पुणे: सद्यस्थितीत शहरातील रस्त्यांच्या तसेच अन्य कामांसाठी होणाऱ्या खोदाईमुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे रात्री करण्याचे नियोजन करावे अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केली आहे.
आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की , सध्या शाळांमध्ये परीक्षा सुरु आहेत. त्यात दिवसभर शहरातील रस्त्यांची कामे सुरु असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. परिणामी वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचता येत नाही. परीक्षेला वेळेवर पोहचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.दिवसभर रस्त्यांची खोदाई होत असल्याने नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.त्यात आता उन्हाळा सुरु झाला असून त्याची तीव्रताही वाढत आहे. वाहतूक कोंडीत अडकल्याने नागरिकांना उन्हाचाही त्रास होत आहे. त्यात लवकरच निवडणुकांचा प्रचार सुरु होणार आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे, त्यानुषंगाने अन्य कामे ही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत करण्याचे नियोजन करावे. जेणेकरून पुणेकरांना दिवसा होणाऱ्या वाहतूक कोडींच्या त्रासातून दिलासा मिळेल. त्यासाठी यंत्रणा वाढवा ;पण रस्त्यांची कामे ही रात्री करण्यात यावी. दिवसभरात रस्ते किंवा अन्य कामांसाठी खोदाईचे काम करू नये. असे आबा बागुल यांनी म्हटले आहे.