Home Blog Page 1147

केजरीवालांच्या अटकेचे परिणाम भाजपाला निवडणुकीत भोगावे लागतील -शरद पवार

पुणे– प्रत्येक राज्याच्या मंत्रिमंडळाला मद्य धोरण निश्चित करण्याचा अधिकार असतो. त्यानुसारच अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचे प्रमुख म्हणून धोरण निश्चित केले, असे शरद पवार म्हणाले. सरकारी यंत्रणांचा वापर करून लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम यापूर्वी कधी घडले नव्हते, असा दावाही त्यांनी केला.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मद्य धोरणाबाबत केजरीवालांवर टीका केली आहे. पण पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याची वेगवेगळी धोरणे ठरवणारी अधिकृत यंत्रणा असते. त्या धोरणात काही चुकले असेल तर लोकांसमोर जायला पाहिजे. निवडणुकीमध्ये मुद्दे उपस्थित करायला पाहिजेत.

कायदेशीरदृष्ट्या काही गैर असेल तर कोर्टामध्ये गेले पाहिजे. मात्र तसे न करता त्यांना अटक केली. केजरीवाल सामान्य कुटुंबातील आहेत. ते पण तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना ९० टक्के मते मिळाली आहेत.त्यामुळे चांगल्या माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार गाजवू देत नाही. हे लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेच्या कारवाईचा शंभर टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे. मागील विधानसभेला भाजपच्या दोन तरी जागा आल्या होत्या. पुढच्या वेळी त्याही येणार नाहीत, अशी परिस्थिती आहे, असेही पवार म्हणाले.

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई

विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार : मुरलीधर मोहोळ

पुणे : गेल्या दहा वर्षांमधील कामगिरी पाहता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत, अशी संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य लोकांची भावना आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एक मत देण्याचा निश्चय प्रत्येक पुणेकराने केला आहे. ही देशाची निवडणूक आहे, मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत असून विकासकामांच्या जोरावरच निवडणूक लढवणार आहोत, असे पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज येथे केले.

पुण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ते म्हणाले ”पुणेकर सूज्ञ आहेत. पुण्याच्या निवडणुकीचा निकाल देशाचा पंतप्रधान कोण असणार, हे ठरवणार आहे. विधानसभा पोटनिवडणूक आणि देशाच्या लोकसभेची निवडणूक याचे संदर्भ पूर्णपणे वेगळे असतात. आज त्यांच्या पक्षाला जो योग्य उमेदवार वाटला, तो त्यांनी दिला. माझ्या पक्षाला माझे नाव योग्य वाटले म्हणून मला उमेदवारी दिली आहे. महायुतीची आणि महाविकास आघाडीची निवडणूक आहे असे न पाहता मोदींची निवडणूक आहे, या दृष्टीने आम्ही पाहत आहोत.

किती मताधिक्याने निवडून याल? ही निवडणूक एकतर्फी आहे का? असे विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘एकतर्फी लढाई होणार, हे पुणेकरांनी ठरवले आहे. आपण पत्रकार सर्वत्र फिरत असतात आपणही याचा कानोसा घ्यावा. आकड्यात मी जाणार नाही, भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी पुणेकर उभा राहतील हा विश्वास आहे’.

त्यांचा राहुल गांधींवर विश्वास नसावा’

मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे फोटो वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु असून यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता मोहोळ म्हणाले ” मीही ते पाहिले. मला त्याचे हसू आले. कदाचित, त्यांचा त्यांचे नेते राहुल गांधींवर विश्वास नसावा, म्हणून त्यांनी बापट यांचा फोटो वापरला.

मताधिक्य राखणे ही खा. गिरीश बापटांना श्रद्धांजली

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी विक्रमी मताधिक्य घेत विजय संपादन केला होता. ते मताधिक्य कायम राखणे, हीच खरी खा. बापट यांना श्रद्धांजली असेल’, असेही मोहोळ म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्याकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

पुणे, दि. २२: जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मतदानाच्यावेळी उन्हापासून संरक्षणासाठी करावयाच्या व्यवस्थेबाबत माहिती घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उप व्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समन्वयक अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, स्थिर आणि भरारी पथकांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास त्वरीत गुन्हे दाखल करून अहवाल सादर करावा. मतदानासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या प्रशिक्षणाला विशेष महत्व द्यावे. कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचे सविस्तर प्रशिक्षण मिळेल यादृष्टीने नियोजन करा आणि त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईपर्यंत प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण द्यावे.

नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या दिनांकापर्यंत मिळालेला अवधी कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी उपयोगात आणावा. कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरुप सूक्ष्मरितीने समजावून द्यावे, त्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी समन्वयक अधिकाऱ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी मनुष्यबळ व्यवस्थापन, ईव्हीएम यादृच्छीकरण, मतदान कर्मचाऱ्यांचे मतदान, मतदान साहित्य वाटप, वाहतूक आराखडा आदींबाबत आढावा घेण्यात आला.

निवडणूक कालावधीत दुष्काळसदृश परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता आवश्यक उपययोजना तात्काळ कराव्यात असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

रायगडावर माथा टेकवून लोकशाहीसाठी लढ्याला प्रारंभ -धंगेकर

पुणे-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर जावून काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आज महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. ही प्रेरणा देणारी, ऊर्जा देणारी आणि विजयाचे प्रतिक असलेली भूमी आहे, असे ते म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास जागवणारे हे ऊर्जा स्थळ आहे. येथे येवून नेहमीच प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा घेवून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरत आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा इथे येवून आम्ही माथा टेकवून महाराजांचा आशीर्वाद घेवू, असा निश्चय रवींद्र धंगेकर यांनी केला.

छत्रपतींच्या घराण्यातील आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हेही या निवडणुकीत आमच्यासोबत आहेत. त्यांचाही आम्हाला आशीर्वाद लाभला आहे. जनताही भरभरून आशीर्वाद देईल, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.रवींद्र धंगेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरोधात लढा देऊन स्वराज्य स्थापन केले. रयतेचे हित साधले. सर्वसामान्यांचे कल्याण केले. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेसाठी लढा देत समाजाची सेवा केली. समाजसुधारकांचे, संतांचे कार्य जनसेवा करताना कायम स्फूर्ती देणारे आहे.

देशात हुकूमशाही, अराजकता सुरू आहे. आपल्याला लोकशाही वाचविण्यासाठी लढायचे आहे. भाजपच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. हे चित्र बदलण्यासाठी जनतेने इंडिया आघाडीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती: नाना पटोले

2024 ची लढाई संविधान आणि लोकशाही वाचवण्याची

मुंबई दि. 22 मार्च 2024

लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या असताना विरोधकांशी सरळ दोन हात करण्याची हिम्मत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यात नाही म्हणून ते रडीचा डाव खेळत आहेत. पराभवाच्या भितीने घाबरलेले नरेंद्र मोदींनी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. याचाच भाग म्हणून झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवता येऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाची खाती गोठवली आहेत. मोदी सरकारने फक्त काँग्रेसची खाती नाही तर या देशातील लोकशाही गोठवली असून वन नेशन, वन इलेक्शन, नो अपोझिशन ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार चीन व रशियाच्या मॉडेलनुसार काम करत असून त्यांना देशात फक्त एकच पक्ष हवा आहे त्यांच्या या मॉडेलमध्ये विरोधी पक्षाला स्थानच नाही म्हणून ते विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ते आपली पूर्ण ताकद लावून संविधानिक संस्था आणि तपासयंत्रणांचा गैरवापर करत आहेत. भाजपाचा कार्यकर्ता आयकर विभागाने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा कपटी डाव खेळला आहे. भारतीय जनता पक्षासह कोणताही राजकीय पक्ष इन्कम टॅक्स भरत नाही. असे असताना फक्त काँग्रेस पक्षावरच आयकर विभागाने कारवाई करून 11 बँक खाती का गोठवली? काँग्रेसवर जशी कारवाई केली तशी भारतीय जनता पक्षावर कारवाई करण्याची हिम्मत या इन्कम टॅक्स विभागाने का दाखवली नाही ? 2017-18 साली काँग्रेस पक्षाला मिळालेल्या 210 कोटी देणग्यांचा मुद्दा आहे. काँग्रेस खासदारांनी पक्षाला 14 लाख 49 हजार रुपये रोख दिले आहेत, हे कारण दाखवून इन्कम टॅक्स विभागाने 106% दंड लावून काँग्रेस पक्षाच्या खात्यातून 115 कोटी रुपये जबरदस्तीने काढून घेतले आहेत.

यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे.. टायमिंग.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाला पुढे करून काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून आर्थिक कोंडी केली आहे. पक्षाकडे निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पैसे नाहीत. 1993-94 साली सिताराम केसरी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते त्यावेळच्या देणग्यासाठी आता 31 वर्षानंतर इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. राजकीय पक्ष इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाहीत हे मोदींना माहित आहे. भाजपने कधी इन्कम टॅक्स भरला आहे का? असा सवाल करून मोदी सरकार किती खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहे हे दिसते, काँग्रेस पक्ष याप्रश्नी कोर्टात जाईल पण तोपर्यंत लोकसभा निवडणुका संपतील, असे पटोले म्हणाले.एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे इलोक्टोरल बाँड मधून भाजपा मात्र कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल करत आहे. नरेंद्र मोदी या बाँडच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे खंडणीचे रॅकेट चालवत आहेत. इलोक्टोरल बाँडच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या बहुतेक कंपन्या बोगस आहेत. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाचे छापे टाकून कंपन्यांकडून जबरदस्तीने खंडणी गोळा केली आहे. लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत पण मोदी सरकार विरोधकांना संपवत आहेत. भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव होत असल्याचे चित्र देशात स्पष्ट दिसत आहे म्हणूनच मोदी-शाह टोळीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदी सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. हुकूमशहाचा अंत जवळ आला आहे तशी शेवटची धडपड सुरु झाली आहे पण जनता या हुकूमशाहीचा अंत करुन लोकशाही व्यवस्थेचे सरकार देशात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खासदार प्रज्ञा ठाकूर कोर्टात हजर, जामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबई: भोपाळच्या भाजप खासदारासमोर हजर राहिल्यानंतर येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले.

सप्टेंबर 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ठाकूर याच्या विरोधात कोर्टाने 11 मार्च रोजी 10,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले होते, वारंवार चेतावणी देऊनही न्यायालयात हजर न झाल्याबद्दल जारी केलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले

विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी त्या वेळी ठाकूर यांना २० मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते, परंतु ती येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल असल्याचा दावा करत ती तसे करू शकली नाही.

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी

पुणे, दि. २२: गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो बांधकाम काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द करून गणेशखिंड रोड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) यांनी प्रायोगित तत्वावर तात्पुरते आदेश जारी केले आहेत.

पुणे विद्यापीठ चौकामधुन गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून सेनापती बापट रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून पर्यायी मार्गाने जावे.

शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्यावर येणाऱ्या रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेंज हिल्स् कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून रेंज हिल्स् कॉर्नर येथून डावीकडे वळण घेवून रेंज हिल्सकडे पर्यायी मार्गाने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून औंध, सांगवी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औंध रोडवरून प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकामधून बाणेर रस्त्याने जावे व राजभवनच्या पाठीमागील बाजुस यु-टर्न घेवून पुणे विद्यापीठ चौकामध्ये यावे व डावीकडे वळण घेवून औंध रोडने जावे.

पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाणेर रोडवरून प्रवेश बंद राहणार असून वाहनचांलकांनी पुणे विद्यापीठ चौकातून डावीकडे वळणे घेवून पाषाण रोडने अभिमानश्री जंक्शन येथून उजवीकडे वळण घेवून बाणेर रस्त्याला येवून बाणेरकडे जावे. बाणेर व औंध रस्त्यावरून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या वाहतुकीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स, कंटेनर्स यांच्यासाठी २४ तास प्रवेश बंद
गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते पुणे विद्यापीठ चौक, औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक व सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीएट हॉटेल चौक ते पुणे विद्यापीठ चौजक या मार्गावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स व कंटेनर्स यांना २४ तास प्रवेश बंदी राहील.

भाजीपाला वाहतूक करणारे तीनचाकी पिकअप, तीनचाकी, चारचाकी मालवाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने तसेच डंपर, मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर कमी वेगाने चालणारी वाहने व इतर वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान वा. दरम्यान प्रवेश बंद राहील, असेही पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

इतर शहरातून पुण्यामार्गे दुसऱ्या शहराकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल

पुणे, दि. २२: पुणे शहरातून सोलापूर रस्ता, अहमदनगर रस्ता, सातारा रस्ता, मुंबई रस्ता, नाशिक रस्ता, सासवड रस्ता, पौड रस्ता, आळंदी रस्ता व इतर रस्त्यांवरून शहरात मार्गक्रमण करून दुसऱ्या शहराकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणारे ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास २३ मार्च पासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे. यासंबंधीचे पूर्वीचे आदेश रद्द करून प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ, वाहतूक कोंडी, जड वाहनांमुळे अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकास कामे सुरु असल्यामुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले व रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत प्रवेश असणारे मार्ग
अहमदनगर रस्त्यावरून पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पुल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद राहील. वाहनचालक शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील. अहमदनगर रस्त्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालक लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजूरी या पर्यायी मार्गानी इच्छितस्थळी जातील.

अहमदनगर रस्त्यावरून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरिता खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद राहील. वाहनचालक शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्यावरून साताराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मंतरवाडी फाटाचौक, खडी मशीनचौक, कात्रजचौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी केडगाव चौफुला, लोणंद या पर्यायी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

सोलापूर रस्त्यावरून अहमदनगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार असून वाहनचालकांनी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापुर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर मार्गे इच्छितस्थळी जावे.

शहरातील अंतर्गत रस्त्यावर जड, अवजड वाहनांसाठी २४ तास प्रवेश बंद
पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर २४ तास प्रवेश बंद राहील. सार्वजनिक वाहतूकीच्या बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहने यातून वगळण्यात आली आहेत.

सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक
संचेती चौकावरील जंगली महाराज रोड, गणेशखिंड रोड, पौड फाटा चौकवर कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोड, राजाराम पुलावरून डी. पी. रोडकडे जाणारी, दांडेकर पुल-शास्त्री रोडकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे, पॉवर हाऊस चौक-मालधक्का चौकाकडे, पोल्ट्री फार्मचौक-आर.टी.ओ. चौकाकडे, पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे, खाणे मारूती चौक-इस्ट स्ट्रीटकडे, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे, ब्रेमेन चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री बाणेर चौक पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमान श्री पाषाण चौक- पुणे विद्यापीठ चौकाकडे, सिंफनी सर्कल गणेशखिंड रोडकडे, सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, वल्फर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत कोरेगाव पार्क रोड-नॉर्थ मेन रोड ताडीगुत्ता चौक ते कोरेगाव पार्क जंक्शन या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंद असेल.

अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी कळविले आहे.

साप्ताहिक अयोध्या सुपरफास्ट ट्रेन रोज चालवण्याची मागणी

मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेकडे केली मागणी

मुंबई दिनांक २२ मार्च २०२४
अयोध्या धाममध्ये प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारल्यानंतर प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्या धामकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने दर्शनासाठी प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी रेल्वे क्रमांक 22103 अयोध्या कॅन्टोन्मेंट सुपरफास्ट साप्ताहिक गाडी नियमितपणे रोज चालवावी अशी मागणी मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेचे व्यवस्थापक राम करण यादव यांना पत्राद्वारे केली आहे. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.

मुंबईतून अयोध्येसाठी रोज गाडी सुरू झाल्यास लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एसी/स्लिपर कोचमध्ये वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. यावेळी डॉ. रमाशंकर भारतीय, आर.डी. यादव, सुरेश पाल, दीपनारायण मिश्रा, अभय झा, दयाशंकर यादव, कृपाशंकर दुबे, ब्रिजेश पाल आदी उपस्थित होते.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांची खाती गोठवणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार- पृथ्वीराज चव्हाण

मर्जीतील निवडणूक आयुक्त,विरोधकांची बेकायदा कोंडी तरीही चित्र तेच,’ आत्मविश्वास गमावलेले मोदी’

पुणे : कर चुकवेगिरीच्या प्रकरणाचा त्वरीत निकाल लावावा ही आमची मागणी नाकारली जात आहे. संबधित यंत्रणेने आमची खाती गोठवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायिक प्रकरणांमध्ये काँग्रेसला अडकवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

काँग्रेस भवनमध्ये चव्हाण यांनी या विषयावर पत्रकारांबरोबर संवाद साधला. पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कर चुकवला म्हणून काँग्रेसवर वेगवेगळ्या खात्यांची कारवाई सुरू आहे. काँग्रेसने याबाबत संबधित प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे, मात्र निकाल न देता त्यांनी काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत.

चव्हाण म्हणाले, यातील एक प्रकरण ९ वर्षांपूर्वीचे तर दुसरे तब्बल ३० वर्षांपूर्वीचे आहे. जमा न केलेला कर भरण्यास काँग्रेस तयार आहे, मात्र ती रक्कम दंड लावून अवाजवी वाढवण्यात आली आहे. आम्ही प्राधिकरणाकडे दाद मागितली, मात्र त्यांनी खाती गोठवण्याची कारवाई केली. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली तर न्यायालयाने प्रथम प्राधिकरणाचा निकाल येऊ द्या, मगच आमच्याकडे या असे सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रकार आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर

भारतीय जनता पक्ष त्यांचा जिंकण्याचा आत्मविश्वास हरवून बसला आहे. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर, बेकायदेशीर कारवाया, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना कारवाईची धमकी देऊन पक्षात घेणे असे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही देशभरात निवडणूक लढ‌तो आहोत, अशा स्थितीत खातीच गोठवून ठेवली तर आम्ही करायचे तरी काय असा प्रश्न चव्हाण यांनी केली. साधा १० रूपयांचा धनादेशही आम्ही आज वटवू शकत नाही, उमेदवारांना आर्थिक मदत करणे तर दूरच, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार नाही तर दुसरे काय आहे असे चव्हाण म्हणाले.

निवडणूक रोख्यांचा कायदा करून तिजोरी भरली-

देशाला याची कल्पना यावी यासाठी काँग्रेस देशस्तरावर या विरोधात आवाज उठवत आहे. त्यांना जिंकून येण्याची खात्री नाही, आम्हाला जनतेचे पाठिंबा मिळेल याची भीती आहे, त्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू आहे. आम्हाला निवडणूक लढवताच येऊ नये अशी स्थिती करून ठेवली आहे. स्वत: भाजपने मात्र निवडणूक रोख्यांचा कायदा करून स्वत:ची तिजोरी भरून घेतली आहे. आम्ही या कायद्याला सुरूवातीपासून विरोध केला, मात्र पाशवी बहुमतावर त्यांनी तो मंजूर करून घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने हा कायदाच घटनाबाह्य ठरवला आहे असे चव्हाण यांनी सांगितले.

आम्ही लढाई लढतोच आहे, मात्र प्राधिकरणाचा निकाल, त्यानंतर न्यायालयात दाद या सगळ्यात निवडणुका संपतील. तेच त्यांना अपेक्षित आहे, मात्र आता जनतेनेच आता याविरोधात आवाज उठवावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. ही लोकसभा निवडणूकच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठीची आहे असे समजूनच आम्ही लढतो आहोत, जनतेने पाठिंबा द्यावा असे ते म्हणाले.

बहुतेक अधिकारी नवीन -कामकाजावर परिणाम

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका लागला आहे. राज्य सरकारने परिमंडळाचे उपायुक्त संतोष वारुळे, आशा राऊत आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे यांची बदली केली. महापालिकेत ३१ मार्चपूर्वी कामे संपविण्याची गडबड सुरु असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.एका जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा जास्त नोकरी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आज वारुळे, राऊत आणि केरूरे यांची बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे. सध्या रवींद्र बिनवडे हे जुने अतिरिक्त आयुक्त आहे. आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच महापालिकेचा कार्यभार स्वीकारला असून, सध्या ते विभागनिहाय माहिती घेत आहेत.
३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असताना ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले मंजूर करून पैसे जमा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका भवनात गडबड सुरु आहे. पण प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण त्याचा परिणाम कामकाजावर झाला आहे.राजेंद्र भोसले यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी विभागप्रमुखांनी बैठक घेऊन शहरातील कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील किरकोळ स्वरूपाची माहिती मागितली असता अधिकाऱ्यांना ही सांगता आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करत कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले.

भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू – हर्षवर्धन पाटील

‘ॲग्रीवाईस – २४’ राष्ट्रीय परिषद पीसीईटीच्या पुणे बिझनेस स्कुलमध्ये संपन्न;
देशभरातील पाचशे संस्थांमधील एक नऊशे प्रतिनिधींचा सहभाग

पिंपरी, पुणे (दि. २२ मार्च २०२४) भारतात शेती व्यवसाय आजही उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय ठेवले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन शेती धोरणामुळे २०४७ पर्यंत भारतातील शेती उद्योग जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहचू, असा विश्वास नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पुणे पब्लिक स्कूल (पीबीएस) च्या वतीने ‘ॲग्री वाईस २४’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.यावेळी दीपक फर्टिलायझर्स ॲण्ड पेट्रोकेमिकल्स लि. चे सहयोगी उपाध्यक्ष मनिष गुप्ता, जे. के. सीडसचे व्यवस्थापक किशोर अहिरे, पीबीएसचे प्राचार्य डॉ. गणेश राव, अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी आदी उपस्थित होते. देशभरातील पाचशे संस्थांमधील नऊशे विद्यार्थी, प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सध्या शेतकरी शेतीमाल उत्पादन करताना रासायनिक खते, कीटकनाशके यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. परंतु याचा विपरित परिणाम पिकांवर होऊन उत्पादन कमी होते. शेतकऱ्यांनी शाश्वत, नैसर्गिक शेती केली आणि एक उद्योग म्हणून याकडे पाहिले तर अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळू शकतो.‌ त्यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असे किशोर अहिरे यांनी सांगितले.
भारतात सरासरी ८७ टक्के पाणी शेतीसाठी, अकरा टक्के पाणी दैनंदिन वापरासाठी तर दोन टक्के पाणी औद्योगिक क्षेत्राला वापरले जाते. म्हणजेच शेतीसाठी पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच रासायनिक खते मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र त्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन होत नाही. पाणी आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला पाहिजे. माती परीक्षण करून कोणती पिके घ्यावीत याविषयी माहिती घेतली पाहिजे, असे मनिष गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान सकाळच्या सत्रात पशुसंवर्धन सहआयुक्त शितलकुमार मुकणे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कोरोमंडल इंटरनॅशनल लि. चे सहयोगी उपाध्यक्ष जितेंद्र कोळपे, पीआय इंडस्ट्रीज लि.चे उपव्यवस्थापक प्रवीण जाधव, महिको चे राष्ट्रीय विक्री व्यवस्थापक श्रीकांत शिवले यांनी शेती उद्योगातील नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, विविध प्रश्न, अडचणी, सुधारित बियाणे आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. आभार डॉ. मीनाक्षी त्यागी यांनी मानले.
चौकट –
साखर उद्योगाची ओळख ऊर्जा उद्योग म्हणून होईल – हर्षवर्धन पाटील

भारतात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन होते. ऊसापासून साखर निर्मिती केली जाते. जागतिक पातळीवर साखर उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. परंतु विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात खूप संशोधन होत आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगातही फार मोठे बदल होत आहेत. ऊसाच्या मळी पासून इथेनॉल निर्मिती करून त्याचा वापर जैव इंधन म्हणून तसेच ऊर्जा निर्मितीसाठी होऊ शकतो. पुढील काळात हे नवीन तंत्रज्ञान भारतात आणून ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी सरकारकडून पुढील धोरण आखण्यात येत आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमुळे साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था मिळून ऊर्जा उद्योग म्हणून नवी ओळख निर्माण होईल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

कात्रज परिसरात बेफाम अवैध धंद्यांना राजकीय अभय ?

पुणे- तरुणाई व्यसनी कशी होईल, गुन्हेगारीकडे कशी वळेल असा दृष्टीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात सर्रास अवैध धंदे बेफामपणे चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी गावठी दारूसह अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.जागा बळकावणे, अनधिकृत बांधकामे करणे यासह दारूचे धंदे येथे धनाढ्य राजकीय हस्तकांनी चालविल्याने त्यांची दहशत येथे पसरलेली दिसते आहे.
अनधिकृत लॉटरी सेंटर हे सर्रास सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कात्रज-दत्तनगर रस्ता परिसरांसह अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. अनेक वॉईन शॉप बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे.मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कृष्णसागर हॉटेलच्या समोरील बाजूस गावठी दारूचा व्यवसाय चालतो. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांगडेवाडी गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.सर्पोद्यान पासून पुढे गेल्यावर कात्रजच्या प्रमुख चौकापासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट होतो आहे. वर्षानुवर्षे नाल्याच्या कडेला चालणाऱ्या बिअर शॉपी आणि शेजारील रेस्टॉरंट पासून याची सुरुवात झाली अन ती संपूर्ण कात्रज परिसरात पोहोचली कात्रज चौक आणि इतर ठिकाणी दुकानांना पडदे लावून सरकारमान्य गेम आणि ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टे, सोरट, जुगार, अशा प्रकारचे अवैध धंदे बिनधास्त सुरु असतात. त्यामुळे अवैध धंद्यांना राजकीय अभय आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्सास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. संतोषनगर, अंजलीनगर, कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर, साईनगरसह समाविष्ट गावांत हे पदार्थ सहज मिळतात.मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करण्यासारखे प्रकार वाढीस लागले असून कात्रज चौक, मुंबई महामार्ग, राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ रस्त्यावरच मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सशस्त्र टोळक्याने रात्री अपरात्री दहशत माजवण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. नुकताच संतोषनगर परिसरात किरकोळ कारणांवरून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता.

प्रत्येक वेळी जेव्हा कोणी मला विचारले की मी मोठी झाल्यावर मला काय बनायचे आहे, तेव्हा माझे एकच उत्तर होते – मला एक्टर व्हायचे आहे! – शरवरी

बरं, हे पूर्ण करण्यापेक्षा सांगणं सोपं आहे… अनेक वर्षांचा संयम, कलाकुसरीच्या प्रेमासाठी आग पेटवत राहणं, माझ्या कौशल्याचा आदर करणं, माझ्या असुरक्षिततेवर नियंत्रण ठेवणं, आत्म-शंका आणि आत्मनिरीक्षणाच्या दिवसांतून जाणं, त्या उदासीन भावनेतून बाहेर पडणं, कारण चांगले … तो एक प्रकल्प मिळविण्यासाठी स्टार्स ला खरोखर संरेखित करावे लागते .. जे तुम्हाला सर्वोत्तम करण्यासाठी सक्षम करते.

मी या सुंदर इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही पाठिंब्याशिवाय आले आहे, मला पूर्ण माहिती आहे की मी करत असलेला प्रत्येक चित्रपट मला टिकून राहण्यासाठी हिट किंवा प्रशंसा मिळवणे आवश्यक आहे.असे वाटेत की मार्गदर्शक भेटले ज्यांना मी खरोखर माझे पालक देवदूत म्हणू शकते. निखिल अडवाणी सर तुम्ही माझे मार्गदर्शक आहात.. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला.. तुम्ही मला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले आणि तुम्ही मला #वेदा दिला!

मला माहित नाही की जर तुम्ही आणि हा विशेष चित्रपट माझ्यासोबत नसता तर मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी इतका आत्मविश्वास आणि उत्साह असता किंवा नाही
झी स्टुडिओ आणि एमे एंटरटेनमेंट : मला या सर्जनशील ठिकाणाचा एक भाग बनवल्याबद्दल धन्यवाद ज्याला मी आता माझे कुटुंब म्हणते. जॉन: प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तू एक्शन चा  बाप आहेस आणि चित्रीकरणातून तू माझा नॉर्थ स्टार झाला आहेस. मला आनंद आहे की मी आता तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर तुमचा सल्ला घेऊ शकेन 

तुमच्यामुळे मी आणखी एक दिवस लढण्यासाठी जगते . तुमच्यामुळे मी आणखी एक दिवस स्वप्न पाहण्यासाठी जगते . मी वचन देते की मी तुम्हाला निराश करणार नाही.

प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. नंबर 1 वर ट्रेंड होत असलेला #वेदाचा टीझर पाहणे खूप आनंददायी आहे! ते अतिवास्तक आहे. माझा प्रवास किकस्टार्ट व्हावा अशी मला नेहमीच इच्छा होती … आणि तो इथून सुरु होते 

12 जुलैला सिनेमागृहात भेटूया 

https://www.instagram.com/p/C4zgw6JxU0v/?igsh=MThlNGx1bjdzOGRuNQ==

तमन्ना भाटिया दिसणार ” डेअरिंग पार्टनर्स ” मध्ये !

 पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया ही कायम फॅशन आणि तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्स मधून चर्चेत असते. नुकतच तिने तिच्या आगामी प्रोजेक्ट ची घोषणा केली या बद्दल ती म्हणते मी माझ्या आगामी प्रोजेक्ट ‘डेअरिंग पार्टनर्स’ बद्दल खूप उत्साहित आहे. ज्यामध्ये डायना पेंटीसोबत स्क्रीन शेअर करत आहे. 

‘डेअरिंग पार्टनर्स’ ही दोन जिवलग मित्रांची कथा आहे जे अल्कोहोल स्टार्ट-अपचे भागीदार म्हणून एक धाडसी प्रवास सुरू करतात. याची कथा खूप सुंदर लिहीली आहे. या प्रकल्पा बद्दल आता सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 

 अर्चित कुमार आणि निशांत नाईक दिग्दर्शित ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये जावेद जाफरी यांचीही भूमिका आहे. चित्रपटाचे लेखन नंदिनी गुप्ता, मिथुन गंगोपाध्याय आणि आर्ष व्होरा यांनी केले आहे. ‘डेअरिंग पार्टनर्स’च्या पलीकडे तमन्ना यावर्षी अनेक मनोरंजक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीकडे तेलगूमध्ये ‘ओडेला 2’, हिंदीमध्ये वेदा आणि तमिळमध्ये ‘अरनमानाई 4’ मध्ये ती दिसणार आहे.