मंदिर कोष प्रकाशन च्यावतीने महाराष्ट्रातील तब्बल एक हजार गणपतींच्या ॥ सहस्र गणपती सहस्र कथा॥ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : भारतासह जगाच्या कानाकोप-यात गणपतीच्या विविध मूर्ती मोठया संख्येने पहायला मिळतात. मात्र, प्रत्येक मूर्तीमधील वैविध्य हे मूर्तीकलेचे वैशिष्टय आहे. भारत ही श्री गणेशाच्या वैविध्यपूर्ण मूर्तींची खाण आहे. मी अनेक ठिकाणी मूर्ती पाहिल्या आहेत. मात्र, कै. मोरेश्र्वर कुंटे व विजया कुंटे यांनी एम ५० दुचाकीवरुन प्रवास करीत मूर्तींची माहिती व फोटो संकलनाचे केलेले काम अभूतपूर्व आहे, असे मत ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ.गो.बं.देगलूरकर यांनी व्यक्त केले.
मंदिर कोष प्रकाशन च्यावतीने महाराष्ट्रातील तब्बल एक हजार गणपतींच्या ॥ सहस्र गणपती सहस्र कथा॥ या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात झाले. पुस्तकाचे लेखक कै. मोरेश्र्वर कुंटे व विजया कुंटे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील १८ हजार मंदिरे पाहिली असून फोटो काढून माहीती गोळा केली आहे. यावेळी पं. वसंतराव गाडगीळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, ज्ञानेश्वर रासने, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, आयोजक प्रभाकर कुंटे, प्रियांका कुंटे आदी उपस्थित होते.
डॉ.गो.बं.देगलूरकर म्हणाले, भारतात अनेक देवालये आहेत. दक्षिणेतील मंदिरांच्या वरच्या भागात देवी लक्ष्मीची मूर्ती आढळते, तर महाराष्ट्रात गणेशाची मूर्ती दिसून येते. महाराष्ट्रात गणेश पूजेचे महत्व मोठे आहे. श्री गणेश हे परमेश्वराचे सर्वव्यापी स्वरुप असून तो विघ्नहर्ता आहे. त्यामुळे गणेशाचे पूजन आपण सर्वप्रथम करतो. अगदी दोन भुजांपासून ते अष्टभुजांपर्यंत विविध प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती भारतात पहायला मिळत आहेत. त्याची माहिती या पुस्तकाद्वारे गणेशभक्तांना मिळणार आहे.
पं.वसंतराव गाडगीळ म्हणाले, प्रत्येकजण गणेशाची सेवा आपापल्यापरिने करीत असतो. मात्र, कुंटे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून गणेशाची सेवा केली आहे. त्यांनी सर्व प्रवास बजाज एम-५० वरून केला. त्याच्या या कामाचा उल्लेख लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये नोंदवला गेला. मोरेश्र्वर कुंटे यांची आतापर्यंत जिल्हावार १६ पुस्तके, तसेच मंदिरा संबंधी विषयांची एकूण ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले.