मर्जीतील निवडणूक आयुक्त,विरोधकांची बेकायदा कोंडी तरीही चित्र तेच,’ आत्मविश्वास गमावलेले मोदी’
पुणे : कर चुकवेगिरीच्या प्रकरणाचा त्वरीत निकाल लावावा ही आमची मागणी नाकारली जात आहे. संबधित यंत्रणेने आमची खाती गोठवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायिक प्रकरणांमध्ये काँग्रेसला अडकवण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
काँग्रेस भवनमध्ये चव्हाण यांनी या विषयावर पत्रकारांबरोबर संवाद साधला. पुणे शहर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कर चुकवला म्हणून काँग्रेसवर वेगवेगळ्या खात्यांची कारवाई सुरू आहे. काँग्रेसने याबाबत संबधित प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे, मात्र निकाल न देता त्यांनी काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवली आहेत.
चव्हाण म्हणाले, यातील एक प्रकरण ९ वर्षांपूर्वीचे तर दुसरे तब्बल ३० वर्षांपूर्वीचे आहे. जमा न केलेला कर भरण्यास काँग्रेस तयार आहे, मात्र ती रक्कम दंड लावून अवाजवी वाढवण्यात आली आहे. आम्ही प्राधिकरणाकडे दाद मागितली, मात्र त्यांनी खाती गोठवण्याची कारवाई केली. त्याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली तर न्यायालयाने प्रथम प्राधिकरणाचा निकाल येऊ द्या, मगच आमच्याकडे या असे सांगितले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची आर्थिक कोंडी करण्याचा हा प्रकार आहे.
केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर
भारतीय जनता पक्ष त्यांचा जिंकण्याचा आत्मविश्वास हरवून बसला आहे. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर, बेकायदेशीर कारवाया, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना कारवाईची धमकी देऊन पक्षात घेणे असे प्रकार सुरू आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आम्ही देशभरात निवडणूक लढतो आहोत, अशा स्थितीत खातीच गोठवून ठेवली तर आम्ही करायचे तरी काय असा प्रश्न चव्हाण यांनी केली. साधा १० रूपयांचा धनादेशही आम्ही आज वटवू शकत नाही, उमेदवारांना आर्थिक मदत करणे तर दूरच, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार नाही तर दुसरे काय आहे असे चव्हाण म्हणाले.
निवडणूक रोख्यांचा कायदा करून तिजोरी भरली-
देशाला याची कल्पना यावी यासाठी काँग्रेस देशस्तरावर या विरोधात आवाज उठवत आहे. त्यांना जिंकून येण्याची खात्री नाही, आम्हाला जनतेचे पाठिंबा मिळेल याची भीती आहे, त्यामुळेच हा सर्व प्रकार सुरू आहे. आम्हाला निवडणूक लढवताच येऊ नये अशी स्थिती करून ठेवली आहे. स्वत: भाजपने मात्र निवडणूक रोख्यांचा कायदा करून स्वत:ची तिजोरी भरून घेतली आहे. आम्ही या कायद्याला सुरूवातीपासून विरोध केला, मात्र पाशवी बहुमतावर त्यांनी तो मंजूर करून घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने हा कायदाच घटनाबाह्य ठरवला आहे असे चव्हाण यांनी सांगितले.
आम्ही लढाई लढतोच आहे, मात्र प्राधिकरणाचा निकाल, त्यानंतर न्यायालयात दाद या सगळ्यात निवडणुका संपतील. तेच त्यांना अपेक्षित आहे, मात्र आता जनतेनेच आता याविरोधात आवाज उठवावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. ही लोकसभा निवडणूकच भारतीय लोकशाही वाचवण्यासाठीची आहे असे समजूनच आम्ही लढतो आहोत, जनतेने पाठिंबा द्यावा असे ते म्हणाले.