Home Blog Page 1162

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १३ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ११ ऑक्टोबर २०२३ पासून https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीमध्ये संकेतस्थळावर भरून त्याची प्रत संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावेत.

महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी घ्यावी. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर ५ हजार ४३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आहे.

विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

 भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

मुंबई, दि. 13 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर  व अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय  देशात असावे या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळा झाला. या कार्यक्रमादरम्यान, स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेच्या पोर्टलचा शुभारंभही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.

सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ.मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार असून याठिकाणी चारशे आसन व्यवस्थेचे सभागृह, 18 क्लास रुम, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 300 आसनी खुले सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.

महावितरणच्या पुण्यातील आणखी दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

पुणे, दि. १३ मार्च २०२४: महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत वानवडी येथील रेसकोर्स आणि धनकवडी येथील साईमिस्टिक या आणखी दोन उपकेंद्रांनी नुकतेच ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत या दोन्ही उपकेंद्राना ‘आयएसओ’चे परीक्षक श्री. नंदकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित उपकेंद्रांना ‘आयएसओ’ मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे, वानवडी येथील महावितरणच्या रेसकोर्स उपकेंद्राने राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्यांमध्ये प्रथमच गुणवत्ता, पर्यावरण व सुरक्षा या तिनही वर्गवारीत स्वतंत्र आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे.   

महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यादृष्टीने उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात येत आहे. यामध्ये रास्तापेठ विभागातील रेसकोर्स २२/२२/११ केव्ही उपकेंद्र (सेंट मेरी उपविभाग) आणि पद्मावती विभागातील साई मिस्टिक २२/२२ केव्ही स्विचिंग स्टेशन (धनकवडी उपविभाग) आयएसओ ९००१:२०१५ च्या मानांकनासाठी पात्र ठरले आहे.

धनकवडी व वानवडी येथे झालेल्या स्वतंत्र कार्यक्रमात आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी वानवडी येथे कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, बॅटमिंटन कोर्टचे उद्घाटन तसेच धनकवडी येथे डॉ. दत्ता कोहिनकर यांचा तणावमुक्तीसाठी व्याख्यान झाले. तसेच दोन्ही ठिकाणी उपकार्यकारी अभियंता श्री. संतोष पाटणी यांनी वीजसुरक्षेबाबत प्रबोधन केले.

‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. संजीव नेहेते (स्थापत्य) कार्यकारी अभियंता श्री. चंद्रकांत दिघे (रास्तापेठ), श्री. रवींद्र आव्हाड (पद्मावती), श्री. भागवत थेटे (प्रशासन), अतिरिक्त कार्यकारी अभियंता डॉ. संजय घोडके, श्री. राजेंद्र भुजबळ, देविदास तिडके, नीलेश रोहणकर, सहायक अभियंता श्री. स्वप्निल जाधव, श्री. प्रभाकर पवार तसेच बाबासाहेब शिंदे, पुंडलिक काशिद, सिद्धार्थ एकबोटे, प्रतिक शिंदे, अक्षय वाघमोडे यांनी कामगिरी केली.

राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘महावितरणचे उपकेंद्र सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. सर्वच उपकेंद्राचा दर्जा व कार्यक्षमतेत सातत्य राखण्यासाठी नेहमी उपाययोजना सुरु असतात. त्यास आणखी वेग देण्यात आला आहे. यात पाच उपकेंद्रांना आयएसओ ९००१:२०१५ चे मानांकन मिळाले आहे. त्यासाठी संबंधित सर्वांचे कौतुक आहे.

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उभारण्यावर भर हवा-डॉ. शां. ब. मुजुमदार

मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सिम्बायोसिस रुग्णालयातील ‘एनआयसीयू’ अद्ययावत
पुणे : “सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उभारण्यावर भर हवा. त्यासाठी औद्योगिक सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) चांगला उपयोग करून घ्यायला हवा. छाब्रिया दाम्पत्याप्रमाणे इतरांनीही ‘सीएसआर’मार्फत आरोग्यसुविधा अत्याधुनिक व सक्षम बनवल्या, तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात चांगले उपचार मिळू शकतील,” असे मत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले. 
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी अद्ययावत केलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे (एनआयसीयू) उद्घाटन डॉ. मुजुमदार यांच्या हस्ते झाले.
‘फिनोलेक्स’चे अध्यक्ष प्रकाश प्रल्हाद छाब्रिया, मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, ‘सिम्बायोसिस’चे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर, ‘एनआयसीयू’ प्रमुख डॉ. अंजली खेर, डॉ. नितीन लिंगायत, ‘फिनोलेक्स’चे व्यवस्थापकीय संचालक अजित व्येंकटरामन, माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल वाभी, मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी, बबलू मोकळे आदी उपस्थित होते.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “मुळशी तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना विनामूल्य आरोग्यसुविधा या रुग्णालयात दिल्या जात आहेत. माझे मित्र प्रल्हाद छाब्रिया यांची आज जयंती आहे. त्यांच्या स्मरणार्थ प्रकाश आणि रितू यांनी ‘एनआयसीयू’ कक्ष अद्ययावत केला आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे लहान मुलांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांप्रती तळमळ असल्याने गेल्या २५ वर्षात रितू छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.”
प्रकाश छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या या पुढाकाराचे कौतुक केले. सिम्बायोसिस रुग्णालय गरिबांना चांगली आरोग्य सेवा पुरवीत असून, मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून येथील आरोग्य सुविधा आणखी अद्ययावत होतील, असा विश्वास छाब्रिया यांनी व्यक्त केला.

डॉ. राजीव येरवडेकर म्हणाले, “ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेल्या या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नवजात बालकांच्या किंवा अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण नक्कीच घटणार आहे. या पाच बेडच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात बालसंगोपनाची सेवा आम्हाला देता येईल.”
अजित व्येंकटरामन यांनी फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमांत अग्रेसर राहिले असल्याचे नमूद केले. अनिल वाभी यांनीही फाउंडेशनच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. सचिन कुलकर्णी यांनी फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. नितीन लिंगायत यांनी आभार मानले. इम्रान अली चौहान यांनी सूत्रसंचालन केले.

मुकुल माधव फाउंडेशन गेल्या २५ वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी, आरोग्यसुविधा व शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सिम्बायोसिस रुग्णालयामुळे मुळशी भागातील ग्रामीण रुग्णांना उपचार मिळत आहेत. नवजात बालकांचे प्राण वाचविण्यासाठी पुण्यातील अनेक रुग्णालयांत नवजात शिशु अतिदक्षता विभागाची उभारणी करण्याचे काम सुरु आहे. आज पाच खाटा अद्ययावत झाल्या असून, लवकरच आणखी काही खाटांची उभारणी करणार आहोत.”

– रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीने संपवलं:अन् हे पाप मोदींनी केलं

मालेगाव-जीएसटी अन् नोटबंदीने या देशातील छोटे व्यापारी मोदींनी संपवले, असा आरोप राहुल गांधी यांनी येथे केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील हे देखील त्यांच्यासोबत होते.भारतात महत्त्वाचे फक्त तीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बेरोजगारी, दुसरा महागाई आणि तसरा भागीदारी. भारताचं धन भागीदारीमध्ये जातंय. महागाई आणि बेरोजगारीने आपण सर्व सामना करतोय. विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिक्षण घेतात, 5 ते 10 खर्च होतात. पण हिदुस्तानात नोकरी मिळत नाही. कारण छोटे व्यापाऱ्यांचे काम बंद झालंय. इथे पावरलूम बंद पडले. छोट्या उद्योगधंद्यांना जीएसटी आणि नोटबंदीने संपवून टाकलं, तर हे लागू करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून पाप केले, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.नरेंद्र मोदी यांनी अदानी सारख्या अब्जाधीशांसाठी काम केलं. या अब्जाधीशांनी मोदींना सांगितलं की, तुमचा चेहरा टीव्हीवर हवा, असं वाटत असेल तर जीएसटी, नोटबंदी लागू करा आणि हिंदुस्तानातील छोट्या व्यावसायिकांना संपवा. मोठे उद्योगपती रोजगार देत नाहीत. रोजगार इथे पावरलूममध्ये मिळतो. रोजगार छोटे व्यापारी देतात. पण त्यांना सर्वांना नरेंद्र मोदी यांनी संपललं आहे. या देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले की, मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडायला आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेचं लक्ष्य दुसरीकडे वळवत आहेत. कारण त्यांना माहिती हिंदु्स्थानाचं धन 10-15 लोकांच्या खिशात जावं. भारतात सर्वात श्रीमंत 22 लोक आहेत. त्यांच्याकडे देशातील 70 कोटी जनतेकडे जितका पैसा आहे तितका पैसा आहे. ही भारतातील स्थिती आहे.

मीडिया, विमानतळ, पोर्ट्स, पावरजनरेशन, सेल्फफोन जिथे बघाल तिथे हेच 25 लोक दिसतील. तुम्ही मोबाईल पाहतात, रिल्स बघतात, पैसे कोण बनवतं, गाडीत पेट्रोल टाकता, पैसे कोण कमवतं? रस्त्यावर चालतात, पैसे कोण कमवतं? विजेचा दर वाढतो, पैसे कोण कमवतो? प्रत्येक ठिकाणी तेच 20-25 लोक पैसे कमवतात, असा आरोप राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाणा साधला.

तरुणाईच्या कट्टयांवरुन साहित्य व संस्कृती सह मूल्यभान जपण्याचे काम- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी 

मैत्रयुवा फाऊंडेशन तर्फे ‘मैत्रयुवा कट्टा’ बोधचिन्ह अनावरण
पुणे : आजची तरुणाई भरकटलेली आहे, असे बोलले जात असनाच, मैत्रयुवा फाऊंडेशनसारख्या अनेक संस्थांचे चांगले व वेगळे काम करीत आहेत. मैत्रयुवा कट्टा सारख्या तरुणाईच्या कट्ट्यांवरुन साहित्य व संस्कृती सह मूल्यभान जपण्याचे काम केले जात आहे. दिव्यांगांसह वंचितांसाठी सुरु असलेले तरुणाईचे काम पाहून त्यांच्यात सामाजिक जाणीव असल्याची साक्ष पटते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले. 
मैत्रयुवा फाऊंडेशन तर्फे ‘मैत्रयुवा कट्टा’ बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, रमेश पंडित, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ.सविता केळकर, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देणारी चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली. 
भाऊसाहेब जाधव म्हणाले, परमेश्वराने आपल्याला सगळे काही दिले असूनही आपण इतरांना देण्याऐवजी अपकार किंवा नकारात्मक पद्धतीने काम करण्यापेक्षा आपण सकारात्मक पद्धतीने काम करायला हवे. महाविद्यालयीन तरुणांनी मैत्रयुवा फाऊंडेशनसारखे सामाजिक कार्यात सहभागी व्हायला हवे. तरुणाईची शक्ती चांगल्या कार्यात व समाजासाठी कामी यावी, हा प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
डॉ.सविता केळकर म्हणाल्या, आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो, त्या प्रवासात अनेक जण आपल्यासोबत असतात. तर, अनेकजण आपल्याला मार्गदर्शन देखील करीत असतात. त्यांना आपण विसरता कामा नये. समाजात काम करताना आपण स्वत: आनंद घेताना इतरांना देखील द्यायला हवा. 
संकेत देशपांडे म्हणाले, वंचित व विशेष मुलांसाठी काम करण्याकरिता तरुणाईला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद मिळावा आणि आपले देखील कोणीतरी कौतुक करते, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मैत्रयुवा कट्ट्याच्या माध्यमातून समाजातील दिग्गजांचे विचार व अनुभव तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

कमल व्यवहारेंनी थेट गाठले राहुल गांधींना,म्हणाल्या…

धुळे – पुण्याच्या पहिल्या महिला महापौर,आणि कॉंग्रेसच्या माजी महिला प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेउन् त्यांच्याशी बोलताना महिला यावेळी खंबीरपणे आपल्या पाठीशी आहेत असा विश्वास व्यक्त केला आणि पुण्यातून यावेळी कॉंग्रेसचाच खासदार होईल यासाठी आम्ही पुरेपूर मेहनतीने लोकापर्यंत पोहोचून आपण जाहीर केलेय ५ योजनांची माहिती देऊ असेही म्हटले आहे.या पाच हि योजनांबाबत त्यांनी राहुल गांधी यांचे आभार देखील मानले. कॉंग्रेसने देशाला खूप काही दिले आहे,घडविले आहे हे सांगताना आम्ही कसलीही कमतरता अगर उणीव भासू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.त्यांच्या या वक्तव्याने राहुल गांधी यांनी त्यंना शुभेछ्या दिल्यात.

काँग्रेसने 5 योजना जाहीर केल्या…

1.महालक्ष्मी गॅरंटी : या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल.

2. अर्धी लोकसंख्या-पूर्ण हक्क : याअंतर्गत केंद्र सरकारच्या नवीन नियुक्त्यांमध्ये महिलांना निम्मे अधिकार मिळतील.

3. शक्तीचा सन्मान : या योजनेंतर्गत अंगणवाडी, आशा आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल.

4. अधिकार मैत्री: या अंतर्गत, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि आवश्यक मदत देण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये एक पॅरा-लीगल म्हणजेच कायदेशीर सहायक अधिकारी मित्र म्हणून नियुक्त केला जाईल.

5. सावित्रीबाई फुले वसतिगृह: सर्व जिल्हा मुख्यालयांत नोकरदार महिलांसाठी किमान एक वसतिगृह बांधले जाईल आणि या वसतिगृहांची संख्या संपूर्ण देशात दुप्पट केली जाईल.

मोदी म्हणत ४०० रुपयांचा गैस सिलेंडर महाग खूप , निवडून आल्यावर त्यांनी तो १११० रुपयांवर नेला.. म्हणजे स्वस्त केला काय ? राहुल गांधींचा सवाल

देशातील प्रत्येक गरिब महिलेला वर्षाला एक लाख रुपये, सरकारी नोकरीत ५० टक्केआरक्षण, आशा सेविकांचे मानधन दुप्पट करणार: मल्लिकार्जून खरगे.

हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांतीनंतर ‘महिला न्याय गॅरंटी’ देण्याचे काँग्रेसचे ऐतिहासिक पाऊल: राहुल गांधी

क्रांतीज्योती सावित्रिबाई फुलेंच्या जन्मभूमीतून देशभर प्रत्येक जिल्ह्यात महिला व मुलींचे वसतीगृह उभारण्याची घोषणा.

धुळ्यात भारत जोडो न्याय यात्रेचे भव्य स्वागत, महिला सक्षमिकरणासाठी महिला न्याय हक्क परिषद संपन्न.

धुळे, दि. १३ मार्च

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पाच गॅरंटी जाहीर करत आहेत, यातील तीन गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच गॅरंटी जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय गॅरंटी अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने ५ घोषणा केल्या असून यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला गॅरंटी काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी जाहीर केले.

भारत जोडो न्याय यात्रेच्या महिला हक्क न्याय परिषदेला ॲानलाईन संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, महालक्ष्मी गॅरंटी अतंर्गत देशातील सर्व गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क, अंतर्गत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये ५० टक्के हिस्सा महिलांना दिला जाईल. शक्ती का सम्मान, अंतर्गत आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका आणि मध्यान्न भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे वेतनात केंद्र सरकारचा हिस्सा दुप्पट केला जाईल. अधिकार मैत्री, अंतर्गत महिलांना त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सावित्रिबाई फुले वसतिगृह अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह बांधले जाईल. याआधी काँग्रेस पक्षाने शेतकरी न्याय, युवा न्याय व भागिदारी न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी पोकळ वा जुमले नसतात तर त्या काळ्या दगडावरील रेघ असतात. आमच्या विरोधकांचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा १९२६ पासून जाहिरनामे बनवतो व त्यातील घोषणा पूर्णही करतो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा आणि लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत आमचे हात बळकट करा, असे आवाहनही मल्लिकार्जून खरगे यांनी केले आहे.
महिला हक्क न्याय परिषदेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुमधडाक्यात महिला आरक्षण जाहीर केले, जल्लोषही केला परंतु हे आरक्षण सर्वे केल्यानंतर लागू होईल म्हणजे १० वर्षानंतर परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल. विधानसभा, लोकसभेसह सर्व ठिकाणी महिलांची भागिदारी वाढली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. महालक्ष्मी योजनेचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. नरेंद्र मोदी देशातील अरबपतींना १६ लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष महिलांना मदत करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. महिला न्याय गॅरंटी हे देशाच्या इतिहासात क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्वे करुन प्रत्येक विभागात महिला, दलित, अल्पसंख्याक, मागास समाजाची किती भागिदारी आहे हे तपासणार आहे. काँग्रेसने हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांती करुन इतिहास घडवला आणि आता जातनिहाय जनगणना करून जेवढी लोकसंख्या तेवढी भागिदारी हे सुत्र आमलात आणणार आहे. युपीए सरकार असताना ४०० रुपयांचा गॅस सिलिंडर नरेंद्र मोदींना महाग वाटत होता पण त्यांच्या सरकारने तो ९०० रुपये केला तरीही त्यांना तो महाग वाटत नाही. हिंदुस्थानचे सरकार ९० लोक चालवतात त्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास समाजाचे लोक अत्यल्प आहेत. सर्व क्षेत्रात या समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी आहे आणि हेच चित्र काँग्रेस पक्षाला बदलवायचे असून ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा भागिदारी हे सुत्र लागू करायचे आहे असे राहुल गांधी म्हणाले.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यावेळी बोलताना म्हणला की, काँग्रेस पक्षाने महिलांसाठी नेहमीच काम केले आहे. मॅटरनिटी लिव्ह, हुंडाविरोधी कायदा, कन्या भृण हत्या विरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधातील कायदा असे अनेक कायदे करुन महिला सक्षमिकरणाची पावले उचलली आहेत. महिला सक्षमीकरण करुन त्यांना त्यांचे हक्क देण्याचे काम काँग्रेस करत आहे. आज जाहीर केलेल्या महिला न्याय गॅरंटीचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार असून अलका लांबा यांना महिला न्याय गॅरंटी जाहीर केल्याबद्दल काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

या महिला हक्क न्याय हक्क परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव सोनल पटेल, हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार शिरिष चौधरी, आमदार अमित झनक, भावना जैन, धुळे काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.

सकाळी दोंडाईचा पासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली त्यांनतर धुळ्यातील क्रांती स्मारकाला भेट देऊन राहुल गांधी यांनी अभिवादन केले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित केले दुपारनंतर यात्रेचा पुढचा प्रवास सुरु झाला, मालेगाव येथे जाहीर सभा आणि हॉटेल फाऊंटन मालेगाव येथे यात्रेचा मुक्काम असेल.

पवार कुटुंबाविरुद्ध विजय शिवतारे बारामतीत लोकसभा लढवणार, म्हणाले- पवार विरुद्ध सर्वसामान्य माणूस सामना रंगणार

“मला अजित पवार म्हणाले होते, तू पुन्हा कसा निवडून येतो हे पाहतो. मी कोणाला पाडायचे ठरवले तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही” असा दावा शिवतारे यांनी केला आहे. पुढे शिवतारे म्हणाले, राजकारणात एखाद्याला निवडून आणण्याची सकारात्मक प्रवृत्ती हवी. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, पण वसवायला अनेक लागतात. अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्या उर्मट भाषेसाठी मी माफ केले आहे. ते महायुतीत आल्यानंतर मी त्यांचा सत्कारही केला होता. पण तरीही त्यांची उर्मी तशीच होती,” असे विजय शिवतारे म्हणाले आहेत.

पुणे- माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.पवार विरुद्ध बारामतीमधील सर्वसामान्य माणूस अशी ही निवडणूक असेल. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. देशातील एक मतदारसंघ असून, त्यावर कोणाची मालकी नाही. त्यामुळे स्वाभिमान जागरुक ठेवून लढलं पाहिजे” असे शिवतारे म्हणाले. याशिवाय सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना लोकं मते देऊ इच्छित नाहीत असेही शिवतारे म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आज विजय शिवतारे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत एकमताने विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्तावावर मंजूरी मिळाली. शिवाय बैठकीत पुरंदर आणि हवेली येथील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवतारे माघार घेऊ नका, असा पाठिंबा कार्यकर्त्यांनीही दिला आहे. त्यानंतर आपण बारमती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले.

बारामतीवर कोणाची मालकी नाही, मी लढणार म्हणजे लढणारच असे म्हणत त्यांनो निवडणुकी लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विजय शिवतारे हे बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.त्यामुळे आता बारामतीत पवार कुटुंब विरुद्ध विजय शिवतारे असा सामना रंगणार आहे.

दरम्यान यावेळी बोलतांना विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. “2021 च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता. तो राजकारणाचा भाग होता. पण त्यांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली होती. मी 23 दिवस लिलावतीत दाखल होतो. मला बायपास करायला सांगितली असता मी केली नव्हती. मी रुग्णवाहिकेतून प्रचार केला होता. त्यावेळी मरायला आले असताना कशाला निवडणूक लढवत आहात असे म्हंटले होते. त्यांनी माझ्यावर सहानुभूती मिळवत असून खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर माझ्या गाडीचा नंबर मिळवला होता. अजित पवार खालच्या थराला गेले होते” अशी टीका शिवतारे यांनी केली आहे.

कॉंग्रेसमध्ये हयात गेली,३० वर्षे नगरसेवक म्हणूनच गणना झाली,सरतेशेवटी कामाच्या बळावर लोकसभा मागितली,न्यायाच्या प्रतिक्षेची परिसीमा झाली ?

पुणे-ज्यांनी पक्षांतरबंदी कायदा आणला त्याच कॉंग्रेसने निष्ठावंतांवर अन्याय करून पक्ष बदलून आलेल्यांना पायघड्या टाकू नये अशी मागणी आता रवींद्र धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी आघाडीवर असल्याच्या बातम्यांच्या आधारे केली जाते आहे,निष्ठावंतांवर अन्याय करून अशा पद्धतीने उमेदवारी दिली तर कठीण आहे असाही सूर आवळला जातोय कॉंग्रेस मधील लोकसभा इच्छुकांमधील स्पर्धा आता तीव्र होत असून यात आबा बागुल यांच्यावर पक्षाने अन्याय चालविला असल्याचे वातावरण पसरते आहे.7 वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना नगरसेवकाची,आमदारकीची उमेदवारी मिळाली,पण पक्षात हयात घालविलेल्या,३० वर्षे नगरसेवक राहिलेल्या आबा बागुलांना लोकसभा मागावी लागते आणि तरीही उमेदवारी मिळेना या वातावणामुळे पक्षाच्या मतदारांपर्यंत निष्ठावांतांची पक्षातील दुरवस्था पोहोचू पाहते आहे.

पुण्यात लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ किंवा जगदीश मुळीक यांना भाजपने उमेदवारी दिली तर कॉंग्रेसला पुण्याचा हातून निसटलेला बालेकील्ला सहज पुन्हा मिळविता येईल असे स्पष्ट चित्र असल्याचा दावा सगळीकडून होतो आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल ३० वर्षे नगरसेवक म्हणूनच पक्षात कार्यरत राहिलेले आबा बागुल यांनी आपल्या निष्ठेच्या आणि कामाच्या बळावर लोकसभेसाठी उमेदवारी मागितली आहे आणि त्यांना उमेदवारी मिळाली…आणि आमदार धंगेकर यांच्यापासून शहर अध्यक्ष,माजी शहर अध्यक्ष या सर्वांनी त्यांच्या निष्ठेला साथ दिली तर निष्ठावंतांना कॉंग्रेस पक्ष विसरत नाही त्यांच्या पाठीशी राहतो असाच संदेश जाईल.मात्र कॉंग्रेसचे प्रादेशिक नेते आबा बागुलांच्या पाठीशी का राहत नाहीत ?हे गूढ अद्याप उकलेनासे झाले आहे. धंगेकर यांचे नाव निश्चित होईल असे सांगून त्यामागे जो ‘निवडून येण्याचा ‘निकष लावला जातोय, तोच निकष बागुल यांच्या बाबत मान्य का होत नाही ? असा प्रश्न विचारला जातोय.काँग्रेसकडून कसब्याचे आमदार धंगेकर यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.लोकसभेसाठी ज्यांच्या नावाची जोरदार चर्चा माध्यमातून आणि फलक बाजीतून होते आहे, त्या धंगेकर यांचे नाव लोकसभेसाठी निश्चित झाल्याचे वारंवार सांगितले जातेय,यामुळे तर परंपरागत कॉंग्रेसचे काम करणारे कॉंग्रेसचे कार्यकर्ते हतबल झालेत.आणि ‘या पक्षात आता जे जे होईल तेते पाहतच कुठवर बसायचे ?’ असा सवाल विचारला जात असताना मोहन जोशींनी मोरेंची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली गेली. आणि धंगेकर यांचे नाव आघाडीवर असताना लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहन जोशी यांनी मनसे तून बाहेर पडलेल्या माजी नगरसेवक मोरे यांची भेट घेतली आणि हि भेट त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी घेतली गेल्याची अफवा जोरदारपणे पसरली,आपण भेट घेतली पण यात लोकसभाच काय विधानसभेच्या उमेदवारीचा देखील काही संबध नाही,कात्रजमध्ये ते कॉंग्रेस वाढवू शकतील काय ? या विचाराने आपण मोरेंची भेट घेतल्याचा दावा मोहन जोशींनी केला तर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले त्यांनी लोकसभेचे काही बोलणे केले असेल तर ते कशाच्या आधारे केले याबाबत माहिती घ्यावी लागेल, मात्र स्थानिक अध्यक्ष म्हणून याबाबत आपल्याशी काहीही बोलणे झालेले नही अगर आपणास काहीही माहिती नाही.दरम्यान मोहन जोशी,अरविंद शिंदे,अभय छाजेड हे निष्ठावंतच आहेत आणि तेही लोकसभेच्या उमेदवारीच्या स्पर्धेत आहेतच प्रादेशिक नेते आणि दिल्लीश्वर कुणाच्या पारड्यात ‘न्याय’ टाकतात हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’

अहमदनगर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रवासियांच्या इच्छेची पूर्तता
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि. 13 :- अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

एमएमटीसी- पॅम्पतर्फे राम लल्ला सिल्व्हर बार लाँच – भक्तीचे अनोखे प्रतीक

·         राम लल्ला ५० ग्रॅम सिल्व्हर बार, ९९.९९+ टक्के शुद्धतेसह, नवीन राम लल्ला मूर्तीच्या प्रतिमेसह, पाठीमागे राम मंदिराची प्रतिकृती कोरलेली.

·         हे नवे उत्पादन एमएमटीसी- पॅम्पची भक्तांना प्रभू श्रीरामाप्रती आपली भक्ती शुद्ध चांदीतून व्यक्त करण्याची संधी मिळवून देण्याची बांधिलकी दर्शवणारे

मुंबई एमएमटीसी- पॅम्प पॅम्प या भारतातील एकमेव लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (एलबीएमए) गुड डिलीव्हरी सोने आणि चांदी रिफायनरीला , ९९.९९+ टक्के शुद्धतेसह, राम लल्ला ५० ग्रॅम सिल्व्हर बार लाँच करताना अभिमान वाटत आहे. हे खास तयार करण्यात आलेले बार प्रभू श्रीरामाप्रती भक्ती दर्शवणारे असून त्यावर पुढील बाजूस राम लल्लाची मूर्ती रंगीत थ्रीडीमध्ये कोरण्यात आले असून मागील बाजूस प्रसिद्ध राम मंदिर आहे.

जगभरातील लाखो भक्तांसाठी प्रभू श्रीराम श्रद्धेचं स्थान आहेत. भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले गेलेले प्रभू श्रीराम सत्य, न्याय आणि नैतिक सचोटीचे प्रतीक आहेत. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे त्यांचा असामान्य प्रवास हा चांगुलपणाने वाईटावर केलेला विजय असून तो विश्वास व भक्तीची ताकद दाखवणारा आहे.

या घोषणेविषयी एमएमटीसी- पॅम्पचे प्रवक्ते म्हणाले, राम मंदिर आणि पवित्र राम लल्ला मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने संपूर्ण भारत आनंदित झाला असून या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने राम लल्ला सिल्व्हर बार लाँच करताना एमएमटीसी- पॅम्पला अभिमान वाटत आहे. शुद्ध चांदीत बनवण्यात आलेले खास डिझाइन, स्विस कारागिरी आणि प्रतिकात्मता यामुळे हा सिल्व्हर बार प्रभू श्रीरामांच्या अवताराला आदरांजली वाहाणारा आणि सत्य आणि स्वर्गीय शांतीचा संदेश देणारा आहे.

राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा समारंभात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीत प्राण फुंकण्यात आले व हा क्षण हिंदू दिनदर्शिकेत सर्वात महत्त्वाचा ठरला. हा अध्यात्मिक प्रबोधनाचा काळ असून या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्र येऊन आपल्या आवडत्या दैवतेची सेवा करत समृद्धी, शांतता व एकोप्यासाठी त्याचे आशीर्वाद मागत आहेत.

एमएमटीसी- पॅम्प राम लल्ला सिल्व्हर बार या पवित्र सोहळ्याचे स्मरण करून देणारा, भक्तांना त्यांच्या भक्तीचे जवळ ठेवण्याजोगे प्रतीक मिळवून देणारा आहे. हा बार ९९.९९+ टक्के शुद्ध चांदीत आणि नाजूक कलाकुसरीत तयार करण्यात आलेला असून ग्राहकांना प्रत्येक बारचे मूल्य व अस्सलपणा सहज लक्षात येईल. राम लल्ला सिल्व्हर बार भक्ती व अध्यात्माचे कालातीत चिन्ह असून स्मरणचिन्ह म्हणून ठेवण्यासाठी व पिढ्यानपिढ्या जपण्यासाठी योग्य आहे.

राम लल्लाची संपूर्ण प्रतिमा या बारवर असून भगवान विष्णूच्या १० अवतारांचे तपशील तसेच हनुमान व गरूडाची प्रतिमाही आहे. ही चिन्हे प्रभू श्रीरामांच्या लाखो भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. ही भावना जपणाऱ्या या सिल्व्हर बारच्या मागील बाजूस राम मंदिराची रंगीत प्रतिमा कोरण्यात आली आहे.

एमएमटीसी- पॅम्पतर्फे तयार करण्यात आलेले प्रत्येक उत्पादन शुद्धीकरणाची कठोर प्रक्रिया करून ९९९.९+ शुद्धतेची खात्री केली जाते. एमएमटीसी- पॅम्पच्या प्रत्येक उत्पादनावर एक अनोखा क्रमांक दिलेला असतो व ते असेयर प्रमाणित मिंटेड कार्डमध्ये पॅक केलेले असते.

एमएमटीसी- पॅम्पकडून खरेदी केलेले सोने व चांदीच्या प्रत्येक उत्पादनाचा वेट टॉलरन्स पॉझिटिव्ह असल्यामुळे प्रत्येक नाणे किंवा बारचे वजन नोंदवलेल्या वजनापेक्षा जास्त असते. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचे जास्त मूल्य मिळते.

शॅम्पेन व्हाइट गाऊनपासून रफल्ड मिनी ड्रेसपर्यंत सनी लिओनी

शॅम्पेन व्हाइट गाऊनपासून रफल्ड मिनी ड्रेसपर्यंत अभिनेत्री सनी लिओनीने स्प्लिट्सविला X5 साठी केले स्टायलिश स्टेटमेंट सेट
 अभिनेत्री सनी लिओनी स्प्लिट्सविला X5 च्या आगामी सीझनचे होस्ट करण्यासाठी सज्ज आहे आणि प्रेक्षकांना या शो बद्दल खूप उत्सुकता देखील आहे. सनीने Splitsvilla X5 साठी तिच्या OOTD स्टेटमेंटमध्ये काही खास फॅशन गेम सेट केले आहेत.

 लॅव्हेंडर पँटसूटमध्ये या लॅव्हेंडर आउटफिटमध्ये सनी लिओनी उठून दिसत आहे. ज्यामध्ये तिने अंगठ्या, ब्रेसलेट आणि आकर्षक कानातले घातले आहेत. आकर्षक सॉफ्ट ग्लॅम लुकसह, सनी लिओन पूर्णपणे ‘गुड व्हाइब्स ऑन टाइड्स’ मध्ये तिचा हा लूक छान दिसतोय. 
https://www.instagram.com/reel/C4SQPYbqr7L/?utm_source=ig_web_copy_link

 स्कर्ट आणि क्रॉप टॉप : या मिनी स्कर्ट आणि स्लीव्हलेस क्रॉप टॉपमध्ये सनी सुंदर दिसत आहे. 

https://www.instagram.com/reel/C4KXFSKKxYe/?utm_source=ig_web_copy_link

 द पीच ब्लश सनी लिओनीने नेटके लूक असलेल्या या ड्रामाटिक टॉपने ती तुफान व्हायरल होत आहे. 
https://www.instagram.com/reel/C3hQnsNq-fL/?utm_source=ig_web_copy_link

 लाल रफल्ड फ्लेअर्स रेड वाईन कलरच्या या मिनी ड्रेसमध्ये सनी अतिशय आकर्षक दिसत आहे. रफल्ड एकतर्फी खांदा त्याच्या शैलीसाठी लक्ष केंद्रीत झाला तर सनीने साध्या सोनेरी हूप्ससह तिच्या लूकमध्ये ओम्फ जोडले. आम्ही तिचा हा पोशाख आमच्या वॉर्डरोबमध्ये पूर्णपणे जोडत आहोत! 

https://www.instagram.com/reel/C3R2vKPtLJ3/?utm_source=ig_web_copy_link

 शॅम्पेन व्हाईट गाऊन आकर्षक शॅम्पेन पांढऱ्या गाउनमध्ये चमकणाऱ्या, सनीने रॉयल वाइब्स दिसल्या. 
https://www.instagram.com/reel/C3zNDDBqik5/?utm_source=ig_web_copy_link

युवक क्रांती दलातर्फे ‘वेध लोकसभा निवडणुकीचा’ व्याख्यान,१७ मार्च रोजी गांधी भवन येथे आयोजन

  पुणे : युवक क्रांती दलातर्फे पत्रकार अशोक वानखेडे यांच्या ‘वेध लोकसभा निवडणुकीचा’ या व्याख्यानाचे आयोजन रविवार,दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.हे व्याख्यान गांधी भवन(कोथरूड) येथे होणार असून अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी असणार आहेत.युवक क्रांती दलातर्फे कार्यवाह जांबुवंत मनोहर,मुस्कान परवीन बाबासाहेब,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे या कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.  

‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेख यांच्यात करार

‘पुनीत बालन ग्रुप’ करणार खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत

३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची होणार मदत

पुणे –
‘पुनीत बालन ग्रुप’ आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात नुकताच परस्पर सामंजस्य करार झाला असून ‘पुनीत बालन ग्रुप’ महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. या करारानुसार पुनीत बालन ग्रुप सिकंदर शेखला ३ वर्षांसाठी ४५ लाख रुपयांची मदत करणार आहे.

देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ कायमच विविध खेळाडूंच्या पाठीशी उभा राहिलेला आहे यापूर्वी देखील अनेक खेळाडूंसोबत करार करून पुनीत बालन ग्रुपच्यावतीने त्यांच्या करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. नुकताच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेते ठरलेल्या आणि राज्यभर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये आपली विजयी घोडदौड कायम असलेला सिकंदर शेखचा यांच्या करिअरसाठीही हातभार लावण्याचा निर्णय पुनीत बालन ग्रुपने घेतला आहे. त्यानुसार युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या वतीने नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सिकंदर शेख यांनाही खेळातील करिअरसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर सिकंदर शेख यांचेक आता हिंद केसरी होण्याचे आणि ऑलम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या या स्वप्नाला पूर्ततेची सोनेरी झालर लावण्यासाठी या सहकार्याचा निश्चित उपयोग होईल.

सिंकदर शेख यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूला ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून आम्ही आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं त्यांचं हिंद केसरी होण्याचं आणि ऑलम्पिक स्पर्धेतून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल. या माध्यमातून महाराष्ट्राचं नाव देशात आणि जगातही झळकेल आणि हाच ‘पुनीत बालन ग्रुप’साठी मोठा सन्मान ठरेल.
– पुनीत बालन, युवा उद्योजक