पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडका लागला आहे. राज्य सरकारने परिमंडळाचे उपायुक्त संतोष वारुळे, आशा राऊत आणि क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त चेतना केरूरे यांची बदली केली. महापालिकेत ३१ मार्चपूर्वी कामे संपविण्याची गडबड सुरु असताना अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.एका जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा जास्त नोकरी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. आज वारुळे, राऊत आणि केरूरे यांची बदली करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली आहे. सध्या रवींद्र बिनवडे हे जुने अतिरिक्त आयुक्त आहे. आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच महापालिकेचा कार्यभार स्वीकारला असून, सध्या ते विभागनिहाय माहिती घेत आहेत.
३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत असताना ठेकेदारांनी केलेल्या कामांची बिले मंजूर करून पैसे जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयासह महापालिका भवनात गडबड सुरु आहे. पण प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण त्याचा परिणाम कामकाजावर झाला आहे.राजेंद्र भोसले यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी विभागप्रमुखांनी बैठक घेऊन शहरातील कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आयुक्तांनी महापालिकेच्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील किरकोळ स्वरूपाची माहिती मागितली असता अधिकाऱ्यांना ही सांगता आली नाही. त्यामुळे आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करत कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले.