
वीरपत्नी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडीक यांचा विशेष सन्मान
पुणे –
ज्यांच्या प्राणांच्या आहुतीमुळे आज आपल्या सर्वांचे जीवन प्रकाशमय आहे, अशा शहीद जवानांचे स्मरण आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांच्या देहूरोड येथील निवासस्थानी शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे दिवाळीनिमित्त स्मरण करण्यात आले यावेळी स्वाती महाडिक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. निवासस्थान परिसराची स्वच्छता करून भारतमातेची प्रतिकृती असलेली रांगोळी साकारण्यात आली. शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लेफ्टनंट कर्नल स्वाती संतोष महाडिक यांच्या उपस्थितीत शेकडो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले. यावेळी अमित बागुल यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक यांचा शाल, लक्ष्मीमातेची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे पदाधिकारी घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, सागर बागुल, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, तसेच अभिषेक बागुल, धनंजय कांबळे, विजय बिबवे ,इम्तियाज तांबोळी, पप्पू देवकर, गणेश पवार, गणेश खांडरे, गोरख मरळ, सोमनाथ कोंडे ,महेश ढवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल स्वाती महाडिक म्हणाल्या की, आम्ही दिवाळी साजरी करणार नव्हतो;पण पुण्यातील या युवकांनी परवानगी मागितली आणि ते इथे आले. स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी प्रज्वलित केलेल्या शेकडो पणत्या पाहून मला शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्यासमवेतील दिवाळीचे स्मरण होत आहे.खरंच असा हा उपक्रम शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी महत्वपूर्ण आहे. तर संयोजक अमित बागुल म्हणाले अभूतपूर्व साहस, जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर प्रतिकूल निसर्ग आणि अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत, आपल्या जिवाची तमा न बाळगता ‘छोडो मत उनको!’ असं म्हणत शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान! …पण शहीद झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे काय ?त्यांची दिवाळी कशी यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये. दिवाळीनिमित्त या कुटुंबियांसमवेत काही क्षण व्यतीत करावे आणि शहीद जवानांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या अगोदर,शहीद पोलीस अधिकारी अशोक कामठे यांच्या निवासस्थानी दोन वेळा दिवाळी तर शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या सातारा जिल्ह्यातील ,शहीद चंदू चव्हाण यांच्या धुळे जिल्ह्यातील निवासस्थानी शौर्य गुढी उभारण्यात आलेली आहे.