रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजन ; राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती ; विनामूल्य प्रवेश
पुणे : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल स्वरसम्राज्ञी – एक अभिजात स्वरानुभूती या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे पुण्यात अनुभविता येणार आहे. गुरुवार, दिनांक १४ मार्च रोजी कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमाला पुणेकरांना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती क्लबच्या कल्चरल कमिटीच्या संचालिका अमृता देवगांवकर व सहसंचालिक स्नेहल भट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी होणा-या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोटरी क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, रोटरी क्लब ऑफ पुणे बावधन एलिट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
अमृता देवगांवकर म्हणाल्या, रसिकांसाठी ही संगीत मैफल विनामूल्य खुली असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. तसेच कार्यक्रमात विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या स्मित फाऊंडेशनला आर्थिक व वस्तुरुपी मदत देखील देण्यात येणार आहे. स्वरसम्राज्ञी या स्वरमैफलीत शीलू मेहता, स्वरदा गोडबोले, दीपक महाजन, केतन गोडबोले हे गायन करणार आहेत.
स्नेहल भट म्हणाल्या, कार्यक्रमात मुकेश देढिया, अभिजीत भदे, अमान सय्यद, विशाल गंड्रतवार, सचिन वाघमारे हे कलाकार वादनसाथ करणार आहेत. अमृता ठाकूरदेसाई यांचे संगीत संयोजन असून हेमंत उत्तेकर हे ध्वनी आणि विजय चेन्नूर हे प्रकाशयोजना करणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, गांधीभवन, टिळक रोड, फिनिक्स, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, विज्डम, सारसबाग या सदस्यांनी देखील सहभाग घेतला आहे.