पुणे- तरुणाई व्यसनी कशी होईल, गुन्हेगारीकडे कशी वळेल असा दृष्टीने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात सर्रास अवैध धंदे बेफामपणे चालू आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, भितीमुळे कोणीही समोर यायला तयार नाही. अनेक ठिकाणी गावठी दारूसह अंमली पदार्थांची विक्री होताना दिसत आहे.जागा बळकावणे, अनधिकृत बांधकामे करणे यासह दारूचे धंदे येथे धनाढ्य राजकीय हस्तकांनी चालविल्याने त्यांची दहशत येथे पसरलेली दिसते आहे.
अनधिकृत लॉटरी सेंटर हे सर्रास सुरू असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. कात्रज-दत्तनगर रस्ता परिसरांसह अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु आहेत. अनेक वॉईन शॉप बाहेरील टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा आणि इतर अंमली पदार्थ मिळत असल्याचे समोर आले आहे.मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलांमध्ये सहज उपलब्ध होत असल्याने गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. टोळक्याने गांजा ओढण्यात येतो, असे नागरिक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात. कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील कृष्णसागर हॉटेलच्या समोरील बाजूस गावठी दारूचा व्यवसाय चालतो. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांगडेवाडी गावातही गावठी दारू बनविण्यात येत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.सर्पोद्यान पासून पुढे गेल्यावर कात्रजच्या प्रमुख चौकापासून अवैध धंद्यांचा सुळसुळाट होतो आहे. वर्षानुवर्षे नाल्याच्या कडेला चालणाऱ्या बिअर शॉपी आणि शेजारील रेस्टॉरंट पासून याची सुरुवात झाली अन ती संपूर्ण कात्रज परिसरात पोहोचली कात्रज चौक आणि इतर ठिकाणी दुकानांना पडदे लावून सरकारमान्य गेम आणि ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या नावाखाली बेकायदा सट्टे, सोरट, जुगार, अशा प्रकारचे अवैध धंदे बिनधास्त सुरु असतात. त्यामुळे अवैध धंद्यांना राजकीय अभय आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
वाढलेल्या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. यामध्ये अल्पवयीन मुले तसेच सराईत गुन्हेगारांचा समावेश दिसून येतो. बंदी असताना मिळणारा सर्सास गुटखा सोबतच मिळणारे नशांचे विविध पदार्थ हे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. संतोषनगर, अंजलीनगर, कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर, साईनगरसह समाविष्ट गावांत हे पदार्थ सहज मिळतात.मोकळ्या जागांमध्ये मद्यपान करण्यासारखे प्रकार वाढीस लागले असून कात्रज चौक, मुंबई महामार्ग, राजमाता जिजाऊ उद्यानाजवळ रस्त्यावरच मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहेत. सशस्त्र टोळक्याने रात्री अपरात्री दहशत माजवण्याचेही प्रकार यापूर्वी घडले आहेत. नुकताच संतोषनगर परिसरात किरकोळ कारणांवरून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता.