पुणे : “कलाकाराच्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला, तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल आणि आपली मुल्ये समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे. सोबतच आपला सांस्कृतिक वारसा जपण्याला प्राधान्य द्यावे,” असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव मिळावा व वर्षभर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक व्हावे, यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचलित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन-पीआयएटी) आयोजित ‘ऑरा २०२४’ सजावट प्रदर्शनात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. प्रदर्शनाचे हे १८ वे वर्ष होते. यंदा ‘झरोका’ या संकल्पनेतून संस्थेची रौप्य महोत्सवी वाटचाल दाखवण्यात आली. टाकाऊ वस्तूंपासून ही संकल्पना साकारण्यात आली.
या प्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. यामध्ये प्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे, वास्तुविशारद महेश बांगड, फॅमिली इंटेरियरचे मितेश पतंगे, रवींद्र माळवदकर, ऍड. पांडुरंग थोरवे, प्रसन्न पाटील, सुभाष कांकरिया, राजकुमार सुराणा, ‘पीआयएटी’चे प्राचार्य प्रा. अजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मुलांनी प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरणही यावेळी करण्यात आले.
सदाशिव पेठेत टिळक रस्त्यावरील अभिनव महाविद्यालयाशेजारी असलेल्या ‘पीआयएटी’ संस्थेच्या परिसरात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमांतर्गत केलेले काम, तसेच घर सजावटीसाठीच्या वस्तू, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्लास्टिकमुक्त परिसर, सुंदर शहर, हरित शहर, ऊर्जेचे पर्याय, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध गोष्टी शिल्प आणि हस्तकलेच्या माध्यमातून चितारल्या होत्या.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “मुलांनी भरविलेले हे प्रदर्शन अतिशय सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दिसून येत आहे. पाठ्यक्रम शिकवण्याबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना स्वावलंबन, प्रात्यक्षिक अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गेली २० वर्षे मुलांच्या पुढाकारातून व कल्पकतेतून हे प्रदर्शन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. यातून मुलांच्या प्लेसमेंट्स होतात.”
अभिजित धोंडफळे म्हणाले, “कौशल्य विकास कार्यक्रमात अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना समाविष्ट करायला हवे. कल्पकतेला पैसे द्यावेत, ही भावना रुजायला हवी. विद्यार्थ्यांना शिक्षण सुरु असतानाच कमावण्याची सवय लावणे गरजेचे आहे. ‘ऑरा’ सारख्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील कलात्मकतेला, चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते.”
महेश बांगड म्हणाले, “माणसाने सतत नवनवीन गोष्टी शिकाव्यात, आत्मसात कराव्यात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर त्या क्षेत्रात सखोल ज्ञान घेतले पाहिजे. आपले काम उत्तम आणि इतरांपेक्षा वेगळे करण्यावर भर द्यावा. कलाकृती चांगल्या असतील, तर लोकांचा प्रतिसाद तितकाच उदंड मिळतो.”
“हा अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक बाबी पक्क्या होण्यावर भर दिला पाहिजे. समाजाला नेमके काय हवे, याचा विचार करून आपल्याला नाविन्यपूर्ण, कल्पक रचना निर्माण करता याव्यात. प्रात्यक्षिक अनुभव घेण्याला प्राधान्य द्यावे. गटागटाने कंसल्टंसी सुरु करून त्यातून अर्थार्जन करता येऊ शकते, असे प्राचार्य अजित शिंदे म्हणाले.
प्रा. अजित शिंदे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका व प्रक्रिया सांगितली. आयुष पोकर्णा, दीपिका पटेल यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन पल्लवी पुरंदरे, अनिकेत नाईकरे, अमित जगदाळे, ऋतुजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.