– हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : खोट्या कागदपत्रांच्या साह्याने मुळशीतील मुगावडे येथे प्लॉट विक्री करत एका ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एक्सार्बिया या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2010 ते आतापर्यंत घडला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
बांधकाम व्यावसायिक राहुल रसिकलाल नहार, कंपनीचे व्यवस्थापक साई केरकर आणखी एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणारे साबीर नजीर अहमद शेख या ग्राहकाने पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 (आयपीसी) च्या कलम 406 (विश्वास भंग), 420 (फसवणूक), 467 (दिशाभूल करणे), 468 (फसवण्याच्या उद्देशाने दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बनावट तयार करणे), 471 (तोतयेगिरी करणे) आणि 34 म्हणजेच संगनमत करून गुन्हा करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी एक्सार्बिया डेव्हलपर्स लिमिटेड (आधीचे नाव आयफल डेव्हलपर्स अँड रिएअल्ट्स लिमिटेड) याचे मालक राहुल नहार यांच्याकडून मुळशी तालुक्यातील मुगावडे गावातील ऑलम्पिया प्लॉटिंग स्कीम बाबत वर्तमानपत्रात जाहिरात पहिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. त्यावेळी तक्रारदार याना या स्कीमच्या मार्केटिंग व सेल्स टीमचे सुनील ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे यांनी त्यांना स्कीमविषयी माहिती दिली. यानंतर तक्रारदाराने नहार यांची भेट घेतली असता त्यांनी ही स्कीम कायदेशीर असल्याचे सांगितले.
सेल्स टीम व नहार यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने 7 हजार 635 चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले. यानंतर दि. 30/07/2010 रोजी खरेदी देणार एक्सर्बीया डेव्हलपर्सचे मालक राहुल नहार यांच्या मार्फत कुलमुखत्यार धारक म्हणुन योगेश नारायण निकम यांच्याकडुन या प्लॉटचे अँग्रीमेंट टु सेल सह दुय्यम निंबधक मुळशी क्र. 2 यांच्या कार्यालयात केले व त्याबदल्यात राहुल नहार यांना 26 लाख 52 हजार 300 रुपये वेळोवेळी रोख व चेक स्वरुपात तक्रारदाराने दिले. मात्र खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.
तक्रारदार यांनी नहार याना खरेदीखत का करुन देत नाही असे वेळोवेळी विचारले असता त्यांनी कंपनीच्या नियमानुसार सुरुवातीला आम्ही अँग्रीमेंट टु सेल करुन घेतो व नंतर खरेदी खत करुन देतो असे सांगितले. या करारनाम्यानुसार नहार यांनी संबंधित प्लॉटचा ताबा दिला नाही, असे तक्रारीत म्हटलेले आहे.
तक्रारदार हे सन 2011 ते 2017 या कालवधी मध्ये व्यवयासनिमित्त परदेशात होते. ते परदेशातून परत आल्यानंतर त्यांनी नहार यांना अँग्रीमेंट टु सेल करारनाम्याप्रमाणे खरेदीखत करुन देण्याची विनंती केली असता नहार ने खरेदीखत करुन देण्यास चाल ढकल करत वारंवार टाळाटाळ केली. परंतु शेख यांनी फारच आग्रह केल्यामुळे दि. 01/09/2021 रोजी सह दुय्यम निंबधक मुळशी क्र.2 यांचे कार्यालयात नहार यांच्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता किशोर पांडुरंग हिदगावकर तर्फे क.ज. साठी वि.कु.मु. अजिंक्य प्रमोद पंलगे यांचेकडुन अँग्रीमेंट टु सेल मध्ये नमुद केलेली जमिन मिळकत खरेदी केली.
खरेदीखताप्रमाणे तक्रारदार यांनी मुळशीतील तहसिलदार कार्यालयात दप्तरी नोंद करण्यासाठी अर्ज केला असता या कार्यालयाने नहार यांनी तूकडेबंदीची रितसर परवानगी घेतली परंतू शासनाच्या मंजुरीसाठी लागणारी रक्कम अदा केली नसल्याने प्लॉटची नोंद नामंजूर केली. यानंतर तक्रारदाराने दि. 30/07/2010 रोजीचे अँग्रीमेंट टु सेल व त्यासोबत जोडलेले सातबारा, फेर फार, मंजुर नकाशा, ही कागदपत्रे व दि. 01/09/2021 रोजी केलेले खरेदीखत व त्यासोबत जोडलेले कागदपत्रे सातबारा, मंजुर नकाशा, एन ए ऑर्डर, इ. अँग्रीमेंट टु सेल कागदपत्रे पडताळून पाहिले असता सेल मध्ये त्यांना विकलेला प्लॉट क्र.36 होता व खरेदीखतामध्ये नमुद केलेला प्लॉट चा क्र. 36 (एन 1) असा आढळून आला. त्याबाबत त्यांनी नहार व कंपनीचे मॅनेजर साई केरकर यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन्ही प्लॉट एकच आहेत अशी खोटी माहिती दिली.
त्यानंतर तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या प्लॉट सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 50 लाख रुपयांना एका महिलेला विकणार होते. त्यामुळे त्या महिलेने शिवाजीनगर येथील बँक आयसीआयसीआय होम फायनान्स यांच्याकडे या मिळकतीचे कागदपत्रे कर्ज मंजुर करुन घेण्यासाठी दिली असता बँकेने या प्लॉटवर कर्ज मंजुर करता येत नसल्याचे सांगितले. कारण प्लॉट बाबत अकृशक वापराची परवानगी जोडलेली आहे ती व्यवसाय वापरासाठी असून त्यामध्ये रहिवासी वापराची कोणतीही परवानगी घेतलेली नाही असे आढळून आले. त्यामुळे त्यांना मिळकत महिलेस विकता न आल्याने त्यांचे कधीही भरुन न निघणारे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच या खरेदीखतासोबत जोडलेला नकाशा खोटा असल्याचे आढळले. तसेच प्लॉट नं. 36 व 36 (एन 1) हे वेगवेगळे असुन सदर एक्सर्बिया डेव्हलपर्स लि. नहार, सुनिल ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे व साई केरकर यांनी संगनमत करुन पध्दतशिरपणे खोटी व दिशाभूल केल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.