पुणे, दि. १३ : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विविध योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता ११ ऑक्टोबर २०२३ पासून https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीमध्ये संकेतस्थळावर भरून त्याची प्रत संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावेत.
महाविद्यालयात प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी घ्यावी. पुणे जिल्ह्यातील महाविद्यालय स्तरावर ५ हजार ४३ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आहे.
विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालयावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.