पुणे: सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांच्या तसेच अन्य कामांसाठी होणाऱ्या खोदाईमुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे रात्री करण्याचे नियोजन करावे अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की , सध्या शाळांमध्ये परीक्षा सुरु आहेत. त्यात दिवसभर शहरातील रस्त्यांची कामे सुरु असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. परिणामी वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. परीक्षेला वेळेवर पोहचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.दिवसभर रस्त्यांची खोदाई होत असल्याने नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यात आता उन्हाळा सुरु झाला असून त्याची तीव्रताही वाढत आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांना उन्हाचाही त्रास होत आहे. त्यात लवकरच निवडणुकांचा प्रचार सुरु होणार आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे, त्यानुषंगाने अन्य कामे ही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत करण्याचे नियोजन करावे. जेणेकरून पुणेकरांना दिवसा होणाऱ्या वाहतूक कोडींच्या त्रासातून दिलासा मिळेल. त्यासाठी यंत्रणा वाढवा ;पण रस्त्यांची कामे ही रात्री करण्यात यावी. दिवसभरात रस्ते किंवा अन्य कामांसाठी खोदाईचे काम करू नये. असे आबा बागुल यांनी म्हटले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे रात्री करा माजी उपमहापौर आबा बागुल यांची आयुक्तांकडे मागणी
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा- मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला
पुणे, दि. १२: पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ग्रामीण भागातील गरीब कारागिरांसाठी महत्वाची असून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारी आहे; या योजनेचा लाभ समाजातील गरीब, होतकरु कारागिरांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी फेडरेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह वानवडी येथे रविवारी (१० मार्च) आयोजित प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची कार्यशाळा व जनजागृती मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी पुणे जिल्हा ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव आदमाने, बलुतेदार ग्रामोद्योग फेडरेशनचे पदाधिकारी, संस्थाध्यक्ष, संचालक तसेच ग्रामीण कारागीर उपस्थित होते.
श्रीमती विमला म्हणाल्या, अवजारे, साधनांचा वापर करुन हाताने काम करणाऱ्या पारंपरिक बलुतेदार व हस्तकलेच्या कारागिरांना स्वत:ची ओळख प्राप्त करुन देण्याबरोबरच त्यांना आधार देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेला ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून लाभार्थी सामान्य सुविधा केंद्रावर आपल्या नावाची नोंदणी करीत आहेत.
नावनोंदणी न केलेल्या कारागिरांनी लवकर नाव नोंदणी करावी. याकरीता आधार कार्ड, शिधापत्रिका, बँक पासबुक व आधारकार्डशी संलग्न भ्रमणध्वनीची आवश्यकता आहे. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना योजनेचे ओळखपत्र, कौशल्य वृद्धीसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, ५०० रुपये प्रतिदिन विद्यावेतनासह १५ हजार रुपयांचे टुलकिट मिळणार आहे. लाभार्थ्यांना १ लाख रुपयाचा पहिला हप्ता त्यांनतर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता असा ५ टक्के व्याजदराने वित्तीय संस्थेमार्फत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पात्र मतदारांना मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन
पुणे, दि. १२:निवडणूक जाहीर झाल्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवसांपूर्वीपर्यंत अर्जदारांकडून प्राप्त मतदार नोंदणी करण्याबाबत नमुना क्र. ६ व पत्त्यात दुरुस्ती करण्याबाबत नमुना क्र. ८ वर अंतिम कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येणार असल्याने पात्र मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
निवडणूक वर्षात मतदार यादीत नाव नोंदणी, स्थलांतर व वगळणी करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार नागरिकांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी आहे. भारत निवडणूक आयोगाच्या ‘वोटर हेल्पलाईन अॅप’ वर ऑनलाईन किंवा जवळच्या तहसिल कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने नमुना क्र.६ चा अर्ज सादर करता येईल. मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांनी मतदार नोंदणी करावी असे, आवाहन डॉ.दिवसे यांनी केले आहे.
स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची जोडी गाजवणार छोटा पडदा
‘सुख कळले’ लवकरच
कलर्स मराठीवर
महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन अवतरत आहेत. ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” ही आणखी एक नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. याचे कारण रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे. तसंच स्पृहा बरोबर गुणी आणि चोखंदळ अभिनेता सागर देशमुख असणार आहे.
सध्या तरी ही मालिका कधी सुरु होणार, हे गुलदस्त्यात असले तरी या पहिल्याच सुंदर टीजरने रसिकांना सुखद धक्का दिला असून प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख हे दोन्ही तगडे कलाकार प्रथमच एकत्र येत असून ही दमदार जोडी लोकांच्या पसंतीस उतरते आहे. “सुख कळले” ही एक वास्तवदर्शी मालिका असून स्पृहा- सागर आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवायला पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
प्रोमोमधील तरल भावस्पर्शी क्षण या दोघांमधील नाते अधोरेखित करत आहे. त्यामुळे ही एक मध्यमवर्गीय कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी असून जी प्रेक्षकांना तुफान भावते आहे.
‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मधील पहिले गाणे भेटीला
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृद्गंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले ‘साला कॅरेक्टर’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात ‘चाळीशी’तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर दिसत आहे. सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय धमाल आहे.
चाळीशी हा आयुष्यातला असा गंमतशीर टप्पा आहे, जिथे तुम्ही तरुणही नसता आणि प्रौढही. त्यामुळे या वयातील धमाल ही विशेष वेगळी असते. ही धमाल, मजामस्ती या गाण्यात दाखवण्यात आली आहे. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर, संदीप देशपांडे निर्माते आहेत. हे ‘चाळीशी’तील चोर येत्या २९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
गाण्याबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” ‘साला कॅरेक्टर’ हे गाणं करताना ते सर्व वयोगटातल्या लोकांना सहज गुणगुणता यावं आणि नाचता यावं असा विचार होता ज्याला अजित परब आणि वैभव जोशी या दोन्ही अवलियांनी पुरेपूर न्याय दिला आहे.गाण्यावरून चित्रपटात काय धमाल येईल, याचा अंदाज तुम्ही बांधूच शकता.”
उद्यमशीलता, उत्कृष्टता हा एक प्रवास – हर्षवर्धन पाटील
‘दखल उद्यमशीलतेची, कौतुक उत्कृष्टतेचं पीबीएस कॉर्पोरेट एक्सलन्स -२०२४’ पुरस्कारांचे वितरण
पिंपरी, पुणे (दि. १२ मार्च २०२४) प्रत्येक यशस्वी संघटनेच्या अथवा संस्थेच्या यशामागे कर्तृत्ववान व्यक्तींचा विशेष सहभाग असतो. अशा व्यक्तींची दूरदृष्टी, नेतृत्व आणि अथक मेहनत संस्थांना उत्कृष्टतेकडे घेऊन जातात. उत्कृष्टता ही एकदम मिळत नसते तर तो एक प्रवास असतो. त्यासाठी संपूर्ण समर्पण, चिकाटी आणि अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवण्याची प्रतिबद्धता यांचा समावेश असतो, असे प्रतिपादन नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी केले. हर्षवर्धन पाटील व उद्योजक नरेंद्र लांडगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलने नुकताच ‘पी. बी. एस. कॉर्पोरेट एक्सलन्स -२०२४’ पुरस्कार वितरण हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हिंजेवाडी, पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु) प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी, पीबीएसचे संचालक डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते.
‘पी.बी.एस. कॉर्पोरेट एक्सलन्स – २०२४’ पुरस्कारला उदंड आणि उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देशातून पाचशे पेक्षा अधिक प्रवेशिका आल्या होत्या. नामांकन समितीत नामवंत कंपन्यांचे अध्यक्ष, संचालक आणि अधिकारी यांचा समावेश होता.
विविध विभागांसाठी पुरस्कार –
यामध्ये मोस्ट इन्स्पायरिंग मॅनेजिंग डायरेक्टर, मोस्ट सक्सेसफुल सीईओ, बेस्ट सीओओ, बेस्ट सीएचआरओ ,एचआर लीडर, यंग एचआर टॅलेंट, डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन आयकॉन यांचा समावेश होता. यावेळी दिव्यांग व्यक्तींना अन संग हिरोज हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ. मणीमाला पुरी यांनी पीसीईटी शैक्षणिक समुहातील शिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी स्वागत केले. डॉ. गणेश राव यांनी आभार मानले.
‘ई-बाहा एसएई इंडिया २४’ राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईच्या संघाला उपविजेतेपद
इनोव्हेशन आणि डिझाईन श्रेणींमध्ये पटकावले अव्वल स्थान
पिंपरी, पुणे (दि. १२ मार्च २०२४)नसरापूर तेलंगणा येथे नुकत्याच झालेल्या ‘ई-बाहा एसएई इंडिया २४’ या राष्ट्रीय स्पर्धेत पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) टीम रेड बॅरॉन संघाने प्रतिभा आणि नावीन्य दाखवून अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले. टीम रेड बॅरॉन संघाला सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल स्पर्धेचा उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
डॉ. बी. व्ही. राजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नसरापूर, तेलंगणा, येथे सहा ते नऊ मार्च २४ दरम्यान राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रेड बॅरॉन संघाने ग्रीन एफिशियंट व्हेईकल, डिझाईन आणि इनोव्हेशन श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि ऑटोमोटिव्ह डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रात टिकून राहण्याची आणि सीमा वाढवण्याची क्षमता आणि ग्राउंड ब्रेकिंग सोल्यूशन्स विकसित करण्याची त्यांची वचनबद्धता दर्शविली.
शिवाय, संघाने सीएई श्रेणीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले, एंड्युरन्स शर्यतीत प्रथम उपविजेते स्थान मिळवले, तसेच कॉस्ट आणि ओव्हर ऑल स्टॅटीक श्रेणींमध्ये तृतीय स्थान प्राप्त केले. या यशामुळे रेड बॅरॉन संघाने उपविजेतेपद पटकावले. कर्णधार वेदांत तारकासे यांच्या नेतृत्वातील संघात कौशल रानडे, सौरभ ठाकरे आणि ओंकार सालोरकर यांच्यासह रेड बॅरॉन संघात विविध विभागातील ४० विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्राध्यापक सल्लागार म्हणून प्रा. उम्मीद शेख यांनी संघाला मार्गदर्शन केले.
उम्मीद शेख यांनी संघाला मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. ए. देशमुख, एसडीडब्ल्यू अधिष्ठाता डॉ. पी. आर. काळे यांनी विजयी संघातील विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले.
लाभार्थ्यांना सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन
पुणे, दि. १२: राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळ आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे तसेच राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सवलतीच्या कर्ज वाटप कार्यक्रमाचे १३ मार्च रोजी दु. २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत देशातील एक लाख लाभार्थ्यांना सवलतीचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नगरपालिकेतील विविध लाभार्थ्यांना पीपीई संच आणि आयुषमान कार्डचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांची दिवाळीची खास भेट – १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार“संगीत मानापमान”!
मराठी संगीत रंगभूमीवरील एक सोन्याचे पान असलेल्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला आज ११३ वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच आजच्या या विशेषदिनी या अजरामर कलाकृतीला आणि सर्व दिग्गजांना वंदन करून जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे यांनी १ नोव्हेंबर रोजी चित्रपट “संगीत मानापमान” प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केली आहे.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित “संगीत मानापमान” या नाटकाला आजतागायत रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यात अनेकांचा वाटा आहे. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या कलाकृतीवर प्रेरित, भव्यादिव्य संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे जाहीर केले आहे.
या चित्रपटातील प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून त्याचप्रमाणे या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील सुबोध भावे यांनी केले आहे. त्याचबरोबर ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यासोबतच प्रसिध्द संगीतकार शंकर- एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत “संगीत मानापमान” हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृहांत प्रदर्शनास सज्ज होणार आहे.
अंकिता लोखंडे आणि रणदीप हुड्डा यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या मराठी ट्रेलरचे अनावरण
अंकिता लोखंडे यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ च्या मराठी ट्रेलरचे अनावरण पुण्यातील सावरकरांच्या वसतिगृहाला दिली भेट
‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ रणदीप हुड्डा दिग्दर्शित पदार्पण करत आहे. 22 मार्चला हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित!
स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी… महान क्रांतिकारक… समाजसुधारक… राजनेता… साहित्यिक… म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे अमूल्य योगदान प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले, त्याच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांच्यासह चित्रपटाची टीम उपस्थित होती. आनंद पंडित मोशन पिक्चर्स, लिजण्ड स्टुडिओज, अवाक फिल्म्स आणि रणदीप हुड्डा फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट झी स्टुडिओजच्या सहकार्याने प्रदर्शित होणार आहे. रणदीप हुड्डा दिग्दर्शित या चित्रपटाचे झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार आणि रणदीप हुड्डा निर्माते असून रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती सहनिर्माते आहेत. तर या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अंकिता लोखंडे यांनी सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
आयुक्तसाहेब , सार्वजनिक मालमत्ता विद्रूपिकरणप्रकरणी भाजपवर गुन्हा दाखल करा
भाजपच्या अनधिकृत जाहिरातबाजी
पुणे-भाजपच्या सातत्याने होणाऱ्या प्रचंड जाहिरातबाजीने लोकांची डोकेदुखी वाढलेली असताना आता या जाहिरातींचे विपरीत परिणाम होतील अशी शक्यता व्यक्त होता असताना पुणे शहरातील शिवसेना (UBT ) ने याबाबत आवाज उठविला आहे.पुणे शहरात सार्वजनिक मालमत्ता विद्रूपिकरण विषयात भाजप वर गुन्हा दाखल करा.अशी मागणी करण्यात आली आहे.शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप यांची भेट घेउन पुणे शहरातील लाखो रू खर्च करून स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत सुशोभीकरण केलेल्या भिंती विद्रुपिकरण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर सुध्दा गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, राजेश पळसकर, आनंद गोयल ,मा नगरसेवक पृथ्वीराज सुतार, अविनाश साळवे, बाळा ओसवाल, विभागप्रमुख प्रविण डोंगरे, अजय परदेशी, नंदू येवले, मुकुंद चव्हाण, नितीन रावळेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .
या संदर्भात शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले,’पुणे शहर हे सांस्कृतिक तसेच विद्येचे माहेरघर म्हणून राज्यात प्रचलित आहे , स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या , परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार केला आहे. आणि शहर विद्रुपीकरण केले आहे. तसेच विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात भाजपच्या वतीने गल्लोगल्ली बॅनर लाऊन शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.या विद्रुपीकरणाचा शिवसेना पुणे शहराच्या वतीने आम्ही निषेध करत पुणे महानगर पालिका प्रशासनाने तत्परतेने सदर शहर विद्रुपीकरण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यां विरोधात पालिका अधिनियम १९४९ आणि महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम नुसार गुन्हे दाखल करावेत. अन्यथा शिवसेना पद्धतीने आम्हास आंदोलन करुन अथवा कायदेशीर मार्गाने आपणास आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देऊ असे शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.
गोदरेज ॲग्रोव्हेटने प्रथमच आयोजित केली ‘शेतीतील महिला’ शिखर परिषद
चांगल्या रोजगाराच्या संधी आणि आर्थिक उन्नतीसाठी या क्षेत्रातील 1 लाख महिलांना सहकार्य करणार
मुंबई-: गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) ने त्यांच्या ‘वुमन इन ॲग्रिकल्चर’ अर्थात शेतीतील महिला या शिखर परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले. क्षेत्रातील महिलांना साजरा करण्याजोग्या अशा या शिखर परिषदेचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रामध्ये विविध दृष्टीकोनांना एकत्र आणणे आणि भारताच्या कृषी क्षेत्रातील महिलांच्या महत्त्वाच्या भूमिकेला संबोधित करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी विचारप्रवर्तक चर्चा घडवणे हा आहे.
शेती हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, असा व्यापक गैरसमज असूनही, आपल्या देशाची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती प्रकट करते. भारतात 86.1 दशलक्ष स्त्रिया कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. देशातील एकूण महिला कामगारांपैकी त्यांचे प्रमाण 60 टक्के आहे. ग्रामीण भारतात उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असलेल्या महिलांची टक्केवारी 84 टक्के इतकी आहे. दुसरीकडे, कृषी-व्यवसायातही सर्व ठिकाणी महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात महिलांच्या महत्त्वाच्या परंतु अनेकदा दुर्लक्षित केलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा या शिखर परिषदेचा उद्देश होता.
कृषी-अन्न क्षेत्रातील महिलांसाठी रोजगारक्षमता वाढविण्यावरील पॅनेल चर्चेमध्ये या क्षेत्रातील महिलांना भेडसावणा-या कौशल्याच्या फरकांच्या विविध पैलूंमध्ये आणि शैक्षणिक आणि उद्योगातील सहकार्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी कशी मदत करू शकते, याबद्दल खोलवर चर्चा झाली. इतर पॅनेल चर्चेत महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत विकसित आणि प्रगत करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि उद्योगातील महिलांना सक्षम बनवण्याची गरज अधोरेखित करताना विचार आणि विचारांची देवाणघेवाण झाली.
कंपनीने पुढाकार घेतलेल्या या शिखर परिषदेवर भाष्य करताना GAVLचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बलराम सिंग यादव म्हणाले की, “आमच्या महिला शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती आणि या क्षेत्रात मोठे योगदान असूनही, आवश्यक संसाधनांचा अभाव आहे. म्हणून ज्या देशात आपल्याला अब्जावधी लोकांचे पोट भरावे लागेल, त्या देशात आपल्याला केवळ शेतातच नव्हे तर कृषी व्यवसायातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी एक इको-सिस्टम तयार करण्याची गरज आहे. त्यांना आवश्यक ज्ञान, पायाभूत सुविधा आणि सहाय्य प्रदान केल्याने आम्हाला निश्चितपणे देशाचे एकूण कृषी उत्पादन वाढविण्यात मदत होईल.”
ते पुढे म्हणाले, “भारत शाश्वत विकासाच्या भविष्यासाठी प्रयत्नशील असताना, मूल्य साखळीला ओलांडून महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून, भारतीय कृषी कौशल्य परिषद (ASCI), भारताचे भविष्यातील कृषी नेते (FALI) आणि गोदरेज गुड अँड ग्रीन यांच्याशी भागीदारी करून, आम्ही या क्षेत्रातील 1 लाख महिलांचे उत्तम रोजगाराच्या संधी आणि आर्थिक उन्नतीसाठी पालनपोषण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
भारतीय कृषी कौशल्य परिषद (ASCI) कृषी आणि संलग्न क्षेत्रातील संघटित/असंघटित विभागांमध्ये गुंतलेले शेतकरी, वेतन कामगार, स्वयंरोजगार आणि विस्तार कामगार यांच्यातील अंतर भरून आणि कौशल्ये सुधारून क्षमता वाढीसाठी कार्य करते.
द फ्युचर ऑफ ॲग्रिकल्चर लीडर्स इन इंडिया (FALI), अग्रगण्य कृषी व्यवसाय संस्थांद्वारे समर्थित एक उपक्रम आहे. त्याद्वारे हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसोबत काम केले जाते. त्यांना आधुनिक, शाश्वत शेती आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवसाय आणि नेतृत्व कौशल्ये मिळवून दिले जाते.
GAVLच्या मानव संसाधन विभागाच्या प्रमुख मल्लिका मुत्रेजा यांनी महिला सक्षमीकरणाचे महत्त्व सांगून स्पष्ट केले की, “GAVLमध्ये, महिलांचे सक्षमीकरण हे आम्ही करत असलेल्या प्रत्येक कृतीचा केंद्रबिंदू आहे. आम्हाला ठाम विश्वास आहे की, शेतीमध्ये स्त्रीकरण आम्हाला सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास मदत करेल आणि महिला शेतक-यांची क्षमता ओळखण्यासाठी आमच्या उद्योगासाठी महत्त्वाच्या संरचनात्मक असमानता दूर करण्यात मदत करेल. भारतीय कृषी कौशल्य परिषदेच्या भागीदारीतील ही उद्घाटन शिखर परिषद, एक महत्त्वाचा क्षण दर्शविते, एक संस्था या नात्याने जी आपल्या राष्ट्राला अन्न पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते, आम्ही येत्या काही वर्षांत अशा प्रकारच्या आणखी सहकार्यांची अपेक्षा करतो.”
या शिखर परिषदेत गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (GIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि GAVL आणि Astec LifeSciences Limited चे अध्यक्ष नादिर गोदरेज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कार्यकारी अध्यक्ष निसाबा गोदरेज; पीक संरक्षण व्यवसाय, GAVL चे कार्यकारी संचालक आणि सीओओ बुर्जिस गोदरेज; ओपन सिक्रेटचे सीईओ अहाना गौतम; EYचे भागीदार अंगशुमन भट्टाचार्य; निव्हाच्या व्यवस्थापकीय संचालक गीतिका मेहता; सल्लागार आणि तज्ज्ञ (भारतीय कृषी आणि शहरी बदल) आणि स्वतंत्र संचालक इरीना विट्टल; ऑम्निव्होर शिल्पा दिवेकर निरुला, व्हेंचर पार्टनर; प्रा. विद्या वेमिरेड्डी, IIM अहमदाबाद येथील लिंग केंद्राच्या अध्यक्षा आणि भारतीय कृषी कौशल्य परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतेंद्र आर्य यांसारख्या उद्योगातील आघाडीचे नेते आणि शैक्षणिक तज्ञांचा सहभाग होता.
‘वुमन इन ॲग्रिकल्चर’ समिट हे कृषी क्षेत्रातील महिलांना ओळखण्यासाठी आणि सक्षम करण्याच्या GAVL च्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून काम करते. संवाद आणि सहकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून शिखर परिषदेने अशा भविष्याचा मार्ग मोकळा केला आहे जिथे भारतातील शाश्वत कृषी विकास चालविण्यामध्ये महिलांना समान भागीदार म्हणून ओळखले जाईल.
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 6 राज्यांतून 43 नावे
काँग्रेसने मंगळवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात 43 उमेदवारांची नावे आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना छिंदवाडामधून तर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोरमधून तिकीट देण्यात आले आहे.
यापूर्वी पक्षाच्या पहिल्या यादीत 39 नावे जाहीर करण्यात आली होती. अशा प्रकारे काँग्रेसने आतापर्यंत 82 नावांची घोषणा केली आहे. यादीतील 76.7% उमेदवारांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे.
येथे संपूर्ण यादी पहा


मोदींची निती व नियत समाजात फूट पाडण्याची, भारत जोडो व न्याय यात्रेतून काँग्रेसचे उत्तर: जयराम रमेश.
नंदूरबार, मुंबई, दि. १२ मार्च
निवडणुकीत एका पक्षाला एकच चिन्ह असते पण भारतीय जनता पक्ष दोन चिन्हांवर लढत आहे, एक चिन्ह कमळ आहे तर दुसरे चिन्ह वॉशिंग मशिन आहे. आणखी दोन फ्रंटल आहेत ते म्हणजे ईडी व सीबीआय. भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निती व नियत ही समाजात फूट पाडण्याची आहे. भाजपाच्या या नितीविरोधात काँग्रेस पक्ष मात्र भारत जोडो व न्याय यात्रेच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचे काम करत आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी सांगितले.
नंदूरबार येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना जयराम रमेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, १४ जानेवारी २०२४ ला मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली व आज ५९ व्या दिवशी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा व पांच न्याय याबद्दल जनतेला माहिती दिली. आतापर्यत तीन न्याय संदर्भात काँग्रेस पक्षांने गॅरंटी दिली आहे. ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर ही पक्षाची गॅरंटी आहे. एमएसपीला कायदेशीर करणे, तरुणांना पाच न्याय देण्यासंदर्भात गॅरंटी दिली तर सामाजिक न्याय संदर्भात जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवण्याची गॅरंटी दिली आहे. धुळ्यात महिला संमेलनात महिला न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केली जाईल तर १७ तारखेला शिवाजी पार्कवरील सभेत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कामगार न्यायाच्या गॅरंटीबद्दल घोषणा केली जाईल.
प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु आहे, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय आहे. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा असून कोणतेही मतभेद नाहीत. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरु आहे व बाळासाहेब थोरात हेही त्यांच्याशी चर्चा करत आहेत. १७ तारखेनंतर मविआचा जागा वाटपाचा फार्म्युला जाहीर केला जाईल.
नाना पटोले म्हणाले की, देशाची अवस्था अत्यंत वाईट असून लोकशाही व संविधान संपवून जनतेला महागाई व बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्यात आले आहे. देशाला दिशा दाखवण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे यावेळीही महाराष्ट्रच परिवर्तनाचा संदेश देणार आहे. भाजपा लोकसभेच्या १५० जागाही निवडून येणार नाहीत. भाजपाचा शेवटचा प्रयत्न सुरु आहे. केंद्रातील भाजपा सरकार खाली खेचण्याची भावना जनतेची झालेली आहे.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नंदूरबार जिल्हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जिल्हा राहिला आहे. आणि या जिल्ह्यातून काँग्रेसचे उमेदवार नेहमी निवडून आला आहे. भाजपाच्या कार्यपद्धती व विचाराविरुद्ध आहेत. जे या विरोधात आहे त्या सर्वांनी एकत्र यावे ही भूमिका काँग्रेसची आहे. या विचाराचे लोक भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होत आहेत. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान १४ मार्चला चांदवड येथे शेतकरी मेळावा होत असून मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री के. सी. पाडवी, AICC सचिव बी. एम. संदीप, आ.शिरीष नाईक, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.
भर दुपारी ,भर रस्त्यावर सव्वाआठ लाख रुपयांची जबरी चोरी
पुणे- अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेले पुणे जबरी चोऱ्या , घरफोड्या, आणि चेन स्नचिंग सारख्या गुन्हयांनीहि हैराण झालेले आहे. काल दुपारी खराडी बायपास कडून केशवनगर कडे जाणाऱ्या आर के बिअर शॉपी समोर भर रस्त्यावर एका दाम्पत्याला अडवून त्यांचेकडील रोकड आणि मोबाईल असा सुमारे सवां आठ लाखाचा ऐवज जबरदस्तीने भामट्यांनी हिसकावून नेल्याची तक्रार चंदन नगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
देहूरोड येथे राहणारे एक ४५ वर्षे वयाचा इसम आपल्या पत्नी सह दुचाकी वरून जात असताना त्याला अडवून मोतार्साय्काल्वरून आलेल्या दोघांनी त्याचेकडील बैगेतून तब्बल ८ लाख ११ हजाराची रोकड हिसकावून घेतली आणि जाताना त्याचा मोबाईल देखील हिसकावून नेला .फौजदार शेगर (9552529686)आता या भामट्यांचा शोध घेत आहेत .
