मैत्रयुवा फाऊंडेशन तर्फे ‘मैत्रयुवा कट्टा’ बोधचिन्ह अनावरण
पुणे : आजची तरुणाई भरकटलेली आहे, असे बोलले जात असनाच, मैत्रयुवा फाऊंडेशनसारख्या अनेक संस्थांचे चांगले व वेगळे काम करीत आहेत. मैत्रयुवा कट्टा सारख्या तरुणाईच्या कट्ट्यांवरुन साहित्य व संस्कृती सह मूल्यभान जपण्याचे काम केले जात आहे. दिव्यांगांसह वंचितांसाठी सुरु असलेले तरुणाईचे काम पाहून त्यांच्यात सामाजिक जाणीव असल्याची साक्ष पटते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
मैत्रयुवा फाऊंडेशन तर्फे ‘मैत्रयुवा कट्टा’ बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा मित्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, रमेश पंडित, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ.सविता केळकर, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देणारी चित्रफित उपस्थितांना दाखविण्यात आली.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, परमेश्वराने आपल्याला सगळे काही दिले असूनही आपण इतरांना देण्याऐवजी अपकार किंवा नकारात्मक पद्धतीने काम करण्यापेक्षा आपण सकारात्मक पद्धतीने काम करायला हवे. महाविद्यालयीन तरुणांनी मैत्रयुवा फाऊंडेशनसारखे सामाजिक कार्यात सहभागी व्हायला हवे. तरुणाईची शक्ती चांगल्या कार्यात व समाजासाठी कामी यावी, हा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
डॉ.सविता केळकर म्हणाल्या, आपण यशाच्या शिखरावर पोहोचतो, त्या प्रवासात अनेक जण आपल्यासोबत असतात. तर, अनेकजण आपल्याला मार्गदर्शन देखील करीत असतात. त्यांना आपण विसरता कामा नये. समाजात काम करताना आपण स्वत: आनंद घेताना इतरांना देखील द्यायला हवा.
संकेत देशपांडे म्हणाले, वंचित व विशेष मुलांसाठी काम करण्याकरिता तरुणाईला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद मिळावा आणि आपले देखील कोणीतरी कौतुक करते, ही भावना त्यांच्यापर्यंत पोहोचावी, याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मैत्रयुवा कट्ट्याच्या माध्यमातून समाजातील दिग्गजांचे विचार व अनुभव तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न फाऊंडेशन करीत आहे. भविष्यात देखील असे उपक्रम राबविले जाणार आहेत.