्राज्ञी या स्वरमैफलीत शीलू मेहता, स्वरदा गोडबोले, दीपक महाजन, केतन गोडबोले हे गायन करणार आहेत.

स्नेहल भट म्हणाल्या, कार्यक्रमात मुकेश देढिया, अभिजीत भदे, अमान सय्यद, विशाल गंड्रतवार, सचिन वाघमारे हे कलाकार वादनसाथ करणार आहेत. अमृता ठाकूरदेसाई यांचे संगीत संयोजन असून हेमंत उत्तेकर हे ध्वनी आणि विजय चेन्नूर हे प्रकाशयोजना करणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, गांधीभवन, टिळक रोड, फिनिक्स, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, विज्डम, सारसबाग या सदस्यांनी देखील सहभाग घेतला आहे.

हेराफेरी-एक्सार्बिया बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल-बांधकाम क्षेत्रात खळबळ

– हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : खोट्या कागदपत्रांच्या साह्याने मुळशीतील मुगावडे येथे प्लॉट विक्री करत एका ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एक्सार्बिया या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2010 ते आतापर्यंत घडला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक राहुल रसिकलाल नहार, कंपनीचे व्यवस्थापक साई केरकर आणखी एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणारे साबीर नजीर अहमद शेख या ग्राहकाने पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 (आयपीसी) च्या कलम 406 (विश्वास भंग), 420 (फसवणूक), 467 (दिशाभूल करणे), 468 (फसवण्याच्या उद्देशाने दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बनावट तयार करणे), 471 (तोतयेगिरी करणे) आणि 34 म्हणजेच संगनमत करून गुन्हा करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी एक्सार्बिया डेव्हलपर्स लिमिटेड (आधीचे नाव आयफल डेव्हलपर्स अँड रिएअल्ट्स लिमिटेड) याचे मालक राहुल नहार यांच्याकडून मुळशी तालुक्यातील मुगावडे गावातील ऑलम्पिया प्लॉटिंग स्कीम बाबत वर्तमानपत्रात जाहिरात पहिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. त्यावेळी तक्रारदार याना या स्कीमच्या मार्केटिंग व सेल्स टीमचे सुनील ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे यांनी त्यांना स्कीमविषयी माहिती दिली. यानंतर तक्रारदाराने नहार यांची भेट घेतली असता त्यांनी ही स्कीम कायदेशीर असल्याचे सांगितले.

सेल्स टीम व नहार यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने 7 हजार 635 चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले. यानंतर दि. 30/07/2010 रोजी खरेदी देणार एक्सर्बीया डेव्हलपर्सचे मालक राहुल नहार यांच्या मार्फत कुलमुखत्यार धारक म्हणुन योगेश नारायण निकम यांच्याकडुन या प्लॉटचे अँग्रीमेंट टु सेल सह दुय्यम निंबधक मुळशी क्र. 2 यांच्या कार्यालयात केले व त्याबदल्यात राहुल नहार यांना 26 लाख 52 हजार 300 रुपये वेळोवेळी रोख व चेक स्वरुपात तक्रारदाराने दिले. मात्र खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.

 तक्रारदार यांनी नहार याना खरेदीखत का करुन देत नाही असे वेळोवेळी विचारले असता त्यांनी कंपनीच्या नियमानुसार सुरुवातीला आम्ही अँग्रीमेंट टु सेल करुन घेतो व नंतर खरेदी खत करुन देतो असे सांगितले. या करारनाम्यानुसार नहार यांनी संबंधित प्लॉटचा ताबा दिला नाही, असे तक्रारीत म्हटलेले आहे.

तक्रारदार हे सन 2011 ते 2017 या कालवधी मध्ये व्यवयासनिमित्त परदेशात होते. ते परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी नहार यांना अँग्रीमेंट टु सेल करारनाम्याप्रमाणे खरेदीखत करुन देण्याची विनंती केली असता नहार ने खरेदीखत करुन देण्यास चाल ढकल करत वारंवार टाळाटाळ केली. परंतु शेख यांनी फारच आग्रह केल्यामुळे दि. 01/09/2021 रोजी सह दुय्यम निंबधक मुळशी क्र.2 यांचे कार्यालयात नहार यांच्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता किशोर पांडुरंग हिदगावकर तर्फे क.ज. साठी वि.कु.मु. अजिंक्य प्रमोद पंलगे यांचेकडुन अँग्रीमेंट टु सेल मध्ये नमुद केलेली जमिन मिळकत खरेदी केली.

 खरेदीखताप्रमाणे तक्रारदार यांनी मुळशीतील तहसिलदार कार्यालयात दप्तरी नोंद करण्यासाठी अर्ज केला असता या कार्यालयाने नहार यांनी तूकडेबंदीची रितसर परवानगी घेतली परंतू शासनाच्या मंजुरीसाठी लागणारी रक्कम अदा केली नसल्याने प्लॉटची नोंद नामंजूर केली. यानंतर तक्रारदाराने दि. 30/07/2010 रोजीचे अँग्रीमेंट टु सेल व त्यासोबत जोडलेले सातबारा, फेर फार, मंजुर नकाशा, ही कागदपत्रे व दि. 01/09/2021 रोजी केलेले खरेदीखत व त्यासोबत जोडलेले कागदपत्रे सातबारा, मंजुर नकाशा, एन ए ऑर्डर, इ. अँग्रीमेंट टु सेल कागदपत्रे पडताळून पाहिले असता सेल मध्ये त्यांना विकलेला प्लॉट क्र.36 होता व खरेदीखतामध्ये नमुद केलेला प्लॉट चा क्र. 36 (एन 1) असा आढळून आला. त्याबाबत त्यांनी नहार व कंपनीचे मॅनेजर साई केरकर यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी  दोन्ही प्लॉट एकच आहेत अशी खोटी माहिती दिली.

त्यानंतर तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या प्लॉट सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 50 लाख रुपयांना एका महिलेला विकणार होते. त्यामुळे त्या महिलेने शिवाजीनगर येथील बँक आयसीआयसीआय होम फायनान्स यांच्याकडे या मिळकतीचे कागदपत्रे कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी दिली असता बँकेने या प्लॉटवर कर्ज मंजुर करता येत नसल्याचे सांगितले. कारण प्लॉट बाबत अकृशक वापराची परवानगी जोडलेली आहे ती व्यवसाय वापरासाठी असून त्यामध्ये रहिवासी वापराची कोणतीही परवानगी घेतलेली नाही असे आढळून आले. त्यामुळे त्यांना मिळकत महिलेस विकता न आल्याने त्यांचे कधीही भरुन न निघणारे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच या खरेदीखतासोबत जोडलेला नकाशा खोटा असल्याचे आढळले. तसेच प्लॉट नं. 36 व 36 (एन 1) हे वेगवेगळे असुन सदर एक्सर्बिया डेव्हलपर्स लि.  नहार, सुनिल ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे व साई केरकर यांनी संगनमत करुन पध्दतशिरपणे खोटी व दिशाभूल केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

आर्थिक देवाणघेवाण करताना काळजी घ्यायला हवीऍड. जयश्री नांगरे यांचा सल्ला;सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे : “इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत माणूस आज पूर्णतः सायबर विश्वावर अवलंबून आहे. पारंपारिक युद्धापेक्षा आज शत्रुराष्ट्र आणि गुन्हेगार सायबर हल्ल्याचा अधिक वापर करत आहेत. त्यामुळे देश खऱ्या अर्थाने सुरक्षित राहण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्ती सायबर साक्षर व सुशिक्षित असणे गरजेचे आहे, असे मत सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या वतीने सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या परिषदेवेळी ‘इंटरनेट विश्व, सायबर हल्ला आणि सायबर सुरक्षा’ यावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.
प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार ऍड. जयश्री नांगरे, चंदन चौरसिया, डॉ. नवीन चौधरी, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, सायबर कायदा अभ्यासक ऍड. राजस पिंगळे, नाझमीन अन्सारी, आर. के. पिल्लई, पिंपरी-चिंचवड सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपायुक्त सागर पानमंद, ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अनिल सावळे, ‘सूर्यदत्त’च्या अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मनीषा कुंभार आदी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, “वेबसाईट हॅकिंग हा प्रकार आता जुना झाला आहे. आज कोणताही सोशल मीडिया पूर्णतः सुरक्षित नाही. त्यामुळे या विश्वामध्ये सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम काळजी घेणे आणि स्वतःवरच काही बंधने घालून घेणे गरजेचे आहे. या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. सायबर सुरक्षा सल्लागार म्हणून आज अनेक विद्यार्थी आपले करिअर घडवत आहेत. शिक्षण संस्थांनी ‘सूर्यदत्त’प्रमाणे सायबर सुरक्षेवरील अभ्यासक्रमांची निर्मिती केली पाहिजे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सर्वांसाठी इंटरनेट सुविधा हे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. आज जेव्हा प्रत्येकजण इंटरनेट विश्वाशी जोडला गेलेला आहे, त्यावेळी देशातील प्रत्येक जण हा सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. याची जाणीव असल्यामुळे ‘सूर्यदत्त’ने देशात प्रथमच सायबर सुरक्षा आधारित अभ्यासक्रमांची आखणी केली आहे. बीएससी इन सायबर सिक्युरिटी या विषयावर पदवी देणारी ‘सूर्यदत्त’ देशातील पहिली संस्था आहे.”
ऍड. राजस पिंगळे म्हणाले, “आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इंटरनेट वापर सहज झाला असला, तरी त्यामुळे धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशिक्षित नागरिकही सायबर हल्ल्याला बळी पडत आहेत त्यामुळे सायबर सुरक्षेच्या संदर्भात अधिक जनजागृती करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या ‘सायबर फॉर ऑल’ या उद्दिष्टामध्ये सहभागी होण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.”
अक्षय मांडले म्हणाले, “आज सर्वसामान्यांना सायबर हल्ल्यामुळे निर्माण झालेली नुकसान भरपाई देण्यासाठी केवळ माहिती आणि तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याची माहितीही अनेकांना नाही. त्यामुळे एकदा ऑनलाइन फसवणूक झाली, तर काय करायचे याची देशातील बहुतांश लोकांना नाही. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत इतर कायदे बळकट करणे गरजेचे असून त्याचा लाभ सर्वसामान्यांना कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
आर. के. पिल्लई म्हणाले, “भविष्यात सायबर विश्वामध्ये कशाप्रकारे माणसावर हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे माणूस मुळापासून उध्वस्त होऊ शकतो याची पूर्णतः जाणीव असल्यामुळेच सूर्यदत्त इन्स्टिट्यूटने या अभ्यासक्रमाला महत्त्व दिले आहे. आज ज्या ठिकाणी संगणक आणि इंटरनेटचा वापर होतो, तेथे आपण सायबर हल्ल्याला बळी पडू शकतो. प्रत्येक व्यक्तीने सायबर सुरक्षेसंदर्भात जागरूक असावे.”
डॉ. नवीन चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांना सायबर साक्षर व सुरक्षारक्षक बनविणे ही शिक्षण संस्थांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पारंपारिक विषयांचे ज्ञान दिले जाते, त्याचप्रमाणे त्यांना सायबर विश्वामध्ये वावरताना आपण कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतो आणि त्यासाठी कोणते शिक्षण घेतले पाहिजे याची माहिती देणे गरजेचे आहे.”
सागर पानमंद म्हणाले, “सोशल मीडियाच्या जगामध्ये लाईक्स आणि फॉलोवर्स मिळवण्याच्या हव्यासापोटी इतरांची बदनामी केली जाते. त्यामध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. अशाप्रकारे सोशल मीडियाचा गैरवापर केल्यामुळे अनेक सायबर झाले आहेत. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोशल मीडियाचा योग्य व गरजेपुरता वापर केला पाहिजे.”
ऍड. जयश्री नांगरे म्हणाल्या, “आज मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण डिजिटल स्वरूपामध्ये वाढत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना डिजिटल गुन्हेगारी करण्यासाठी मोठ्या संधी मिळतात. आर्थिक देवाणघेवाणीमुळे प्रत्येकजण सायबर विश्वाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, याची जाणीव सर्वसामान्यांना असणे गरजेचे आहे. ज्येष्ठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजगृती वाढवायला हवी.”
चंदन चौरसिया म्हणाले, “अनेकांच्या घर किंवा गृहनिर्माण संस्थांना सिक्युरिटी गार्डच्या स्वरूपात पारंपारिक सुरक्षा मिळालेली असते, परंतु असे असतानाही आपण प्रत्यक्ष खरेच सुरक्षित आहोत का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपण जोपर्यंत सायबर सुरक्षेसंदर्भात जागरूक होत नाही, तोपर्यंत आपण आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या असुरक्षित  आहोत.”
अनिल सावळे म्हणाले, “सायबर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. माध्यमे सातत्याने सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्याचे काम करतात. मात्र, वापरकर्त्यांनी सायबर सुरक्षेचे ज्ञान घ्यायला हवे. आर्थिक व्यवहार करताना किंवा सामाजिक माध्यमांवर व्यक्त होताना, आपली माहिती देताना आपण योग्य ती काळजी घेणे महत्वपूर्ण आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर साक्षरता हाच एकमेव उपाय आहे.”
डॉ. डीकोस्टा यांनी विद्यार्थ्यांना ‘सायबर सीक्यूरीटीतील विविध करिअरच्या संधीबाबत माहिती दिली. येणा-या काळात या क्षेत्रात मोठ्या मनुष्य बळाची गरज आसल्याचे त्यांनी नमूद केले. सायबर स्टॉकिंग, सायबर कॉन्ट्राबँड, सायबर ट्रेस पासिंग, सायबर लॉन्ड्रिंग, सायबर वाँडलीसम, सायबर डीफेमेशन, सायबर टेरररिसम, सायबर पोर्नोग्राफी आणि सायबर फ्रॉड अशा सायबर गुन्हेगारीच्या प्रकारांबद्दल त्यांनी माहिती दिली.
सायबर सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. दीपक शिकारपूर, ऍड. राजस पिंगळे, डॉ. हॅरोल्ड डिकॉस्टा, चंदन चौरसिया, नवीनकुमार चौधरी, आर. के. पिल्लई, जयश्री नांगरे, नाझमीन अन्सारी, सागर पानमंद, अनिल सावळे यांना ‘सूर्यदत्त सायबर टेक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, डॉ. आरिफ शेख, प्रा. डॉ. मनीषा कुंभार यांनी परिषदेतील विविध परिसंवादांचे निवेदन केले. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.

राशी खन्नाच्या आयुष्यातील खरा ” योद्धा “’ कोण ?

 युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना तिच्या अलीकडील चित्रपट योद्धा च्या रिलीजसाठी तयारी करत असून ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान बहुमुखी अभिनेत्रीला तिच्या वास्तविक जीवनातील योद्धा कोण. या बद्दल विचारण्यात आले आणि याला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ हे माझे योद्धा आहेत. मला वाटते की मी जे काही मिळवले आहे, आज मी जिथे आहे, ते सर्व माझ्या आई-वडील आणि भावाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. माझ्या भावाने मला स्वत:बद्दल फारसा विश्वास नसतानाही मला प्रोत्साहन देऊन काम करण्याची प्रेरणा दिली आणि म्हणून मी आज इथपर्यंत आहे “
 ‘फर्जी’ नंतर लोकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा खूप आहेत. “लोकांनी मला एक अभिनेत्री म्हणून पाहिलं पण ‘फर्जी’नंतर मला एक कलाकार म्हणून मान मिळाला. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पुन्हा एकदा मी या चित्रपटात दिसणार असून मला या बद्दल उत्सुकता आहे असं राशी म्हणते.

 दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेली राशी आता योद्धा चित्रपटातून बॉलीवूड जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे ज्यामध्ये ती एका सरकारी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, धर्मा प्रॉडक्शन समर्थित, 15 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा-स्टार, राशी ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ मध्ये दिसणार आहे, ज्यात विक्रांत मॅसी आहे. तिच्याकडे तमिळ चित्रपट ‘अरनमानई 4’ आणि तेलुगू चित्रपट ‘तेलुसू काडा’ देखील आहे.

ठाणे कारागृह:बंद्यांकरिता ,स्मार्ट कार्ड दुरध्वनी सुविधा, वॉशिंग मशिन,दुरदर्शन संच ,ई मुलाखत युनिट, आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड योजना सुरु

ठाणे-कारागृहात दाखल बंद्यांना कारागृहातील नियमानुसार त्यांच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद होण्याकरीता मुलाखत, कॉईन बॉक्स, व्हिडीओ कॉन्फरन्स,गळाभेट इत्यादी सुविधा पुरविण्यात येत होत्या परंतू कारागृहात क्षमतेपेक्षा सरसरी पेक्षा जास्त बंदी दाखल असल्याने प्रचलित सुविधा देण्यात मर्यादा येत होत्या तसेच काळानुरुप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कारागृहातील सर्वांना बंद्यांना त्याच्या कुटुंबियांशी/वकीलाशी संवाद साधण्याकरीता यामध्ये सुधारणा होणे आवश्यक होते.याचा सर्वकक्ष बाबींचा आढावा घेऊन कारागृहमहानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृहातील बंद्यांकरीता तमिळनाडू कारागृहाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व कारागृहात दाखल बंद्यांकरीता तमिळनाडू स्थित ॲलन ग्रुप,कंपणीच्या सहाय्याने बंद्यांकरीता स्मार्टकार्ड सुविधा सुरु केली आहे.

दि.12.03.2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये बंद्याकरीता स्मार्टकार्ड दुरध्वनी सुविधा,वॉशिंग मशिन, दुरदर्शन संच,ई मुलाखत युनिट इत्यादीचे उदघाटन व आयुष्यमान भारत कार्ड, श्रमीक कार्ड चे वितरण निवृत्त पोलीस महासंचालक, भारताचे सौदी अरेबियातील माजी राजदूतअहमद जावेद यांचे हस्ते व अमिताभ गुप्तायांचे प्रमुख उपस्थितीत पार पडलेले आहे. सदर उद्घाटन कार्यक्रमाकरिता ,कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई व अधीक्षक,ठाणे मध्यवर्ती कारागृह राणी भोसले,आणि इतर अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.

ठाणे मध्यवर्ती कारागृहात सध्यसिथतीत सरासरी 4200 पुरुष बंदी व 133 महिला बंदी दाखल असून सर्व विभागातील बॅरेक च्या बाहेरील बाजूस ॲलन ग्रुप,कंपणी द्वारे 20 नग स्मार्टकार्ड दुरध्वनी संच बसविण्यात येऊन फोन सुविधे करीता आवश्यक स्मार्ट कार्ड पुरविण्यात आलेले आहे. स्मार्टकार्ड मध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचे एकूण 03 फोन क्रमांक जतन केलेले असतील त्या मोबाईल क्रमांकावरच बंदी स्मार्टकार्डद्वारे कॉल करु शकनार आहेत.  स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या बंद्यांच्या फोन नंबरची पडताळणी झालेली आहे,अशा सर्व बंद्यांना आठवडयातून तीनवेळा प्रत्येकी 06 मिनीटे देण्यात येणार असून सदर फोन सुविधेकरीता बंद्यांना प्रति मिनीट 01 रुपये प्रमाणे शुल्क ठेवण्यात आलेले आहे.स्मार्टफोन सुविधेमुळे बंद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी व वकीलाशी संवाद साधण्यात सुलभता येऊन बंद्यांना निश्चित फायदा होणार आहे.त्याच प्रमाणे कारागृहातील बंद्यांना कपडे स्वच्छेकरीता मुख्यालयाकडुन बंद्यांचे स्वत:चे वापराचे कपडे धुण्यासाठी 05 नग वॉशिंग मशीन व कपडे सुकविण्याकरीता 05 ड्रायर मशीन  पुरविण्यात आलेले आहेत. कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांचे मनोरंजनोकरीता टि.व्ही. सुविधेमध्ये दुरदर्शन चॅनेलशिवाय 4 वेगवेगळे स्पोर्ट चॅनेल  तसेच मराठी /हिंदी /इंग्रजी बातम्यांचे प्रत्येकी चार चॅनेल तसेच ॲनिमल प्लॅनेट  इ. चॅनेल सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे.त्यानुसार ठाणे मध्यवर्ती कारागृहास,मुख्यालयाकडुन 75 इंची 03 नग , 50 इंच -15 नग, 43 इंची 10 नग टि.व्ही. व 55 इंची टि.व्ही. 10 नग इ. अशा एकूण 38 नग दुरदर्शन संच पुरवठा करण्यात आलेला आहे. ज्या बंद्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष भेटी करीता येऊ शकत नाही अशा बंद्यां करीता ई मुलाखत सुविधा सुरु करण्यात आलेली आहे, ई मुलाखत करीता 10 व्ही.सी.संच कार्यान्वयित करण्यात आलेले आहेत.सदर सुविधेमार्फत बंद्यांना नातेवाईक भेटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

भारत सरकारची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कारागृहातील पात्र बंद्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत रुपये 05 लक्ष पर्यंत वैद्यकीय उपचार कवच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.सदर योजनेअंर्गत लाभार्थी बंद्यांना आयुष्मान भारत कार्ड चे वाटप करण्यात आले.

कामगार मंत्रालयांतर्गत श्रमिक कार्ड नोंदणी अंतर्गत कारागृहातील बंद्यांची नोंदणी करुन बंद्यांना कामगार मंत्रालयांतर्गत दोन लक्ष रुपयांचा अपघात विमाचा लाभ देण्यात येत आहे.या अतर्गत बंद्यांची नोंदणी करुन  ई श्रम कार्डचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

नियोजित साधू वासवानी पुलाच्या आराखड्यात बदल करा :माजी आमदार मोहन जोशी

पुणे – कोरेगाव पार्क येथे नियोजित साधू वासवानी पुलाच्या आराखड्यात रहदारी नियोजनाच्या दृष्टीने बदल करावेत, अशी मागणी माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपमुख्य मंत्री अजितदादा पवार याच्याकडे काल (रविवारी) निवेदनाद्वारे केली आहे.

कोरेगाव पार्क येथील रेल्वे रूळावरून जाणारा ५० वर्षापूर्वी बांधलेला साधू वासवानी पूल नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. नवीन पुलाचा प्रस्ताव बनविताना सद्य परिस्थिती आणि भविष्यातील वाहनांची रहदारी याचा विचार कुठेही दिसत नाही. यांकरिता आराखड्यातील बदलासाठी काही पर्याय सुचवित आहे, त्याचा विचार व्हावा, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रस्तावित पुलाची लांबी (६४० मिटर) वाढवून बार्टी कार्यालय ते बर्निंग घाट चौकापर्यंत दुहेरी उड्डाणपूल बनवावा, प्रस्तावित पुलाची लांबी वाढविणे शक्य नसेल तर मंगलदास रोडकडून येणारा चौक आणि कोरेगाव पार्ककडे जाणारा चौक या दोन चौकांना टाळून जाणारा अंडरपास रोड येरवड्याच्या दिशेने बनविण्यात यावा.

मंगलदास रोडकडून येणारा चौक आणि कोरेगाव पार्ककडे जाणारा चौक या दोन चौकात सध्या रहदारीची समस्या उदभवत आहे. ती सोडविण्यासाठी, आगामी काळाचा विचार करून सुचविलेले पर्यायी बदल उपयोगी ठरतील, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

पीएमपीएल च्या बस गाड्यांच्या ताफ्यात नवीन बस गाड्या घ्याव्यात:माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने २००० नवीन बस गाड्यांची भर घालावी, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांना काल (रविवारी) दिले.

सद्यस्थितीत पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या २,०२८ इतकी आहे. त्यातही ३०० ते ४०० बस गाड्या ऐनवेळी बिघडतात किंवा दुरूस्तीसाठी आगारात असतात. साधारणतः १,६०० बस गाड्याच उपलब्ध असतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासचा परिसर मिळून १कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढतेच आहे. हे लक्षात घेऊन पीएमपीएमएलच्या ताफ्यात कमीतकमी २००० नवीन बस गाड्यांची भर घालणे आवश्यक आहे, याकरिता राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपीएमएलच्या बस सेवेची चांगली कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. शहरात मेट्रो असली तरी, पीएमपीएल सक्षम करणे, हा सद्यस्थितीत एकमेव पर्याय आहे, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे. उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तृतीयपंथीय समाज आता मुख्य प्रवाहात आला- ऐश्वर्या पांडव

पुणे:११-‘तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देऊन भारतीय जनता पार्टीने खऱ्या अर्थाने या समाजाचा सन्मान केला आता आम्ही खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येऊन समाज उपयोगी कामे अधिक जोमाने करू शकतो नुसतेच तृतीयपंथी नव्हे तर समाजातील इतर घटकांसाठी तृतीयपंथी प्रकोष्ट तितक्याच तत्परतेने काम करेल’ असा विश्वास प्रकोष्ठच्या अध्यक्षा ऐश्वर्या पांडव यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने पुण्यामध्ये किंबहुना देशांमधील पहिला तृतीय पंथी प्रकोष्ठाची स्थापना करण्यात आली
या वेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, सरचिटणीस प्रियांका शेंडगे,आरती कोंढरे, भावना शेळके, स्वाती मोहोळ, उज्वला गौड आदी पदाधिकारी उपस्थित होत्या ह्यावेळी ३२तृतीयपंथी भगिनींनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला

मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 11 : सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरिंगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रियदर्शनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या 300 एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सिजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) ची वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिणवाहिनी मार्गिका मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते आज अंशतः खुली करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डॉ.अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य शासन सर्वसामान्यांना लाभ होणारे प्रकल्प वेगाने पूर्ण करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येत असलेल्या किनारी रस्त्यामधील एका मार्गिकेचा आज शुभारंभ होत असून पुढील टप्पा मे महिन्यापर्यंत सुरू होईल. वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्यामध्ये सहाय्यभूत ठरणाऱ्या या प्रकल्पात सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. उपलब्ध मोकळ्या जागेत हरित क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. मुंबईचे भूमिपुत्र असलेल्या कोळी बांधवांच्या मागणीनुसार या रस्त्यांच्या खांबांमधील अंतर 120 मीटरपर्यंत वाढवून त्यांना न्याय दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा रस्ता पुढे टप्प्याटप्प्याने दहिसर आणि पालघरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेमचेंजर ठरणारा अटल सेतू, किनारी मार्ग यांसह इतर प्रकल्पांमुळे भविष्यात मुंबईत कोठेही एका तासात पोहोचता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धिविनायक मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराप्रमाणे विकास करण्यात येईल, यासाठी महापालिकेमार्फत 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगून मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या गृह प्रकल्पांमुळे बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाजवळ उचित ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईचा विकास हेच ध्येय – देवेंद्र फडणवीस

किनारी रस्ता हा मुंबईकरांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविणारा प्रकल्प ठरणार असून मुंबईचा सर्वांगीण विकास हेच शासनाचे ध्येय असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले. किनारी रस्त्याला परवानगी मिळताना अनेक अडचणी आल्या, तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि सीआरझेडची मर्यादा बदलू न देता आणि मोकळ्या जागेत हरीत क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेऊन त्यावर मात करण्यात आल्याचे ते म्हणाले. किनारी रस्ता पुढे वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-विरार, विरार-पालघर असा टप्प्याटप्प्याने विस्तारणार असून मुंबई महानगर क्षेत्रात कोठेही एका तासात पोहोचता यावे यासाठी रस्त्यांची एक रिंग तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांना लाभदायी ठरणाऱ्या किनारी रस्त्याचा एक टप्पा पूर्ण होतोच याचे समाधान असल्याचे सांगून त्यांनी यासाठी हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानले.

सकारात्मक भूमिका ठेवली की मार्ग निघतात – अजित पवार

मुंबईतील प्रवासादरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो, अटल सेतू, जमिनीखालून रस्ते असे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पांदरम्यान अडचणी येतात तथापि सकारात्मक भूमिका ठेवली की त्यातून मार्ग निघतात, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. मुंबईची प्रदूषित शहर ही ओळख बदलून वेगवान प्रवासासाठी शासन पावले उचलत आहे. वाहतूक कोंडी कमी करून मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हरीत पट्टे तयार करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने सध्या सुरू असलेले विविध प्रकल्प मुंबईच्या वैभवात भर घालणारे आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे नमूद करून भविष्यातील सुखकर प्रवासासाठी मुंबईकरांनी आता होत असलेल्या त्रासात सहनशीलता दाखविल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

प्रास्ताविकाद्वारे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती भिडे यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली. मुंबईला वेगवान करणारा हा प्रकल्प आहे. सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाच्या 10.58 कि.मी. लांबीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका असतील, तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने वरळी ते मरीन ड्राईव्ह या मार्गिकेवर सध्या सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ असे नाव देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महिलांच्या बसला हिरवा झेंडा दाखवून किनारी रस्त्याच्या मार्गिकेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.